स्वातंत्र्य असावं, स्वैराचार नसावा – युगंधरा वळसंगकर, गृहिणी
दीपिका पदुकोणने ‘माय लाइफ माय चॉइस’ या व्हिडीओमध्ये मांडलेल्या विचारांचं मी समर्थन करणार नाही. मला ते विचार पटले नाहीत. निसर्गाचे काही नियम आहेत. त्या नियमांचं उल्लंघन केलं तर नुकसानच होतं. उदाहरण द्यायचं झालं तर, वयात आलेल्या मुलीला शारीरिक आकर्षणामुळे संबंध ठेवावेसे वाटले आणि त्यातून ती गरोदर राहिली तर ते हानिकारक आहे, कारण यासाठी आवश्यक असणारी बौद्धिक आणि शारीरिक वाढ त्या मुलीची झालेली नसते. ‘माय चॉइस’ असं म्हणत तुम्ही स्वातंत्र्याच्या गोष्टी करताय; पण हे स्वातंत्र्य नसून स्वैराचार आहे. स्वातंत्र्य आणि स्वैराचार यात गफलत करू नये. प्रत्येकाची सामाजिक बांधीलकी असते. व्हिडीओमध्ये मांडले गेलेले विचार हे आताच्या काळात बसणारे नाहीत असं मला वाटतं. अशा विचारांनी एखादी मुलगी वागली, तर समाज काय, पण तिच्या घरातूनच तिला स्वीकारलं जाणार नाही. करिअर, लग्नासाठी मुलगा निवडणं, नोकरी करणं-न करणं इथवर चॉइस असणं स्वाभाविक आहे; पण त्यापुढे ‘माझं-माझं’ असा विचार करणं, तोही शारीरिक संबंधांशी निगडित विचार करणं न पटण्यासारखं आहे. आजची स्त्री प्रॅक्टिकल विचारांची आहे, असं म्हणतात. प्रॅक्टिकल जरूर असावं, पण त्यालाही काही मर्यादा असावी. बंधन फक्त स्त्रीलाच नाही, तर पुरुषालाही असावं, तरच स्त्री-पुरुष समानता आहे, हे दिसून येईल.
गैरसमजुतींना खतपाणी – सॅम्युअल डायस, नोकरी
दीपिका पदुकोण सारख्या सिने कलाकारांना सगळ्यांकडून फॉलो केलं जातं. कलाकारांची देहबोली, वागण्या-बोलण्याकडे तरुणाईचं बारीक लक्ष असतं. त्यामुळे दीपिकाने व्हिडीओमध्ये जे केलं, सांगितलं ते सर्व काही योग्य आहे, असा समज तरुण करू शकतात. स्त्रीला स्वातंत्र्य आहे मान्य आहे, पण त्याचा अर्थ असा नाही की सिगारेट, अल्कोहोलच समर्थन करावं. आयुष्य अशाच प्रकारे जगायचं असतं, अशीही समजूत होऊ शकते. चाहत्यांवर या गोष्टींचा परिणाम होतो. कलाकारांना रोल मॉडेल मानलं जातं. व्हिडीओमध्ये मांडलेले विचार वैयक्तिक विचार आहेत. तुमचे वैयक्तिक विचार मांडण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला नक्कीच आहे. ते नाकारलं जात नाहीय, पण ते अशा प्रकारे मांडून काय साध्य होईल? सिगरेट, अल्कोहोल माझा चॉइस हे सांगून अशा गोष्टींसाठी प्रवृत्त करताय का, किंबहुना त्यातून तसाच अर्थ निघताना दिसतो. जर एखाद्या मुलीने तिच्या वडिलांना सांगितलं की, सिगरेट, अल्कोहल चुकीचं नाही, कारण दीपिका सांगते तर ते योग्यच असणार, तर त्याचे परिणाम काय होऊ शकतात याचाही विचार केला पाहिजे. व्हिडीओमधला स्वातंत्र्याचा मुद्दा बाजूला सारून इतर अनेक मुद्दय़ांकडे लक्ष वेधलं जाण्याचीच शक्यता अधिक आहे. शेवटी, ‘स्वत:ला सोयीस्कर उचललं जाणं’ं ही भारतीय संस्कृतीची मानसिकताच आहे.
संकल्पना समजून घ्यायला हव्यात – सायली कुलकर्णी, शिक्षिका
आपल्या देशात वैयक्तिक स्वातंत्र्य आहे, पण ते कसं जपायचं, उपभोगायचं हे जास्त महत्त्वाचं आहे. दीपिकाच्या व्हिडीओमधली मतं आजच्या काळाला अनुरूप अशी अजिबात नाहीत असं वाटतं. त्या व्हिडीओमध्ये मांडलेले तिचे विचार हे समाजाकडून सहजरीत्या स्वीकारले जाऊ शकत नाहीत. हे समाजाला घातकच आहे. लग्नव्यवस्था अस्तित्वात येण्यामागे अनेक महत्त्वाची कारणं आहेत. त्याचा विचार झाला पाहिजे. ‘माय लाइफ माय चॉइस’ या व्हिडीओमध्ये मांडलेले विचार मला पटलेले नाहीत. कोणतेही विचार मांडताना प्रत्येकाने आपली सदसद्विवेकबुद्धी जागरूक ठेवावी. दीपिका पदुकोण अभिनेत्री म्हणून चांगली आहेच, पण ती आता ‘हा माझा चॉइस आहे,’ असं म्हणत असेल, तर तिच्या स्वातंत्र्यावर आपण घाला घालू शकत नाही; पण आदर्श म्हणून तुम्ही तिचा विचार करणार का हे तुमच्यावर अवलंबून आहे. ते आपण अंगीकारायचं का, किंबहुना ते शक्य आहे का याबाबतची पडताळणी करायला हवी. ‘स्त्री किती श्रेष्ठ आहे’ अशी महती सांगणारे संदेश सध्या मोठय़ा प्रमाणावर पसरत आहेत. त्याचा अतिरेक होताना दिसतोय. ही एक लाट आहे असं म्हणता येईल, पण अशा संदेशांमधून चुकीचा अर्थ काढू नये. आपल्या संस्कृतीतील अनेक संकल्पनांना आताच्या मुली विरोध करतात. त्या समजून घेऊन प्रॅक्टिकल राहायला हवं. मुक्त जगणं असतं हे मुक्तच असावं, पण तिथे अस्पष्ट लक्ष्मणरेषा घालून घेतली पाहिजे. तरच ते संबंध दीर्घकाळापर्यंत दृढ राहतात.