स्वातंत्र्याबरोबर जबाबदारीचं भान महत्त्वाचं

दीपिका पदुकोनचा ‘माय लाइफ, माय चॉइस’ हा व्हिडीओ सोशल साइट्सवर वाऱ्याच्या वेगाने पसरला. त्यात मांडलेले विचार काहींना पटले, तर काहींना नाही. अशाच काही तरुणांची रोखठोक मतं.

lp23विश्वास महत्त्वाचा – प्रांजली भोयर, स्पर्धा परीक्षा विद्यार्थिनी
‘ माय लाइफ माय चॉइस’ हा व्हीडिओ एक चांगला ‘प्रयत्न’ आहे. पण त्यात सर्व स्त्रियांचा चॉइस किंवा प्राधान्य असलेल्या गोष्टी येत नाहीत. व्हीडिओचे नावच ‘माय चॉइस’ असल्याने तो व्हीडिओ करण्याची निवड दीपिकाची वैयक्तिकच म्हणावी लागेल. मग यात चर्चा, टीका किंवा पाठिंबा यांचा प्रश्न उरतोच कुठे? दुसरी गोष्ट म्हणजे यात फक्त ‘माझी निवड’ आहे असे म्हटलंय, याचा अर्थ हे सगळे करायलाच हवे किंवा केले जाईलच असे नाही. कुठल्याही धर्मातील लग्नसंस्था ही परस्परातील विश्वासावर आधारित असते. त्यामुळे एकदा लग्न झाले की यात विश्वास सर्वात महत्त्वाचा आहे.

lp27दोन्ही बाजूंचा विचार महत्त्वाचा – सुवर्णा क्षेमकल्याणी, आरजे
दीपिका पदुकोनचा व्हिडीओ पाहिल्यानंतर मनात खूप काही येऊन गेलं. त्यातल्या सगळ्या गोष्टी जरी पटत नसल्या तरी सध्या स्त्रियांवर होणारे अत्याचार, मानसिक छळ पाहिल्यावर स्त्रियांना मनच नाहीये का, त्यांची स्वत:ची अशी ओळख नाहीये का, असे प्रश्न पडले. मुलीला लहानपणापासून कुठलंही काम करताना कुणाची तरी परवानगी घेऊनच करावे लागते. स्त्री असल्यामुळे तिनेच प्रत्येक वेळी समजून घ्यायला हवं हा दृष्टिकोन समाजात अजूनही आहे. दीपिकाने स्पष्टपणे एका स्त्रीला काय हवं असतं ते मांडलं आहे. अर्थात प्रत्येक स्त्रीला तेच हवं असेल असं नाही. महिलांना आत्मविश्वास, आदर, प्रेम हवं असतं; मात्र ते मिळवण्यासाठीदेखील आयुष्य निघून जातं. आपण आज फॉरवर्ड झालोय असं म्हणतो, पण कुणी जरा वेगळं करण्याचा प्रयत्न केला तर लगेच समाजाकडून आक्षेप घेतला जातो. मग ते कपडय़ांबाबत असो, नोकरीबद्दल असो किंवा लग्नाबद्दल असो. तिने चांगलं बोलायला हवं, चांगलं वागायला हवं, पण तिला मात्र अपेक्षित वागणूक मिळते का; हा प्रश्न उरतोच. विवाहबाह्य़ संबंध मला पटत नाहीत; परंतु लग्न ठरवताना मुलींच्या मनाचा विचार व्हायलाच हवा. लग्नानंतर तिची आवड तिला जपता आली पाहिजे. लग्न म्हणजे तिच्यासाठी पिंजरा असू नये. तिला तिच्या मुक्त जगात स्वच्छंदपणे विहरता यायला हवं. एकूणच महिलांना त्यांच्या मनाप्रमाणे जगता यायला हवं तितकं स्वातंत्र्य असावं, मात्र स्वैराचार नसावा.

lp24हक्कासह जबाबदारीही येते – चेतन बाविस्कर, स्पर्धा परीक्षा विद्यार्थी
कोणत्याही कलाकृतीत कोण आहे यावरही अनेक गोष्टी अवलंबून असतात. विशेषत: त्यात लोकप्रिय कलाकार असतील तर ती कलाकृती प्रभावी वाटू शकते. ‘माय लाइफ माय चॉइस’ व्हीडिओचंही तसंच झालं. त्यामध्ये दीपिका पुदकोणसारखी बॉलीवूडची सुपरहिट अभिनेत्री असल्याने त्याचा प्रभाव चांगला पडला. पण कदाचित विशिष्ट वर्गापुरता मर्यादित. हा व्हीडिओ फारच महत्त्वाच्या विषयावर भाष्य करणारा आहे. मग सांगणारी दीपिका असोत वा आणखी कोणी. समाजातील स्त्रियांचा अधिकार हा विषय गंभीर आहे. एक गोष्ट फक्त लक्षात ठेवायला हवी की जेव्हा आपण निवडीचा हक्क मागतो त्याबरोबर जबाबदारीही येते. त्यामुळे आपल्याला काय हवं हे सांगताना त्याबरोबर येणाऱ्या जबाबदारींचं भान असणंही तितकंच किंबहुना त्यापेक्षा महत्त्वाचं आहे.

lp28सहमत आहे -चेतन केकडे, टेलिकॉम इंजिनियर
वर्षांनुवर्षे पुरुषप्रधान संस्कृती व पुरुषांचे अत्याचाराविरुद्ध ‘आता निवड माझीच’ असा स्त्रीघोष हा व्हीडिओ करतो. स्त्रियांना गृहीत धरणे आणि आपली मत त्यांचावर लादणे थांबायलाच हवे. ‘माय चॉइज’मधल्या विचारांशी मी सहमत आहे. एखाद्या मुलीला तिच्या आवडीचा पेहराव प्रसंगावधानाने करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. स्त्रियांचे पेहराव उत्तेजक नसतात, पण पुरुषांचे त्यामागचे विचार चुकीचे असतात. तसेच तिचे सेक्स लाइफ ही तिची वयक्तिक बाब आहे. पण एकदा का लग्न ‘बंधन’ म्हटले की ‘लॉयल्टी’ हवीच! तसेच मुलाच्या जन्माविषयीचा निर्णयही दांपत्याचा निर्णय असतो, कुणा एकाचा नव्हे. एकाचा नसायलाच हवा.

lp30स्वातंत्र्य असायलाच हवे – स्वप्निल गर्गे, रिसर्च एक्झिक्युटिव्ह
सोशल नेटवर्किंग साइटवर दीपिका पदुकोनचा व्हिडीओ बघितला आणि आवडलासुद्धा. केवळ आवडलाच नाही तर मनापासून पटला. पुरुषांप्रमाणे स्त्रियांनादेखील स्वातंत्र्य मिळायला हवे. तिने काय घालावे, घरी कधी यावे यात तिला कोणी अडवण्याचा प्रश्नच नाही. जर एक मुलगा लग्नाआधी दहा मुलींबरोबर फिरला आणि अकराव्या मुलीबरोबर लग्न केले असेल तर त्याने चार मुलांबरोबर फिरलेल्या मुलीला स्वीकारायला काय हरकत आहे? उदाहरण द्यायचं तर मी जर असं केलं असेल तर तशाच परिस्थितीतल्या मुलीला मी स्वीकारेन. ती पार्टीला गेली आणि यायला उशीर झाला तर तिची काळजी वाटणं स्वाभाविक आहे. पण म्हणून पार्टीला जाण्यापासून तिला मी थांबवणार नाही. लग्नानंतर जर एकत्र कुटुंब असेल तर घरच्या लोकांमध्ये चांगला संवाद व्हायला हवा. त्यामुळे गैरसमज किंवा शंकांना जागाच उरणार नाही. माझं असं मत आहे की, वयाबरोबर आपण, आपले विचार प्रगल्भ होतात. एखादी मुलगी लग्नाआधी धूम्रपान करत असेल तर तीच मुलगी लग्नानंतर आपल्या बाळाला त्रास नको म्हणून ही सवय सोडण्याचा विचार करू शकेल किंवा करेल. तेवढी ती विचारांनी प्रगल्भ झालेली असू शकते. आपल्याला स्वातंत्र्य हवं म्हणून आपण स्वैराचाराने वागावे असे नाही. स्वातंत्र्य आणि स्वैराचार या दोन्ही गोष्टींमध्ये खूप फरक आहे.

lp25थोडीफार बंधनं हवीच – आदिती जाधव, एच.आर. एक्झिक्युटिव्ह
दीपिका पदुकोनचा व्हिडीओ मला फारसा आवडला नाही. कुठल्या रंगाचा ड्रेस घालावा, कुठल्या प्रकारचा घालावा या खरंतर क्षुल्लक गोष्टी आहेत. पण ते ठरवण्याचा अधिकार फक्त तिलाच आहे हेही मान्य करावं लागेल. त्यात कुठलेही बंधन तिला असण्याचे काहीच कारण नाही. पण लग्नानंतर विवाहबाह्य़ प्रेमप्रकरण करणे, शारीरिक संबंध ठेवणे, कधीही बाहेर जाणे, उशिरा पर
त येणे हे मात्र योग्य नाही. कामामुळे घरी यायला उशीर होत असेल तर ते स्वाभाविक आहे. पण विनाकारण उशीर करणे याला अर्थ नाही. स्त्रियांनी कुठलीच बंधने मानली नाहीत तर एकंदर समाजाला कसलाच धरबंध उरणार नाही. अशा तिच्या वागण्याने ती चांगला समाज कसा घडवणार? दुसरं अस की मतं तुम्ही कोणावर लादू शकत नाही. ज्यांना हे पटतं ते हा व्हिडीओ येण्याआधीच तसं वागत असणारच, आणि ज्यांना पटत नाही ते हा व्हिडीओ बघून नव्याने विचार करणार नाहीत.

lp29मर्यादा ओळखायला हवी – हेमश्री मंत्री, आरजे
विशिष्ट व्हिडीओ आवडणं, न आवडणं हा विषय व्यक्तिसापेक्ष आहे. एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असतो. त्यांच्या मतांशी जुळेल असाच अर्थ प्रत्येक जण त्या विषयाशी जोडत असतो. तसंच त्याच्याशी संबंध जोडतो. दीपिका पदुकोनच्या ‘माय लाइफ माय चॉइस’ या व्हिडीओमधून एक मुख्य विचार पुढे आला तो असा की, कोणत्याही स्त्रीला कोणीही गृहीत धरू नये. तिला स्वत:चं वैयक्तिक आयुष्य आहे. ती स्वतंत्र आहे. केवळ स्त्री आहे म्हणून पुरुषाच्या दबावाखाली राहणं म्हणजे स्वत:ला नगण्य मानणे. यातून आपण काय घ्यायचे हे शेवटी आपणच ठरवले पाहिजे. लग्नाबाहेर प्रकरण असणं मला पटत नाही. किती पुढे जायचं आणि कुठे थांबायचं हे ज्याने-त्याने ठरवायलाच हवं. ‘चॉइस’ प्रत्येकाला आहे. काय चांगलं आणि काय वाईट ते आपणच ठरवायचं आहे. शेवटी कुठल्याही स्वातंत्र्याला मर्यादा असतेच आणि ती मर्यादा आपण ओळखायला हवी.

lp26दीपिकाची निवडच चुकीची -आरती भागवत, जर्मन लॅग्वेज ट्रेनर
फेमिनिझम विषय हाताळण्याच्या प्रयत्नाचा हा व्हीडिओ म्हणजे ‘बॅड चॉइस’ म्हणावा लागेल. शिक्षण, पोषण, करिअरसारख्या असंख्य मूलभूत प्रश्नांविषयी चॉइस असण्याची स्त्रीवर्गाला आज अधिक गरज आहे. उदाहरणार्थ, बाळ झाल्यावर नोकरी करण्याची निवड माझी असायला हवी किंवा कॉसमेटिक्सपेक्षा पुस्तकांवर खर्च करण्याची माझी निवड असेल. निवड ही निव्वळ काय कपडे घालायचे किंवा कुणाबरोबर शारीरिक संबंध करायचे यापेक्षा कितीतरी प्रमाणाने इतर मूलभूत गोष्टींची निवड करण्याचा हक्क असायला हवा. या व्हिडीओसाठी दीपिकाची ‘निवड’ हीच घोड चूक आहे. यापेक्षा पुरुषप्रधान संस्कृतीचे चटके रोज सोसणारे सामान्य चेहरे निवडले असते तर तो व्हीडिओ जास्त परिणामकारक झाला असता. व्हीडिओतील ‘मला हवे ते करेन, तुमचे काय जाते’चा रोख उन्मत्त वाटतो.

Story img Loader