मथितार्थ
भारतरत्न प्रदान करण्याची घोषणा सरकारने केल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ज्येष्ठ वैज्ञानिक प्रा. सीएनआर राव यांनी सरकारच्या वर्तणुकीवर जोरदार टीका केली. तेवढय़ावरच ते थांबले नाहीत, तर आपल्या कडवट टीकेमध्ये त्यांनी राजकीय नेतृत्वामध्ये असलेला देशभक्तीचा अभाव, विज्ञानाला कमी लेखण्याची वृत्ती आणि नियोजनशून्यता याबद्दल अक्कलशून्य म्हणत त्यांच्यावर जोरदार प्रहारच केला. आर्थिक विकासाचा वाढत जाणारा दर आणि उसळी घेणारा सेन्सेक्स म्हणजे प्रगती किंवा महासत्तेच्या दिशेने जाणे नव्हे, असे म्हणत भारतरत्न जाहीर झालेल्या या द्रष्टय़ा संशोधकानेच सरकारचे कान टोचले.
खरे तर पुरस्कार देणाऱ्याच्या विरोधात सर्वसाधारणपणे बोलले जात नाही किंवा टीका केली जात नाही, कारण तो औचित्यभंग किंवा संकेतभंग समजला जातो, पण याची पक्की खूणगाठ मनात बांधलेले राजकारणी मग त्याच संकेतांचा वापर अप्पलपोटेपणासाठी करतात. पुरस्कार दिला, की साहित्यिक, वैज्ञानिक आणि समाजातील विचारवंत मग सरकारवर टीका करणार नाहीत, असे त्यांना वाटते; किंबहुना म्हणूनच पुरस्कार देत त्यांचे तोंड गप्प केले जाते. अर्थात पुरस्कार घेतल्यानंतर किंवा स्वीकारल्यानंतरही सरकारवर टीका करण्यासाठी स्वत:कडे तेवढे स्वत्व आणि सत्त्व असावे लागते, पण अनुभव असा आहे की, अलीकडच्या साहित्यिक, विचारवंतांकडे ते अभावानेच आढळते. त्यामुळे अलीकडे अशी कडवट टीका कुणी केल्याचा अनुभव तसा कमीच येतो. मराठी समाज किंवा महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचे तर टीका केल्यानंतर कोणत्याही शासकीय गोष्टीसाठी आपली निवड होणार नाही, हे पक्के ठाऊक असतानाही सरकारवर कडवट टीका करणाऱ्या विचारवंतांची एक फळीच होती. त्यात दुर्गा भागवत, विंदा करंदीकर, पुलं, कुसुमाग्रज, विजय तेंडुलकर आदींचा समावेश होता. या पाश्र्वभूमीवर प्रा. सीएनआर राव यांनी केलेली टीका खूप महत्त्वाची ठरते. केवळ टीका करून ते थांबले नाहीत तर प्रगतीसाठी किंवा महासत्तेच्या दिशेने जाण्यासाठी काय करायला हवे, तेही त्यांनी सांगितले.
महासत्तेच्या स्पर्धेत आपल्यासोबत चीन आहे, असे मानले जाते. मात्र चीन खूप पुढे आहे, कारण पराकोटीची मेहनत घेण्याची क्षमता त्यांच्यात आहे, याची जाणीव त्यांनी करून दिली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे केवळ शिक्षण आणि विज्ञान यांच्याच बळावर महासत्ता होता येते, असे त्यांनी ठणकावून सांगितले. शिक्षणासाठीची गुंतवणूक ही सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या सहा टक्के, तर विज्ञानावरची किमान दोन टक्के असायला हवी. याबाबतीत प्रा. राव यांनी करून दिलेली जाणीव महासत्तेचे स्वप्न पाहणाऱ्या  प्रत्येक भारतीयास विचार करायला लावणारी आहे, कारण हीच गुंतवणूक आपल्याकडे अनुक्रमे दोन टक्के आणि एक टक्का एवढीच आहे. विज्ञानाला दिला जाणारा तुटपुंजा निधी यावर त्यांचा सारा रोख होता. प्राधान्यक्रम कोणता व कसा असायला हवा, याचे भान राज्यकर्त्यांना नाही. म्हणून त्यांनी त्यांची संभावना ‘इडियट्स’ अशी केली. प्रा. राव यांच्या टीकेचा मथितार्थ काढायचा तर असे म्हणता येईल की, केवळ मंगळावर यान पाठवून महासत्ता होता येत नाही, तर त्यासाठी विज्ञान तुमच्या समाजाच्या नसानसांत मुरलेले असावे लागते. केवळ विज्ञान शिकून उपयोग नसतो, तर माणूस विज्ञानसाक्षर असावा लागतो. शिक्षणाने माणूस साक्षर होतो त्याचबरोबर तो सुसंस्कृत होणे अपेक्षित असते. त्याचप्रमाणे विज्ञानसाक्षर झाल्यानंतर त्याने ते प्रत्यक्ष आयुष्यात अवलंबणे अपेक्षित असते, पण भारतात सध्या दिसणारे चित्र हे नेमके त्याच्या उलट आहे. अन्यथा एका डेंग्यूच्या डासाने तमाम भारतीयांना एवढे हैराण केले नसते.
सध्या सर्वच पक्षांच्या सर्व राजकारण्यांना चढला आहे तो निवडणूकज्वर. त्या ज्वराची लागण झालेल्या मंडळींचा सध्या कुठे कलगीतुरा रंगतो आहे, तर कुठे सुरू आहे शिमगा. या निवडणूकज्वराच्या बेधुंद नशेत डेंग्यूच्या ज्वराकडे मात्र पुरते दुर्लक्ष झाले असून त्यामुळेच त्याने बळी घ्यायला सुरु वात केली आहे. बळींची संख्या सातत्याने वाढते आहे आणि त्याला रोखण्यात या महासत्तेचे स्वप्न पाहणाऱ्या देशाला अपयशच येते आहे हे जळजळीत वास्तव आहे. मंगळयान प्रत्यक्षात मंगळाच्या कक्षेत यशस्वीरीत्या पोहोचले तरी डेंग्यूचा उतारा तिथे सापडणार नाही. त्याचा उतारा याच इथे भूतलावर विज्ञानसाक्षरतेमध्ये दडलेला आहे. महासत्ता धडधाकट असायला हवी तर त्यासाठी निरोगी आरोग्याची कास धरायला हवी आणि त्याचा मार्ग विज्ञानशिक्षण आणि त्याच्या उपयोजनेतून जातो, कारण त्याचा अवलंब केला नाही, तर त्यातून मनुष्यहानी आणि वित्तहानी होतच राहणार आहे. आजारी पडलेला माणूस स्वत:च्या आरोग्यावर पैसे खर्च करतो आणि त्याचा परिणाम त्याच्या स्वत:च्या आर्थिक अंदाजपत्रकावर होतोच, पण त्याच वेळेस त्याच्या आजारी पडण्यामुळे व कामावर न जाण्यामुळे देशाच्या उत्पादन क्षमतेतही फरक पडतो. अशा प्रकारे रु ग्णांची संख्या वाढत जाते तेव्हा त्याचा दुहेरी फटका देशाला बसतो. माणसे दगावणे हेही देशासाठी काही चांगले लक्षण नाही.
भारतासारख्या देशात माणसे कशामुळे दगावतात याचा शोध घेतला, तर काही धक्कादायक निष्कर्ष विविध सर्वेक्षणांमधून आपल्या हाती लागतात. कुणाला असे वाटू शकते की, सध्याचा सर्वात भयानक विकार म्हणजे एड्स, पण सर्वाधिक बळी ज्या विकारांमध्ये जातात ते सर्वच्या सर्व अतिशय साधारण वाटावेत असे किंवा मग संसर्गजन्य विकार आहेत. त्यातही जागतिक आरोग्य संघटनेने वर्गवारी केली आहे. त्यात असे लक्षात आले की, भारतातील सर्वाधिक बळी हे दूषित पाण्यामुळे होतात. दूषित किंवा प्रदूषित पाणी हे त्याचे सर्वात महत्त्वाचे कारण आहे. सर्वाधिक बळी घेणाऱ्या रोगांमध्ये हगवण किंवा अतिसार या साधारण वाटणाऱ्या रोगाचा क्रमांक पहिला आहे. दूषित पाणी हे याचे प्रथमदर्शनी कारण असले तरी स्वच्छतेच्या सवयी खासगी आणि सार्वजनिक आयुष्यात नसणे हे त्याचे प्राथमिक व महत्त्वाचे कारण आहे. हे कारण सर्व शहरे आणि निमशहरी भागांत तर आहेच, पण हे सारे शहरांच्या दिशेने प्रवास सुरू झालेल्या गावांमध्येही आढळते. आपली सर्व गावे, शहरे यांचे व्यवच्छेदक लक्षण म्हणजे गलिच्छताच. बहुसंख्य संसर्गजन्य विकारांचा प्रादुर्भाव याच गलिच्छतेमधून होतो. आपल्याला केवळ विज्ञान माहीत असते. आता त्याच्या उपयोजनाची वेळ आली आहे. यात विज्ञान कळणे किंवा समजणे आणि त्याचे उपयोजन करणे असे दोन टप्पे आहेत. शालेय शिक्षणामध्येच विज्ञान हा विषय आपण रंजकतेने शिकवला, तर समाजासमोरचे भविष्यातील आ वासणारे प्रश्न सोडवणे तुलनेने सोपे जाईल. अन्यथा.. एक साला मच्छर.. आपले स्वप्नभंग करण्याचे काम करेल आणि त्यानंतरही स्वप्नभंग नेमका का झाला त्याचे मूळ कारण आपल्याला कळणार नाही.
सध्या होते आहे ते असेच. डासांमुळे मलेरिया होतो किंवा डेंग्यू होतो असे कळले किंवा त्याच्या जाहिराती लागल्या की मग आपण घरात डास येऊ नयेत म्हणून जाळी लावा किंवा मग डास मारण्यासाठीची औषधे म्हणजे कॉइल्स आणतो किंवा मॅट्स जाळतो. त्यांची राख आपण पुन्हा आजूबाजूलाच टाकतो. त्यातून होणाऱ्या प्रदूषणाचे आपल्याला काहीच पडलेले नसते, कारण मुळात त्यातील एलिथ्रीन नावाच्या द्रव्यामुळे निसर्गाचे हानीकारक प्रदूषण होते, हे कुठे आपल्याला ठाऊक असते. त्यामुळे आपली उपाययोजना ही लक्षणांवरची उपाययोजना असते. उपचार आपण मुळावर करण्याची गरज आहे. म्हणजेच डासांना मारण्यासाठी औषध वापरण्यापेक्षा परिसरात डास येणारच नाहीत, असे वातावरण कसे ठेवता येईल, याचा विचार व्हायला हवा. तसा विचार झाला तरच आपल्याला निरोगी महासत्तेच्या दिशेने जाता येईल.
अन्यथा सध्या हजारांमध्ये असलेला डेंग्यूच्या बळींचा आकडा लाखांमध्ये पोहोचेल. ते होऊ नये यासाठी शहरांमध्ये महापालिकांनी आणि गावांमध्ये ग्रामपंचायतींनी खास प्रयत्न करायला हवेत. निवडणूकज्वरापेक्षा अधिक लक्ष डेंग्यूच्या ज्वराकडे देणे गरजेचे आहे, याची जाणीव राज्यकर्त्यांना यायला हवी. डेंग्यूबाबतचा एक विशेषही लक्षात ठेवायला हवा की, डेंग्यू हा काही गरिबांचा किंवा केवळ श्रीमंतांचा विकार नाही. तो सर्वानाच होतो. पंतप्रधानांच्या सुरक्षित घरी राहणाऱ्या त्यांच्या नातवंडांनाही होतो आणि तो महापौरालाही होतो. तो यश चोप्रांचेही प्राण घेतो आणि झोपडीतील गरिबाचेही. त्यामुळे सर्वानीच आपला परिसर स्वच्छ ठेवणे हीच त्यावरची जालीम मात्रा आहे. अन्यथा आपले यान मंगळावर पोहोचेलही, पण त्याच वेळेस डेंग्यूच्या डंखाने इथे भूतलावर मात्र आपल्या महासत्तेच्या स्वप्नांचा फुगा फुटून आपण जमिनीवर आपटलेले असू.

Story img Loader