आशुतोष बापट – response.lokprabha@expressindia.com
आदिम काळापासून चालत असलेली शक्तीची उपासना जगभर सर्वत्र पाहायला मिळते. शक्तीपूजेला कोणतेही भौगोलिक बंधन नाही. जगातील सर्वच संस्कृतींमध्ये शक्तीपूजा प्रकर्षांने दिसते. तिचे स्वरूप फक्त वेगवेगळे आहे. त्यांची नावे वेगवेगळी असतील, परंतु शक्ती, सामथ्र्य यांचे पूजन सर्वत्र लोकप्रिय असेच आहे. स्त्रीदेवतांची पूजाही मानववंश सातत्य आणि वंशवृद्धी तसेच सामथ्र्यवृद्धी याकरिता आवर्जून केली जायची. महाराष्ट्रातदेखील सर्वाधिक मंदिरे देवीची आणि शंकराचीच आढळतात. प्रत्येक कुटुंबाची एक कुलदेवता देवीरूपात असतेच असते. त्यांचे कुळधर्म, कुळाचार हे या देवतेशीच निगडित असतात. इतिहासात कुषाण राजांच्या नाण्यांवर आपल्याला विविध रूपातील देवींचे अंकन केलेले पाहायला मिळते. ग्रीक राजांच्या नाण्यांवरदेखील ती ओर्दोक्शोच्या, ननाच्या रूपांत दिसते. आपल्या लक्ष्मीशी खूपच साधम्र्य असलेल्या या देवीमुळे शक्तीपूजेचे व्यापक स्वरूप आपल्याला समजते. भारतामध्ये तर शक्तीची पूजा ही पार्वतीच्या स्वरूपाशी निगडित असल्याचे दिसते. मग दुर्गा, गौरी, काली, महिषासुरमर्दिनी यांची उपासना असो, किंवा चौसष्ठ योगिनींचे मंदिर असो, वा बंगालमध्ये प्रसिद्ध असलेली दुर्गापूजा असो, दुष्टांच्या निर्दालनासाठी सदैव तत्पर असलेली देवी आपल्याला पाहायला मिळते.
देवीची अनेक रूपे आपल्याला भटकंतीमध्ये दिसतात. दुर्गा, लक्ष्मी, काली, सरस्वती अशा विविध रूपांमधे ती आपल्याला दर्शन देत असते. तिच्याशी अनेक कथा निगडित असतात. पुराणांमध्ये देवीच्या पराक्रमाची असंख्य वर्णने वाचायला मिळतात. तिचे शौर्य, भक्तांप्रती असलेली तिची करुणा, आई या भावनेने तिने घेतलेली भक्तांची काळजी, आणि अर्थातच भक्तांची तिच्याकडून असलेली अपेक्षा या आणि अशा अनेक विषयांवरच्या कथा ग्रंथांमध्ये वाचायला मिळतात. या कथांवरून तयार झालेली शिल्पकलाही आपल्याला पाहता येते. विविध रूढी, परंपरा, नवससायास हे या देवतेशी जोडले गेले आहेत. खरंतर ठरावीक देवी स्थानांची माहिती देणे म्हणजे अतिशय अवघड असेच काम आहे कारण प्रत्येक गावातल्या देवी स्थानाला काहीना काही इतिहास, काही पौराणिक संदर्भ हा असतोच असतो. तरीसुद्धा नेहमीच्या ठरावीक प्रचलित स्थानांपेक्षा काहीतरी वेगळे जे दिसले ते ‘लोकप्रभा’च्या जाणकार वाचकांसमोर मांडायचा हा प्रयत्न आहे. नवरात्रीच्या निमित्ताने महाराष्ट्रातल्या अशा आगळ्यावेगळ्या नऊ देवींचा जागर या लेखांच्या रूपाने आपण करूया.
अंबडची मत्स्योदरी देवी
यादव काळामध्ये भरभराटीला आलेल्या मराठवाडय़ाला अनेक पैलू आहेत. इथे विविध देवस्थाने आहेत, लेणी आहेत, मूर्तिकला आहे आणि उत्तमोत्तम मंदिरे आहेत. जालना जिल्ह्यतील अंबड हे तालुक्याचे गाव आणि इथे वसलेली मत्स्योदरी देवी हेही त्यातलेच एक उदाहरण. दुधना आणि गोदावरी या नद्यांच्या दुआबात वसलेला अंबड तालुका हा मराठवाडय़ातला एक संपन्न तालुका म्हणून गणला जातो. अगदी १८ व्या शतकातही सरकार जालनापूरमधील अंबड हा एक प्रधान परगणा राहिला होता. अंबडच्या इतिहासावर प्रकाश टाकणारी बरीच पेशवेकालीन कागदपत्रे उपलब्ध झाली आहेत. त्यात साखरे घराण्यातील काही कागद, अंबड ताम्रपट, तसेच नाईक अशी पदवी असलेल्या काळे यांच्या घराण्यातील ‘उचापती’ या सदरातली कागदपत्रे यांचा समावेश होतो. अंबडच्या मत्स्योदरी देवीबद्दल बरीच माहिती त्यातून उपलब्ध होते. या गावाची मत्स्योदरी देवी अगदी प्राचीन काळापासून प्रसिद्ध असून तिचे स्थान हे गावाच्या आग्नेय दिशेला असलेल्या डोंगरावर आहे. ‘मत्स्यश्वरदरम यास्यासामत्स्योदरी’ या उक्ती प्रमाणे या डोंगराचा आकार माशासारखा असल्यामुळे या देवीला हे नाव पडले असावे, असे मानले जाते. समोरून तोंड उघडलेल्या माशासारखा हा डोंगर दिसतो. मागच्या बाजूला हा निमुळता होत जाऊन माशाच्या शेपटीसारखे याचे टोक आहे. स्कंदपुराणातील सह्यद्री खंडांतर्गत आलेल्या कथेनुसार अंबरीष ऋषींनी कठोर तपश्चर्या करून आणि अनुष्ठाने करून महालक्ष्मी, महाकाली आणि महासरस्वती अशा तीन स्वरूपांत इथे देवीची स्थापना केल्याची दंतकथा प्रचलित आहे. सध्याचे मंदिर होळकरांच्या काळातील आहे. अंबड परगणा हा होळकरांच्या खासगी दौलतीचा एक भाग होता. ही खासगी दौलत पेशव्यांकडून मल्हारराव होळकरांना एक विशेष अधिकार म्हणून मिळाली होती. आपले राज्य वृद्धिंगत व्हावे यासाठी अनेक सेवा, इनामे होळकरांनी दिली होती. अंबड येथील मत्स्योदरी देवीला त्यांनी दिलेली इनामे, जमिनी, वर्षांसने हे याचेच द्योतक आहे. सध्याचे मंदिर हे एका डोंगरावर वसले असून तिथपर्यंत जाण्यासाठी पायऱ्या बांधून काढल्या आहेत. पायऱ्या चढून वरती गेले की एक देखणे प्रवेशद्वार लागते. त्याच्या आतील दोन्ही बाजूस देवडय़ा आहेत. पुढे एक चौक आहे आणि नंतर मुख्य मंदिरामध्ये प्रवेश होतो. मंदिरात तीन तांदळे असून त्याच महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती म्हणून इथे पुजल्या जातात. मंदिर प्रदक्षिणा मार्गावर एक देवनागरी लिपीमधील शिलालेख कोरलेला आढळतो. बाजूला काही खोल्यासुद्धा आहेत. उंचावर मंदिरं असल्यामुळे इथून खालचा परिसर तसेच अंबड शहराचा देखावा फारच सुंदर दिसतो. मंदिराच्या मधल्या चौकट भिंतीवर एक सुंदर शिल्प कोरलेले आहे. तीन मासे आणि त्यांचे एकच तोंड असे हे शिल्प आहे. त्याला शिल्पश्लेश असे म्हणतात. देवस्थान परिसर खूप प्रशस्त असून या ठिकाणी शारदीय नवरात्रामध्ये खूप मोठी जत्रा भरते.
वैष्णवशक्तींचे मंदिर- अन्वा
शक्तीपूजा ही अगदी आदिम काळापासून सर्व भारतभर केली जाते. विविध रूपांमधील शक्तीदेवतेची आराधना करण्याची पद्धत देशभर प्रचलित आहे. दुर्गा, भवानी, महालक्ष्मी, महाकाली या आणि अशा अनेक शक्तीदेवातांचे पूजन आपण करत आलो आहोत. शक्ती म्हणजे सामथ्र्य, ताकद, ऊर्जा अशी सुद्धा भावना शक्ती या नावामागे आहे. पुराणामध्ये अंधकासुर वधाची एक कथा येते. अंधकासुरवधाच्या वेळी शंकर भगवानांनी सर्व देवांकडे त्यांच्या शक्ती मागितल्या. आणि त्यानुसार सर्व देवांनी त्या शक्ती शिवाला बहाल केल्या. त्या शक्ती म्हणजे ब्रह्माची- ब्राह्मणी, इंद्राची—इंद्राणी, कार्तिकेयाची—कौमारी अशा होत. त्या बहुधा संख्येने सात असतात म्हणून त्यांना सप्तमातृका असे संबोधले जाऊ लागले. भाषाशास्त्रानुसार शक्ती हा स्त्रीलिंगी शब्द येतो आणि त्याचा अर्थसुद्धा वाचणाऱ्याला लगेच समजतो. परंतु मूर्तीशास्त्रानुसार शक्ती दाखवायची असेल तर त्या संबंधित देवाची स्त्रीरूपातील प्रतिमा दाखवली जाते. उदाहरणार्थ :- भुलेश्वरच्या मंदिरात गणेशाची शक्ती दाखवताना स्त्रीरूपातील गणेशप्रतिमा दाखवली आहे. ती गणेशाची पत्नी नाही तर ती गणेशाची शक्ती असते तिलाच गणेशी अथवा वैनायकी असे म्हणतात. त्याचप्रमाणे विष्णूच्या शक्तींचे मूर्तीरूपातील दर्शन आपल्याला एका सुंदर मंदिरावर पाहायला मिळते. औरंगाबाद—अजिंठा रस्त्यावर असलेल्या अन्वा इथले मंदिर होय.
चतुर्भुज विष्णूच्या हातात शंख—चक्र—गदा—पद्म अशी चार आयुधे असतात. या आयुधांचा त्यांच्या हातातील क्रम बदलला की गणिती शास्त्रानुसार २४ संगती तयार होतात. त्या प्रत्येक प्रकाराला केशव, माधव, नारायण, अशी संध्येत येणारी २४ नावे आहेत. औरंगाबादपासून अजिंठय़ाला जाताना अंदाजे ८० कि.मी. वर गोळेगाव लागते. इथून उजवीकडे १० कि.मी. गेले की अन्वा आहे. गावात महादेव मंदिर आहे ज्याला स्थानिक भाषेमध्ये मढ असे म्हणतात. गावाच्या किंचित बाहेर असलेले, अंदाजे १२ व्या शतकातील हे मंदिर मुळात वैष्णव मंदिर होते. तारकाकृती पीठावर असलेले हे मंदिर खजुराहोच्या कांदारीया महादेव मंदिराच्या पीठाची आठवण करून देते. मंदिराला एकूण ५० स्तंभ आहेत. मंदिरावरील सर्व शिल्पे ही वैष्णव आहेत. हे लक्ष्मीचे मंदिर असावे. मुख्य कोनाडय़ातसुद्धा वैष्णव शिल्पे आहेत. अत्यंत सुंदर अशा पाच द्वारशाखा असलेले गर्भगृह आहे. दरवाजाच्या बाहेर त्रिभंग अवस्थेमधील वैष्णव द्वारपाल दिसतात. मूळ गाभाऱ्यात सध्या शिवपिंडी आहे. मंदिराच्या बाभागावर २४ वैष्णव शक्ती प्रतिमा दिसतात. स्त्रीरूपातील या प्रतिमांच्या हातात विष्णूच्या हातातली आयुधे आहेत. त्या सगळ्या प्रतिमांच्या हातातील आयुधांचे क्रमसुद्धा बदलते आहेत. त्यामुळे त्या विष्णूच्या शक्ती समजल्या जातात. जसे विष्णूची केशव, माधव, नारायण, अशी नावे आहेत त्याच प्रमाणे या शक्तींचीसुद्धा कीर्ति, कांती, तुष्टी, पुष्टी, धृती अशा प्रकारे
२४ नावे आढळतात. अग्निपुराण, पद्मपुराण, चतुर्वर्गचिंतामणी या ग्रंथांच्या आधारे ही माहिती मिळते. विष्णूच्या शक्तींचे या स्वरूपातील बहुधा हे एकमेव मंदिर असावे. या मूर्तींची काही प्रमाणात झीज झालेली आहे तरीसुद्धा त्यांच्या अंगावरील अलंकरण, त्यांचा डौल, चेहेऱ्यावरील भावमुद्रा केवळ पाहण्याजोग्या आहेत. अजिंठय़ाला जाताना मुद्दाम, आवर्जून अन्वा या ठिकाणी थांबून हे मंदिर पाहून घ्यावे. वैष्णव शक्ती दाखवलेल्या मूर्तींच्या उपलब्धतेचे हे सौभाग्य महाराष्ट्राच्या इतर भागाला नक्कीच नाही. म्हणूनच या मंदिराला वाट वाकडी करून अवश्य भेट द्यावे या दर्जाचे आहे.
हिंगुळजा- पाकिस्तानातून गडहिंग्लजला
महाराष्ट्रामध्ये भटकंती करत असताना खरोखरच काही चमत्कारिक ठिकाणे, त्यांचे संदर्भ आपल्याला आश्चर्यचकित करतात. त्यांचे उगम शोधू गेलो तर एकतर मिळत नाहीत, आणि जे मिळतात ते थक्क करणारे असतात. गडहिंग्लज हे गाव आणि तिथल्या हिंगुळजा देवीबद्दल असेच काहीसे म्हणावे लागेल. पुराणातील प्रसिद्ध कथेनुसार राजा दक्ष याने आपल्या यज्ञात आपलाच जावई शंकराला बोलावले नाही. शंकराच्या पत्नीला, सतीला हा अपमान सहन न झाल्यामुळे तिने त्या यज्ञातच उडी घेतली. परंतु तिचे शरीर जळाले नाही. उद्विग्न झालेल्या शंकराने ते शरीर पाठीवर टाकले आणि तो मार्गक्रमण करू लागला. त्या शरीराचे विविध अवयव पृथ्वीवर अनेक ठिकाणी पडत गेले. ज्या ज्या ठिकाणी ते अवयव पडले त्या त्या ठिकाणी शक्तिपीठे तयार झाली. त्या कथेनुसार तिचे शीर जिथे पडले ते स्थान आता पाकिस्तानातील बलुचिस्तान या प्रांतात आहे. कराचीच्या वायव्येला सुमारे २५० कि.मी. वर बलुचिस्तान प्रांतातल्या मकरान टेकडय़ांच्या प्रदेशात हिंगोळ नदीच्या काठावर एका गुहेमध्ये नानीबीबी किंवा हिंगुळजादेवी हे हिंदूंचे पवित्र क्षेत्र वसलेले आहे. हे हिंदूंचे तीर्थस्थान असले तरीदेखील इथली मुसलमान जनता नानीबीबी या नावाने या देवीची पूजा करते. तीच हिंगुळादेवी गडहिंग्लज इथे गुड्डाई देवी म्हणून आली. एका छोटय़ाशा टेकडीवर वसलेले हे मंदिर आहे. हिंगुळादेवीचा गड म्हणून गडहिंग्लज अशी या गावाच्या नावाची व्युत्पत्ती सांगितली जाते. गुजरातमधील सोनारकाम करणाऱ्या पराजीया सोनी जातीची ती कुलदेवता आहे. याच जातीमधील एक पुरुष हुकमीचंद याला देवीने सुवर्ण कारागिरी शिकवल्याची कथा सांगितली जाते. तर स्थानिक समजुतीनुसार हिंगाचा व्यापार करणाऱ्या बलुची व्यापारी मंडळींबरोबर त्यांची ही देवी गडहिंग्लज या ठिकाणी आल्याचे सांगतात. ही व्यापारी मंडळी ज्या मोठय़ा व्यापारीपेठ असलेल्या ठिकाणी गेली तिथे त्यांनी त्यांची ही देवी प्रस्थापित केली. हिंगुळादेवीचे आणखी एक मंदिर राजस्थानमध्ये हिंगलाजगढ या ठिकाणी आहे. तर कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्यतदेखील ही हिंगुळादेवी असून तिथे तिला चंदला परमेश्वरी अशा नावाने संबोधले जाते. गडहिंग्लज गावाला लागूनच असलेल्या छोटय़ा टेकडीवर हे मंदिर आहे. मंदिरामध्ये देवीची पाषाणरूपातली मूर्ती आहे. मंदिर परिसर अत्यंत शांत असून तिथून सगळ्या गावाचा परिसर न्याहाळता येतो. या डोंगराला गुड्डाईचा डोंगर या नावानेच ओळखले जाते. या डोंगरावरून खाली आले की भडगावमध्ये नाईक यांच्या घरात याच देवीचे ठाणे आहे. तिथे मात्र देवीची चार हाताची मूर्ती आहे. मूर्तीच्या हातात मशाल, कमल अशी आयुधे असून डोंगरावर असलेली गुड्डाई चालत या ठिकाणी आली असे सांगतात. नाईक घराण्यामध्ये परंपरागत देवीची पूजा चालू आहे. गडहिंग्लज गाव आणि सारा परिसर अत्यंत निसर्गरम्य आहे. या ठिकाणी येऊन मुद्दाम या आगळ्यावेगळ्या हिंगुळादेवीचे दर्शन आवर्जून घ्यावे.
भगवती देवी— कोटकामते
निसर्गसौंदर्याने नटलेली कोकणची भूमी ही तिथे असलेल्या विविध देवस्थानांसाठीसुद्धा प्रसिद्ध आहे. गर्द झाडीमध्ये वसलेली अत्यंत मनोहारी मंदिरे आपल्याला कोंकणात पाहायला मिळतात. इथले वैशिष्टय़ म्हणजे इथल्या जवळजवळ सगळ्याच देवस्थानांशी काही ना काही गूढरम्य अशा कथा निगडित असतात. अत्यंत शांत वातावरण असलेल्या या मंदिरांमध्ये खरोखर मन:शांती मिळते. काहीसे वेगळे पण मोठी ऐतिहासिक पाश्र्वभूमी लाभलेले असेच एक मंदिर म्हणजे कोटकामते येथील श्रीभगवती मंदिर होय. सिंधुदुर्ग जिल्ह्यतल्या देवगड तालुक्यात असलेले हे मंदिर देवगडपासून ३० कि.मी. आणि कुणकेश्वर या प्रसिद्ध ठिकाणाहून फक्त १५ कि.मी. वर आहे. या गावचे अगदी खास असे वैशिष्टय़ म्हणजे, देशभरातील इतर व्यक्तिगत इनामे आणि संस्थाने रद्द झाली असली तरी देवगड तालुक्यातील कोटकामते गावचे इनाम मात्र अजूनही चालू आहे. या गावाच्या सर्व जमिनीवर प्रमुख कब्जेदार म्हणून इनामदार ‘श्री देवी भगवती संस्थान कोटकामते’ असा शिक्का प्रत्येक जमिनीच्या ७/१२ च्या उताऱ्यावर आहे. या गावाला पूर्वी एक प्राचीन कोट होता. त्याची साक्ष म्हणून रस्त्याच्या कडेला फक्त एक बुरुज आणि थोडीफार तटबंदी आजसुद्धा पाहायला मिळते. कोट असलेले गाव म्हणून कोटकामते असे याचे नाव पडले. मराठी आरमाराचे सरखेल कान्होजी आंग्रे यांनी शके १६४७ म्हणजेच इ.स. १७२५ साली या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. त्याची नोंद म्हणून मंदिराच्या भिंतीवर एक देवनागरी लिपीमधील ऐतिहासिक शिलालेख बसवला आहे. त्यामध्ये कान्होजी आंग्रे यांचा स्पष्ट उल्लेख केलेला आढळतो. सहा प्रचंड लाकडी कोरीव खांबांनी तोललेली तक्तपोशी, जुन्या घंटा, देवतांचे तरंग, लामणदिवे आणि भगवतीची सर्वांगसुंदर मनोहारी मूर्ती असे सगळे साग्रसंगीत सजलेले हे देवालय आहे. अत्यंत जागृत देवस्थान आणि नवसाला पावणारी देवी अशी हिची ख्याती पंचक्रोशीमध्ये पसरलेली आहे. मंदिराच्या परिसरात श्रीदेव रवळनाथ, हनुमान, पावणादेवी, असून शिवाय लाकडी नक्षीकाम, दीपमाळ, सुंदर कलात्मक बांधणीची एक पाण्याची विहीर, इत्यादी सर्व गोष्टी पाहायला मिळतात. देवीच्या या देवळाबाहेर मंदिराकडे तोंड करून सिंहाची प्रतिमा आहे. मंदिराच्या बाहेरच्या बाजूला दोन मोठय़ा तोफा जमिनीमध्ये पुरून ठेवलेल्या दिसतात. नवरात्रोत्सव हा इथला प्रमुख उत्सव असून तो मोठय़ा प्रमाणावर इथे साजरा केला जातो.
मंदिराच्या मागील बाजूस उंचावर डॉ. प्रभुदेसाई यांचे घर आहे. हे सारे प्रभुदेसाई घराणे आयुर्वेदिक वैद्य आहेत. ते इथले वतनदारदेखील आहेत. त्यांच्या खापरपणजोबांनी इथेच संजीवन समाधी घेतली होती. त्या पुण्यपुरुषाचं स्मारक इथे नीटसपणे राखलेलं आहे.
श्रीदुर्गादेवी-कुणकावळे
मालवण आणि सिंधुदुर्ग यांचे नाते एवढे घट्ट आहे की मालवणच्या परिसरात यापेक्षा काही वेगळ्या गोष्टी, स्थळे असतील असा विचारसुद्धा पर्यटकांच्या मनात कधी येत नाही. परंतु परिस्थिती अशी नाही. मालवण परिसरामध्ये एकापेक्षा एक अशी सरस ठिकाणे वसली असून ती पर्यटकांच्या प्रतीक्षेत आहेत. कुणकावळे इथले दुर्गादेवीचे मंदिर आणि त्यापेक्षाही त्या देवीची अत्यंत सुडौल मूर्ती हे इथले खास आकर्षण आहे. अगदी आड असलेल्या गावात इतकी शिल्पजडित देवीची मूर्ती असेल यावर विश्वासच बसत नाही. पण या मंदिराची प्रसिद्धी पंचक्रोशीच्या बाहेर कुठेही नाही आणि म्हणूनच मालवणला येणाऱ्या पर्यटकांना याची माहितीसुद्धा नसते. मालवणपासून फक्त १५-१६ कि.मी. वर आहे कुणकावळे गाव. मालवणहून कसालच्या दिशेने जायला लागले की कुंभारमाठ नावाचे गाव लागते. इथून पुढे चौके फाटा आहे. या फाटय़ापासून एक रस्ता कुणकावळे गावाला जातो. कुणकावळे गावात आहे श्रीदुर्गादेवीचे मंदिर. गावाच्या उत्तर दिशेला सुमारे एक कि.मी. चा गावकऱ्यांनी केलेला रस्ता आपल्याला थेट दुर्गादेवी मंदिरापाशी आणून सोडतो. प्रत्यक्ष धर्मराजांनी या देवीची स्थापना केली अशी ग्रामस्थांची श्रद्धा आहे. १९६१ साली झालेल्या वादळाचा तडाखा बसल्यामुळे या मंदिराचा जीर्णोद्धार करणे गरजेचे झाले. खास कोंकणी पद्धतीची सुंदर दीपमाळ एका ओटय़ावर उभी आहे. मंदिराला भव्य सभामंडप बांधलेला आहे. आणि या मंदिरात आहे अतिशय देखणी साडेचार फूट उंचीची दुर्गादेवीची उभी मूर्ती. चतुर्भुज देवीच्या हातात तलवार, चक्र, त्रिशूळ ही आयुधे असून डाव्या हातात परळ आहे. पायाशी दोन्ही बाजूला सेविका दाखवल्या आहेत. मूर्तीवर वस्त्रप्रावरणे, दागदागिने ठसठशीत कोरलेले आहेत. दंडामध्ये वाकी असून बाजूला मोर दाखवले आहेत. देवीच्या पायात खडावा आहेत तर केशसंभार अप्रतिम आहे. देवीच्या पाठीमागे कोरलेली प्रभावळ फारच देखणी आहे. मूर्तीसमोर दगडी प्रसाद पात्र आहे. अत्यंत मनोहारी अशी ही मूर्ती, आडवाटेला असली तरी खास वेळ ठेवून पाहायला हवी. अनेक ठिकाणी देवीची मूर्ती म्हणजे एक तांदळा असतो. त्याला वस्त्रप्रावरणे नेसवून तो अत्यंत मनोहारी केलेला असतो. इथे मात्र सुटी स्वतंत्र देवीची मूर्तीच आहे. काळ्या दगडामध्ये कोरलेल्या या मूर्तीवर बारीकसारीक कलाकुसर केलेली दिसते. प्रसन्नवदना असलेली ही श्रीदुर्गादेवीची मूर्ती दगडामध्ये कोरून काढलेल्या इतक्या अलंकारांनी मढवलेली आहे की ते पाहून अचंबित व्हायला होते. मालवणच्या इतक्या जवळ असलेल्या या देवीचे दर्शन मुद्दाम वाट वाकडी करून अवश्य घेण्याची गरज आहे.
नृत्यमग्न सप्तमातृका – मुखेड
मराठवाडय़ात होट्टल, धर्मापुरी, पानगाव, निलंगा, औंढानागनाथ, धारासुर अशा विविध ठिकाणी अत्यंत शिल्पजडित मंदिरे आणि त्यावरील वैविध्यपूर्ण मूर्ती बघायला मिळतात. या सर्व मंदिरांच्या पंक्तीमध्ये बसणारे आणखी एक ठिकाण आहे ते म्हणजे नांदेड तालुक्यातील मुखेड गावचे दाशरथेश्वर महादेव मंदिर. या मंदिरावर आहेत अत्यंत दुर्मीळ अशा नृत्य करणाऱ्या सप्तमातृका. प्राचीन भारतीय समाजात मातृदेवतेची पूजा प्रचलित होतीच. अंधकासुर वधाच्या वेळी शिवाच्या मदतीसाठी काही देवांनी आपल्या शक्ती शिवाला साहाय्यासाठी उत्पन्न केल्या. त्या ब्राह्मणी, वाराही, कौमारी, इंद्राणी, माहेश्वरी, नारसिंही या नावांने ओळखल्या जातात. या शक्तींनी मिळून शिवाला साहाय्य केले आणि दैत्याचा नायनाट केला अशा कथा पुराणांमधून येतात. या मातृकांना सप्तमातृका असे म्हटले जाते. शिल्पकारांना अर्थातच या सप्तमातृकांचे अंकन करण्याचा मोह झाला. वेरुळच्या लेणींमधून या सप्तमातृकांची अत्यंत ठसठशीत शिल्पे आपल्याला पाहायला मिळतात. अनेक मंदिरामध्ये एक सप्तमातृका पट पाहायला मिळतो. एका ओळीमध्ये बसलेल्या या मातृका आणि त्यांच्या पायाशी असलेली त्याची वाहने असे शिल्प अनेक ठिकाणी पाहायला मिळते. परंतु मुखेडच्या दाशरथेश्वर महादेव मंदिराच्या बाह्यंगावर यातली प्रत्येक मातृका ही अत्यंत डौलदारपणे नृत्य करताना शिल्पित केलेली आहे. दुर्दैवाने यातील काही शिल्पांचे हात भंगलेले आहेत तरीसुद्धा त्यांच्या शरीराचा डौल अत्यंत आकर्षक दाखवला आहे. नृत्य करताना शरीराला आलेला बाक आणि लयबद्धता त्या मूर्तिकारांनी इतकी अचूक दाखवली आहे की प्रत्यक्ष नृत्याचा भास झाल्याशिवाय राहत नाही. त्या प्रत्येक मातृकांच्या पायाशी एक कमळाचे फूल असून त्यामध्ये त्यांचे वाहन शिल्पित केलेले दिसते. त्या वाहनावरून त्या मातृकांची ओळख पटते. नृत्यरत अवस्थेमधील या सप्तमातृकांच्या डोक्यावर मुकुट असून कानात कुंडले आहेत. त्यांचे अधोवस्त्र मेखलेने बांधलेले असून वस्त्राचा सोगा दोन्ही पायामध्ये रुळताना दिसतो आहे. काही मातृकांच्या पायात तोडे आणि पैंजण यासारखे अलंकारदेखील दिसतात. अत्यंत देखण्या, अतिशय प्रमाणबद्ध आणि नृत्यामध्ये रममाण झालेल्या अशा या सप्तमातृका मुखेडच्या महादेव मंदिरावर पाहायला मिळतात. अत्यंत दुर्मीळ असा हा शिल्पठेवा जपायला हवा. तिथे पर्यटक, अभ्यासक मुद्दाम मोठय़ा संख्येने गेले आणि त्यांनी हा ठेवा पाहिला तरच तो जपला जाईल. मुखेडचे हे मंदिर खरोखर अगदी निराळे असेच म्हणावे लागेल. याच मंदिरावर एक दुर्मीळ शिल्प पाहायला मिळते आणि ते म्हणजे ज्येष्ठा अथवा अलक्ष्मीचे. महाराष्ट्रात ‘अक्काबाई’ म्हणून प्रसिद्ध असलेली ही लक्ष्मीची मोठी बहीण होय. समुद्रमंथनाच्या वेळी दोघी बहिणींमध्ये ही प्रथम आली म्हणून हिला ज्येष्ठा हे नाव मिळाले. लक्ष्मीशी श्रीविष्णूने लग्न केले पण या मोठीचा हात धरायला कोणी तयार होईना. शेवटी कपिल मुनींनी तिच्याशी लग्न केल्याची कथा आहे. दक्षिण भारतात या ज्येष्ठेचे मोठे महत्त्व आहे. केरसुणी आणि कावळा ही तिची चिन्हे तर गाढव हे तिचे वाहन असते. रोगराई, मरीआई, यांची देवता असेही तिचे वर्णन काही ठिकाणी आलेले आहे. मुखेडच्या महादेव मंदिरावरील हिचे शिल्प अत्यंत देखणे आहे. इथे ही ज्येष्ठेची प्रतिमा चतुर्मुख असून उजव्या वरच्या हातात केरसुणी आहे तर एका हातात सुरा, आणि एका हातात कपालपात्र धरलेले दिसते. कानात कुंडले तर डोक्यावर मुकुट घातला असून तिच्या डाव्या खांद्यावरून लोंबणारी एक मुंडमाळा आहे. तिच्या शेजारीच तिचे वाहन गाढव हे दिसते आहे. अत्यंत दुर्मीळ असे हे शिल्प एक आगळेवेगळे नक्कीच आहे.
निलंग्याची हरगौरी
हिंदू दैवतशास्त्रात तसेच समाजजीवनात गौरीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. गौरी हे शिवाच्या शक्तीचे रूप मानले गेले आहे. विविध पुराणे आणि ग्रंथांमधून गौरीची प्रतिमालक्षणे दिलेली आहेत. अपराजितपृच्छा या ग्रंथामधे द्वादशगौरींचा उल्लेख येतो, तर अग्निपुराणामध्ये गौरी मूर्तीचे सामूहिक पूजन केले जाते असे सांगितले आहे. रूपमंडन या ग्रंथात तिची जी लक्षणे सांगितली आहेत त्यानुसार गौरी ही गोधासना, चार हात, तीन डोळे, आणि आभूषणांनी युक्त असावी असे म्हटले आहे. गौरीकडे कुमारिका म्हणूनसुद्धा पाहिले जाते. गौरी ही घोरपड या वाहनावर उभी असल्याचे दाखवले जाते. हे सर्व सांगायचे कारण एवढेच की, अगदी अशीच एक सुंदर शिव आणि गौरीची अप्रतिम प्रतिमा लातूर जिल्ह्यतील निलंगा गावामधल्या एका मंदिरात आहे. निलंगा येथील नीलकंठेश्वर मंदिर हे एक त्रिदल पद्धतीचे मंदिर आहे. मुख्य गर्भगृहात शिवपिंडी असून डावीकडील गर्भगृहात तीन फूट उंचीची सुरेख अशी विष्णुप्रतिमा आहे. त्याच्याच समोरच्या गर्भगृहात उमामहेश्वर आलिंगन मूर्ती दिसते. शिवाच्या डाव्या मांडीवर देवी बसली असून शिवाचा डावा हात तिच्या डाव्या खांद्यावर ठेवलेला दिसतो. परंतु इथेच एक अजून वैशिष्टय़ आहे. ते म्हणजे शिव आणि पार्वती ज्या पीठावर बसलेले दाखवले आहेत त्याच्या पायाशी एका घोरपडीचे शिल्प कोरलेले आहे. घोरपड ही चिवटपणासाठी प्रसिद्ध आहे. एखाद्या ठिकाणी तिने पकड घेतली तर ती अत्यंत चिवटपणे धरून ठेवते. तिथून तिला हलवणे केवळ कठीण असते. कथा, त्यामागील तत्त्वज्ञान आणि त्यानुरूप घडवलेल्या देखण्या मूर्ती हे आपल्याला मिळालेले वरदानच म्हणायला हवे. पार्वतीने शिवाच्या प्राप्तीसाठी अत्यंत तीव्र आणि कठोर तपश्चर्या केली होती. तिची शिवप्राप्तीची इच्छा अत्यंत प्रबळ होती. त्यासाठी तिने अत्यंत चिवटपणे आपली तपश्चर्या चालू ठेवली. तिची अवस्था एखाद्या पर्णहीन वृक्षाप्रमाणे झालेली होती यावरूनच तिला अपर्णा असे नाव मिळाले आहे. पार्वतीच्या या चिवट तपश्चर्येला घोरपडीच्या चिवटपणाची उपमा दिलेली दिसते. आणि त्याचे प्रतिबिंब आपल्याला मूर्तिशास्त्रामध्येसुद्धा दिसते. शिव म्हणजे हर आणि पार्वतीची होते गौरी. या अशा हरगौरी प्रतिमा खूपच कमी संख्येने पाहायला मिळतात. निलंगा इथल्या नीलकंठेश्वर मंदिरामधील ही हरगौरीची प्रतिमा चांगली साडेचार-पाच फूट उंचीची भव्य अशी आहे. अत्यंत देखण्या या प्रतिमेवर दक्षिण भारतातल्या शिल्पकलेची छाप पडल्याचे जाणवते. शिवाच्या उजव्या वरच्या हातात त्रिशूळ असून उजव्या खालच्या हातात अक्षमाला असून तो हात अभयमुद्रेत दाखवला आहे. गौरीच्या डाव्या हातात बीजपूरक आहे. शिवाला जटामुकुट असून देवीच्या केसांवर फुलांची वेणी दिसते आहे. ते बसलेल्या पीठावर शिवाच्या पायाशी नंदी असून देवीच्या पायाशी घोरपड अत्यंत सुबकतेने शिल्पित केलेली दिसते. हिंदू विवाह पद्धतीत गौरीहराची पूजा करण्याचा विधी प्रामुख्याने केला जातो. त्यामागेदेखील घोरपडीच्या चिवटपणाचेच तत्त्व सांगितले आहे. या प्रकारच्या मूर्ती घडवण्यामागे ते तत्त्वज्ञान लोकांच्या समोर दृग्गोचर व्हावे हा उदात्त हेतू तत्कालीन राजसत्तांचा आणि शिल्पकारांचा होता हे विशेषकरून जाणवते. ती प्रतिमा आणि नीलकंठेश्वर मंदिर या दोन्हीही गोष्टी मुद्दाम जाऊन पाहण्याजोग्या आहेत.
पारची रामवरदायिनी
आई जगदंबा अगदी आडरानात, निसर्गाच्या कुशीतसुद्धा वसलेली आहे. किल्ले भटकताना, डोंगरवाटा तुडवताना तिचे अकस्मात झालेले दर्शन फारच आनंददायी असते. छत्रपती शिवरायांची तर ती आराध्य देवताच होती. त्यांच्या अनेक किल्लय़ांवर जगदंबेची मंदिरे पाहायला मिळतात. असेच एक नितांतसुंदर मंदिर आहे ते प्रतापगडाच्या घेऱ्यात पार या गावी. प्रतापगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या कुंभरोशी गावाजवळून एक रस्ता पार या अत्यंत रमणीय अशा गावाला जातो. याचे पूर्वीचे नाव पार्वतीपूर! त्याचेच पहिले आणि शेवटच अक्षर घेऊन झाले पार. या ठिकाणाशी एक दंतकथा निगडित आहे. या डोंगराळ आणि निबिड अरण्य असलेल्या प्रदेशात अतिबळ आणि महाबळ हे राक्षस राहत होते. ते अतिशय माजले होते आणि त्यांनी इथे उच्छाद मांडला होता. देवांनी विष्णूकडे धाव घेतली. विष्णूने अतिबळ दैत्याचा वध केला, पण महाबळ काही मरेना. शेवटी सर्व देवांनी आदिशक्तीचा धावा केला. आदिशक्तीने महाबळावर मोहिनी घातली आणि त्याने देवांनाच वर मागायला सांगितले. देवांनी त्याचा मृत्यू व्हावा अशी इच्छा प्रकट केली. त्याचा नाइलाज होता. त्याला हे मान्य करावेच लागले. पण त्यानेही एक वर मागितला, तो असा की, तो पर्वतरूप होऊन इथेच वास्तव्य करेल आणि सर्व देवांनी त्या पर्वतरूपी महाबळीच्या अंगावर वास्तव्य करावे. देवांनी ते मान्य केले. त्यानंतर मग कोयना नदीच्या तीरावर श्रीआदिशक्तीची स्थापना खुद्द देवांनी केली, तीच ही रामवरदायिनी. पारच्या देवीच्या मंदिरात दोन मूर्ती आहेत. एक आहे श्रीवरदायिनी तर दुसरी आहे श्रीरामवरदायिनी. तिचीसुद्धा एक कथा आहे. सीतेचा शोध घेत असता रामाची परीक्षा पाहावी म्हणून पार्वती सीतेचे रूप घेऊन रामासमोर उभी राहिली. रामाने तिचे खरे स्वरूप जाणले आणि हे माते, तू का उगाच त्रास करून घेते आहेस? असे विचारले. पार्वती प्रसन्न झाली आणि तुझ्या कार्यात तुला यश येईल असा आशीर्वाद देऊन अंतर्धान पावली. श्रीरामाने या जागी तिची स्थापना केली. रामालाही वर देणारी म्हणून रामवरदायिनी या नावाने ती ओळखली जाऊ लागली. पार गावाजवळच पार घाट आहे. कोकणाला देशाशी जोडणारा हा रस्ता पूर्वी व्यापाऱ्यांनी गजबजलेला असे. पार घाटाच्या तोंडाशी मेट किंवा पहारा करायची जागा आहे. समर्थ रामदासस्वामी या देवीच्या दर्शनाला आल्याची नोंद आहे. प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या या रहाळामधील जाज्ज्वल्य देवस्थान असलेल्या मंदिरात त्यांनी देवीकडे जे मागणे मागितले तेसुद्धा स्वत:साठी नाही तर स्वराज्यासाठीच मागितले. येकचि मागणे आता द्यावे ते मजकारणे तुझा तू वाढवी राजा शीघ्र आम्हासि देखता असे मागणे समर्थानी देवीकडे मागितले होते. या ठिकाणी येण्यासाठी आता उत्तम डांबरी सडक आहे. ग्रामस्थ आणि मुंबईला स्थायिक झालेले इथले स्थानिक यांनी बराच पैसा खर्च करून आता इथे एक मोठे मंदिर उभारले आहे. मंदिराजवळ भक्तनिवाससुद्धा आहे. अत्यंत रम्य परिसर, आजूबाजूला निबिड अरण्य, आणि प्रतापगडाचा शेजार यामुळे इथे येणे फारच आनंददायी असते. महाबळेश्वरपासून प्रतापगडला जाताना डावीकडे या देवस्थानची कमान उभारलेली दिसते. इथून साधारण ३ किमीवर हे मंदिर आहे. प्रतापगड, मकरंदगड, हातलोट घाट ही ट्रेकर्ससाठीची तीर्थक्षेत्रे इथेच आसपास वसलेली आहेत.
राशीनची श्रीजगदंबा
जगज्जननी असणारी श्रीजगदंबा आपल्या भक्तांच्या कल्याणाकरिता सर्वतोपरी तयार आहे. तिची अनेक मंदिरे आपल्याला निरनिराळ्या ठिकाणी पाहायला मिळतात. परंतु काही मंदिरे देवीसाठी प्रसिद्ध आहेत, तशीच काही मंदिरे तिथे असणाऱ्या काही स्थापत्य चमत्कारांसाठीसुद्धा प्रसिद्ध आहेत. पुणे-सोलापूर हमरस्त्यावरील भिगवणपासून कर्जतकडे जाणाऱ्या रस्त्यावर आहे राशीन. गावात इ.स.च्या ९ व्या-१० व्या शतकात उभारलेलं श्रीयमाई किंवा श्रीजगदंबा देवीचे मंदिर आहे. रेणुकामातेचेच एक रूप असलेली ही यमाई माता आहे असे इथे समजले जाते. तटबंदीयुक्त आवाराला भव्य दरवाजा असून त्यालाच लागून देवडय़ा, फरसबंदी अंगण, त्यात एक मोठी विहीर, बाजूला ओवऱ्या आणि मंदिरासमोर दोन दीपमाळा आहेत. त्या आता विविध रंगांनी रंगवलेल्या आहेत. त्यांचे बांधकाम खाली दगडाचे आणि वर विटांचे आहे. दक्षिणेकडील दीपमाळेवर जाण्यासाठी बाहेरून जिना आहे तर उत्तरेकडील दीपमाळेवर जायला आतून जिना केलेला आहे. या जिन्याने वरती गेल्यावर एक आडवा लाकडी दांडा आहे तो धरून हलवला की दीपमाळ हलते. हा चमत्कार आश्चर्यकारक नक्कीच आहे. आता मात्र इथे जाण्याचा रस्ता बंद केला असून या दीपमाळा हलवता येत नाहीत. बीड जिल्ह्यतील रेणापूर, शिरूरजवळील कर्डे इथेही अशाच डोलणाऱ्या दीपमाळा आहेत. तसेच अहमदाबाद रेल्वे स्टेशनजवळच्या एका मशिदेचे डोलणारे मनोरे प्रसिद्ध आहेत. पण आता तिथे जाणे सर्वसामान्यांसाठी बंद केले आहे. खान्देशामध्ये फरकांडय़ाचे असेच हलणारे मनोरे अक्षम्य दुर्लक्ष झाल्यामुळे पडून गेले आहेत. नगर जिल्ह्यतील कर्जत तालुक्यातील असलेले राशीन हे गाव आहे तसे छोटेसेच, पण इथली देवी आणि तिची मोठ्ठी जत्रा या परिसरात खूप महत्त्वाची आहे. राशीनची यमाई ही चतुर्भुज मूर्ती असून तिच्या हातात आयुधे आहेत. मंदिराच्या फरसबंदी प्रांगणामध्ये श्रीजमदग्नी मंदिर तसेच कल्लोळतीर्थ नावाची एक सुंदर बारवदेखील आहे. तसेच वीरभद्राचे पूर्वाभिमुख मंदिर, उत्तराभिमुख श्रीगजाननाचे मंदिर, काळभैरव आणि शनीची मंदिरेसुद्धा मंदिर परिसरात पाहायला मिळतात. इथेच असलेल्या विष्णू मंदिरात विष्णुमूर्तीबरोबरच रुक्मिणी-विठ्ठल आणि राधा-कृष्णाच्या मूर्ती आहेत. पेशवाईतील मुत्सद्दी अंताजी माणकेश्वरांचे राशीन हे गाव. मंदिरातल्या एका ओवरीमधील एक संस्कृत आणि एका मराठी शिलालेखात त्यांच्या नावाचा उल्लेख आहे. इथे एकूण पाच शिलालेख आहेत.
टाहाकारीची भवानी
नगर जिल्ह्यतील अकोले हा तालुका निसर्गसौंदर्याने ओसंडून वाहतो आहे. हरिश्चंद्रगड, कलाड, कुंजर, आड, औंढा, पट्टा, बितिंगा, रतनगड, अलंग- मदन- कुलंग हे भन्नाट किल्ले, कळसूबाईसारखे महाराष्ट्रातले सर्वोच्च शिखर, भंडारदरा धरण, घनदाट झाडी, घाटमाथ्याला अगदी लागून असल्यामुळे भरपूर पाऊस आणि विविध सुंदर मंदिरे यांनी खरेच हा अकोले प्रदेश नटला आहे. रतनवाडीचे अमृतेश्वर मंदिर असो की अकोले गावामधले सिद्धेश्वर मंदिर असो. ही शिल्पजडित मंदिरे अत्यंत देखणी आहेत आणि त्यावरील कलाकुसर मुद्दाम पाहण्याजोगी आहे. याच देखण्या मंदिरांच्या पंक्तीमध्ये येते ते म्हणजे टाहाकारी इथले श्रीभवानी किंवा जगदंबा मंदिर. टाहाकारी या नावाची उत्पत्ती खूप रंजक आहे. रावणाने सीताहरण केले तेव्हा सीतेने रामाच्या नावाने याच ठिकाणी टाहो फोडला. जिथे तिने टाहो फोडला ते ठिकाण टाहाकारी म्हणून प्रसिद्धीला आले असे इथे सांगितले जाते. अकोल्याच्या वायव्येला १६ किमी अंतरावर असलेले हे अत्यंत देखणे, शिल्पजडित यादवकालीन मंदिर आढळा किंवा आरदळा नदीच्या काठावर वसलेले आहे. तीन गाभारे असलेले हे काहीसे निराळे मंदिर आहे. तीनही गाभाऱ्यांना एक सामायिक सभामंडप आहे. मुख्य गाभाऱ्यात वाघावर आरुढ झालेल्या अठरा हातांच्या महिषासुरमर्दिनीची लाकडी मूर्ती आहे. अत्यंत प्रसन्न आणि देखण्या अशा या मूर्तीच्या हातामध्ये विविध आयुधे दाखवलेली दिसतात. याच मूर्तीच्या पुढे देवीचा एक तांदळा असून त्यावर चांदीचा मुखवटा दिसतो. मुख्य गाभाऱ्याला असलेली दरवाजाची चौकट (द्वारशाखा) अत्यंत देखणी आहे. इथे गणेशपट्टीवर देवीची मूर्ती कोरलेली दिसते. मंदिराच्या उर्वरित दोन गाभाऱ्यांमध्ये पूर्वेला महालक्ष्मी आणि पश्चिमेला महाकालीच्या सुंदर मूर्ती दिसतात. अंतराळावर असलेल्या छताला मध्यभागातून खाली लोंबणारे एक अप्रतिम दगडी झुंबर कोरलेले आहे. मुख्य गाभाऱ्याच्या बाहेरील बाजूस तीन कोनाडे (देवकोष्ठे) आहेत. एका देवकोष्ठातील चामुंडेचे शिल्प खूपच प्रमाणबद्ध असे आहे. टाहाकारी मंदिराच्या बाह्यंगावर अनेक अप्सरा ज्यांना सुरसुंदरी असे म्हणतात त्यांचे मोठय़ा प्रमाणावर अंकन केलेले दिसते. काही सुरसुंदरींच्या डोक्यावर छत्र दिसते तर एका सुंदरीच्या अंगामध्ये युरोपीयन पद्धतीचा कोट घातलेला अगदी स्पष्टपणे दाखवलेला आहे. अत्यंत विलोभनीय अशा या सगळ्या प्रतिमा आहेत. श्रीभवानी मंदिर आणि नदी यांच्यामध्ये आणखी एक पडके देऊळ आहे. त्याच्या मंडपातील एका खांबावर संस्कृत शिलालेख असून त्यामध्ये शक १०५० म्हणजेच इ.स. ११२८ असा उल्लेख सापडतो. मंदिरापासून नदीपर्यंत जाण्यासाठी दगडी पायऱ्या असून त्यावर काही शिल्पांचे अवशेष ठेवलेले आढळतात.
चैत्रामध्ये देवीची मोठी यात्रा भरते तर नवरात्रीत एकूण १२ दिवस इथे मोठा उत्सव केला जातो, ज्यात वीणा भजन हा एक निराळा कार्यक्रम केला जातो.