सुनीता कुलकर्णी – response.lokprabha@expressindia.com
हम जहाँ पे खडे होते है,
लाइन वहाँ से शुरू होती है..
हा डायलॉग अमिताभ बच्चन यांच्या वाटय़ाला आला असला तरी त्याच्यावर खरा हक्क दिलीपकुमार यांचाच होता. दिलीप, देव आणि राज या भारतीय सिनेसृष्टीला पडलेल्या स्वप्नाचंच नाही तर नायक या संकल्पनेचंच नायकपण त्यांच्याकडे आलं होतं.  त्याच्याही पुढे जाऊन म्हणायचं तर त्यांच्या आणि त्यांच्यानंतरच्या प्रत्येक पिढीमधल्या, रुपेरी पडद्यावर आपल्या अभिनयाचं नाणं वाजवू पाहणाऱ्या प्रत्येक नायकाचे ते नायक होते. त्यामुळे नायकांचे नायक, हिरोंचे हिरो हे बिरुद त्यांना शोभून दिसलं आणि त्यांनी ते तितक्याच खणखणीतपणे वागवलंदेखील.

खरं तर दिलीप, देव आणि राज या त्रिकुटामधल्या राज कपूर यांच्यासारखा कपूर घराण्याचा अभिजात वारसा त्यांच्यामागे नव्हता. राज कपूर यांच्यामधल्या अभिनेत्यावर त्यांच्यामधल्या दिग्दर्शकाने कुरघोडी केली तेव्हा त्या मंथनातून आलेली शोमनशीप ही राज कपूर यांची नंतर मक्तेदारीच ठरली. तीच त्यांची ओळख झाली. स्त्री देहाचं सौंदर्य अत्यंत कलात्मक पद्धतीने पडद्यावर पेश करण्यापासून ते त्याचा बाजार करण्याचा आरोप होण्यापर्यंतचा प्रवास त्यांनी स्वत:च केला.

देव आनंद यांच्याबद्दल काय काय सांगायचं? विजय आनंद, चेतन आनंद अशा दोन दोन भावांचा भक्कम पाठिंबा घेऊन सिनेसृष्टीत वावरण्याचं नशीब त्यांच्याकडे होतं. चेहऱ्यावरचं ते विशिष्ट हसू, केसांचा कोंबडा, शरीराच्या त्या विशिष्ट लकबी या सगळ्यांसह त्यांनी एका पिढीला वेड लावलं आणि त्यानंतर काही वर्षांनी तरुण दिसण्याच्या विचित्र वाटाव्या अशा अट्टहासापायी हास्यास्पद ठरण्याची वेळही त्यांच्यावर आली.

दिलीप-देव-राज या त्रिकुटातल्या दोघांना नशिबाचीही साथ होती आणि त्यांच्यावर या ना त्या कारणाने वादग्रस्त होण्याची वेळ आली किंवा त्यांनी ती ओढवून घेतली असं म्हणता येईल. पण या दोन्ही गोष्टींमध्ये देखील दिलीप कुमार या त्रिकुटामधले नायकच ठरले. त्यांच्या अभिनयाचं नाणं इतकं खणखणीत वाजलं की त्यांना नशिबा बिशिबाच्या साथीची किंवा सिनेसृष्टीत लागेबांधे असण्याची कधी गरजच पडली नाही.

ते जिथे उभे राहिले तिथून रांग सुरू झाली. त्यांनी पडद्यावर जे जे म्हणून केलं त्या सगळ्याला अभिनय म्हटलं गेलं. त्यांच्यासारखी हेअर स्टाइल, त्यांच्यासारखं हसणं, त्यांच्यासारखं तोंडातल्या तोंडात पुटपुटत बोलणं, त्यांच्यासारखा पेहराव, त्यांच्यासारखं नाचणं.. त्यांच्या पिढीत तर लगोलग त्या सगळ्याचं अनुकरण झालंच, पण त्यांच्यानंतरच्या काळातही  पुढच्या पिढीतले नायक होऊ पाहणारे रुपेरी पडद्यावरचा त्यांचा वावर बघूनच संवादफेक गिरवायला लागले, नृत्याची पावलं टाकायला लागले.

नंतरच्या काळात स्वतला महानायक म्हणवून घेणाऱ्या अमिताभ बच्चन यांच्या अभिनयावर असलेला दिलीपकुमार यांचा प्रचंड प्रभाव सतत जाणवत राहतो. दिलीप कुमार यांच्या कारकीर्दीएवढं स्वत:चं वय असलेल्या, स्वत:ला बॉलिवूडचा किंग खान म्हणवून घेणाऱ्या शाहरुख खानलाही अजूनही अभिनयाच्या बाबतीत दिलीप कुमार यांना ओलांडून पुढे जाता आलेलं नाही.

राज कपूर आणि देव आनंद यांचं नशीब जसं दिलीप कुमार यांच्या वाटय़ाला आलं नाही, तसंच दिलीप कुमार यांच्या वाटय़ाचा हा झळाळता तुकडा त्या दोघांच्या वाटय़ाला आला नाही.  प्रत्येक गोष्टीमधलं अभिजातपण जपणारा, देखणं माणूसपण वाटय़ाला आलेला माणूस होता तो. त्याच्या सिनेमांबद्दल, अभिनय कौशल्याबद्दल याआधीही बरंच लिहिलं-बोललं गेलं आहे, आता पुन्हा त्याची उजळणी होते आहे. त्याच्या वाटय़ाला आलेलं त्याच्या पिढीचं, नंतरच्या पिढीतल्या नायकांचं एवढंच नाही तर शतकाचं नायकपण हा वारसा कधीच विसरता येण्यासारखा नाही. लोकप्रभा परिवारातर्फे दिलीपकुमार यांना श्रद्धांजली.

Story img Loader