२५ एप्रिल २०१५ रोजी नेपाळमध्ये प्रचंड मोठय़ा भूकंपाची आपत्ती ओढवली. भूकंप, पूर, चक्रीवादळे, ढगफुटी या सगळ्या नैसर्गिक आपत्ती, तर बॉम्बस्फोट, दहशतवादी हल्ला, दंगल या मानवनिर्मित आपत्ती. आपल्याला तोंड द्यावे लागते. आपत्ती म्हणजे आकस्मिक आलेले संकट. यात मोठय़ा प्रमाणत जीवित आणि वित्तहानी होते. कोणत्याही आपत्तीनंतर ताबडतोब मदतीचा ओघ सुरू होतो. अन्न, वस्त्र, निवारा आणि सुरक्षितता या गरजा पूर्ण करण्यासाठी सगळे झटत असतात. जखमींची शुश्रूषा आणि रोगराई पसरू नये यासाठी उपाययोजना सुरू केल्या जातात. एवढय़ा मोठय़ा संकटाने माणूस हतबल होतो. त्याच्या मनावर मोठा आघात होतो. आपत्तीनंतर शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्याचीही काळजी घ्यावी लागते.
भूकंपासारख्या आपत्तीची पूर्वसूचना मिळत नाही. सुरुवातीला मोठा मानसिक धक्का बसतो. जे घडते आहे त्यावर विश्वासच बसत नाही. पहिल्या काही तासांमध्ये प्रचंड भीती मनात निर्माण होते. जवळच्या व्यक्तीचा मृत्यू, आपल्या घराची हानी हे जणू घडलेच नाही असे काही जण वागतात. अनेक ठिकाणांहून मदत मिळू लागली की एक प्रकारचे बळ अंगी येते. आपण जिवंत असल्याचा आनंद वाटतो; त्याचबरोबर आपण का जिवंत राहिलो आणि बाकीचे का गेले अशी अपराधीपणाची भावना निर्माण होते. इतरांना मदत करण्याची प्रबळ इच्छा होते. हळू हळू मदतीचा ओघ थांबतो. मग असे लक्षात येते की आता आपले आपल्यालाच सावरायचे आहे. आपण एकटे पडलो, सगळे आपल्याला सोडून गेले असे वाटू लागते आणि मनात निराशा निर्माण होते. शारीरिक व्याधीही बळावतात.
आपत्तीनंतरच्या काही तासांपासून ते अनेक महिने- वर्षांपर्यंत दूरगामी मानसिक परिणाम दिसून येतात. अगदी लगेचच्या काळात आपली झालेली हानी, जवळच्या व्यक्तीचा मृत्यू, मनात दाटून येणारी भीती, भविष्याविषयीची अनिश्चितता यांचा मनावर परिणाम होतो. अचानक दचकणे, भीती वाटणे, थोडासा आवाज झाला तरी घाबरून घराबाहेर पळणे, झोपेत दचकणे, छातीत धडधडू लागणे, हातपाय थरथरणे, घाम फुटणे अशी अनेक शारीरिक लक्षणे दिसून येतात. मनात सतत चिंता वाटणे, रडू येणे, उदास वाटणे, निराश वाटणे, कशातही रस न वाटणे असा उदासीनतेचा आजार होऊ शकतो. व्यसनाधीनता वाढते. लहान मुलांच्या मनावरही खोल परिणाम होतो. मनावर झालेल्या आघातामुळे संकटकाळची दृश्ये सतत डोळ्यासमोर येत राहतात. जणू पुन्हा तो प्रसंग आपण जगतो आहोत अशी अनुभूती येते. कोणतेही काम करतानासुद्धा पुन्हा पुन्हा त्या प्रसंगाची आठवण येत राहते आणि मन अस्वस्थ होते. काही जण त्या प्रसंगाबद्दल बोलणे टाळतात, इतर आपत्तीग्रस्त व्यक्तींना भेटणे टाळतात. एकूणच लोकांशी मिळून मिसळून राहणे बंद करतात. आपल्या जवळच्या माणसांबद्दलसुद्धा एक प्रकारचा अलिप्तपणा येतो. मनातील भावभावना जणू गोठून जातात. या अशा लक्षणांना Post-traumatic stress disorder (मानसिक आघाताचे दुष्परिणाम) असे म्हणतात. (PTSD), अतिचिंतेचे विकार, उदासीनता या सगळ्यासाठी मनोविकारतज्ज्ञाची मदत घेणे आवश्यक असते. मन मोकळे करायला मिळणे आवश्यक असते. मानसिक त्रास प्रमाणाबाहेर असेल तर औषध गोळ्यांचीही मदत घ्यावी लागते.
आपत्तीनंतरच्या एक ते तीन वर्षांच्या काळात हळू हळू व्यक्ती आणि समाज आपले बदललेले वास्तव स्वीकारू लागतो. आयुष्य पुन्हा रुळावर येते. यात यशस्वी होतात ते अनुभवातून काही शिकतात. आपल्या वैयक्तिक क्षमता, संकटाला सामोरे जाण्याची शक्ती याचे प्रकटीकरण होते आणि जगण्याचे नवे बळ मिळते.
आपत्तीमुळे एक असाधारण परिस्थिती निर्माण होते. त्यावर स्वाभाविक अशी मानसिक प्रतिक्रिया दिसून येते. त्यात वावगे असे काही नाही. मानवी मन अतिशय लवचीक असते. आपत्तीला तोंड देऊन आपले आयुष्य सावरण्याच्या प्रक्रियेमध्ये, आपले मन:स्वास्थ्य टिकवण्यासाठी या लवचीकतेचा उपयोग होतो. बहुतांश लोक आपत्तीतून यशस्वीपणे बाहेर येतात. उपलब्ध संसाधने वापरून मानसिक बळ मिळवतात. राहते घर, पैसा, नोकरी अशा प्रत्यक्ष साधनांचा उपयोग होतोच; परंतु संकटांना सामोरे जाण्याच्या क्षमतेविषयी आत्मविश्वास असणे, भावनिक आधार देण्यासाठी कोणी ना कोणी उपलब्ध असणे याचा खरा उपयोग होतो. आपले अनुभव कोणाबरोबर तरी वाटून घेता आले की मानसिक आधार मिळतो. येणाऱ्या समस्यांना उत्तरे शोधण्यासाठी सल्लामसलत करायला कोणीतरी असते. मनात आशा असेल तर लवकर मन:शक्ती निर्माण होते. सर्व जण आपल्यासाठी करत असलेल्या प्रयत्नांमधून चांगले तेच घडेल असे मानणारे अधिक लवकर सावरतात. आपणहून परिस्थिती बदलण्याचा सातत्याने प्रयत्न करणे, परिस्थितीचे योग्य परीक्षण करणे, परिस्थिती सुधारायला वेळ लागेल याचा स्वीकार करणे, या सगळ्याचा संकटसमयी उपयोग होतो. खूप वेळा आपत्तीनंतर आयुष्याचा एक नवीन अर्थ सापडतो. तो जगण्याचे बळ देतो. आध्यात्मिक, धार्मिक प्रवृत्ती असेल तर मानसिक शक्ती मिळते.
वैयक्तिक पातळीवरच नाही, तर सामूहिक पातळीवरसुद्धा मन:स्थितीचा लवचीकपणा आपत्तीतून समाजाला सावरायला मदत करतो. एकत्रितपणे केलेले प्रयत्न, तरुण आणि मुलांनासुद्धा सामूहिक कामांमध्ये सामील करून घेणे, जबाबदाऱ्यांचे वाटप करणे, सण, उत्सव सामूहिकरीत्या साजरे करणे याचा पुनर्वसनामध्ये मोठा वाटा असतो.
आपत्तीला तोंड देणे जितके महत्त्वाचे तितकेच आपत्तीची मानसिक पूर्वतयारी (Disaster preparedness) करणे हेही महत्त्वाचे बनले आहे. महत्त्वाची कागदपत्रे, थोडे पैसे, कोरडा खाऊ , पाणी, अशा वस्तू ठरावीक ठिकाणी ठेवणे आणि वेळ पडल्यास लगेच घेऊन घराबाहेर पडणे याची मनातल्या मनात तालीम केली की प्रत्यक्ष संकटाच्या वेळेस गडबडून न जाता तोंड देण्याचे बळ येते. घरातल्या व्यक्तींबरोबर याची चर्चा करणे गरजेचे असते. शाळा, कार्यालये, सार्वजनिक ठिकाणे अशा सर्व ठिकाणी अशी योजना असणे आवश्यक असते.
अशा मानसिक पूर्वतयारीपासून ते आपत्तीचा यशस्वीपणे सामना करणे, त्यासाठी आवश्यक तेव्हा मानसिक उपचारांची मदत घेणे म्हणजे आपत्तीचे व्यवस्थापन होय.
डॉ. जान्हवी केदारे