सध्या सर्वत्र जय्यत तयारी सुरू आहे. दिवाळी दोन्हीकडे असणार आहे. त्यामुळे तयारी, धामधूमही दोन्हीकडे आहे. फक्त घराघरांमध्ये दिवाळीच्या तयारीला आनंद-उत्साहाचे उधाण दिसत आहे; तर राजकारणात मात्र अनिश्चितता आहे. चर्चा आहे ती कोणाची दिवाळी अन् कुणाचे दिवाळे वाजणार याची. असे म्हणतात की, राजकारण्यांची दिवाळी तर वर्षभरच सुरू असते; पण ती दिवाळी करण्यासाठी म्हणून जी बेगमी करावी लागते, त्या मतांच्या बेगमीचा कालखंड सध्या सुरू आहे. एकुणात काय, तर घरातही धामधूम आणि बाहेरही; अशीच अवस्था आहे. फरक इतकाच की, राजकीय फटाके दिवाळीपूर्वीच म्हणजे १९ ऑक्टोबर रोजीच फुटणार आहेत. तेव्हा निकाल लागेल की, अॅटमबॉम्ब कोण आणि फुसका बार कोणाचा होता ते!
राजकारणातील धामधुमीकडेही सामान्यांचे लक्ष असतेच, पण त्यांना स्वत:च्या रोजच्या जगण्याची अधिक भ्रांत असते आणि म्हणून ते राजकारणाकडे दोन घटकांची करमणूक म्हणून पाहताना दिसतात. अर्थात मतदारराजाचा दृष्टिकोनच असा असेल तर मग राजकारणाचे काय होणार? यंदा तर विधानसभेच्या निवडणुका म्हणजे सार्वत्रिक गोंधळच असे वातावरण आहे.
वाढत्या महागाईने जीव कितीही टांगणीला लागला तरी सामान्यांच्या आयुष्यात दिवाळीला एक वेगळेच स्थान आहे. दिवाळी म्हणजे सणांची राज्ञी. खाण्यापिण्याची रेलचेल आणि त्याचबरोबर कपडय़ालत्त्यांची खरेदी हे आजवरचे समीकरण, पण आता देशवासीयांची क्रयशक्तीही वाढली आहे. त्यामुळेच कपडय़ालत्त्यांबरोबर आता घरटी एक तरी इलेक्ट्रॉनिक वस्तू दिवाळीला विकत घेतली जाते, असे काही अग्रगण्य व्यावसायिक सर्वेक्षण कंपन्यांनी केलेल्या पाहणीत लक्षात आले आहे. त्यातही आता जमाना आहे तो घरबसल्या सारे खरेदी-विक्री व्यवहार करण्याचा. त्यामुळे ऑनलाइन पोर्टल्सची चलती आहे सर्वत्र. हाच नवा ट्रेंड लक्षात आल्याने या खेपेस रुचकर व शॉपिंग विशेषांकामध्ये लोकप्रभाने ऑनलाइन शॉपिंगच्या विश्वाचा अंदाज आणि आवाका स्पष्ट करणारी कव्हर स्टोरी केली आहे. असे असले तरी याची खात्री आहे की, अंकामध्ये सर्वाच्या आवडीचा आणि आकर्षणाचा विषय ठरणार आहे तो रुचकर विशेष!
सेलिब्रेशन असे म्हटले किंवा कोणतीही चांगली गोष्ट झाली की, कुणाच्याही तोंडी सहज उद्गार येतात, चला पार्टी करू या! खाण्यापिण्याशी माणूस हा इतका जोडला गेला आहे. जगण्यासाठी, शरीराच्या वाढीसाठी, झीज भरून येण्यासाठी खाणे हा जसा नैसर्गिक भाग आहे, तसाच तो माणसाच्या सेलिब्रेशनचाही अविभाज्य भाग झाला आहे. पण ते खरे आहे ते जगाच्या पौर्वात्य भागात. कारण पाश्चिमात्यांकडे मात्र वेगळी प्रथा आहे. पौर्वात्य देशांमधली परंपरा ही खाण्यापिण्याच्या संदर्भात आपल्या संस्कृतीचाच एक अविभाज्य भाग झालेली आहे. या खाण्यापिण्यामुळे पौर्वात्य जगात माणसे एकमेकांशी जोडली गेली आहेत. इथे प्रेम आणि सौहार्द व्यक्त करण्यासाठी प्रतीकात्मक बाब म्हणून खाद्यसंस्कृती कार्यरत आहे. नव्या ओळखीनंतर म्हणूनच तर इथे पाहुण्यांना घरी बोलावण्याची प्रथा आहे. पाश्चात्त्य माणूस एवढय़ा सहजी कधीच कुणाला घरी बोलावीत नाही. तो त्याचे खासगीपण आणि व्यक्तिगतता राखून असतो. पाश्चात्त्य जगात एखादी व्यक्ती खाण्यापिण्यासाठी आमंत्रण देते तेव्हा असे गृहीत असते की, दोघांनीही एकत्र खायचे-प्यायचे आणि पैसे आपापले भरायचे. म्हणूनच विदेशात प्रथमच गेलेल्या भारतीयांची अशी फसगत झाल्याचे अनेक प्रसंग ऐकायला मिळतात, कारण आमंत्रण देणारी व्यक्तीच पैसेही भरते, असा आपला पौर्वात्य अनुभव असतो.
भारतासह पूर्वेकडील सर्वच देशांमध्ये खाद्यसंस्कृती ही अशा प्रकारे प्रेम व्यक्त करणारी आणि एकमेकांप्रति सौहार्द व्यक्त करणारी आहे. म्हणून तर आपण निमित्त शोधत असतो.. ईद असो किंवा मग दिवाळी. कधी खीर वाटप होते शेजाऱ्यापाजाऱ्यांमध्ये तर कधी फराळ वाटला जातो. म्हटले तर प्रत्येक घरामध्ये फराळ तयार असतो, पण कुणी म्हणेलही की, मग एकमेकांना फराळ देण्यात काय अर्थ आहे? इथे हे लक्षात घ्यायला हवे की, आपण देतो तो फराळ नसतो तर ते सौहार्दाचे वाटप असते!
सौहार्दाची दिवाळी!
सध्या सर्वत्र जय्यत तयारी सुरू आहे. दिवाळी दोन्हीकडे असणार आहे. त्यामुळे तयारी, धामधूमही दोन्हीकडे आहे. फक्त घराघरांमध्ये दिवाळीच्या तयारीला आनंद-उत्साहाचे उधाण दिसत आहे...
First published on: 10-10-2014 at 01:15 IST
मराठीतील सर्व मथितार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diwali festival