रुचकर आणि शॉपिंग विशेष
आदित्य बिवलकर – response.lokprabha@expressindia.com

दिवाळीनिमित्त अनेक जण नवीन लॅपटॉप आणि स्मार्टफोन्सची खरेदी करतात. या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपन्यांनी अनेक नवीन पर्याय आणले आहेत. अनेकदा सारखेच फीचर्स असल्यामुळे, नेमकं कोणतं मॉडेल निवडावं याविषयी ग्राहक गोंधळून जातात. त्याचबरोबर ऑनलाइन की ऑफलाइन खरेदी हासुद्धा प्रश्न असतोच. सध्या ई-कॉमर्स संकेतस्थळांनी स्मार्टफोन्सवर दिवाळीनिमित्त अनेक ऑफर्स दिल्या आहेत. सेल सुरू आहेत. त्यातच ईएमआय ऑफर, कॅशबॅक, रिवॉर्ड्स यांसारखे पर्यायसुद्धा आहेत, त्यामुळे ऑनलाइन खरेदी हादेखील उत्तम पर्याय आहे. उपलब्ध असलेले विविध पर्याय आणि त्यातून आपल्या गरजेनुसार योग्य पर्याय निवडण्याच्या टिप्स जाणून घेऊयात..

मोबाइल खरेदी करताना

स्मार्टफोनच्या खरेदीचा ट्रेन्ड आता बदलत चालला आहे. ठरावीक फीचर्सचा विचार करून खरेदी केली जाते. त्यामुळे स्मार्टफोन विकत घेताना आपल्या गरजा, आवडी, वापर इत्यादी निकषांचा विचार करावा. बहुतेक वेळा स्मार्टफोन ग्राहक सर्वात उत्तम बॅटरी लाइफ असणाऱ्या फोनला प्राधान्य देतात. सॅमसंगच्या एम-सीरीज आणि ए सीरीज फोन्समध्ये उत्तम बॅटरी लाइफ असणारे पर्याय उपलब्ध आहेत.

बॅटरीप्रमाणेच स्मार्टफोनमधील युजर इंटरफेस, स्टोरेजचे पर्याय, कॅमेरा, स्मार्टफोनचे वजन या गोष्टीसुद्धा नवीन स्मार्टफोन विकत घेताना लक्षात घेतल्या पाहिजेत. सामान्य भारतीय ग्राहक नवीन मोबाइल घेताना तो तीन ते चार वर्षांसाठी वापरण्याच्या उद्देशाने घेतो. त्यामुळे आपल्या वाढत्या गरजाही मोबाइल निवडताना विचारात घ्यायला हव्यात.

गरजेनुसार निवड

  • अगदीच प्राथमिक वापर असेल तर ४ जीबी अन्यथा कमीत कमी ६ जीबी रॅम असणारा फोन घेणं फायद्याचं ठरेल.
  • स्टोरेजचा विचार करायचा झाल्यास कमीत कमी ६४ जीबी इंटर्नल स्टोरेज असणारा स्मार्टफोन घेणे योग्य.
  • आपल्याला दिवसभरात स्मार्टफोनचा किती वापर करावा लागतो, याचा अंदाज घ्यावा आणि त्यानुसार बॅटरीची क्षमता असणारा स्मार्टफोन निवडावा.
  • स्मार्टफोन पुढील ३-४ र्वष वापरायचा असेल, तर ५जी सपोर्ट असणाऱ्या फोनचा जरूर विचार करावा.

बजेटचा विचार

तुमच्या बजेटनुसार तुम्ही स्मार्टफोनची निवड करू शकता. सध्याच्या घडीला सॅमसंग आणि रिअलमी या कंपन्यांच्या स्मार्टफोनना चांगला प्रतिसाद मिळत असून या दोन कंपन्यांमध्ये प्रथम क्रमांकासाठी चुरस आहे. त्याखालोखाल ओप्पो, व्हिवो या कंपन्यांच्या मिड रेन्ज स्मार्टफोनचा नंबर लागतो. या स्पर्धेत वन प्लस आणि अ‍ॅपलच्या प्रीमियम स्मार्टफोनचासुद्धा चांगला पर्याय ग्राहकांसमोर आहे. वन प्लस नॉर्ड तसेच सॅमसंगच्या एम सीरीजवर सध्या ऑनलाइन भरपूर ऑफर्स आहेत. एम सीरीजमध्ये

१२ हजारांपासून ते २८हजारांपर्यंतचे फोन उपलब्ध असून त्यांच्या फीचर्समध्ये कमीअधिक बदल आहेत. ते विचारात घेऊन ग्राहक फोनची निवड करू शकतात.

१० हजारांपर्यंतचे स्मार्टफोन

१० हजार रुपये किंवा त्यापेक्षा कमी किमतीच्या स्मार्टफोनमध्ये बेसिक फीचर्स उपलब्ध आहेत. सॅमसंग एम २, एम १२, टेक्नो स्पार्क ७, रेड मी ९, ओप्पो ए १५, रेड मी ९ प्राइम, एम १, व्हिवो वाय २० यांसारख्या फोन्सचा पर्याय आहे. यामध्ये साधारणपणे ३२ मेगा पिक्सल कॅमेरा, ३ किंवा ४ जीबी रॅम ६४ जीबी स्टोरेज अशी फीचर्स आहेत. खिशाला परवडणाऱ्या या फोन्सना सर्वाधिक मागणी आहे. उत्तम बॅटरी लाइफ, चांगला कॅमेरा आणि परवडणारी किंमत यामुळे हे फोन सध्या चांगलेच चर्चेत आहेत.

१५ हजारांपर्यंतचे स्मार्टफोन

१५ हजार रुपये आणि त्यापेक्षा कमी किमतीचा फोन खरेदी करायचा असल्यास सॅमसंग एम ३२, रेडमी नोट १० एस, ओप्पो ए ३१, ओप्पो ए ५५ या फोनना सध्या चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या तिमाहीमध्ये सॅमसंग एम सीरीजने सर्वाधिक विक्री नोंदवली. बॅटरी लाइफ हा या सीरीजमधला सगळ्यात मोठा मुद्दा मानला जातो. दोन दिवसांचा टॉक टाइम असणारे फोन या सीरीजमध्ये सध्या बघायला मिळतात.

१५ हजारांच्या पुढे…

पंधरा हजारच्या पुढे स्मार्टफोन सीरीजमध्ये प्रत्येकाच्या बजेटनुसार विविध पर्याय आहेत. यामध्ये २५ हजार आणि त्यापासून पुढे वन प्लस तसेच इतर प्रीमियम रेंज फोन उपलब्ध आहेत. फोन आपण किती वर्षे वापरणार आहोत आणि आपला मोबाइलचा वापर नेमका कशासाठी आहे, याचा विचार करून या रेंजमधील फोनची निवड ग्राहक करू शकतात. प्रीमियम रेंजमध्ये आयफोनच्या वेगवेगळ्या मॉडेल्सवर सध्या भरपूर ऑफर्स आहेत. कंपनीने आयफोन १३चे अनावरण केल्यानंतर आधीच्या मॉडेल्सवर सध्या ऑफर्स दिल्या आहेत.

लॅपटॉप विकत घेताना

मोबाइलप्रमाणेच सध्या वर्क फ्रॉम होममुळे ऑफिसच्या कामांसाठी लॅपटॉपचा वापर करणाऱ्यांचं प्रमाण वाढलं आहे. उत्सवांच्या निमित्ताने ऑनलाइन आणि ऑफलाइन सवलती आणि सेलमुळे दरवर्षीच या काळात लॅपटॉपची विक्री वाढते. यंदाही तेच चित्र पाहायला मिळण्याची शक्यता आहे. सध्या हलक्या, छोटय़ा लॅपटॉपना पसंती असल्याचे दिसून येत आहे. एचपी, डेल, लेनोव्हो या तीन कंपन्यांमध्ये सध्या चांगलीच चुरस आहे. ऑनलाइन तसेच ऑफलाइन बाजारात साधारण ३० ते ४० हजारांदरम्यान लॅपटॉप उपलब्ध आहेत. प्रत्येकाने आपलं बजेट आणि वापर ठरवून त्यानुसार योग्य मॉडेलची निवड केली पाहिजे.

कोणतीही नवी वस्तू घेताना सर्वात महत्त्वाचा निकष ठरतो बजेट! आपल्या सोयीनुसार आणि बजेटनुसार लॅपटॉपचं मॉडेल शोधून मग त्यानुसार आवडेल तो लॅपटॉप खरेदी करावा. आज २० हजारांपासून ते ३-४ लाखापर्यंत चांगले लॅपटॉप्स उपलब्ध आहेत. प्रत्येक कंपनीचं लॅपटॉपसाठी स्वत:चं संकेतस्थळ असतंच. शिवाय फ्लिपकार्ट, स्नॅपडीलसारख्या संकेतस्थळांवरही लॅपटॉप्सचे पर्याय उपलब्ध झालेले दिसतील. याशिवाय जवळपास प्रत्येक शहरात प्रत्येक कंपनीचे अधिकृत विक्री केंद्र असतेच. त्यामुळे तिथे जाऊनही लॅपटॉपची निवड करता येईल.

अनेकदा केवळ लोकांचं ऐकून आपण प्रोसेसर किंवा लॅपटॉपचं महागडं मॉडेल खरेदी करण्यासाठी जास्त पैसे खर्च करतो, मात्र त्या त्याचा उपयोग आपल्याला नसतो. त्यामुळे आपली गरज ओळखून लॅपटॉप विकत घ्यावा.

* महागडा लॅपटॉप जास्त वेगवान असतो किंवा तो हँग होण्याची शक्यता नसते, असा अनेकांचा गैरसमज असतो. उगाच जास्त पैसे देऊन महाग लॅपटॉप विकत घेतला जातो; पण प्रत्यक्षात मात्र लॅपटॉप हँग होणे किंवा संथ होणे हे त्याचा वापर योग्य पद्धतीने केला जात आहे की नाही, यावर अवलंबून असते. त्याचा लॅपटॉपच्या किमतीशी संबंध नसतो.

* लॅपटॉप विकत घेत असताना त्याची स्क्रीन साइज, वजन याचबरोबर त्याचे फीचर्स याचाही विचार करणे आवश्यक आहे.

* लॅपटॉप ऑनलाइन घेतल्यास, काही वेळा वॉरन्टी वाढवून मिळत नाही. काही वेळा त्यासाठी अतिरिक्त शुल्क भरावे लागते. स्टोअर सहकार्य मिळत नाही. असे अनेक फायदे-तोटे आहेत. त्यामुळे याचा विचार करून ऑनलाइन किंवा ऑफलाइन खरेदीचा निर्णय घ्यावा.

स्मार्टफोन आणि किंमत

  • रेडमी ९    ६९००
  • रेडमी नोट १०          १४०००
  • ओप्पो ए ३१             ११५००
  • सॅमसंग एम ३२         १२,९९९
  • सॅमसंग एम १२         १०,५००
  • वन प्लस नॉर्ड           २३,०००
  • आयफोन ११            ४००००
  • एस २०    ४००००
  • वन प्लस ९               ४५०००

ऑनलाइन खरेदी करताना लक्षात ठेवण्याच्या गोष्टी

  • योग्य ब्रॅन्ड बघून आणि त्याची दुकानातील खरी किंमत बघूनच खरेदी करा.
  • कंपनीच्या रिफन्ड पॉलिसीची माहिती घ्या.
  • इलेक्ट्रॉनिक उपकरणांसाठी वॉरन्टी नक्की वाढवून घ्या. प्रॉडक्ट असेल तर नक्की घ्या.
  • तक्रार असल्यास ती कंपनीच्या हेल्प आणि सपोर्टकडे नोंदवा.
  • सेलमधील गोष्टींचा नीट अभ्यास करून, त्यातील रिव्ह्य़ू वाचून मगच ऑर्डर द्या.
  • कंपनीचे सव्‍‌र्हिस सेंटर आणि इतर माहिती तपासून बघा.
  • केवळ स्वस्त आहे, सवलत आहे किंवा सेल आहे, म्हणून खरेदी करू नका.