अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांवर सध्या एक जाहिरात लोकप्रिय झाली आहे.. उच्च शिक्षणासाठी दूरदेशी जाऊ इच्छिणारा एक तरुण व्हिसाच्या रांगेत असतो. मुलाखतीला सुरुवात होतानाच मुलाखतकार त्याला विमानाचे तिकीट केव्हाचे काढले आहे, याची विचारणा करते. त्याने तारीख सांगितल्यावर ती म्हणते की, ‘अरे, त्या दिवशी तर देशात मतदान आहे.’ त्यावर मुलगा उत्तरतो, ‘माझे एक मत नाही पडले तर या देशाला काय एवढा मोठा फरक पडणार आहे..’ त्यावर मुलाखतकार म्हणते, ‘तुझ्या एका मताने या देशाला काही फरक पडणार नसेल, तर तू ज्या देशात जाणार आहेस त्या देशाला तरी तुझ्या येण्या- न येण्याने काय फरक पडणार आहे?’ मतदानाला प्रवृत्त करणारी ही जाहिरात खूप महत्त्वाची आहे.
देशातील सध्याचे वातावरण हे सर्वाधिक संभ्रमाचे आणि गोंधळात टाकणारे आहे. अनेक प्रश्न मतदारांसमोर फेर धरून आहेत. व्यक्तीला समोर ठेवून मतदान करायचे की, पक्ष आणि त्यांच्या संस्कृतीला समोर ठेवून. स्थानिक मुद्दय़ांना महत्त्व द्यायचे की, देशपातळीवरील? हे सर्वच मुद्दे महत्त्वाचे असून हा यक्षप्रश्न मतदारांनाच सोडवावा लागणार आहे. त्या प्रश्नापासून दूर पळणे आणि मतदान न करणे किंवा ‘नोटा’चा नकारात्मक मतदानाचा म्हणजेच ‘उपरोक्त उमेदवारांतील कुणीही नाही’ हा पर्याय स्वीकारणे हा मार्ग असणार नाही. ती पळवाट असेल.. निर्णय घ्यायला घाबरू नका आणि पळपुटेही होऊ नका.. लक्षात ठेवा भित्यापाठी ब्रह्मराक्षस. त्या ब्रह्मराक्षसाला दूर ठेवायचे तर हीच संधी आहे. नंतर तब्बल पाच वर्षे वाट पाहावी लागेल.
इतर सर्व मतदान करताहेत तेव्हा आपल्या एका मताने काय फरक पडणार, असा विचार प्रत्येकानेच केला तर अभिषेकासाठी दुधाने भरावयाचा हौद पाण्यानेच भरला गेल्याची पुराणातील कथा एकविसाव्या शतकात प्रत्यक्षात येईल आणि ते आपणा सर्वासाठीच घातक असेल. त्याची जाणीव होईल तेव्हा वेळही निघून गेलेली असेल. धर्म, जात-पात, पंथ आदी भेदाभेदांना आपल्या विचारांत स्थान देऊ नका. उमेदवारांची पाश्र्वभूमी तपासून पाहा, कर्तृत्व जोखा आणि विवेकाने अवश्य मतदान करा.
मनातील सारे भ्रम, विभ्रम आणि संभ्रम दूर सारण्याची शक्ती केवळ विवेकामध्ये असते. उमेदवार आणि विविध पक्षांनी वातावरण गढूळ आणि ढगाळ केले आहे. त्यांचे उद्दिष्टच ते आहे की आकाशात पाहा अथवा खाली असलेल्या पाण्यात, परिणाम गोंधळाचाच असेल. कारण सर्वानाच वाटते आहे.. इफ यू कान्ट कन्व्हिन्स, देन कन्फ्यूज. त्यांचे कामच ते आहे.
या परिस्थितीत आठवते एक बुद्धकथा. पांथस्थ नुकतेच निघून गेलेल्या ओढय़ाकाठी भगवान बुद्ध थांबले. त्यांनी शिष्याकडे पाणी पिण्याची इच्छा व्यक्त केली. काही क्षणांतच शिष्य हात हलवत परत आला. नुकतेच पांथस्थ गेल्याने पाणी गढूळ असल्याचे, कारण शिष्याने दिले. बुद्ध म्हणाले, अशा वेळी थोडे थांबावे. संयम ठेवावा. शांत बसावे. काही काळ जाऊ दिला की, पाणी शांत होते. गाळ खाली बसतो. मग ते पाणी वरच्या बाजूस स्वच्छ असेल.
हे खरे आहे की, संयम ठेवला, शांत बसले तर गाळ खाली बसल्याने पाणी शुद्ध होईल. पण सध्याचा काळ त्या मार्गावरून जाणाऱ्यांनी पाणी सतत गढूळ करण्याचाच आहे. म्हणूनच अशा वेळी विवेकाचाच आधार असू शकतो. बुद्धीचे उपयोजन करण्याची प्रत्येकाची क्षमता वेगळी असली तरी ती प्रत्येकाकडे असतेच असे विज्ञान सांगते. त्याच वेळेस विज्ञान हेही सांगते की, विवेकबुद्धी निसर्गाने प्रत्येकाला दिलेली असते. फक्त ती जागृत ठेवावी लागते, जाणीवपूर्वक!
आपल्या एका मताने काय होणार असा विचार मनात आलाच तर घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे शब्द आठवा. ते म्हणाले होते, ‘तुमच्या मताची किंमत मीठ-मिरचीइतकी समजू नका. त्यातील सामथ्र्य कळेल तेव्हा ते विकत घेऊ पाहणाऱ्यांइतके कंगाल कुणी नसेल.’
आपल्या प्रत्येकातील विवेकाचा सूर्योदय झाला तर कुणीही पेरलेल्या अंधाराचा नाश करण्याची क्षमता त्यात असेल..
म्हणूनच ‘विवेके करावे मतदान!’
 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा