मुंबईतील केईएम या सरकारी रुग्णालयामध्ये ‘तो’ प्रथमच जात होता. निमित्त होते मित्राच्या एका आजारी नातेवाईकाला पाहायला जाण्याचे. तो केवळ सोबत गेला होता. मित्र नातेवाईकाशी गप्पा मारत असताना तो आजूबाजूला पाहात होता. सर्व खाटांजवळ नातेवाईक- मित्रांची गर्दी होती, पण काही खाटांजवळ मात्र रुग्णांसोबत कुणीच नव्हते. बव्हंशी ती म्हातारी मंडळीच होती. सहज चौकशी केल्यावर त्याला कळले की, त्यांना भेटायला कुणीच येत नाही, कारण जवळचे असे कुणी नाहीच त्यांना.. त्यातील काहींशी त्याने संवाद साधला तेव्हा कळले की, याच नव्हे तर इतरही सरकारी रुग्णालयांत असे बरेच असतात, ज्यांना कुणीच वाली नाही.. हाच त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारा क्षण होता. त्याच वेळी त्याने निर्णय घेतला. आयटी कंपनीत पाच दिवसांचाच आठवडा असल्याने दोन दिवस सुट्टी असते. त्यातील एक दिवस या रुग्णांसोबत घालवायचा. त्यांची विचारपूस करायची. कुणाला औषधे हवी असतात, पण आणणारे कुणी नसते. तर कुणाला वेगवेगळ्या चाचण्यांसाठी विविध विभागांत नेणारे कुणी नसते.. कुणाशी बोलायला कुणी नसते. अशांसाठी आता तो सुट्टीचा एक वार इथे देतो. त्याच्याकडून प्रेरणा घेत आता अनेक तरुण त्यांचा वेळ सत्पात्री दान करण्यासाठी पुढे आले आहेत.
एका स्पर्धेच्या वेळेस शैला भागवत नावाच्या आजींच्या असे लक्षात आले की, अंध मुलांचा सहभाग कमी आहे. कारण मुळातच त्यांना ब्रेलमध्ये वाचण्यासाठी पुस्तकेच उपलब्ध नाहीत. आता गेली काही वर्षे प्रतिवर्षी ५० हजार रुपये त्या वेगळे काढतात आणि त्यातून अंध मुलांसाठी पुस्तके तयार करून घेतात.
विलेपाल्र्याचे दिवंगत वासुदेव बर्वे हेदेखील अशांपैकीच एक. ‘ऐ मेरे वतन के लोगो’ हे कवी प्रदीप यांचे गीत भारतभरात गाजले, पण कवी प्रदीप यांना मात्र लोक विसरले, हे एका बातमीतून लक्षात आल्यानंतर बर्वे यांनी स्वत:च्या पेन्शनमधून कवी प्रदीप यांच्या नावे पुरस्कार सुरू केला. गरजूंना मदत करणे हा त्यांनी धर्म मानला. तसेच १५ ऑगस्टला सिग्नलवर भारतीय ध्वज लहान मुलांकडून विकत घेताना त्यांना लक्षात आले की, त्यावरचे अशोकचक्र कुणा लहान मुलानेच हाताने काढले आहे. चौकशी केल्यावर कळले की, मूकबधिर मुलांची संस्था हे ध्वज तयार करण्याचे काम करते. त्या वेळेस राष्ट्रध्वजाचा सन्मान कायम राहावा आणि त्याच मुलांच्या हातांमध्ये ते काम राहावे म्हणून बर्वेकाकांनी पेन्शनमधल्या पैशांतून अशोकचक्राची डाय तयार करून मूकबधिर शाळांना मोफत वाटली..
दान, दान म्हणजे तरी शेवटी काय असते? माणसाच्या नि:स्वार्थी चांगुलपणाचाच तो एक आविष्कार असतो!
वाचक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांना ‘लोकप्रभा’ वर्धापन दिन आणि गुढीपाडव्याच्या अनंत शुभेच्छा!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा