आपल्यासमोर प्रश्न असा येतो की ‘संशय म्हणजे नेमके काय?’ आणि आपल्या मनात काही नसतानाही मनात घर करून तो आपल्या मानगुटीवर बसतो. आणि काही केल्या तो आपला पिच्छा सोडत नाही. राग, लोभ, मद, मत्सर याप्रमाणेच संशय हा व्यक्तिस्वभाव आहे. बऱ्याचदा हा संशय सत्याची उकल होण्याआधीच मारा करतो आणि खूप घातक ठरतो. ती वेळ येण्यापूर्वीच त्या संशयाचा आपणास पुरेपूर बंदोबस्त करावयास हवा.
या संशयाची अनेक रूपे आहेत या ना त्या माध्यमातून तो सतत आपल्या अवतीभवती वावरत असतो. यात प्रामुख्याने व्यक्तीचा व्यक्तीवर संशय, एखाद्या वस्तूबाबतचा संशय, असे अनेक प्रकार आहेत. आपण मुख्यत्वेकरून व्यक्तिसंशयाचे विश्लेषण पाहणार आहोत. उदा. पोलिसांचा चोरावर संशय. एखादी व्यक्ती निदरेष असतानाही केवळ संशयामुळे एखाद्या गुन्ह्यामध्ये गोवली जाते. मग याला जबाबदार कोण? पोलीस, ती व्यक्ती की संशय! याचे उत्तर मी शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा मला असे दिसून आले की दोन्ही व्यक्ती त्यास कारणीभूत आहेत. निदरेष व्यक्ती भीतीपोटी पोलिसांच्या प्रश्नाला व्यवस्थित उत्तरे देत नाही, त्यामुळे पोलिसांच्या मनात त्या व्यक्तीविषयी संशयाचे दाट वलय निर्माण होते. तसेच गुन्ह्याचा पुरेपूर अभ्यास न करता त्याची योग्य ती शहानिशा न करता त्या गुन्ह्याशी संबंध नसलेल्या व्यक्तीवर हकनाक संशय घेतला जातो. हे झाले सर्वसाधारण उदाहरण.
हा संशय इथेच थांबत नाही. या संशयामुळे आपल्याला अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झालेली पाहायला मिळतील. उदा. पतीचा पत्नीवर संशय किंवा पत्नीचा पतीवर संशय. पतीला सारखे असे वाटते की आपल्या पत्नीचे कुणा दुसऱ्या व्यक्तीशी अनैतिक संबंध आहेत. हेच पत्नीला पतीच्या बाबतीतही वाटते. माझा पती रोज वेळेवर घरी येत असता आजकाल उशिरा घरी येऊ लागला आहे, म्हणजे नक्कीच त्याचे कुणाशी अनैतिक संबंध असतील वगैरे. या संशयासही कारणीभूत वरील दोन्ही घटक (पती/पत्नी) ठरतात. पती आपल्या पत्नीला एखाद्या गोष्टीचे कटाक्षाने पालन करण्यास सांगत असतानाही पत्नी त्याकडे दुर्लक्ष करते आणि यामुळे सदर पतीचा पत्नीबद्दलचा संशय वाढत जातो.
अशा या संशयामुळे पती आणि पत्नी दोघांचेही मानसिक संतुलन बिघडते आणि संसारात वारंवार खटके उडू लागतात. याचा परिणाम म्हणजे पती वेळेवर घरी येत नाही, व्यसनांच्या आहारी जातो. परिणामी, तो किंवा ती आत्महत्या करण्यासही घाबरत नाही. या संशयाच्या वादळातून बाहेर येण्यासाठी दोघांनीही एकमेकांवर पुरेपूर विश्वास ठेवला पाहिजे. आणि ज्या वेळेस असे घडेल त्या वेळेस या संशयाच्या राक्षसाचा नायनाट होईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा