आदरांजली
वैशाली चिटणीस – response.lokprabha@expressindia.com

काही माणसं अशी असतात की ती आहेत या जाणिवेतच इतरांना खूप ताकद मिळत असते.  डॉ. श्रीराम लागू तसे होते. त्यामुळेच आत्यंतिक बुद्धिप्रमाण्यवाद, विवेकवाद, तत्त्वनिष्ठा, संवेदवशीलता, कमालीचं सामाजिक भान या सगळ्यामधून तयार झालेल्या त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा फक्त नाटय़क्षेत्रातच नाही तर एकूण समाजातच कसा नैतिक दबदबा होता, याचा प्रत्यय नवीन पिढीला त्यांच्यावर गेल्या तीनचार दिवसात प्रसिद्ध झालेल्या वेगवेगळ्या लेखांमधून येतो आहे. या लेखांमधून तरूण पिढीला प्रत्यय येतो आहे असा उल्लेख करण्याचं कारण असं की ‘सूर्य पाहिलेला माणूस’ आणि त्यानंतर ‘मित्र’ हे नाटक केल्यानंतर त्यांनी नाटकातून काम करणं थांबवलं होतं. डॉक्टर तसे ‘सार्वजनिक’ व्यक्ती कधीच नव्हते. त्यामुळे नाटक, चित्रपट करणं थांबल्यावर या-त्या कार्यक्रमांमधून व्यासपीठांवरून, वयोपरत्वे येणारा अधिकार वापरत तरूण पिढीला उपदेशाचे डोस देत वावरताना ते कधीच दिसले नाहीत. ते दिसले ते त्यांच्या नाटकसिनेमांमध्ये त्यांनी केलेल्या भूमिकांमधून. ‘लमाण’ आणि वेळोवेळी केलेल्या इतर लिखाणामधून. त्यांच्या प्रखर बुद्धिवादी भूमिकेशी सुसंगत अशा वेगवेगळ्या सामाजिक कामांची पाठराखण करण्यामधून.

‘देवाला रिटायर करा’ या त्यांच्या स्पष्ट, थेट भूमिकेमुळे त्या काळात प्रचंड वाद झाले. वास्तविक ही भूमिका त्यांच्या सगळ्या जगण्याशी सुसंगत होती. त्यामुळेच ही भूमिका घेणारे डॉक्टर अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे खंदे समर्थक होते. देव ही सश्रद्ध कवी लोकांनी निर्माण केलेली सुंदर कल्पना आहे, अशी मांडणी ते थेट करू शकत ते या भूमिकेमधल्या सुसंगतीमुळेच. विठ्ठलाच्या मूर्तीकडे पाहताना ‘मी पांडुरंग या नावाने लोकांना ज्ञात असलेल्या दगडाच्या मूर्तीकडे पहात होतो’, असं सांगण्याचं धाडस त्यांच्याकडे होतं. आणि या वैचारिक सुसंगतीमुळेच स्वत:च्या मुलाचा, तन्वीरचा मुंबई-पुणे रेल्वे प्रवासात कुणीतरी फेकलेला दगड लागून मृत्यू झाल्यानंतरही त्यांनी नियती वगैरे मानायला साफ नकार दिला होता. वैयक्तिक दुखा:तही आपला विवेक, आपला बुद्धिप्रामाण्यवाद शाबूत ठेवणाऱ्या डॉक्टरांनी सत्यासाठी विषाचा प्यालाही शांतपणे घेणाऱ्या सॉक्रेटिसची भूमिका करणं अगदीच सयुक्तिक म्हटलं पाहिजे. स्वत:ला बुद्धिप्रामाण्यवादी मानल्यावर कोणत्याही गोष्टीचं विश्लेषण करताना हा बुद्धिप्रामाण्यवाद तुम्हाला जिथपर्यंत फरफटवत नेईल तिर्थपत फरफटत जायची, ज्या उत्तराशी नेऊन सोडेल, ते उत्तर स्वीकारायची तयारी ठेवली पाहिजे, असं ते मानत.

डॉक्टर श्रीराम लागूंच्या नाटय़सिनेकलावंत म्हणून असलेल्या कारकीर्दीकडे या दृष्टिकोनातून बघितलं तर त्यांचा नैतिक दबदबा का होता हे लक्षात येतं. अत्यंत उत्तम असे कलावंत अनेक असतात, पण ‘बुद्धीला पटेल तेच मांडणार, त्याचाच आग्रह धरणार, तेच करणार’ या भूमिकेतून आपल्या आयुष्यावर पकड असणारी माणसं सगळ्याच क्षेत्रात विरळा. सिने नाटय़ क्षेत्रही त्याला अपवाद नाही. आजकाल तर दिवस आणखी अवघड झाले आहेत. जगताना पावलोपावली आपल्या वैचारिक भूमिकांशी तडजोड करावी लागते. भलेभले त्याच्या यातना सहन करत राहतात. आपल्यापुढे दुसरा पर्याय नाही म्हणून आपण तडजोड करतो आहोत असं स्वत:ला सांगत राहतात. म्हणूनच डॉक्टर लागूंची उणीव यापुढच्या काळात अधिक प्रकर्षांने जाणवणार आहे.