देशातील पहिल्या शिवस्मारकाच्या शिल्पकृतीच्या निमित्ताने १९२८ साली इतिहास घडविणारे शिल्पकार म्हणजे पद्मश्री विनायकराव करमरकर. खरेतर शालेय R मिक पुस्तकामध्ये आपल्याला त्यांचा परिचय झालेला असतोच. पण प्रत्यक्षात रायगड जिल्ह्यत सासवणे येथे असलेल्या त्यांच्या संग्रहालयात किंवा देशभरात विखुरलेल्या त्यांनी केलेल्या शिल्पकृती आपण पाहतो तेव्हा केवळ थक्क व्हायला होते. भारतातील मोठय़ा आकारातील पहिले एकसंध ओतकाम केलेले शिल्पही करमरकर यांनीच साकारले. प्रस्तुतची दोन शिल्पे त्यांच्या कौशल्याची पावती देण्यास पुरेशी आहेत. यातील म्हशीचे शिल्प हे चक्क सिमेंट या अपारंपरिक माध्यमातून त्यांनी साकारले आहे. ते एवढे हुबेहुब आहे की, अनेकदा संग्रहालयाबाहेर बसलेले रसिक करमरकरांच्या कुटुंबीयांकडे विचारणा करतात की, ही म्हैस जशी आहे तशीच बसून कशी काय राहते..? करमरकरांच्या घराजवळच एसटी स्टॅण्ड आहे. रात्रीच्या वेळेस सासवण्याच्या एस.टी. स्टॅण्डवर उतरलेला नवखा माणूस अनेकदा करमरकरांच्या चावडीवर मोरूला पाहतो आणि पत्ता विचारतो आणि हमखास फसतो.. नंतर लक्षात येते की, ही शिल्पकृती आहे, खराखुरा माणूस नव्हे. करमरकरांच्या या कौशल्याची दखल घेत १९६२ साली पद्मश्री देऊन भारत सरकारने त्यांचा गौरव केला.

Story img Loader