विसाव्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये जवळपास निषिद्ध मानल्या गेलेल्या पांढऱ्या रंगाचाच प्रभावी वापर करत निसर्गचित्रण करणारे चित्रकार म्हणून लक्ष्मण नारायण तासकर हे ओळखले जात. निसर्गचित्रणाप्रमाणेच व्यक्तिचित्रण हाही त्यांचा हातखंडा होता. त्यांची पत्नी लक्ष्मी तासकर यांच्या प्रस्तुतच्या व्यक्तिचित्रणामधून त्यांचे हे कौशल्य निश्चितच लक्षात येते. व्यक्तिचित्रणामध्येही बारकाव्यानिशी केलेल्या चित्रणावर त्यांचा अधिक भर असे. तसेच त्यांनी व्यक्तिचित्रणामध्ये पारंपरिक पद्धतीला फाटा देण्याचाही यशस्वी प्रयत्न केला. त्यामुळेच इतर व्यक्तिचित्रणाप्रमाणे या चित्रात व्यक्तीची नजर थेट समोर दिसत नाही.. तासकरांच्या निसर्गचित्रांनी दस्तावेजीकरणामध्येही महत्त्वाची भूमिका बजावलेली दिसते.
आणखी वाचा