प्रचंड ताकद, झुंजण्याची वृत्ती, पुनरागमन करण्याची क्षमता, स्मॅश-क्रॉसकोर्ट, बॅकहँड-फोरहँड, लॉब, ड्रॉप अशा विविधांगी फटक्यांवरचं प्रभुत्व असं सगळं असणाऱ्या राफेल नदालला हरवणारा डस्टिन ब्राऊन कोण आहे?
आपल्या सभोवतालच्या पर्यावरणाचे, संस्कृतीचे प्रतिबिंब आपल्या व्यक्तिमत्त्वात उमटते. क्रीडापटू घडण्यात तर या बा घटकांची भूमिका निर्णायक असते. यंदाच्या विम्बल्डन स्पर्धेतला सगळ्यात चर्चित खेळाडूचा मान पटकावला डस्टिन ब्राऊनने. जागतिक क्रमवारीत अव्वल शंभरातही नसणाऱ्या डस्टिनने राफेल नदालसारख्या दिग्गजाला सलामीच्या लढतीतच चीतपट केले आणि सगळीकडे ‘कोण आहे डस्टिन ब्राऊन’ या टॅगलाइनचा पूर लोटला. जर्मनी आणि जमैका या परस्परभिन्न संस्कृतीत वाढलेल्या डस्टिनच्या या रोलर कोस्टर राइडचा सामाजिक दृष्टिकोनातून घेतलेला वेध.
दोन्ही महायुद्धांची झळ बसलेला, हिटलर-नाझी या इतिहासातल्या रक्तरंजित कालखंडाचा साक्षीदार असलेला, राजकीय-भौगौलिक तंटय़ामुळे दोन शकले झालेला आणि या सगळ्यामुळेच आर्थिक ओढग्रस्तीला असलेला देश म्हणजे जर्मनी. जर्मनीची ही ओळख फार जुनी नाही. पण आपल्याला यात खितपत पडण्याऐवजी प्रगती करायची आहे हे जर्मनीतील राजकारण्यांनी आणि नागरिकांनी ठरवलं. ही प्रक्रिया अवघड होती. कागदोपत्री ध्येयधोरणं बदलणं सोपं आहे. मात्र दृष्टिकोन आणि त्याबरहुकूम वर्तन बदलणं फारच कठीण पण जर्मनीने ते ‘करून दाखवलं’ आहे. आणि म्हणूनच आज युरोपातल्या विकसित देशांमध्ये आणि प्रगत अर्थव्यवस्थांमध्ये जर्मनीची गणना होते. आकडेवारीच्या भौतिक सापशिडीपेक्षा जर्मन मूल्यांमध्ये त्यांच्या विकासाचं मर्म आहे. व्यक्तीपेक्षा व्यवस्थेला प्रमाण मानणं, वक्तशीरपणा जपणं, भ्रष्टाचाराला शिष्टाचार न मानणं, अविरत मेहनत आणि आपल्या कामाचा सखोल अभ्यास करून त्यात सातत्याने सुधारणा, ओथंबलेल्या भावनांपेक्षा कठोर व्यावसायिकता, दिखाऊ नौटंकीपेक्षा सच्चेपणाने व्यक्त होणं ही आजच्या जर्मनीची मानसिकता आहे. आणि म्हणूनच खेळ असो, ऑटोमोबाइल किंवा टेलिकम्युनिकेशन, कार्गो प्रत्येक क्षेत्रात जर्मन कंपनी, जर्मन माणसं अग्रस्थानी आहेत. डस्टिन ब्राऊनचा आणि या दृष्टिकोनाचा संबंध अगदी जवळचा- कारण डस्टिनची आई जर्मनीची आहे.
जगाच्या नकाशावर कॅरेबियन बेटांमधला एक ठिपका म्हणजे जमैका. क्षेत्रफळाचा विचार केला तर थोडा मोठा ठिपका. निसर्गाची मुक्त उधळण असलेला मात्र भौतिक श्रीमंतीच्या बाबतीत मागास असलेला प्रांत. स्वच्छ, नितळ आणि लोभसवाणा समुद्रकिनारा ही जमैकाला मिळालेली देणगी. या प्रदेशातल्या मंडळींचं खानपान मुख्यत्वेकरून कंदमुळं. रताळेवर्गीय भाज्या हे प्रमुख अन्न. कोणताही खेळ खेळायचा असेल तर जागा लागते. जमैकात जागाटंचाई हा विषयच नाही. ‘होल वावर इज अवर’ अशी परिस्थिती. आहे त्या जागेवर खेळण्यासाठी, सरावासाठी स्वच्छ हवेची गरज असते. रंध्रारंध्रात अमाप साठवून ठेवावी अशी प्रदूषणविरहित हवा जमैकात बक्कळ. खेळाडूंसाठी आहार फारच महत्त्वाचा. प्रोटिन मिळवून देणाऱ्या, फायबरमुळे आतडी सैल ठेवणाऱ्या आणि काटक पायांना तसेच दमसास जपणाऱ्या फुप्फुसांची प्रतिकारक्षमता वाढवणारा आहार- ही सगळी जमैकातून क्रीडापटू घडण्यामागची कारणं. पण हे बाहेरचं झालं. शिस्तीपेक्षा मनमौजी कारभार, रांगडं आणि दिलखुलास राहणीमान, गाणी-गप्पा-गोष्टी यात रमणारं मन, आज हिरो-कल झिरो झालं तरी सुशेगात राहण्याची वृत्ती ही जमैकावासीयांचे व्यवच्छेदक लक्षण. मुळातच मूलभूत गोष्टींसाठीच संघर्ष असल्याने लढण्याची वृत्ती उपजतच अंगी बाणलेली. अशा या जमैकाचं आणि डस्टिन ब्राऊनचं नातंही जवळचं, कारण डस्टिनचे वडील जमैकाचे आहेत.
तर अशा परस्परविरोधी संस्कृतीचं मिश्रण व्यक्तिमत्त्वात उमटलेला डस्टिन ब्राऊन १९९६ नंतर केशकर्तनालयात गेलेला नाही. त्यामुळे जटाधारी केशसंभार सांभाळत सव्‍‌र्ह- व्हॉलीजचा खेळ करणं अंमळ कठीणच. पण डस्टिन १९ वर्षांनंतरही हे यशस्वीपणे सांभाळतो आहे. केस हे प्रयोगांसाठीच असतात ही खास शिकवण जमैकाची. युसेन बोल्ट असो किंवा ख्रिस गेल- अतरंगी केशप्रयोग हा सगळ्यांमधला सामाईक दुवा. डस्टिनला पाहताक्षणी नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी आलेला युवा साधू असंच वाटतं, पण खेळायला लागल्यानंतर त्याच्यातला जर्मन माणूस जागा होतो. पारंपरिक शैलीला साजेसा व्हॉलीज करणारा, चपळ आणि काटक पायांनिशी संपूर्ण कोर्टचा सुरेख उपयोग करणारा आणि तडाखेबंद सव्‍‌र्हिस करत प्रतिस्पध्र्याला अवाक करणारा डस्टिन जर्मनीचा असतो. सामन्यादरम्यान प्रचंड घाम आल्यामुळे डस्टिनने दोनदा टीशर्ट बदलला. त्यावेळी त्याच्या डाव्या बरगडय़ांवर एक मोठ्ठा टॅटू असल्याचं लक्षात आलं. बऱ्यापैकी वेदना देणारा टॅटू नामक प्रकार गोंदवून घेणं आणि तेही बरगडय़ांवर असं धाडस करण्याची ही लक्षणं जमैकाची. आणि विशेष म्हणजे हा टॅटू प्रेयसी, बायको किंवा आवडती अभिनेत्री यापैकी कुणाचाही नाही. टेनिसची दीक्षा देणाऱ्या आणि त्यासाठी त्याच्या मागे खंबीरपणे उभं राहणाऱ्या वडिलांचा टॅटू. मात्र त्याच वेळी स्पर्धा असो की सराव- दिलेल्या वेळेआधी पंधरा मिनिटं हजर राहणं खास जर्मन तत्त्व. दोन परस्परभिन्न संस्कृतींत वावरताना धेडगुजरी होण्याची आणि दोन्हीकडच्या वाईट गोष्टी टिपण्याची शक्यता जास्त. परंतु डस्टिनचं वेगळेपण यातच आहे. दोन्ही संस्कृतीतील चांगल्या गोष्टी वेचून त्याने स्वत:चं असं संकरित व्यक्तिमत्त्व तयार केलं आहे. विम्बल्डनच्या शिष्टाचारी कोंदणात तो वेगळा भासतो, पण त्याला त्याचं दडपण येत नाही. मी आहे हा असा आहे ही त्याची सोपी भूमिका.
जमैकाचे लेरॉय आणि जर्मनीच्या इंग या दाम्पत्याचा हा मुलगा. जर्मनीतल्या हॅन्होवरजवळच्या सेले प्रांतात त्याचं बालपण गेलं. टेनिसच्या बरोबरीने फुटबॉल, ज्युडो आणि हँडबॉलमध्येही डस्टिनचं नैपुण्य आहे. आठव्या वर्षी फक्त टेनिसवरच लक्ष केंद्रित करण्याचा डस्टिनने निर्णय घेतला. शालेय स्तरावर फारशी चमकदार कामगिरी नसतानाही किम मायकेल विटेनबर्ग या अमेरिकी प्रशिक्षकाने त्याला हेरलं. त्याच्या अकादमीतच डस्टिनने टेनिसची धुळाक्षरं गिरवली. जमैकाची पाश्र्वभूमी असलेल्या डस्टिनला शालेय स्तरावर अनेकदा वंश आणि रंगभेदाला सामोरं जावं लागलं. याकारणासाठी त्याला मारहाणही झाली आहे. जर्मनीत टेनिस शिकण्यासाठी खर्च करावा लागणारा पैसा वाढतच असल्याने ब्राऊन दाम्पत्याने जमैकातील माँटेगो बे इथं स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतला. ‘‘टेनिस कसं खेळायचं हे मला समजलं होतं. पण मी मानसिकदृष्टय़ा कणखर नव्हतो. जर्मनीहून जमैकाला आल्यावर माझं आयुष्यच पालटलं. सुखवस्तू आयुष्यातून मूलभूत गोष्टींसाठी लढा द्यावा लागणाऱ्या वातावरणात मी आलो. माँटेगो बे मधल्या पब्लिक कोर्टवर, सुमार दर्जाच्या चेंडूंसह मी सराव केला. जगणं किती कठीण आहे याची मला जाणीव झाली. क्रिकेट आणि अ‍ॅथलेटिक्सपटूंच्या बरोबरीने मी सराव करत होतो’’ असं डस्टिनने सांगितलं. परंतु जमैकात टेनिस संस्कृती नसल्याने डस्टिनच्या वाटचालीला मर्यादा होत्या हे ब्राऊन कुटुंबीयांनी जाणलं. १९९६ ते २००४ या आठ वर्षांच्या काळात डस्टिनने जमैकन संस्कृती अंगी बाणवली आणि त्यानंतर कुटुंबीयांसह जर्मनीत परतला.
पालक मुलांसाठी काय करू शकतात याचं अनोखं उदाहरण ब्राऊन दाम्पत्याने पेश केलं. त्यांच्याकडे पैसा फार नव्हता, पण मुलाचं टेनिस वाया जाऊ नये अशी त्यांची तळमळ होती. टेनिस हा खर्चीक खेळ आहे. खेळसाहित्य, प्रशिक्षक, ट्रेनर, आहारतज्ज्ञ, प्रवास, निवास या सगळ्यासाठी सातत्याने पैसा लागतो. यातला काही खर्च वाचवता येऊ शकतो हे लक्षात घेऊन त्यांनी डस्टिनसाठी कर्ज काढून कॅराव्हॅन (चालती फिरती घररूपी गाडी) विकत घेतली. स्वदेश चित्रपटात मोहन भार्गव वापरतो अगदी तशीच. फोक्सवागेन कंपनीची ही गाडीच डस्टिनचं घर झालं. युरोपात होणाऱ्या विविध स्पर्धेत तो या गाडीमुळेच सहभागी होतो. या गाडीमुळे त्याचा राहण्याचा आणि विमान प्रवासाचा खर्च वाचतो. इच्छा तिथे मार्ग याचं एक भन्नाट उदाहरण डस्टिनने सिद्ध केलं. टेनिस रॅकेट्स हा तसा नाजूक प्रकार. मोठे खेळाडू रॅकेटमध्ये थोडा जरी बदल झाला तरी रॅकेट सोडून देतात. डस्टिनकडे रॅकेट स्ट्रिंजिंग मशीन आहे. आपलं शिवणमशीन असतं तसं या यंत्रावर रॅकेटच्या तारा सांधण्याचं काम होतं. मोठय़ा खेळाडूंनी टाकून दिलेल्या रॅकेट्स जमवून त्या नीट करून डस्टिन वापरतो. यातून नवीन रॅकेटसाठीचा खर्च वाचतो. कॅराव्हॅनच्या माध्यमातून डस्टिनचा प्रवास सुरूच आहे. असोसिएशन ऑफ टेनिस प्रोफेशनल्स अर्थात एटीपी म्हणजे पुरुष टेनिसपटूंच्या संघटनेतर्फे आयोजित स्पर्धा आणि ग्रँड स्लॅममध्ये डस्टिन सहभागी होतो. मात्र?.. आणि जिंकण्यासाठी आसुसलेल्या खेळाडूंची प्रचंड संख्या यामुळे बहुतांशी वेळा डस्टिनचा प्रवास प्राथमिक फेऱ्यांपुरता मर्यादित राहतो. यंदा विम्बल्डनसारख्या ऐतिहासिक ग्रँडस्लॅम स्पर्धेत दुसऱ्या फेरीपर्यंत मजल मारल्याने डस्टिनच्या खात्यात घसघशीत रक्कम जमा होणार आहे. यामुळे ब्राऊन कुटुंबीयांचं कॅराव्हॅनचं कर्ज फिटणार आहे.
राफेल नदालला हरवणं हे दिव्यकर्मच आहे. प्रचंड ताकद, शेवटच्या गुणापर्यंत झुंज देण्याची वृत्ती, कोणत्याही क्षणापासून पुनरागमन करण्याची क्षमता, स्मॅश-क्रॉसकोर्ट, बॅकहँड-फोरहँड, लॉब, ड्रॉप अशा विविधांगी फटक्यांवरचं प्रभुत्त्व हे नदालचं गुणवैशिष्टय़ आहे. क्ले, ग्रास असो किंवा हार्डकोर्ट नदालच्या झंझावातात जराही घट होत नाही. हॉल आणि पाठोपाठ विम्बल्डन स्पर्धेत नदालवर मिळवलेला विजय डस्टिनच्या स्वत:च्या आणि नदालच्या खेळाचा केलेला सूक्ष्म अभ्यास दर्शवतो. नदालच्या कच्च्या दुव्यांवर प्रहार करत डस्टिनने दिमाखदार विजय साकारला. मात्र ऐतिहासिक यशानंतर आनंदाच्या बरोबरीने रिक्तता येते. नदालविरुद्धच्या खळबळजनक विजयानंतर प्रसारमाध्यमांनी डस्टिनला घेरलं. त्याचं पूर्वायुष्य उलगडणं त्यांचं कामच होतं. पण इतिहास सांगण्यात वेळ आणि ऊर्जा खर्ची झाल्याने व्हिक्टर ट्रॉइकीविरुद्ध डस्टिनला पराभवाला सामोरं जावं लागलं. जमैकन शैलीला साजेसा खेळ करत डस्टिनने नदालवर मात केली पण जर्मन सातत्य त्याला राखता आलं नाही. आंतरराष्ट्रीय टेनिसमधील अतितीव्र स्पर्धेत टिकून राहायचं असेल तर डस्टिनला अधिकाअधिक जर्मन व्हावं लागेल.
पराग फाटक – response.lokprabha@expressindia.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा