सध्या वर्तमानपत्रांतून इबोला संदर्भातल्या बातम्या सातत्याने प्रसिद्ध होताना दिसत आहेत. काय आहे इबोला? त्याची व्याप्ती किती मोठी आहे?

माबालो लोकेला हा यांबुकु गावातल्या शाळेचा मुख्याध्यापक. यांबुकु हे त्या वेळच्या झैरेतील आणि आजच्या कांगोमधील छोटेसे गाव, इबोला नदीच्या काठी वसलेले. माबालो मास्तर एक आठवडाभर मस्त नदी काठची रपेट मारून आला आणि २६ ऑगस्ट १९७६ ला एकदम तापाने फणफणला. दवाखाना, उपचार सारे काही झाले, पण ८ सप्टेंबरला त्याचा मृत्यू झाला. नंतर लक्षात आले त्याला विषाणूजन्य रक्तस्त्रावी तापाने घेरले होते. हा विषाणू नवा होता. इबोला नदीवरून या नव्या विषाणूचे बारसे ‘इबोला विषाणू’ असे करण्यात आले. माबालो लोकेला हा या इबोला आजाराचा पहिला ज्ञात रुग्ण. त्या वर्षी झैरे (कांगो) मध्ये जवळपास ३१८ जणांना इबोलाची लागण झाली आणि त्यापैकी २८० जण दगावले. ही इबोलाची पहिली साथ. यानंतर इबोला अधूनमधून सतत भेटत राहिला आणि एखाद्या दु:स्वप्नासारखा मानवी जगताचा पाठलाग करत राहिला. १९७६ ते आजतागायत इबोलाचे जवळपास ३० उद्रेक आपण पाहिले आहेत. त्याच्याबद्दलची भीती एवढी सर्वव्यापी आहे की १९९५ साली वोल्फगँग पीटरसनने इबोला सदृश्य मोटाबा या काल्पनिक आजारावर ‘आउटब्रेक’ नावाची हॉलीवूड फिल्म तयार केली. डस्टीन हॉफमन या नामवंत अभिनेत्याने त्यात प्रमुख भूमिका केली आहे. या चित्रपटाने इबोलाची ही भीती अत्यंत भेदकपणे सर्वदूर पोहचविली.
..आणि ७ ऑगस्ट २०१४ रोजी जागतिक आरोग्य संघटनेने सध्या पश्चिम आफ्रिकेतील चार देशांमध्ये सुरू असणारा इबोला उद्रेक ही सार्वजनिक आरोग्यातील आंतरराष्ट्रीय आणीबाणी असल्याचे घोषित केले आणि इबोला पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय चर्चेचा आणि काळजीचा विषय झाला.
काय आहे हा इबोला ?
इबोला हा एक विषाणूजन्य आजार आहे. इबोलाचा हा विषाणू हा आज मानवी जगाला ज्ञात असलेला सर्वाधिक घातक विषाणू आहे. या आजारातील मृत्यूचे प्रमाण ५० ते ९० टक्के इतके प्रचंड आहे.
आज सुरू असलेला इबोलाचा उद्रेक हा डिसेंबर २०१३ पासून सुरू झाला आहे. गिनी, सिएरा लिओन, लायबेरिया आणि नायजेरिया या चार देशांसोबत आता कांगोमध्येही हा उद्रेक सुरू आहे. २८ ऑगस्ट २०१४ पर्यंत या देशांमध्ये ३०६९ इबोला रुग्ण आढळले असून त्यापैकी १५५२ जणांचा मृत्यू झाला आहे. सुदैवाने या आजवरच्या सर्वात मोठय़ा इबोला उद्रेकात मृत्यूचे प्रमाण तुलनेने कमी म्हणजे ५३ टक्क्य़ांच्या आसपास आहे. गिनीमध्ये ते ६६ टक्के आहे तर सिएरा लिओन मध्ये ४२ टक्के आहे.
ताप, डोकेदुखी, थकवा, अंगदुखी, घसादुखी, उलटी जुलाब, अंगावर रॅश उमटणे, रक्तस्राव ही या आजाराची प्रमुख लक्षणे आहेत. या आजारात मूत्रपिंड आणि यकृताच्या कामात बिघाड होतो.
इबोला पसरतो कसा?
वटवाघळाच्या काही प्रजाती, चिपांझी, गोरिला, माकडे आणि इतर प्राण्यांमार्फत हा आजार पसरतो. ज्या व्यक्ती या बाधित प्राण्यांच्या शरीर स्रावांच्या संपर्कात येतात त्यांना हा आजार होण्याची शक्यता असते. या बाधित प्राण्यांचे मांस खाणे हेदेखील अनेक वेळा इबोलाला आमंत्रण देणारे ठरते.
पण एकदा का आजार माणसात आला की तो एका रुग्णापासून दुसऱ्या निरोगी माणसाला होऊ शकतो. माणसापासून माणसाला होणारा प्रादुर्भावही मुख्यत्वे शरीर द्रव्यामार्फत होतो. रक्त आणि इतर शरीर द्रव्यामार्फत या विषाणूचा प्रसार होत राहतो. मानवी वीर्यातही हा विषाणू सात आठवडय़ांपर्यंत सापडतो. त्यामुळे एच.आय.व्ही., कावीळ व याप्रमाणेच इबोलादेखील शरीर संबंधांमार्फत पसरू शकतो.
रुग्णाची सेवा करणारे नातेवाईक तसेच डॉक्टर्स आणि इतर आरोग्य कर्मचारी यांना हा आजार होण्याची शक्यता सर्वाधिक आहे आणि म्हणूनच रुग्णांवर उपचार करताना आणि त्यांची शुश्रूषा करताना त्यांच्या शरीरद्रव्याशी आपला संबंध येणार नाही, याची दक्षता आरोग्य कर्मचाऱ्यांनी घेणे आवश्यक आहे. या उद्रेकात खूप मोठय़ा प्रमाणावर आरोग्य कर्मचारी इबोलाला बळी पडताना दिसत आहेत.
अगदी ताजे उदाहरण म्हणजे सिएरा लिओन देशातील डॉ. शेख उमर खान हे होय. २९ जुलै २०१४ रोजी ते इबोलाने गेले. हा माणूस गेले दहा वर्षे इबोला रुग्णांवर उपचार करत होता. त्यांनी आजवर शंभरहून अधिक इबोला रुग्णांवर उपचार केले होते. या साऱ्यांमधील धोका त्यांना कळत होता, पण तरीही एका प्रचंड निष्ठेने ते हे काम करत होते. ‘‘माझे माझ्या जगण्यावर प्रचंड प्रेम आहे. इबोला रुग्णावर उपचार करण्यातला धोका मला समजतो आणि म्हणूनच मी सर्वप्रकारची काळजी घेतो. हे काम करताना होणारा आनंद या धोक्यापेक्षा कितीतरी मोठा आहे,’’ आपल्या मृत्युपूर्वी दिलेल्या शेवटच्या मुलाखतीत ते म्हणाले होते, इबोलाभोवती दाटलेले भयाचे वलय त्यांना पुसायचे होते आणि म्हणूनच आपल्या केमेना येथील रुग्णालयातील बऱ्या होऊन जाणाऱ्या इबोला रुग्णाला ते ‘जादूची झप्पी’ देऊन निरोप द्यायचे. त्याच्या जवळच्या लोकांनी त्याला वाळीत टाकू नये, हा उद्देश त्यामागे असायचा. पण इबोलाशी लढणारा जिद्दी योद्धा या लढाईत कामी आला. ‘आम्ही आज आमचा नॅशनल हीरो गमावला,’ या शब्दांत सिएरा लिओनच्या आरोग्य मंत्र्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
घातक आणि धोकादायक आजार हे वैद्यक शास्त्रासमोरचे आव्हान नेहमीच होते. कॉलरा काय किंवा प्लेग काय साऱ्यांमध्येच ही भीती होती, पण येथे पळपुटी माणसे कामाची नसतात. आपल्या व्यवसायाप्रती कमालीची निष्ठा, धैर्य आणि त्या सोबतच आवश्यक ती खबरदारी घेणारी माणसेच या आणीबाणीच्या प्रसंगी महत्त्वाची ठरतात. आणि म्हणूनच इबोला रुग्णांवर उपचार करताना पीपीईसारखी संरक्षक साधने वापरणे, रुग्णाच्या दूषित गोष्टींची योग्य विल्हेवाट लावणे (जैववैद्यकीय कचऱ्याचे व्यवस्थापन) या सर्व बाबी महत्त्वाच्या आहेत. इबोला हा आजार स्वाइन फ्ल्यूसारखा हवेतून पसरत नाही त्यामुळे तो खूप वेगाने पसरू शकत नाही, हेही महत्त्वाचे.! स्वाइन फ्ल्यूने अवघ्या अडीच महिन्यांत सारे विश्व पादाक्रांत केले होते.
या आजाराचा अधिशयन कालावधी २ ते २१ दिवस आहे. आजमितीला या आजारावर कोणतेही औषध उपलब्ध नाही. काही प्रायोगिक औषधे वापरण्याची परवानगी जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे खरे, पण आजमितीला रुग्णाला लक्षणाधारित उपचार देण्याव्यतिरिक्त आपल्या हातात काहीच नाही. आपल्याकडे राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था पुणे आणि राष्ट्रीय साथरोग नियंत्रण संस्था, नवी दिल्ली येथे या आजाराच्या निदानाची सुविधा उपलब्ध आहे.
इबोला भारतात येऊ शकतो?
हा आपल्या सर्वाच्याच काळजीचा आणि चिंतेचा विषय. आज जवळपास पंचेचाळीस हजार भारतीय पश्चिम आफ्रिकेतील देशात आहेत. इबोला आपल्या देशात येऊ नये, यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे. या देशातून येणाऱ्या प्रवाशांची यादी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील आरोग्य यंत्रणा संबंधित राज्य आरोग्य विभागाला देत असून या प्रवाशांचे त्यांनी इबोलाग्रस्त देश सोडल्यापासून पुढील तीस दिवस दैनंदिन सर्वेक्षण करण्यात येत आहे. यापैकी कोणाला इबोला सदृश्य लक्षणे आढळल्यास त्यांना विलगीकरण कक्षात भरती करण्यात येत आहे.
आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या आणि विशेषत: इबोला ग्रस्त भागातून येणाऱ्या प्रवाशांना त्यांची जबाबदारी समजावून सांगण्यात येत आहे. इबोला ग्रस्त भागातून आल्यानंतर जरी त्यांना काही लक्षणे नसतील तरी या आजाराचा अधिशयनक कालावधी २१ दिवसांचा आहे, हे लक्षात घेऊन त्यांनी आपला जनसंपर्क कमीत कमी ठेवला पाहिजे आणि आलेल्या दिवसापासून एक महिन्याच्या काळात त्यांना काही लक्षणे आढळल्यास त्यांनी स्वत:हून त्यांना दिलेल्या मार्गदर्शक पत्रकातील फोन क्रमांकावर फोन करून त्याची कल्पना द्यायला हवी. हे त्यांच्या, कुटुंबाच्या आणि संपूर्ण समाजाच्या आरोग्याकरिता आवश्यक आहे.
इबोला ज्या प्रकारे पसरतो हे लक्षात घेतल्यास, व्यवसाय किंवा पर्यटनासाठी या देशांमध्ये गेलेल्या प्रवाशांना इबोलाची बाधा होण्याची शक्यता अगदी कमी असल्याचे डब्ल्यू. एच. ओनेही स्पष्ट केले असले तरी ही सारी खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे.
वटवाघूळ हे इबोला विषाणू प्रसारामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते, असे अनेक संशोधनातून पुढे आले आहे. आज १९७६ च्या तुलनेत शहरीकरण झालेल्या आफ्रिकेत पूर्वी इतक्या सहजतेने इबोलाचा उद्रेक थांबताना दिसत नाही. एखाद्या गावात झालेला उद्रेक ते संपूर्ण गाव विलग करून आटोक्यात आणणे सोपे होते, पण आज मात्र आफ्रिकन देशांच्या शहरी आणि मोठय़ा प्रमाणात ये-जा असणाऱ्या भागात इबोलाची लागण होताना दिसते आहे आणि म्हणूनच मागील आठ महिन्यांपासून हा उद्रेक थांबायचे नाव घेत नाही आहे. जागतिकीकरणाच्या फांदीला हे इबोलाचे उलटे वटवाघूळ लटकले आहे. ते जणू आपल्या साऱ्या तथाकथित वैज्ञानिक प्रगतीला वाकुल्या दाखवीत आहे. कॉन्स्पिरसी थिअरी मानणाऱ्या अनेकांना हा बायोटेरीरीझमचा भाग वाटतो तर काहींना औषध कंपन्यांनी केलेला बनाव वाटतो. कोणीच आज याबाबत अंतिम सत्य उमगले आहे, अशा थाटात भाष्य करू शकत नाही. आज आपल्या हातात आहे दक्षता आणि पायासमोर आहे मानवी हितासाठी अनेकांच्या त्याग आणि समर्पणाने सिद्ध झालेली विज्ञानाची पाऊलवाट..! आज आपल्या सर्वाना खाली मुंडी वर पाय करायला लावणाऱ्या या करामती वटवाघळाच्या शीर्षांसनावरही उद्या उपाय सापडलेच, पण तोवर हातात हात घेऊन चालू या. परस्परांची काळजी घेऊ या.

Story img Loader