वैशाली चिटणीस – response.lokprabha@expressindia.com
पास की नापास, हा प्रश्न दहावी-बारावीच्या विद्यार्थी- विद्यार्थिनींसाठी यक्षप्रश्न असतो. परीक्षेचं तंत्र ज्यांना नीट उमगतं ते हा तथाकथित भवसागर पार करून पुढे निघून जातात. प्रश्न असतो ज्यांना हे तंत्र जमलेलं नाही त्यांचा. त्यांच्यावर विनाकारण बुद्धीच्या अभावाचा शिक्का बसतोच शिवाय या दोन परीक्षा पास करून पुढच्या प्रवासाची जी दारं उघडली जाणार असतात तीही त्यांच्यासाठी बंद होतात. त्यांच्याबरोबरच वेगवेगळ्या कारणांमुळे शाळा सोडावी लागली आहे, शिक्षणात गॅप पडली आहे, शिक्षण पूर्ण करण्याची इच्छा अपूर्ण राहिली आहे, अशा लोकांसाठीही दहावी- बारावीची परीक्षा हा संवेदनशील विषय असतो. अशा प्रवाहावेगळ्या लोकांच्या गरजा, त्यांच्या अडचणी लक्षात घेऊन काही ठिकाणी नापासांच्या शाळा चालवल्या जातात. नेमके काय आहेत हे उपक्रम, कोण चालवतं ते, त्यांना कसा प्रतिसाद मिळतो, याचा आढावा या लेखात घेतला आहे. शाळा-बिळा, अभ्यास-बिभ्यास असं म्हणत पहिल्या शब्दाचं महत्त्व आपली भाषा एकदम कमी करून टाकते. तसाच या नापास-बिपासांच्या शाळांचा फेरफटका.
विद्येचं माहेरघर म्हणून पुण्याला कोण महत्त्व. देशाच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी इथे शिक्षण घ्यायला येतात; पण त्या देदीप्यमान परंपरेत बाजूला फेकली जातात, दुर्लक्षित राहतात ती नापास होणारी, शिक्षण अर्धवट सोडावं लागलं आहे अशी मुलं. अशा मुलांसाठी विदुला आणि शशिकांत शेटे हे जोडपं पुण्यात टिळक रोडवर एसपी कॉलेजजवळ तेजस विद्यालय ही शाळा चालवतं. ही शाळा मुख्यत: नापास मुलांसाठी चालवली जाते. विदुला शेटे यांच्या घरी आधी आजी, मग वडील शिकवण्या घ्यायचे. त्यांचे वडील आपली बँकेमधली नोकरी सांभाळून नापास झालेल्या मुलांना शिकवत. विदुला शेटे यांनीही वडिलांना मदत करायला सुरुवात केली. गेली २८ वर्षे त्या हे काम करत आहेत. त्या सांगतात, मी दहावीत होते, तेव्हा आठवी नापास झालेला मुलगा हा माझा पहिला विद्यार्थी होता. एकाच्या ओळखीतून दुसरा अशी नापास मुलं आमच्याकडे शिकायला यायला सुरुवात झाली. या कामातच मी इतकी रमले की, २००२ मध्ये लग्न झाल्यानंतर माझे पतीही त्यात सहभागी झाले. ते सीए आहेत, नोकरी करतात, पण ती करत वेळ काढून ते नापास तसंच शिक्षण अर्धवट सुटलेल्या मुलांना मार्गदर्शन करतात. विदुला आणि शशिकांत शेटे या दोघांनी मिळून हा उपक्रम वाढवत नेला. आत्तापर्यंत त्यांच्याकडून चार हजार मुलं दहावी- बारावी होऊन गेली आहेत. अर्थात तेजस विद्यालयाला इतर शाळांना असते तशी मान्यता नाही. तर इथे वर्गामध्ये उपस्थित राहून, शिकून इथूनच १७ नंबरचा फॉर्म भरून मुलं-मुली दहावी- बारावीची परीक्षा देतात.
विदुला शेटे सांगतात की, नापास झाल्यामुळे किंवा आर्थिक परिस्थितीमुळे किंवा आणखी काही कारणामुळे शिक्षण सुटलं अशा १४ ते ६५ या वयोगटातल्या स्त्री- पुरुषांनी त्यांच्याकडे शिकून दहावी-बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. त्या सांगतात की, राजस्थानातून पुण्यात नातेवाईकांकडे पळून आलेल्या एका मुलीने या शाळेतून फॉर्म भरून बारावीची परीक्षा दिली. ५६ वर्षांच्या एक बाईंनी चौथीमध्ये शाळा सोडली होती. त्यांचा २५ वर्षांचा मुलगा अपघातात मरण पावला. आपल्या आईने दहावीची परीक्षा द्यावी अशी त्याची इच्छा होती. त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी या बाईंनी तेजस विद्यालयातून दहावीची परीक्षा दिली. बालगुन्हेगारीची पाश्र्वभूमी असलेल्या एका मुलाला त्याचे वडील या शाळेत घेऊन आले होते. इथून त्याने दहावी- बारावीच्या परीक्षा दिल्या. आता तो पुढे शिकून आता नीट स्थिरस्थावर झाला आहे. शाळेत समन्वयक म्हणून काम करणारे संदीप कांबळे नववी नापास झाल्यानंतर या शाळेत आले, शिकले. हळूहळू त्यांनी शाळेतल्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या उचलायला सुरुवात केली. आता ते तिथेच काम करतात.
तेजस विद्यालयामध्ये दहावी- बारावीसाठी मराठी, इंग्रजी माध्यम मिळून एकूण चार वर्ग चालतात. प्रत्येक वर्गाला २० ते २५ मुलं असतात.
या मुलांना त्यांच्या गरजेनुसार इंग्रजी, मराठी माध्यमातून शिकवलं जातं. अकरावी, बारावी सायन्स, आर्ट्स, कॉमर्स अशा तिन्ही शाखांचा अभ्यास करून घेतला जातो. सकाळी साडेसातला शाळा सुरू होते. दहावी- बारावीत एखादा विषय राहिला असेल तर तो देता येतो. चौथी ते नववीच्या दरम्यान शाळा सोडली असेल, अशा मुलांची मधल्या इयत्तांची तयारी करून घेऊन त्यांना दहावीत बसवलं जातं. दहावीनंतर खंड पडला, विषय राहिले अशा मुलांना बारावीत बसवलं जातं.
गेली २८ वर्षे नापास झालेल्या मुलांना शिकवणाऱ्या विदुला शेटे यांचा अनुभव असा आहे की, शिक्षणाच्या बाबतीत गेली काही वर्षे सरकारचं धोरण धरसोडीचं आहे. त्यामुळे मुलांचं नुकसान होतं आहे. त्या सांगतात की, आमच्याकडे येणाऱ्या नववी नापास मुलांना साधे पाढेही येत नसतात. अशा मुलांवर काम करून त्यांना दहावीचा- बारावीचा टप्पा पार करून देण्याचं काम त्या करत आहेत; पण जनसंपर्क कमी पडणं, जाहिरात करणं न परवडणं यामुळे त्यांना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता आलेलं नाही; पण इथून शिकून जाणाऱ्या मुलांनी केलेल्या मौखिक प्रसिद्धीमुळे, तसंच समाजमाध्यमांमधून तेजस विद्यालयाची माहिती लोकांपर्यंत पोहोचते आणि ते शोधत विद्यार्थी येतात.
अर्थात त्या चालवत असलेली नापासांची शाळा ही संकल्पना पुण्यात सगळ्यात आधी राबवली होती ती पु. ग तथा भय्या वैद्य यांनी. बौद्धिकदृष्टय़ा सामान्य असणाऱ्या, लहानसहान कारणांनी शिक्षणाच्या व्यवस्थेमधून बाहेर फेकल्या जाणाऱ्या, नापासाचा शिक्का घेऊन जगणाऱ्या मुलांसाठी त्यांनी आपटे रोडवर अगदी छोटय़ाशा जागेत शाळा सुरू केली होती. नापास झालेल्या मुलाकडे जणू काही तो कुणी गुन्हेगार, अपराधी आहे अशा पद्धतीने सगळं जग बघत असताना भय्या वैद्य मात्र त्याचं अभिनंदन करत. तू त्या अभ्यासाच्या आणि परीक्षेच्या चरकातून सुटलास, तेव्हा आता जगायला काय आवश्यक आहे ते शिक आणि व्यवहाराच्या शाळेत यशस्वी हो, असं ते त्याला सांगत. आता हीच भय्या वैद्यांची शाळा आपटे प्रशाला या नावाने पुण्यात प्रसिद्ध आहे.
नापासांच्या शाळेचे आणखीही काही प्रयोग सुरू आहेत. पुण्याजवळ तळेगाव दाभाडे इथं ज्यांना दहावी पास होण्याची इच्छा आहे अशा नापास विद्यार्थ्यांसाठी अशीच एक शाळा चालवली जाते. या शाळेचं नावच ‘फाकटकर सरांची नापासांची शाळा’ असं आहे. एरवी तळेगाव दाभाडेमध्ये कोचिंग क्लासेस चालवणारे नितीन फाकटकर गेली १२ वर्षे ही शाळा चालवत आहेत. ही शाळा सुरू कशी झाली याबद्दल ते सांगतात की, बरेच विद्यार्थी सातवी-आठवीमध्ये शाळा सोडतात. वास्तविक दहावी हा आपल्याकडे शिक्षणव्यवस्थेचा पाया आहे. तो पार केला तर पुढे आणखी वाटा खुल्या होतात; पण बरीच मुलं तिथे पोहोचूच शकत नाही. १२ वर्षांपूर्वी माझ्याकडे अशी नापास झालेली १०-१२ मुलं आली. त्यांना दहावी व्हायचं होतं. आमचा तुम्ही अभ्यास घ्या असं त्यांचं म्हणणं होतं. मग त्यांना दहावीसाठी तयार करणं या उपक्रमाला शाळेचंच स्वरूप द्यायचं असं आम्ही काही जणांनी ठरवलं. सहा तासांचं वेळापत्रक केलं. वेगवेगळ्या विषयांना शिक्षक नेमले. आता हा उपक्रम एखाद्या शाळेसारखाच चालतो. तिथे गॅदरिंग असतं, स्पोर्ट्स डे असतो. वर्षभरात दोन-तीन मोटिव्हेशनल सेमिनार होतात. अडचणीत, गरिबीत दिवस काढूनही ज्यांनी उच्च शिक्षण घेतलं आहे अशांचं अनुभवकथन असतं. ही शाळा ज्यांना दहावीची परीक्षा द्यायची आहे अशांसाठीच चालवली जाते. इथून फॉर्म नंबर १७ भरून मुलं दहावीची परीक्षा देतात. आधी दहावीच्या परीक्षेत अयशस्वी ठरलेली साधारण ८०-९० मुलं आता दरवर्षी इथून दहावी पार करतात. कारण ती मठ्ठ नसतात तर मस्तीखोर असतात. त्यांना परीक्षा देण्याचं, अभ्यास करण्याचं तंत्रच कुणी समजावून सांगितलेलं नसतं. आम्ही त्यांना ते तंत्र हसतखेळत शिकवतो. आतापर्यंत दीड हजार मुलांनी इथून दहावीची परीक्षा पास केली आहे. फाकटकर सांगतात, आमच्या शाळेचा निकाल १०० टक्के लागतो. आमच्या शाळेबद्दल कुणाकुणाकडून ऐकून दहावी होऊ इच्छिणारे लोक स्वत:हून शाळा शोधत येतात. या मुलांकडून रीतसर फी घेतली जाते. ज्यांनी ती देणं परवडणार नसतं, त्यांना सवलत दिली जाते. दोन वर्षांपूर्वी लहानपणीच लग्न झाल्यामुळे शिक्षण थांबलं होतं अशा चार स्त्रियांनी या शाळेत प्रवेश घेतला होता. आम्हाला दहावीची परीक्षा द्यायची आहे, असं त्यांचं म्हणणं होतं. त्यांच्या शिक्षणात आठ-नऊ वर्षांची गॅप पडली होती. त्या चौघीही इथून दहावी उत्तीर्ण झाल्या; पण त्यातल्या अगदी लहान बाळ असलेल्या एका स्त्रीने तर ७७ टक्के मिळवले, असं फाकटकर सांगतात. या शाळेतून दहावी झाल्यानंतर वकील झाले, हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करून परदेशात गेले, एमबीएक केलं, बीएड करून शिक्षण क्षेत्रात काम करतात अशी आमच्या विद्यार्थी- विद्यार्थिनींची उदाहरणं आहेत.
अशीच नापासांची शाळा अण्णा हजारे यांच्या राळेगण सिद्धीत त्यांच्याच पुढाकाराने श्री संत निळोबाराय विद्यालयात चालवली जाते. नापास असणं, दंगेखोर, वाया गेलेला विद्यार्थी म्हणून प्रसिद्धी असणं हीच या शाळेत प्रवेश मिळण्याची पूर्वअट आहे. अशा मुलांना या शाळेत पाचवी ते बारावीसाठी प्रवेश दिला जातो. त्यांच्यावर जाणीवपूर्वक प्रयोग केले जातात. या शाळेतून बाहेर पडलेली मुलं पुढे जबाबदार नागरिक म्हणून वावरतात. दरवर्षीप्रमाणे या वर्षीदेखील या शाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
शिक्षण क्षेत्रात गेली अनेक वर्षे काम करणारे शिक्षक हेरंब कुलकर्णी यासंदर्भात वेगळा मुद्दा मांडतात. त्यांच्या मते गेली काही वर्षे शालेय शिक्षणात नापास केलं जात नसल्यामुळे मुलं-मुली अलगद नववीपर्यंत येऊन पोहोचतात. मात्र नववीमधून दहावीत जाताना नापास होणाऱ्यांचं प्रमाण मोठं म्हणजे जवळजवळ ३२ टक्के आहे. या मुलाचं किंवा मुलीचं वय साधारण १४ वर्षे असतं. ग्रामीण भागात नापास झालं की शाळा थांबते. त्या नियमाने नववीत नापास झालेला मुलगा कामाला लागतो, तर मुलीचं लग्न करून दिलं जातं. त्यामुळे नववी नापासाचा आणि बालमजुरी आणि बालविवाहाचा जवळचा संबंध आहे. देशपातळीवर सगळीकडेच नववीत गळतीचं प्रमाण जास्त आहे हे सरकारी यंत्रणेच्या लक्षात आल्यावर मग पुरवणी परीक्षा घेणं वगैरे सुरू करण्यात आलं आहे; पण मुलांना जे आठवीपर्यंत जमलेलं नसतं ते दोन महिन्यांत घेतल्या जाणाऱ्या पुरवणी परीक्षेत कसं जमणार? सगळ्याच बाबतीत दोन टोकं गाठणं हा इतर क्षेत्रात घडतो तो प्रकार शिक्षणाच्या क्षेत्रासाठी घातक ठरतो आहे.
वेगवेगळ्या कारणांमुळे शिक्षणाच्या प्रक्रियेमधून बाहेर फेकल्या गेलेल्या, नापास झाल्यामुळे शिक्षण थांबून राहिलं आहे अशा विद्यार्थ्यांना हात देऊन, त्यांच्या मार्गावरचे नेमके अडथळे त्यांना दाखवून, बोट धरून आत्मसन्मानाच्या मार्गावर नेऊन सोडणारी ही काही माणसं. याच पद्धतीने काम करणारी राज्यात आणखीही माणसं असतील. कोवळ्या वयात मुलांवर बसणारा अपयशाचा शिक्का आणि त्यातून येणारं नैराश्य घालवण्यासाठी तो करत असलेलं काम मोलाचं आहे.
ड्रॉप आऊट नाही, वॉक आऊट
शाळागळती, शिक्षणव्यवस्थेतून बाहेर फेकली जाणारी मुलं या प्रश्नांकडे पाबळचा विज्ञानाश्रम वेगळ्या पद्धतीने पाहतो. विज्ञानाश्रमाचे संचालक डॉ. योगेश कुलकर्णी सांगतात की, आम्ही नापास वगैरे संकल्पनाच मानत नाही. संसदेमधून ‘वॉक आऊट’ करतात तसं या मुलांनी शिक्षणव्यवस्थेतून ‘वॉक आऊट’ केलं आहे असं आम्ही मानतो. या मुलांसाठी आमच्याकडे पाबळला ‘नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ओपन स्कूल’चा ‘डिप्लोमा इन रुरल टेक्लनालॉजी’ हा वर्षभराचा कार्यक्रम आहे. त्याअंतर्गत एक वर्षांचा कोर्स आणि नंतर एक वर्षांची उमेदवारी असते. आरटीईमुळे त्यासाठी १४ वर्षांनंतरची मुलं घेतली जातात. प्रचलित व्यवस्था मान्य नसते, आहे त्या व्यवस्थेत रस नसतो, तिथल्या यंत्रणेत वावरणं ज्यांना जमत नाही अशी देशभरातून दरवर्षी ६०-७० मुलं या अभ्यासक्रमासाठी येतात. इथे त्यांना गांधीजींच्या ‘नयी तालीम’च्या संकल्पनेनुसार शिकवलं जातं. खरं तर शिकवलं जातं म्हणण्यापेक्षा अनुभवातून, निरीक्षणातून तीच शिकतात. हे शिक्षण अॅक्टिव्हिटी आधारित नसतं तर अनुभवाधारित असतं. शेतात पीक कसं घ्यायचं हे शिकताना मुलं मातीबद्दल शिकतात, हवामानाबद्दल शिकतात, बियाणाबद्दल शिकतात. सौरऊर्जेबद्दल शिकतात तेव्हा ते तिचा समग्र अभ्यास करतात. एकेका विषयाला धरून ते त्यातलं विज्ञान, गणित आणि इतर सगळ्याच गोष्टी शिकत असतात. १४-१५ वर्षांपासून ते साधारण २५ वर्षांपर्यंतची मुलं-मुली इथे येऊन या पद्धतीने वर्षभर राहून शिकू शकतात. व्होकेशनल ट्रेनिंगमध्ये कौशल्याला महत्त्व असतं, तर इथे हाताने काम केलं की बुद्धीला चालना मिळते या तत्त्वावर भर दिलेला असतो. त्यामुळे शेती करायला शिकणं हे फक्त एखादं कौशल्य शिकणं राहात नाही, तर त्यातून जीवशास्त्र, जैववैविध्य, मृदासंधारण, अर्थकारण असं सगळंच शिकणं असतं. काम हे या शिकण्याच्या मध्यभागी असल्यामुळे ते कार्यकेंद्री शिक्षण असतं. यातली बरीच मुलं शाळा आवडत नाही म्हणून, शिकायचा कंटाळा येतो म्हणून थांबलेली, जेमतेम आठवी-नववीपर्यंत पोहोचलेली असतात. समाजमाध्यमांमधून, मौखिक प्रसिद्धीतून, त्यांच्या त्यांच्या भागातल्या संस्थांनी माहिती दिली म्हणून त्यांना या अभ्यासक्रमाबद्दल समजलेलं असतं. १९८७ पासून हा अभ्यासक्रम सुरू आहे. तो केल्यानंतर तुम्हाला जमेल तेव्हा, जमेल तसा दहावी-बारावी- पदवी हा औपचारिक अभ्यासक्रम पूर्ण करा असं आम्ही त्यांना आवर्जून सांगतो. मुक्त विद्यापीठांमधून ते तो करतातही. या अभ्यासक्रमासाठी वर्षभराचा राहण्याजेवण्याचा खर्च आणि शिकवण्याची फी आकारली जाते. ज्यांना शक्य नसतं त्यांच्यासाठी शिष्यवृत्ती असते. हे झालं शालेय जीवनातून वॉक आऊट केलेल्या मुलांबद्दल. याच पद्धतीने महाविद्यालयीन जीवनातून वॉक आऊट केलेल्या, ते घेत असतानाच त्यातला रस संपला आहे अशा किंवा अगदी इंजिनीयर झाल्यानंतर आता काय करायचं हे कळत नाही म्हणून घरी बसलेल्या मुलांसाठीदेखील सहा महिन्यांचा एक अभ्यासक्रम किंवा कार्यक्रम राबवला जातो.