वयाची ऐंशी पार केलेले पंतप्रधान, साठी ओलांडलेले अर्धेअधिक मंत्रिमंडळ, लोकसभेतील खासदारांचे सरासरी वयोमान ५४ हे आपल्या १५ व्या लोकसभेचे चित्र. सोळाव्या लोकसभेचे चित्र प्रत्यक्षात यायला अजून बराच वेळ आहे. त्यातील सरासरी वयोमान काहीही असो, पण हे चित्र रेखाटताना त्यात हुकमाचा स्ट्रोक असणार आहे तो देशातील तरुण मतदारांचा, कारण एकूण मतदारांच्या अध्र्याहून अधिक मतदार हे १८-३५ या वयोगटातील आहेत. हा मतदार ज्यांच्याकडे झुकेल त्यावरच सत्तेची सारी गणितं अवलंबून राहणार आहेत.

‘‘मालेगावमध्ये मुस्लीम टक्का सर्वाधिक आहे, मग आपण अमुक यांना उमेदवारी देऊ, नक्की निवडून येतील.’’
‘‘घाटावर मराठा मतदार जास्त आहे, आपल्याला मराठा उमेदवारच द्यावा लागेल.’’
‘‘दक्षिण मुंबईमध्ये उच्चभ्रू समाज अधिक आहे, पक्षाला आर्थिक फायदापण भरपूर होईल. या वर्गाला चालणारा कोण आहे आपल्याकडे?’’
निवडणुकांचे वारे वाहू लागले की एकजात सर्व राजकीय पक्षांच्या उमेदवार निवड समितीमध्ये हमखास ही चर्चा ऐकू येते. पक्षाच्या उच्च वर्तुळातच नाही, तर स्थानिक पातळीवरदेखील अशीच चर्चा सुरू असते. त्या त्या भागात प्रभावी असणाऱ्या घटकाला मध्यवर्ती ठेवून उमेदवार देण्याची प्रथा बहुतांश पक्षांमध्ये आढळून येते. बऱ्याच वेळा एखाद्या ठरावीक गटाचे समर्थक आपला नेता ठरवून त्याच्या उमेदवारीसाठी लॉबिंगदेखील करताना दिसतात. बहुतांश पक्षांची यशस्वी उमेदवारीची गणिते यावरच बेतलेली असतात. मात्र आजवरच्या निवडणुकीत फारसा प्रभाव न पाडणारा आणखी एक मोठा गट गेल्या तीन वर्षांत हळूहळू सक्रिय झाला असून १६ व्या लोकसभा निवडणुकीत एकूण मतदारांपैकी फार मोठा हिस्सा या गटाने व्यापून टाकला आहे. हा गट आहे तरुणाईचा. आजपर्यंत थेटपणे कोणत्याही पक्षाच्या अजेंडय़ावर नसलेल्या या घटकाने प्रत्येक राजकीय पक्षाला या निवडणुकीत आपली दखल घ्यायला लावली आहे. हा मतदार संघटित नसून अनेक वेगवेगळ्या गटांत विखुरला आहे. एखाद्या पक्षाच्या विचारधारेच्या लेबलापासून आज तरी बराचसा मुक्त आहे. म्हणूनच एकगठ्ठा मतदानाचे गृहीतक या गटाला अजून तरी लागू झालेले नाही.
कोणतेही लेबल न लागलेल्या या वयोगटाची आकडेवारी खूपच बोलकी आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या देशभरातील मतदारांच्या आकडेवारीनुसार १८ ते १९ वयोगटात २ कोटी ३१ लाख ६१ हजार १९६ मतदार आहेत. महत्त्वाचे म्हणजे ८१ कोटी ४५ लाख ९१ हजार १८४ या देशभरातील एकूण मतदारांच्या २.८८ टक्के इतके हे प्रमाण आहे. २००९ च्या लोकसभेत हेच प्रमाण केवळ ०.७८ टक्के इतके होते हे लक्षात घ्यावे लागेल. १८-४० वयोगटातील उमेदवारांची संख्या विचारात घेतली असता ती एकूण उमेदवारांच्या अध्र्याहून अधिक आहे.

महाराष्ट्रातील मतदारांची आकडेवारी पाहिल्यास एकूण मतदार ७ कोटी ८९ लाख ६६ हजार ९३४ इतके आहेत, तर १८ ते ४० वयोगटातील मतदार आहेत ३ कोटी ८० लाख ७९ हजार ५९३. म्हणजेच १८-४० वयोगटातील उमेदवारांचे प्रमाण हे एकूण मतदारांच्या जवळपास निम्मे आहे.
देशात प्रथमच मतदान करणारे मतदार हे जवळपास चार-साडेचार कोटींच्या आसपास आहेत. त्यापैकी २ कोटी ३१ लाख मतदार हे १८-१९ वयोगटातील आहेत. या वयोगटाला निवडणुकीत मतदान करण्याची इच्छा प्रबळ असणार यात काहीच शंका नाही. देशभरातील एकूण ५४३ मतदारसंघांचा विचार करता सरासरी प्रत्येक मतदारसंघात ४२ हजार ६०० मतदार हे १८-१९ वयोगटातील नवीन मतदार आहेत. त्याचबरोबर ३५ पर्यंतच्या वयोगटातील आकडेवारी हीदेखील एकूण मतदारांच्या अध्र्याहून अधिक आहे. अर्थात हे सारे मतदान अटीतटीच्या प्रसंगी आघाडी मिळविण्यासाठी उपयोगी ठरणारे आहे. थोडक्यात सांगायचे तर हे संख्याबळ ज्या दिशेने झुकेल तिकडे यशाचे पारडे झुकण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणजेच १६ व्या लोकसभेच्या निवडणुकीत गेमचेंजरची भूमिका कोणत्याही एका राजकीय पक्षाकडून नाही, तर ती देशातील तरुणाईकडून बजावली जाणार आहे.
आज सर्वच पक्षांना हा वयोगट निवडणुकीला कलाटणी देणारा असू शकतो हे चांगलेच उमगले आहे. ही तरुणाई आपल्याकडेच असावी यासाठी झाडून सारे राजकीय पक्ष सरसावले आहेत. प्रमुख पक्षांच्या प्रवक्त्यांशी याविषयी बोलल्यावर तरुणाईसंदर्भात झालेला बदल लक्षात येतो. तरुणांचा उत्स्फूर्तपणा, झोकून देण्याची वृत्ती, नवनवीन संकल्पना मांडून त्या प्रत्यक्षात उतरविण्याची धडपड, नवे विचार, उद्यमशीलता या गुणांची सर्वच राजकीय पक्षांना आज मोठय़ा प्रमाणात जाणीव झाल्याचे जाणवते. मात्र ही जाणीव तरुणांना समजून घेण्यातून कमी व मतपेटीवर डोळा ठेवून अधिक आहे. मतपेटी हा मुद्दा यामध्ये अध्याहृतच असणार आहे, पण हे राजकीय पक्ष तरुणांना त्यांच्या कामात कितपत वाव देतात, तरुण राजकारणाकडे काय पद्धतीने पाहतात हे पाहणे रंजक ठरेल. याबाबत सर्वच पक्षांत काही मूलभूत मुद्दय़ांवर मात्र मतभिन्नता दिसून येते.
तरुणाच्या व्याख्येवरूनच या मतभिन्नतेला सुरुवात होते. ‘मनाने तरुण तो तरुण’ अशी एक काव्यात्म व्याख्या केली जात असली तरी वयाने तरुण असणे हाच मुद्दा महत्त्वाचा असल्याच्या मुद्दय़ावर सध्या तरी सर्वच पक्षांचे एकमत आहे. पण तरुण म्हणजे किती वयाचा? या प्रश्नावर मात्र १८-२५ वयोगटापासून सोयीनुसार ही वयोमर्यादा थेट ४०-५० पर्यंत वाढवणारे पक्षदेखील आहेत. देशातील सर्वात जुन्या पक्षाची म्हणजेच काँग्रेसची तरुणाची व्याख्या ही युवक काँग्रेसच्या व्याख्येवर आधारित असल्यामुळे १८-३५ ही वयोमर्यादा ते ग्राह्य़ धरतात, पण सोयीनुसार हीच व्याख्या ते ४०-५० पर्यंतदेखील वाढू शकते असेदेखील सूचित करतात. (पंतप्रधानपदाचे उमेदवार राहुल गांधी तरुण आहेत हे दाखविण्यासाठी). तर भाजपा ही मर्यादा ४० पर्यंत खेचून नेतो, तर शिवसेनेच्या मते ३० वर्षांपर्यंतच्या व्यक्तीला युवक या सदरात मोजले जाते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घटनेनुसार ३५ वर्षे हे तरुणाचे वय मानले जाते, त्याचबरोबर ३५ वर्षांनंतर काही लगेच माणूस म्हातारा होत नाही, अशी भूमिका पक्ष घेतो. तर मनसेच्या मते ३० वर्षांपर्यतच्या व्यक्तीला तरुण मानायला हवं.

युवकांचा पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपमध्ये मात्र तरुणाईला २५ वयोमर्यादेवरच रोखून ठेवले आहे. रिपब्लिकन पक्ष तरुणांची मर्यादा ३० पर्यंत असल्याचे सांगतो, कारण याच काळात नवी स्वप्ने पाहून ती प्रत्यक्षात आणण्यासाठी झोकून देण्याची वृत्ती त्यामध्ये असते असे त्यांचे मत आहे. म्हणजेच तरुणांच्या वयाच्या मूलभूत मुद्दय़ावरच आपल्याकडे पक्षांच्या संकल्पनेत आजही स्पष्टता नाही असेच म्हणावे लागले. एकंदरीतच यावरून असे दिसते की, प्रत्येकाने तरुणाईची व्याख्या ही स्वत:साठी सोयीस्करपणे केलेली आहे.
तरुणाई हा या निवडणुकीतील महत्त्वाचा घटक असला तरी हे तरुण राजकारणाकडे काय दृष्टीने पाहतात, याबाबत राजकीय पक्षांची भूमिका खूप वेगवेगळी आहे. काँग्रेसच्या मते राजकारणाच्या आजवर झालेल्या प्रोजेक्शनमुळे राजकारणाकडे तरुण फारसा उत्साहाने पाहत नाही. रिपब्लिकनच्या मते आजचे ३५-४० टक्के तरुण राजकीयदृष्टय़ा सजग असतात. तरुणांमधील मध्यमवर्गीय प्रवृत्ती ही राजकारणाकडे तुच्छतेने पाहणारी आहे. राष्ट्रवादी काँगेस तरुणांचा राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन तुच्छतेचा असल्याबद्दल मध्यमवर्गीय समाजालाच दोष देते. आजवर सर्वच चळवळीत मोठय़ा प्रमाणात तरुणांनी सहभाग घेतला आहे. पण गेल्या काही वर्षांत आर्थिक स्तर वाढलेल्या मध्यमवर्गाच्या प्राथमिकता वेगळ्या आहेत. त्यामुळे शहरी भागातील तरुण राजकारणाकडे फारसा आकर्षित झाला नाही, मात्र लहान शहरे आणि ग्रामीण भागातील तरुण मात्र राजकारणाकडे सजगपणे पाहतो आहे.

cm Devendra fadnavis pa
मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्पष्ट निर्देश, तरी पी.ए. होण्यासाठी उड्यावर उड्या…
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
Shambhuraj Desai
पालकमंत्रिपदांचं वाटप कधी होणार? मंत्री शंभूराज देसाईंनी डेडलाईनच संगितली
Revenue Minister Chandrasekhar Bawankule said amending Revenue Act for societys poorest is necessary
नवे महसूल मंत्री म्हणतात, महसूल कायद्यात सुधारणा आवश्यक
Image of Ajit Pawar
Ajit Pawar : “अरे गप्प बसा ना बाबा”, खाते वाटपाबाबत प्रश्न विचारताच अजित पवार संतापले
Dilip Walse Patil :
Dilip Walse Patil : “१५०० मतांनी निवडून आलोय अन् काय सांगू मला मंत्री करा?”, दिलीप वळसे पाटलांचं विधान चर्चेत
Sudhir Mungantiwar on ministerial post
Sudhir Mungantiwar: ‘शपथविधी सोहळा होईपर्यंत माझं नाव यादीत होतं’ मंत्रिपदाबाबत सुधीर मुनगंटीवार काय म्हणाले?
आम आदमी पक्षाने 'त्या' १३ उमेदवारांना पुन्हा निवडणुकीच्या मैदानात का उतरवलं? (फोटो सौजन्य पीटीआय)
Delhi Elections 2025 : आम आदमी पार्टीने ‘त्या’ १३ उमेदवारांना पुन्हा निवडणुकीच्या मैदानात का उतरवलं?

वैयक्तिक मताचा फायदा होत नसला तरी अशी असंख्य वैयक्तिक मतं नक्कीच परिवर्तन घडवू शकतील त्यामुळे मी तर मतदान नक्कीच करणार आणि माझ्या आजूबाजूच्या लोकांनाही मतदानासाठी प्रवृत्त करणार. मतदान करताना अपेक्षा तर खूप आहेत पण प्रश्नांची उत्तरं शोधणारा आणि ती प्रत्यक्षात आणणारा नेता मिळावा ही मूळ अपेक्षा आहे.
– क्षितिज कुलकर्णी, बी.कॉम., पुणे

पहिल्यांदाच मतदान करताना सर्वानाच ‘एक्साइटमेंट’ असते, पण ‘नव्‍‌र्हसनेस’ मात्र अजिबात नाही. राजकारणाच्या खोलात अजून तरी मी शिरलेलो नाही. त्यामुळे जे काही आजपर्यंत बघितले आणि ऐकले आहे, त्यावरून कोणाला मतदान करायचे, हे ठरवणार. पक्ष किंवा व्यक्तीपेक्षा माझ्यासाठी पक्षाचे आणि त्या व्यक्तीचे काम महत्त्वाचे आहे. त्यामुळे मतदान करताना याचा विचार नक्की करणार. 
– नितीश खाडे, 
प्रथम वर्ष यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ इंजिनीअिरग, नागपूर

राजकारणाची फारशी आवड नसली तरी या वर्षी प्रथमच मतदान करणार आहे. कुठल्या राजकीय पक्षाला मतदान करायचे, या संदर्भातील निर्णय घेतला आहे. कुठलाही राजकीय पक्ष सत्तेवर आला तरी भ्रष्टाचार कमी होणार नाही त्यामुळे सरकारकडून फार अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे. या वर्षी नवमतदारांमध्ये युवकांची संख्या मोठय़ा प्रमाणात असल्यामुळे प्रत्येकाने मतदान केले पाहिजे. 
– राहुल कुळकर्णी, 
बी. कॉम. सीपी अ‍ॅण्ड बेरार महाविद्यालय, नागपूर

मला सरकार बदलायचं आहे. नवीन सरकार आलं तर भ्रष्टाचार संपेल असं नाही पण नवीन सरकार लोकांसाठी नवीन काही तरी करेल. मतदान करण्याचं कारण हेच की नुसती अश्वासनं न देता काम करणारा आणि अडचणी जाणून घेणारा लोकप्रतिनिधी हवा. आत्ता मतदान नाही केलं तर पुढची पाच र्वष आपण नुसतंच बोलत राहतो. आत्ता मिळालेल्या संधीचा फायदा घेणार.
– आशुतोष तांबे, बी.कॉम, पुणे

व्यक्ती आणि काम या दोन्ही गोष्टी माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे मतदान करताना पूर्णपणे विचार करूनच करणार. पहिल्या मतदानाच्या खूप साऱ्या ‘फिलिंग्ज’, ‘एक्साइटमेंट’ आहेत, पण मतदान करताना कोणतीही चूक होणार नाही, याची काळजी नक्कीच घेईल. अलीकडे जे राजकारण सुरू आहे, त्याबद्दल फारसे सांगता येणार नाही. मात्र, सगळे काही चांगले व्हावे एवढे नक्की.
– अस्मिता चांगोले, 
सीएसी ऑलराउंडर, नागपूर

ही माझी पहिलीच निवडणूक आहे. माझ्या मतदान न करण्यामुळे चुकीच्या व्यक्तीला मत जाऊ नये यासाठी मी इथून पुढे नेहमी मतदान करणार आहे. मतदान करताना पक्ष आणि माणूस बघून मत देणार. नेता लोकांसाठी काय करतो, कसं काम करतो हे बघूनच मी मत देणार आहे. भ्रष्टाचार कमी व्हावा यासाठी मी मतदान करणार.
– गायत्री कुलकर्णी, बी.कॉम., पुणे

राजकारणात पहिल्यापासूनच ‘इंटरेस्ट’ आहे. त्यामुळे मतदानाची संधी सोडणार नाहीच. तरुण पिढीला आता बदल हवा आहे आणि त्यासाठी मतदानाकडे पाठ फिरवून चालणार नाही. त्यासाठी आम्ही महाविद्यालयाच्या माध्यमातूनही युवकांना मतदान करण्याविषयी आवाहन केले आहे. देश सक्षम करायचा असेल तर तरुण पिढीला संधी देण्याची गरज आहे आणि त्यासाठी एका चांगल्या नेतृत्वाचीही देशाला गरज आहे.
– अद्वैत बोपोरीकर, 
बी.कॉम, प्रथम वर्ष सेंटर पॉइंट कॉलेज, नागपूर

लोकशाहीने प्रत्येकाला मतदानाचा अधिकार दिला आहे. मात्र, प्रत्येक निवडणुकीत ६० ते ७० टक्के मतदान होत असते. शंभर टक्के मतदान करण्यासाठी प्रत्येकाने घराबाहेर पडायला हवे. महाविद्यालयातील निवडणुकामध्ये मतदान केले. मात्र, लोकसभा निवडणुकीत प्रथमच मतदान करणार असल्याने उत्सुकता आहे. कुठल्या राजकीय पक्षापेक्षा शहराचा विकास कोण करू शकतो, अशा उमेदवाराला मतदान केले पाहिजे.
– नीता लोखंडे, कला प्रथम वर्ष, 
बंझाणी महिला महाविद्यालय, नागपूर

आता बदल व्हायची गरज आहे. महागाई वाढतेच आहे. गरजेच्या वस्तू, पेट्रोलच्या किमती वाढत आहेत. नेहमीच कामं न करता फक्त निवडणुकांच्या आधी कामं केली जातात. त्यामुळे आता बदल गरजेचा आहे. त्यासाठी मतदान करावंच लागेल. जो प्रामाणिकपणे काम करतो त्याला मत देणार. बाकीच्यांनाही मतदान करा म्हणून सांगणार.
– ऋग्वेद गुपचूप, बी.कॉम., पुणे

मतदानाचा हक्क हा माझ्या दृष्टीने परम पवित्र असल्याने तो मी जबाबदारीने बजावणार आहे. सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षांना न्याय देण्यासाठी आधुनिक जगाशी सुसंगत ठरणाऱ्या संकल्पना राबवण्यावर उमेदवारांचा व पक्षांचा भर असला पाहिजे. महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी या समस्यांनी जनतेला ग्रासलेले आहे. देशाचे हे चित्र बदलण्यासाठी सक्षम राजकीय पक्ष सत्तेवर येणे गरजेचे आहे. लोकशाहीचा सकारात्मक विचार करुनच मतदान करणार आहे. 
– रोहित मोरे, कोल्हापूर</span>

मोठमोठी आश्वासने देऊन जनतेला झुलवत ठेवण्याचे काम अनेक राजकीय पक्ष करीत असतात. सार्वजनिक जीवनात वावरत असताना ते लंबीचौडी आश्वासने देतात. पण त्याची अंमलबजावणी मात्र होत नाही. त्यामुळे निवडणुका सुरु झाल्या की मतदारांना पशाचे आमिष दाखवून उमेदवार मत देण्यास प्रवृत्त करतात. समस्यांची सोडवणूक कधीही होत नाही. नेते समस्या सोडवायला कमी पडत असतील तर मतदारांनी त्यांना मतदान कशासाठी करायचे असाही प्रश्न पडतो. पण सरतेशेवटी देशाचा कारभार सक्षमतेने करणाऱ्या उमेदवारांस विचारपूर्वक मतदान केले पाहिजे असे माझे मत आहे.
– संदीप िशदे, कोल्हापूर

देशाला सद्यस्थितीत खंबीर नेतृत्त्वाची गरज आहे. देशाची अर्थ, संरक्षण, कायदा, सुव्यवस्था विषयक व्यवस्था खिळखिळी झालेली आहे. अशा स्थितीत कोणालाही निवडून दिले तरी फारसा फरक पडेल असे मला वाटत नाही. पण असा उमेदवार िरगणात नसेल तर नकाराधिकाराचे बटण दाबले पाहिजे. कोणताच उमेदवार योग्य नसेल तर शासनाने योजलेल्या या मार्गाचा अवलंब केला पाहिजे. 
– श्रृतिका सपाटे, कोल्हापूर

लोकशाही प्रक्रियेत मतदानाचे महत्व खूपच उच्च दर्जाचे आहे. मतदारांनी मतदानाचा हक्क जरुर बजावला पाहिजे. घटनेने मतदान करण्याचा हक्क दिलेला असताना त्यापासून कोणीही दूर राहू नये. देश निर्माणासाठी मतदान करण्यास मी प्राधान्य देणार आहे. मतदानादिवशी सुट्टी असली तरी घरामध्ये टिव्हीसमोर मनोरंजनाचे कार्यक्रम बघत दिवस घालविण्यापेक्षा मतदान केंद्रावर जाऊन आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे.
– राजीव माने, कोल्हापूर

लोकसभा निवडणुसाठी मतदान करताना आपले मत वाया जाणार नाही याची दखल प्रत्येकाने घेतली पाहिजे. मतदानाची संधी पाच वर्षांतून एकदा प्राप्त होत असते. अशा स्थितीत प्रथमच मतदान करताना ज्या उमेदवाराला मतदान करावयाचे आहे, त्याची र्सवकष माहिती घेतली पाहिजे. माझ्या एका मतावर देशाचे भवितव्य अबलंबून आहे. तेव्हा मी निवडलेला उमेदवार गल्ली आणि दिल्ली येथील कामाचा समन्वय ठेवू शकेल काय याचा जरुर विचार झाला पाहिजे.
– निला देसाई, कोल्हापूर
संकलन: दयानंद लिपारे, राखी चव्हाण,  राम भाकरे, इरावती बारसोडे

आजच्या तरुणांना रिझल्ट हवा असतो. थापा चालत नाहीत. पण लोकप्रिय नेता असेल तर तरुणांना राजकारणात इंटरेस्ट निर्माण होऊ शकतो असे प्रतिपादन मनसे करते. आपच्या मते आजचा तरुण खूप हुशार आहे. त्याला त्याचे हक्क कळले आहेत. त्यामुळे तो राजकारणाकडे सजगपणे पाहतो. याच संदर्भात वेगळा मुद्दा मांडताना ‘आप’च्या प्रीती शर्मा सांगतात की, ‘‘महाराष्ट्र सोडता देशातील इतर राज्यांतील तरुण हे राजकारणाकडे तुच्छेतेने पाहात नाहीत, पण महाराष्ट्रात जाणूनबुजून तरुणांना विद्यापीठीय निवडणुकांपासून वंचित ठेवल्यामुळे त्यांचा राजकारणाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात फरक पडला आहे.’’ महाराष्ट्रातील राजकारण्यांना घराणेशाही राबवायची असल्यामुळे हे करण्यात आल्याचे त्या सांगतात. विद्यापीठीय निवडणुका या काही केवळ राजकीय अड्डा नसून त्याद्वारे युवकाला जबाबदारीची जाणीव होते, एक भूमिका तयार होते. नेमका त्याचा येथे अभाव आहे. त्यामुळे आजचा तरुण राजकारणाकडे दबकून पाहतो. बाळासाहेब ठाकरे, नरेंद्र मोदी यांच्या व्यक्तिमत्त्वाचे तरुणांना आकर्षण असल्याचे शिवसेना आणि भाजपचे म्हणणे आहे. प्रभावी व्यक्तिमत्त्वामुळे तरुण राजकारणाकडे, पक्षाकडे आकर्षित होतात असे या दोन्ही पक्षांचे म्हणणे आहे. 

सारे रणांगण तरुणांच्या हातात 
– अनंत गाडगीळ – प्रवक्ता, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 
राहुल गांधींनी तरुणाईला मोठय़ा प्रमाणात वाव दिला आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आम्ही पूर्वीपासूनच तरुणांच्या जवळ आहोत. या निवडणुकीत तरुणाईची सुरुवात नेतृत्वापासूनच केली आहे. ज्येष्ठांना राज्यसभेवर पाठवले आहे. निवडणुकीच्या रणांगणात आता सारेच तरुण आहेत. मोठय़ा प्रमाणात तरुण आमच्याकडे येत आहेत.

आमच्याकडे सर्वात जास्त तरुण उमेदवार – 
– शिशिर शिंदे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना
आमचे सारे उमेदवार हे तरुण आहेत. तरुणांना खमक्या पक्षाचे, रिझल्ट देणारे उमेदवार लागतात. ते चित्र आमच्या पक्षात आहे. त्यामुळे आमच्या पक्षात तरुणांचा वावर अधिक आहे.

आमच्याच पक्षाकडे तरुणांचा ओढा 
– नवाब मलिक – प्रवक्ता, राष्ट्रवादी काँग्रेस 
सुरुवातीच्या काळात आमच्या पक्षाकडे तरुणांचा ओढा होता. मधल्या काळात हा ओढा मनसेकडे गेला होता. पण गेल्या दोन वर्षांत आमच्याकडे ओढा वाढला आहे. तीन वेगवेगळ्या स्तरांवर आम्ही युवकांसाठी काम करत आहोत. युवतींसाठी वेगळा विभाग देणारा राष्ट्रवादी काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे.

मोदी युवाशक्तीने मोठी आघाडी घेतली आहे 
– प्रकाश जावडेकर – प्रवक्ता, भारतीय जनता पक्ष
मोदी युवाशक्तीच्या माध्यमातून गेल्या काही महिन्यांत आम्हाला जे तरुण मिळाले आहेत त्यातील ४५ हजार तरुणांनी निवडणुकीच्या कामासाठी वेळ दिला आहे. मतदार ही एक त्यांची भूमिका झाली, पण त्याही पलीकडे जाऊन त्यांच्याकडे असणारे इनोव्हेशन महत्त्वाचे आहे. आमचा पक्ष अशा इनोव्हेशनला वाव देतो.

बदलाची शक्ती तरुणांमध्येच 
– अर्जुन डांगळे, प्रवक्ता, रिपाई, (आठवले गट) 
आंबेडकरी चळवळ, दलित पँथर या सर्व घडामोडी तरुणांनीच गाजवल्या आहेत. तरुणपणी एक धमक असते. खूप अनुभव घेतल्यावर ही धमक कधी कधी बोथट होते. आम्ही निवडणुकीच्या राजकारणात कमी पडलो असू, पण आताच्या तरुणांचा कल सत्तेकडे जाण्याचा आहे. मात्र आजही कोणत्याही सामाजिक प्रश्नावर आमचा सारा तरुणच सर्वात प्रथम एकवटतो.

आमचा पक्ष तरुणांचा 
– प्रीती शर्मा – प्रवक्ता, आम आदमी पार्टी</span>
आमचा पक्ष हा तरुणांचा असून आमच्या प्रत्येक समितीत २५ टक्के तरुण आहेत. तरुणांसाठी कोणताही वेगळा विभाग न करता आम्ही त्यांना मुख्य धारेत घेतले आहे. तरुण हे देशाची नस आहेत. तरुणांकडे असणाऱ्या नव्या विचारांना- कल्पनांना आम्ही वाव देतो.

शिवसेनेला कायमच तरुणांचा प्रतिसाद 
– नीलम गोऱ्हे – प्रवक्ता, शिवसेना
बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रभावाने खूप मोठा युवा वर्ग पक्षाकडे खेचला गेला आहे. आज युवा सेनेच्या माध्यमातून अनेक तरुण शिवसेनेत येत आहेत. शिवसेनेत तरुण सक्रिय राहतो. सोशल मीडियामध्ये आज पक्षाचे तरुण कार्यकर्तेच आघाडीवर आहेत. तो त्यांच्या कामाचा भाग झाला आहे.

आजचा तरुण हुशार असला, त्याला हक्काची जाणीव झाली असली, तो मतदान करून आपला हक्क बजावणार असला तरी राजकारणात पक्षाच्या कामात तो कितपत सक्रिय असतो, हा प्रश्न उरतोच. राजकीय पक्ष त्याला आपल्या कामात किती थारा देतात हादेखील महत्त्वाचा मुद्दा आहे. आपच्या कोणत्याही समितीमध्ये किमान २५ टक्के तरुणांचा समावेश केला जातो. आपमध्ये इतर पक्षांप्रमाणे युवकांची वेगळी विंग न करता त्यांना मुख्य धारेत सामावून घेतले आहे. मोदी युवाशक्तीच्या माध्यमातून भाजपने गेल्या सहा महिन्यांत लाखो तरुणांशी संपर्क केला आहे. त्याचाच परिणाम म्हणून आज ५० हजार युवक पक्षाचे सभासद नसतानादेखील निवडणुकांच्या कामात सक्रिय असल्याचे भाजप सांगते. निवडणुकीत मतदारांसाठी सक्रिय असणारे एक लाखाहून अधिक गट प्रमुखांपैकी ५० टक्के तरुणच असल्याचे शिवसेनेचे मत आहे, तर एनएसयूआयच्या माध्यमातून काँग्रेस विद्यार्थ्यांना संधी देत असते, असे पक्षाचे मत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सांगते, आमच्याकडे विद्यार्थी, युवक, युवती असे तीन विभाग युवकांसाठी कार्यरत आहेत. युवतींसाठी कोणताही राजकीय पक्ष, वेगळा विभाग केलेला नाही. तसेच आज आमच्याच पक्षाकडे सर्वात जास्त प्रमाणात तरुण येत आहेत, असे त्यांचे प्रतिपादन आहे.

१६ व्या लोकसभा निवडणुकीत तरुण जरी मतदानाची दिशा पालटणार असले तरी एकूणच राजकीय पक्षांनी किती तरुण उमेदवार दिले आहेत या प्रश्नावर थेट मत न मांडता प्रत्येकाने सोयीस्कर भूमिका घेतली आहे. मुळात तरुणाची व्याख्याच करताना सोयीस्कर भूमिका घेतली असल्यामुळे तरुण उमेदवारांच्या बाबतीत तीच भूमिका राहिली असल्याचे स्वाभाविकपणे दिसून येते. आपच्या तरुणाईच्या व्याख्येत २५ वर्षांपर्यंतच तरुण आहे. लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारासाठी किमान वयाची मर्यादा हीच २५ वर्षे आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षाच्या व्याख्येत बसणारा तरुण उमेदवार दिलेला नाही. काँग्रेसने नेतृत्वच तरुणांच्या हाती दिले असून, लोकसभेसाठी बहुतांश उमेदवार हे ३५- ५० वयोगटातील असल्याचे प्रतिपादन केले आहे. ज्येष्ठांना राज्यसभेवर पाठविले असल्यामुळे रणांगण तरुणांच्या हाती असल्याचे त्यांचे मत आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते सांगतात की ३५ नंतर लगेच काही कोणी वयस्कर होत नाही. तसेच ५०-५५ पर्यंत माणसात धडाडी असते. त्यामुळे आमचे उमेदवार त्या वयोगटातील आहेत. भाजप आणि शिवसेनेच्या मते केवळ तरुण आहे हाच मुद्दा नसून उमेदवाराचे काम, कुवत या साऱ्या गोष्टीदेखील महत्त्वाच्या आहेत. उमेदवाराने स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा अशा टप्प्यांवर काम केले असेल, तर त्याला जो अनुभव असतो त्याचा फायदा लोकसभेत होऊ शकतो. त्यामुळे तरुण असणे हाच एकमेव मुद्दा उमेदवारी देताना लागू होत नसल्याचे ते स्पष्ट करतात. शिवसेनेचे सुमारे ४० टक्के उमेदवार हे त्यांच्या तरुणाईच्या व्याख्येत बसणारे असल्याचे त्यांचे मत आहे. सर्वच पक्षांनी तरुणाईला वाव दिला, असे सांगितले तरी तरुणांना उमेदवारी देताना बहुतांशांनी घराणेशाहीच सुरू ठेवली आहे. त्याव्यतिरिक्त निवडणुकांच्या रिंगणात नवीन तरुण हे चित्र अभावानेच दिसते.
तीन-चार वर्षांपासून सक्रिय झालेला सोशल मीडिया हा तरुणांना आकर्षित करण्याचा महत्त्वाचा आधार असे सर्वच पक्षांकडून मानले जाते, पण अनेक राजकीय पक्षांच्या मते सोशल मीडियाचा वापर हा केवळ तरुणच नाही, तर अनेक ज्येष्ठ नागरिकदेखील मोठय़ा प्रमाणात करतात. भाजपच्या मते सोशल मीडिया हे एक साधन आहे. केवळ त्यावरच सारे यश मिळणार नाही. विविध समाजवर्गाशी संपर्क करण्यासाठी विविध माध्यम पर्याय वापरले जातात. सर्वच माध्यमांचे यश हे १०० टक्के कधीच नसते. तसेच या माध्यमाचेदेखील आहे. आपच्या स्थापनेपासूनच सोशल मीडियावर भर दिला आहे. त्यांच्या मते देशातील १२० मतदारसंघ हे सोशल मीडियामुळे जिंकता येतील. काँग्रेस सोशल मीडियाचा प्रभाव नाकारत नाही, मात्र त्या माध्यमातून चर्चा होण्यापेक्षा टिंगलटवाळीच करण्यावर जास्त भर दिला जातो, असे त्यांचे मत आहे. सोशल मिडिया प्रभावशाली आहे, मात्र समोर आदर्श उमेदवार, पक्ष नसेल तर ही सोशल मिडियावरची गर्दी मतदानासाठी उतरणार नाही. त्यासाठी पक्ष खमक्या हवा असे मनसेचे म्हणणे आहे.

शिवसेनेच्या मते सोशल मीडियाने महापालिकेच्या निवडणुकांमध्ये प्रभाव दाखविला आहे. लोकसभा निवडणुकांसाठी सोशल मीडिया ८० टक्के प्रभावी राहण्याची सेनेला शक्यता वाटते. प्रत्येक पक्षातील तरुण वर्ग या सोशल मीडियाशी मोठय़ा प्रमाणात जोडला असल्याचे लक्षात येते. मतदारसंघानुसार, जिल्ह्य़ानुसार ग्रुप केले आहेत. त्या माध्यमातून प्रचाराचा धडाका सुरू आहे. राष्ट्रवादीच्या मते तरुण सोशल मीडियावर कितीही व्यस्त असला, त्यातून त्याची मानसिकता काहीही असली तरी त्याचं मतदान हे काही त्यावर अवलंबून नाही. त्याच्या घरातील विचारसरणीचा पारंपरिक पगडाच मतदानात उमटेल. मात्र सोशल मीडियावर सक्रिय असणारी तरुणाई मतदानाला किती उतरेल हे मात्र कोणालाही ठामपणे सांगता आलेले नाही.
एकंदरीतच १६व्या लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात प्रभावी ठरणाऱ्या तरुण मतदारांसाठी सर्वच पक्षांनी आपापली यंत्रणा कामाला लावली आहे. काही प्रमाणात स्वत:मध्ये बदलदेखील केले आहेत. मात्र तरुणाईबद्दल त्यांची कोणतीही ठोस भूमिका दिसून येत नाही. देशाच्या युवा मंत्रालयानुसार १५-३५ हा वयोगट तरुण म्हणून गणला जातो. आज देशातील प्रमुख पक्षांची तरुणांची व्याख्या वेगवेगळी आहे. दोन प्रमुख पक्ष हीच व्याख्या ४० पर्यंत नेतात. या पाश्र्वभूमीवर देशातील १६ व्या लोकसभेत किती तरुण प्रतिनिधी असतील याची उत्सुकता सर्वानाच राहणार आहे.
नवीन मतदार नोंदणीसाठी निवडणूक आयोगाने गेल्या तीन वर्षांत योजनाबद्ध कार्यक्रम आखून नोंदणी केली आहे. राजकीय पक्षांनीदेखील त्यासाठी जोर लावला होता. आता हीच वाढीव मतदारांची तरुणांची संख्या सर्वच पक्षांचे भविष्य ठरवणार आहे. येत्या निवडणुकीत तरुण मतदार जर मतदानासाठी उतरले, तर मात्र यंदा मतदानाची टक्केवारी मोठय़ा प्रमाणात वाढून ६०-७० टक्क्य़ांपर्यंत जाण्याची शक्यता सर्वच पक्षांनी वर्तविली आहे. अर्थातच ही वाढलेली टक्केवारी या नव्या मतदारांची तरुणाईची असणार आहे आणि हीच टक्केवारी येत्या निवडणुकीत कळीची भूमिका बजावणारी आहे. कधी काळी तरुणांना काय कळते म्हणणारे सारेच पक्ष आज तरुणांच्या मताला किंमत देऊ लागले आहेत, कारण तरुणांच्या मताला आज निवडणुकीचं चित्र फिरविण्याचा भाव आलेला आहे.

Story img Loader