कर्नाटक -महाराष्ट्र सीमा भागात वावरणारे रानटी हत्तींचे काही कळप गेल्या दहा वर्षांत काही कारणांमुळे कोल्हापूर तसंच कोकण परिसराकडे वळले. या पाश्र्वभूमीवर नुकतीच सिंधुदुर्ग जिल्ह्यात पार पडलेली हत्ती पकड मोहीम यशस्वी ठरली.
गेल्या दहा वर्षांत महाराष्ट्रात रानटी हत्तींनी अक्षरश: धुडगूस घातला. कर्नाटक-महाराष्ट्र सीमा भागात रानटी हत्तींचा वावर आहे. मात्र २००३ च्या दरम्याने रानटी हत्तींचे काही कळप महाराष्ट्राकडे वळले. सन २००४ पासून सिंधुदुर्गातील दोडामागा, कुडाळ आणि आंबोलीचा काही भाग, तर कोल्हापूरमधील आजरा व चंदगड तालुक्यांमध्ये त्याचा परिणाम मोठय़ा प्रमाणावर जाणवला. मुळातच महाराष्ट्राने रानटी हत्ती एवढय़ा जवळून पूर्वी पाहिले नव्हते. येथील वनविभाग आणि प्रशासनालादेखील ‘रानटी हत्ती’ हा प्रकार नवीनच होता. कदाचित याचेच पर्यवसान एका मोठय़ा ‘हत्ती-मानव संघर्षां’त झाले असे म्हणावे लागेल. वनविभागाचे हत्ती पळवण्याचे कष्ट कधी सफल होत होते, तर कधी अपयशी. सामाजिक व राजकीय स्तरावर या घटनांचे वेगवेगळे पडसाद उमटले. या पाश्र्वभूमीवर नुकतीच सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात पार पडलेली हत्ती पकड मोहीम यशस्वी ठरली.
एक दृष्टिक्षेप
सर्व प्रथम २००२ साली सात हत्तींचा कळप दोडामार्ग तालुक्यात दाखल झाला. पुढील वर्षभर या कळपाच्या हालचाली दोडामार्गपुरत्याच मार्यादित होत्या. याच दरम्यान २००४ साली आठ हत्तींनी कोल्हापूर जिल्ह्य़ात प्रवेश केला. सन २००४ मध्ये दोडामार्ग तालुक्यात आलेल्या २५ हत्तींपैकी १६ हत्तींना मागे पिटाळून लावण्यात वनविभागाला यश आले, मात्र २००५ सालापासून रानटी हत्ती खऱ्या अर्थाने सिंधुदुर्गवासी झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात २००९ साली एकूण १७ हत्ती असल्याचे सांगितले जात होते. सन २००९ मध्ये दुसऱ्या वेळी वनविभागाने हत्ती हटाव मोहिमेची तयारी केली. आसाममधून हत्तींना पकडण्यासाठी विशेष पथक आले होते. मात्र या मोहिमेत दोन हत्तींचा दुदैवी मृत्यू झाला. गेल्या दहा वर्षांत पीक नुकसानीसोबतच महाराष्ट्रात १३ माणसांचे जीव गेले, तर १४ हत्तींना आपले प्राण गमवावे लागले. आतापर्यंत भारतात सर्वाधिक हत्ती नुकसानभरपाई (पीक आणि जीवित हानी) दिलेला जिल्हा म्हणून सिंधुदुर्गाचे नाव घेतले जाते.
हत्तींचा अधिवास
जगातील एकूण आशियायी हत्तीच्या अधिवासापैकी केवळ ५५ टक्के अधिवास आज नष्ट झाला अहे. भारतात जवळपास २५ हजार (५० टक्के) आशियायी हत्ती आहेत, तर सह्य़ाद्री पर्वतरांगांत दहा हजार हत्तींचा वावर अहे.
कर्नाटक राज्यात जवळपास सहा हजार हत्ती अहेत, तर उत्तर कर्नाटक व अणशी-दांडेली भागात ५०-६० हत्तीचा नियमित वावर आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील ४९ टक्के क्षेत्र वनाच्छादित असले तरी त्यापैकी ८९ टक्के वन हे खासगी मालकीचे आहे. केवळ ११ टक्के क्षेत्रच प्रत्यक्ष वनविभागाकडे आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात हत्तीसाठी सलग जंगलपट्टा आज अस्तित्वात नाही. लहान लहान गावे आणि विखुरलेल्या वस्त्यांमुळे येथे रानटी हत्तींकडून शेतीची नासधूस आणि कुठूनही गेले तरी मनुष्याशी संघर्ष अटळच अहे.
हत्ती स्थिरावण्याची कारणे :
१. दक्षिण भारतातील संरक्षित वनक्षेत्रात रानमोडी व घाणेरी या विदेशी वनस्पतींची मोठय़ा प्रमाणावर वाढ झाली आहे. या विदेशी वनस्पती स्थानिक वनस्पतींशी स्पर्धा करतात. गवत आणि इतर वनस्पतींच्या बिया रुजण्यात त्यांचा मोठा अडथळा होतो. परिणामी, हत्तींना त्यांचे नैसर्गिक खाद्य संरक्षित वनक्षेत्रातच आवश्यक त्या प्रमाणात उपलब्ध होऊ शकत नाही.
२. दक्षिण भारतात व्यावसायिकदृष्टय़ा मोठय़ा प्रमाणावर केली जात असलेली सागवान, चहा, कॉफी व रबराची लागवड.
३. उत्तर कर्नाटक, अणशी-दांडेली भागातील नर व मादी यांचे व्यस्त प्रमाण (१:८).
४. तिलारी धरणामुळे बुडीत गेलेला जंगल प्रदेश आणि सोबतच उत्तर कर्नाटकातील वाढते खाणकाम.
५. सिंधुदुर्गातील सह्य़ाद्री पर्वतरांगांच्या पायथ्याशी मोठय़ा प्रमाणावर उपलब्ध असलेले बांबू, भेरली माड आदी खाद्य. येथील बारमाही पाण्याचे स्रोत आणि सहज अन्न म्हणून उपलब्ध असलेल्या नारळ, केळीच्या बागा. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील माणगाव भागात मोठय़ा प्रमाणावर होत असलेली भातपिकाची लागवड.
संघर्ष निवळण्यासाठी प्रयत्न :
रानटी हत्तींचा सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील प्रवेश रोखण्यासाठी वनविभागाने हत्तींना अडविण्यासाठी खंदक खोदणे, सौर कुंपण उभारणे, सिंधुदुर्गात हत्तींच्या प्रवेश करण्याच्या मार्गावर लोखंडी खांबांचे अडथळे तयार करणे, दगडी भिंती उभारणे यांसारखे विविध उपाय केले. तर सर्वसामान्य शेतकऱ्यांनी हत्ती शेतात आल्यावर फटाके लावणे, ढोल वाजवणे, मशाली पेटवणे, जास्त क्षमतेच्या ‘टॉर्च’ वापरून हत्तींना पळवणे असे प्रयत्न केले. काहींनी शेताभोवती दोरखंडांना ग्रीस व मिरचीपूड याचे मिश्रण लावून पीक संरक्षणाचा प्रयत्न केला, तर काहींनी तंबाखूचा धूर करून हत्तींना पिटाळले. मात्र वरील कोणत्याही प्रयत्नांना म्हणावे तसे यश लाभले नाही. जसजसे हत्ती या सर्व परिस्थितीशी परिचित होत गेले तसतसे ते वरील कोणत्याही प्रयत्नांना दाद देईनासे झाले.
ते कधी पडवीच्या लभती पाडून आतील भात फस्त करीत, तर कधी सौर कुंपणावर बाजूचेच एखादे झाड उन्मळून टाकीत आणि आपली वाट मोकळी करीत.
पदरी अपयशच का आले?
१. सिंधुदुर्गासारख्या अती पावसाच्या भागात खोदलेले खंदक अगदीच कुचकामी ठरतात.
२. मोठय़ा प्रमाणात पाऊस आणि रात्री पडणाऱ्या दवामुळे हत्तींना दूर ठेवण्यासाठी मिरचीपूड आणि ‘ग्रीस’ वापरून तयार केलेल्या दोराखंडांचा प्रभाव कमी होतो.
३. सिंधुदुर्गातील सर्वसामान्य शेतकऱ्याला आपल्या शेताभोवती विद्युत कुंपण उभारणे शक्य नाही.
४. रात्रीच्या वेळी हत्ती शेतीची नासधूस करत असताना प्रत्यक्षात शेतकऱ्याने काय करावयास हवे, यासंदर्भात कोणतेही प्रशिक्षण/माहिती येथील शेतकऱ्यांना नाही. हत्तींच्या भीतीने येथील बऱ्याच शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळी शेतीचे संरक्षण करणेदेखील सोडून दिले आहे. आणि तेच नेमके रानटी हत्तींच्या पथ्यावर पडले.
५. मधमाशांची पोळी शेताभोवती बांधून शेतीचे संरक्षण करण्याचे यशस्वी प्रयोग आफ्रिकेत झाले असले तरी भारतात झालेले नाहीत.
६. रानटी हत्तींना पळवण्यासाठी विशेष रासायनिक प्रतिरोधक किंवा ध्वनीप्रतिरोधकाचा वापर करणे, शेतात हत्तींच्या अवाजाच्या ध्वनिफिती वाजवणे अथवा रानटी हत्तींच्या कळपातील एकाला ‘रेडीओ कॉलरिंग’ करून संपूर्ण कळपावर नजर ठेवणे असे नवनवीन प्रयोग करून पाहण्यासंदर्भात आपण फारच मागे आहोत. गेल्या दहा वर्षांत सिंधुदुर्गातील ‘मानव-हत्ती संघर्षांमागील करणे व त्यावरील उपाय’ यावर अद्याप एकही ठोस अभ्यास प्रकल्प सादर झालेला नाही.
७. आसाममध्ये ४५ गावांत सुरू असलेल्या ‘लिव्हिंग विथ एलिफंट्स’ हा प्रकल्प पूर्ण दुर्लक्षित राहिला.
८. सिंधुदुर्गातील वन्यप्राणी संपदा पाहता वास्तविक येथे वनविभागाचा स्वतंत्र वन्य-जीव विभाग लागू करणे अपेक्षित आहे. मात्र सध्या प्रादेशिक वनविभागातील कर्मचाऱ्यांना कोणतेही विशेष प्रशिक्षण नसताना तुटपुंज्या मनुष्यबळ व साधन सामुग्रीवर वन्यजीव संरक्षणाचे काम करावे लागत अहे.
या पाश्र्वभूमीवर नुकतीच सिंधुदुर्गातील माणगाव खोऱ्यात पार पडलेली हत्ती पकड मोहीम नक्कीच यशस्वी ठरली. कर्नाटकमधून आलेले विशेष ‘हत्ती-पकड’ पथक आणि चार पाळीव प्रशिक्षित नर हत्ती, वनविभागाचे कर्मचारी, पोलीस पथक आणि स्थानिकांच्या सहकार्यातून कुडाळ तालुक्यातील तीन नर हत्ती पकडण्यात यश आले आहे.
रानटी हत्तींना पाळीव करण्याची कला चार हजार वर्षांपूर्वी विकसित होत गेली. राजा- महाराजांच्या काळात रानटी हत्तींना पकडण्यासाठी चार प्रमुख पद्धती वापरल्या जात. त्यात खेड्डा, प्रशिक्षित हत्तिणींचा वापर, छुपे खंदक आणि प्रशिक्षित हत्तींच्या पाठीवरून फास टाकणे या पद्धतींचा समावेश होता. पुढे विसाव्या शतकात हत्तीला भूल देणाऱ्या औषधांचा शोध लागल्याने वरील पद्धती मागे पडत गेल्या. या पद्धतीमध्ये ‘डाटा गन्स’च्या सहाय्याने दुरूनच रानटी हत्तीला गुंगीचे इंजेक्शन मारले जाते. रानटी हत्ती बेशुद्ध झाल्यावर पाळीव प्रशिक्षित हत्ती (कुंकी)च्या सहाय्याने त्याला जेरबंद करतात. मात्र प्रत्यक्षात कशी राबवली जाते ही हत्ती पकड मोहीम?
हत्ती पकड मोहीम
हत्तीबाधित क्षेत्रामधील वनविभागाचे कर्मचारी व वनरक्षक रानटी हत्तीच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून असतात. कधीकधी ‘काल कुणाचे माड पाडले? कुणाची केळी मोडली?’ या बातम्यांवरून संबंधित हत्तीचा ठावठिकाणा मिळवला जातो. रानटी हत्ती दिवसा जास्त प्रवास करण्याऐवजी शक्यतो दाट जंगलात संथपणे चरणे जास्त पसंत करतात आणि याचाच फायदा अनुभवी मागकाढे घेतात. आदल्या रात्रीची खबर मिळताच इकडे ‘कँप’मधील पाळीव हत्तींना ट्रकवर चढवले जाते. उपवनसंरक्षक, माहूत व इतर कर्मचारी मोहिमेच्या या भागाची नव्याने आखणी करतात. योग्य त्या सूचना मिळाल्यावर सर्व ताफा रानटी हत्तींच्या दिशेने रवाना होतो.
मोहिमेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून वनरक्षक आणि पोलीस दलाचे कर्मचारी मोहीम चालू असलेल्या जंगलास खालच्या बाजूने वेढा देऊन असतात. एकदा का रानटी हत्तीच्या इलाक्यात प्रवेश केला आणि हत्तीचा सर्वसाधारण वावर स्पष्ट झाला की मोहिमेची सर्व सूत्रे डॉक्टर्स व माहुतांकडे सोपवली जातात. चार प्रशिक्षित नर हत्तींसोबत त्यांचे माहुत, डॉक्टर्स व दोन वनरक्षक जंगलात प्रवेश करतात. अनुभवी मागकाढे रानटी हत्तीच्या ताज्या खाणाखुणा शोधून काढतात आणि सुरू होतो प्रत्यक्ष मोहिमेचा थरार!
अर्थातच, आपल्या आजूबाजूला काही तरी वेगळे घडते आहे याची पूर्ण जाणीव रानटी हत्तीला असते. एव्हाना चार पाळीव हत्ती आपल्या मागावर आहेत हे देखील त्याने हेरलेले असते. रानटी हत्ती त्या जंगलात बरीच वर्षे राहत असल्याने तेथील प्रत्येक गोष्टींशी तो परिचित असतो. आता संबंधित जंगल सोडून जाण्याची त्याची शक्यता कमी असली तरी तो या पथकाला चकवा देऊ शकतो. म्हणून ‘कुंकी’ना सुरुवातीला काही वेळ रानात शांत उभे केले जाते. ‘डाटा गन्स’ घेऊन डॉक्टर्स व त्यांचे सहकारी रानटी हत्तीच्या मागावर निघतात.
वाऱ्याने होणारी पानांची व फांद्यांची सळसळ आणि जंगलातून दूर चालत असलेल्या रानटी हत्तीमुळे होणारा फांद्यांचा वेगळा आवाज ओळखण्यासाठी खरेच मोठे कसब आवश्यक असते. त्यातच जंगलातील इतर पशु-पक्ष्यांचे आवाज आणि हालचाली मिसळत असतात. अचानक काही अंतरावर एखादी मोठी फांदी तुटल्याचा अवाज होतो आणि रानटी हत्तीची प्रत्यक्ष उपस्थिती निश्चित होते. रानटी हत्तीला पाहून, त्याची उंची, वजन व सरासरी वय ध्यानात घेऊन ‘डाटा गन्स’मधील गुंगीच्या औषधाची मात्रा निश्चित केली जाते. रानटी हत्ती ज्या ठिकाणी व ज्या दिशेने तोंड करून उभा आहे त्यानुसार ‘फिल्डिंग’ लावली जाते. त्याच्या इतर हालचालींवर बारीक नजर ठेवली जाते. त्याला माणसांच्या अस्तित्वाचा कितपत अंदाज आलाय याचेही ठोकताळे केले जातात. यावेळी मागकाढे अपापसात शिट्टीच्या सांकेतिक भाषेत इशारे करतात. या शिट्टीचा अवाजदेखील एका रानपक्ष्याच्या आवाजासारखा असतो.
‘डाटा गन्स’वाली माणसे रानटी हत्तीच्या शक्य तेवढय़ा जवळ जाण्याच्या प्रयत्नात असतात, जेणेकरून योग्य ठिकाणी व योग्य प्रकारे ‘डाटा’ मारणे शक्य व्हावे. काही वेळा रानटी हत्ती अगोदरच सावध होतो, तर काही वेळा आपली दिशाच बदलतो. अता मात्र पाळीव हत्तींना (कुंकींना) बोलावणे पाठवले जाते. रानटी हत्ती हे चक्रव्यूह तोडून बाहेर पडू नये म्हणून पाळीव हत्ती त्याला तीन बाजूंनी घेरतात. हत्ती ‘डाटा गन्स’च्या रेंजमध्ये मिळेपर्यंतचा हा काळ सर्वाचीच सत्त्वपरीक्षा पाहतो. कधी दोन-तीन तासांतच हत्तीला ‘डाटा’ मारला जातो तर काही वेळा आठ-दहा तासदेखील कमी पडतात. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत रानटी हत्ती ‘डाटा’न झाल्यास त्या दिवासापुरती मोहीम थांबवली जाते.
‘डाटा’ केलेला हत्ती चिडलेल्या अवस्थेत असतो. काही वेळा तो जवळच्या एखाद्या झाडाला अंग घासून लगेचच ‘डाटा’ काढून टाकतो. अशा वेळी डॉक्टर्स पडलेल्या ‘डाटा’मधील औषधाचे निरीक्षण करतात. औषध जसेच्या तसे असल्यास पुन्हा तयारी सुरू होते. ‘डाटा’ यशस्वी केल्यावर मात्र डॉक्टर्स व त्यांचे सहकारी हत्तीला नजरेआड होऊ देत नाहीत. अर्धवट गुंगीत असलेल्या हत्तीच्या जवळ जाणे फारच धोकादायक असते. औषध वर्मी लागल्यास हत्ती पुढील जवळपास तासाभरात बेशुद्ध अवस्थेत जातो. पाळीव हत्तींचा वापर करून लगेचच आजूबाजूचा झाड झाडोरा साफ केला जातो. बेशुद्ध हत्तीच्या मानेभोवती जाड दोरखंडाचे फास घट्ट बांधले जातात. मागील दोन्ही पायांना साखळदंड बांधून पुन्हा एक-एक स्वतंत्र दोरखंड दोन पाळीव हत्तींच्या मान व छातीभोवती गुंडाळले जातात. अवघ्या १५ ते २० मिनिटांत सारी कामे उरकली जातात. सर्व धामधुमीच्या कालावधीत डॉक्टर्स मात्र शांतपणे बेशुद्ध हत्तीचे निरीक्षण करीत असतात. सर्व काम सुरळीत पार पडण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावरच तर असते. बेशुद्ध अवस्थेत असताना बऱ्याच वेळेला हत्तीच्या शरीराचे तापमान एकदम वाढते. अशा वेळी त्याच्या अंगावर थंड पाण्याचे कॅन ओतले जातात.
सर्व कामे पूर्ण झाल्याची खात्री झाल्यावर डॉक्टर्स बेशुद्ध हत्तीला भूल उतरण्याचे दुसरे इंजेक्शन देतात. भूल उतरून हत्ती भानावर येण्यासाठी अर्धा ते पाऊण तास लागतो. त्यानंतर डोंगरातून पाच हत्तींना बांधलेल्या अवस्थेत आड वाटांनी खाली उतरावे लागते. पकडलेल्या रानटी हत्तीला आता आजूबाजूच्या परिस्थितीचा चांगलाच अंदाज आलेला असतो. त्याचे पळून जाण्याचे प्रयत्न असफल होत असले तरी माहुतांसाठी ती फार मोठी डोकेदुखी असते. तोपर्यंत इकडे हत्तीला ‘डाटा’ केल्याची बातमी गावभर पसरलेली असते आणि बघ्यांचे थवे गोळा होऊ लागतात.
हत्तींना गावातून नेण्यापूर्वी आसपासच्या सर्व गावांचा वीजपुरवठा काही काळासाठी खंडित केला जातो. हत्तीला पकडून आणताना रात्री दीड वाजतादेखील दोन-अडीच हजार लोकांना शांतपणे बाजूला होण्याच्या सूचना देणे, वाटते तेवढे सोपे काम नक्कीच नाही. वनविभाग आणि पोलीस पथकाला प्रयत्नांची शर्थ करीत परिस्थिती हाताळावी लागते. डोंगरातून उतरल्यावर काळोखात दिसणारा हजारो ‘टॉर्चा’चा प्रकाश, रानटी हत्तीच्या पायातील साखळदंड डांबरी रस्त्यावरून घासून उडणाऱ्या ठिणग्या आणि चहुबाजूंच्या कोलाहलात डॉक्टर्स व त्यांचे सर्व सहकारी घामाच्या धारांत शांतपणे चालत असतात.
शेवटी रानटी हत्तींना ‘कँप’मध्ये आणल्यावर बंदिस्त करून ठेवण्यासाठी लाकडाच्या मोठमोठय़ा ओंडक्यांपासून बनविलेला पिंजरा/‘क्रॉल’ वापरतात. रानटी हत्तीला ‘क्रॉल’मध्ये ढकलल्यावर ‘क्रॉल’ची पुनर्बाधणी केली जाते. अजूनही माहुतांचे काम संपलेले नसते. मानेचे व पायांचे फास काढणे बाकी असतात. त्यासाठी आणखी तासभर वेळ लागतो. पाळीव हत्तींना खाऊ घातल्यावरच माहूत जेवण घेतात, तर रानटी हत्तीला दुसऱ्या दिवसापासून त्याचा आहार दिला जातो.
रानटी हत्तींच्या प्रशिक्षणाचा कालावधी दीड ते तीन महिने असला तरी त्यांचा सुरुवातीचा जंगली उन्माद कमी करण्यासाठी १५ ते २० दिवस लागतात. याला ‘स्पिरीट ब्रेकिंग’ असे म्हणतात. या दरम्यान पकडलेल्या हत्तीचे नामकरण केले जाते. प्रत्येक हत्तीसाठी स्वतंत्र फाइल तयार करून त्यात हत्तीचा स्वभाव, आहार, आरोग्य व इतर आवश्यक त्या पशुवैद्यकीय नोंदी ठेवल्या जातात. त्यानंतर खऱ्या अर्थाने हत्ती प्रशिक्षणास सुरुवात होते. पायांना साखळदंड बांधून त्यांना क्रॉलमधून बाहेर आणले जाते. हत्ती प्रशिक्षणातील निष्णात माहूत विशिष्ट आवाज आणि हत्तीच्या कानांमागे पायांनी केलेल्या विशिष्ट सांकेतिक खुणांद्वारे पुढील दोन महिने त्यांना विविध आज्ञा पालनाचे धडे देतात. त्यानंतरच यांना पाळीव-प्रशिक्षित हत्ती अथवा कुंकी असे संबोधले जाते.
याच धर्तीवर १६ फेब्रुवारी २०१५ रोजी पहाटे साडेतीन वाजता माहुतांनी तिसऱ्या रानटी हत्तीला क्रॉलमध्ये बंदिस्त केले आणि सिंधुदुर्गातील ‘हत्ती हटाव’ मोहिमेची सांगता झाली. येथे हत्ती हटाव मोहिमेचे पहिले पर्व यशस्वीपणे पूर्ण झाले. पकडलेल्या तीन नर हत्तींचे प्रशिक्षण व व्यवस्थापनाची फार मोठी जबाबदारी आता येथील वनविभागाला पार पाडायची आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील अंबेरी ‘फॉरेस्ट चेक पोस्ट’ आता महाराष्ट्रातील पहिले ‘हत्ती प्रशिक्षण केंद्र’ म्हणून उदयास येत आहे.