काळाची गणिते बदलायला लागली आहेत, माणसे बदलतात पण ज्यांच्याकडे एक सुंदर, संवेदनशील, निरागस मन आहे त्यांचे काय? एक छान संवेदनशील मन घेऊन सध्या या व्यावहारिक जगात पाय रोवून राहता येते.

बरेच दिवसांनी मागच्या महिन्यातच आम्ही खूप जवळच्या स्नेह्यंकडे गेलो होतो. सून, मुलगा नोकरी करत असल्यामुळे नातवाला सांभाळण्याची जबाबदारी होती. त्यामुळे मनात असूनही काही वेळा कोणाकडेच जायला जमत नसे. स्नेह्यंशी खूप गप्पा मारल्या. ‘आमच्या वेळेस बुवा असे होते!’ हा टिपिकल मॅटर सोडून सर्व विषयांवर गप्पा झाल्या. निघताना आमचे स्नेही ज्यांना आम्ही अण्णा म्हणत असू, म्हणाले, ‘‘आज तुम्ही तुमच्या कोषाबाहेर पडून आमच्याकडे आलात, खरेच बरे वाटले. तुमचा मुलगा, सून, नातू, अमेरिकेला गेल्यामुळे त्या वर्तुळाबाहेरचे विश्व आता तुम्हाला दिसायला लागले. असेच येत जा, भेटत जा, आनंद होतो, आजकालची पिढी तर ‘नो सेन्टिमेंट्स, बी प्रॅक्टिकल’ या तत्त्वावर जगत असते.
त्यांचे वाक्य मनाला भिडून गेले. खरच प्रॅक्टिकल होण्याच्या नादात माणूस भावनाशून्य, संवेदनाहीन बनत चाललाय का? आजकाल प्रामुख्याने तरुण पिढी आणि सर्व वयोगटांतले आपणा सर्वाचा हाच धोशा असतो ‘बी पॅ्रक्टिकल.’ मुलगा अमेरिकेला चालला होता, परत आपली भेट केव्हा होणार या विचाराने दोघांचेही डोळे (पती, पत्नी आम्ही दोघे) भरून आले त्यालाही थोडे वाईट वाटतच होते, पण स्वत:ला सावरून तो लगेच म्हणाला आई, ‘डोन्ट बी सेंटी, बी प्रॅक्टिकल. आता मी मोठा झालो आहे.’
अरे, कबूल, पण मी तुझी आई आहे. या नात्याला काही मापदंड असतात का? तू माझा मुलगा आणि मी तुझी आई दॅट्स ऑल. आकाशाला गवसणी घालणारे, स्वत:ची स्पेस जपणारे, स्वत:चे अवकाश निर्माण करणारे क्षणभर का होईना हे विसरतात, अरे ही आपली आई..
पूर्वी (सहज म्हणून आठवले म्हणून सांगते, नाही तर तुम्ही म्हणाल केलीच तुलना) माझ्या आजोबांकडे आईचे दोन भाऊ, आजोबांचे कर्नाटकातील गणगोत, शिक्षण म्हणा, काम म्हणा निमित्ताने आमच्या कसब्यातील घरी राहायला यायचे. सर्व कुटुंब गोकुळासारखे भरलेले. कोणाला कोणाची अडचण नव्हती. ‘एकमेका सहाय्य करू , अवघे धरू सुपंथ’ अशी मनोधारणा. घरात कोणतीही अडचण आली मग ती मोलकरीण आली नाही ही अडचण का असेना माझे मामा, काका, आईला मदत म्हणून भांडी घासू लागायचे. दुसऱ्याचे मन संभाळून आपले कर्म करीत राहणे यालाच म्हणतात का! माझे आजोबा तर मामलेदार कचेरीमध्ये साधे कारकून होते पण आपल्या आहे त्या पगारामध्ये एक तीळ सात जणांनी वाटून खायचा ही वृत्ती. ‘सेन्टी’ असणे त्यांच्या दृष्टीने पाप नव्हते.
आजकालची गणितं बदलली, आराखडे बदलले. प्रायव्हसी जपताना आपलेच माणूस परके कधी होऊन जाते कळतच नाही. मान्य आहे. प्रॅक्टिकल जगणे ही काळाची गरज झाली आहे. सगळीकडून इतक्या भावनाशून्य गोष्टी आपल्यावर कोसळतात, तेव्हा असे वाटते की, अरे आपण पण आपल्या आयुष्याचा प्रॅक्टिकली विचार करायला पाहिजे. मग एक व्हिशियस सर्कल तयार होते. तू किती माझ्यासाठी केलेस त्याच्याहून थोडे कमीच मी करणार.. कारण बी प्रॅक्टिकल. एक एक उत्तुंग शिखर गाठताना, पैसा मिळविताना माणूस असा भावनाशून्य बनत जातो आई-वडील, भाऊ-बहीण, आजी-आजोबा, काका-काकू, मामा-मामी, आत्या ही नाती परकी आणि पोरकी होत जातात.
इस्टेट, घर, पैसा, जमीनजुमला, आर्थिक व्यवहार या सगळ्यात आपला वाटा असतो, यात आपण हिरिरीने भाग घेतो पण ज्या आपल्या पूर्वजांनी, माणूसकी, माया, आपुलकी, एक संस्कारक्षम संवेदनशील मन वर्षांनुवर्षे जतन केले त्याच्या वारसा हक्काचे काय? पैशावर हक्क सांगणारे आपण त्याच संवेदनशील मनाचे वारसदार आहोत हा हक्क नाही सांगत.
मुद्दा असा की, काळाची गणिते बदलायला लागली आहेत, माणसे बदलतात पण ज्यांच्याकडे एक सुंदर, संवेदनशील, निरागस मन आहे त्यांचे काय? एक छान संवेदनशील मन घेऊन सध्या या व्यावहारिक जगात पाय रोवून राहता येते. खूप छानसे आयुष्य जगता येते. माणसाच्या कंपूतच मग अशी माणसे एकाकी नसतात. सो, नो सेंटिमेन्ट्स बी प्रॅक्टिकल, असे म्हणून जगण्यापेक्षा फ्यू सेंटिमेन्ट्स अ‍ॅन्ड प्रॅक्टिकल असे होऊ. तुम्हाला काय वाटते?

Story img Loader