इम्रान हाश्मी या अभिनेत्याचे नाव घेतले की सर्वात प्रथम येते त्याची ‘सीरियल किसर’ ही प्रतिमा. कारकिर्दीच्या सुरुवातीला तयार झालेली ही प्रतिमा इम्रान हाश्मीने पूर्णपणे बदलली. कायम दाढी वाढविलेल्या नायकाच्या, अॅण्टिहिरोच्या भूमिका भट कॅम्पच्या चित्रपटांतून साकारल्यानंतर त्याच्याकडे बॉलीवूडच्या अन्य दिग्दर्शकांचे लक्ष वेधले गेले. मीलन लुथारिया दिग्दर्शित ‘द डर्टी पिक्चर’मधील ७०-८०च्या दशकातील आर्ट फिल्मचा दिग्दर्शक ही भूमिका असो की ‘शांघाय’ या दिबाकर बॅनर्जी दिग्दर्शित चित्रपटातील ‘जोगिंदर परमार’ ही अॅडल्ट चित्रपटांचा दिग्दर्शक ही भूमिका असो इम्रान हाश्मीच्या अभिनयाने समीक्षकांचीही दाद मिळवली.
आता तर इम्रान हाश्मी ‘ऑफ बीट’ चित्रपटांच्याही पलीकडे जाण्याचा प्रयत्न करतोय. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय सिनेमामध्ये गेल्या वर्षी त्याने थेट प्रमुख भूमिकेद्वारे चंचुप्रवेश केला आहे.
‘टायगर्स’ असे या प्रॉडक्शनच्या सिनेमाचे नाव असून गेल्या वर्षी त्याचा जागतिक प्रीमिअर टोराण्टो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झाला होता.
या सिनेमाचे वैशिष्टय़ म्हणजे फ्रेंच चित्रपट निर्मितीची कंपनी, सिख्या एण्टरटेन्मेंट, ही भारतीय कंपनी, सिनेमॉर्फिक हा आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्मिती बॅनर, अशा निर्मिती कंपन्यांनी एकत्रितपणे ‘टायगर्स’ची निर्मिती केली असून अनुराग कश्यप, गुनित मोंगा आदी बॉलीवूडमधील निर्मातेही या सिनेमाचे सहनिर्माते आहेत. हिंदी, इंग्रजी, जर्मन आणि उर्दू अशा चार भाषांमध्ये ६ मार्च रोजी ‘टायगर्स’ प्रदर्शित केला जाणार आहे.
या आंतरराष्ट्रीय सिनेमाचे सर्वाधिक महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे २००१ साली गाजलेल्या आणि सवरेत्कृष्ट विदेशी ऑस्करचे पारितोषिक मिळविणाऱ्या ‘नो मॅन्स लॅण्ड’ या बोस्नियाच्या सिनेमाचे दिग्दर्शक डॅनिस टॅनोविक यांनी ‘टायगर्स’ या सिनेमाचे लेखन-दिग्दर्शन केले आहे.
युद्धनाटय़ स्वरूपाच्या गाजलेल्या ‘नो मॅन्स लॅण्ड’सारख्या चित्रपटाच्या दिग्दर्शकाच्या चित्रपटात इम्रान हाश्मीची प्रमुख भूमिकेसाठी निवड होणे ही आश्चर्यजनक बाब म्हणता येईल.
‘टायगर्स’ या सिनेमात इम्रान हाश्मी प्रथमच एका तरुण पाकिस्तानी नागरिकाच्या भूमिकेत दिसणार आहे.
अयान हा नुकताच लग्न झालेला पाकिस्तानी तरुण स्थानिक औषधांच्या विक्रीचे काम करीत असतो. त्याची बायको झैनाब त्याला एखाद्या बहुराष्ट्रीय औषध कंपनीत नोकरी मिळवायला प्रवृत्त करते. योगायोगाने लास्ता नावाच्या बहुराष्ट्रीय कंपनीत तो औषध विक्रेता म्हणून प्रवेश करतो. तिथे तान्ह्य़ा बाळांसाठी लागणारा बेबी फॉम्र्युला विकण्याचे काम स्वीकारतो. त्यायोगे बहुराष्ट्रीय कंपनीला पाकिस्तानात भरपूर नफा कमावून देण्याची जबाबदारी पेलण्यात अयान यशस्वी होतो आणि त्याचा चांगला मोबदलाही अयानला मिळत असतो. परंतु, एकदा त्याला बेबी फॉम्र्युलाचे विदारक सत्य समजते आणि त्याला धक्का बसतो. लहान बाळांच्या जीवाशी खेळ बनू शकणारा बेबी फॉम्र्युला तो विकतोय हे समजल्यानंतर तो बहुराष्ट्रीय कंपनीविरुद्ध लढा देतो. अयानचा बहुराष्ट्रीय कंपनीचे विदारक जीवघेणे गुपित लोकांसमोर उघड करण्याचा प्रयत्न डॉक्युमेंटरीच्या माध्यमातून चित्रित केला जात असतो. अयाना पाकिस्तानात रस्त्यावर उतरून बहुराष्ट्रीय कंपनीचे लागेबांधे असलेल्या लोकांच्या विरोधात लढतो.
हा सत्य घटनेवर आधारित सिनेमा असून टोरांटोमधील एका औषध विक्रेत्याचे काम करणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यात घडलेली गोष्ट आहे.
गीतांजली थापा हिने अयानची बायको झैनाबची भूमिका केली असून सुप्रिया पाठक अयानच्या आईची भूमिका साकारणार आहे.
सुनील नांदगावकर