एखादी गोष्ट सांगायला कितीतरी वाक्यं लागली असती, ते म्हणी चारपाच शब्दांमध्ये सांगून टाकतात. म्हणूनच त्यांना संचित ज्ञान गुटिका म्हटलं जातं. विशेष म्हणजे मराठी आणि इंग्रजीमध्ये अनेक म्हणी समानार्थी आहेत.
गंगूआजी हे आमच्या भागातील सर्वपरिचित व्यक्तिमत्त्व. मला आठवतंय तेव्हापासून ती धुण्या-भांडय़ाची कामं करते. पाठीची कमान झाली तरी तिची कामं चालूच आहेत. दोन घरची कामं झाली की मध्येच एखाद्या घरासमोर गंगूआजी विश्रांतीसाठी टेकते. घरमालकिणीशी पाच-दहा मिनिटं बोलून, पुढच्या कामाला निघते. या म्हातारीच्या तोंडून अस्सल मराठी म्हणी हमखास ऐकायला मिळतात. कुणीतरी म्हणतं, ‘‘आजे, आता या वयात कशाला दगदग करतेस? सुनेला घेत जा मदतीला.’’ तशी गंगूआजी म्हणते, ‘‘काय सांगायचं बाबा, तरण्याचं झालं कोळसं अन् म्हातारीला आलं बाळसं.’’
‘‘सुना कसल्या मदत करताहेत? हल्लीच्या पोरींना कामं कुठं जमताहेत? मी म्हातारी झाले तरी, मलाच काम करावी लागणार.’’ वगरे १० वाक्यांत जे बोलता आलं नसतं ते गंगूआजीनं एका म्हणीत सांगून टाकलं. म्हणूनच म्हणींना भाषेच्या ‘संचित-ज्ञान-गुटिका’ असं म्हटलं आहे. आज इंग्रजी भाषेतल्या काही म्हणी आपण अभ्यासासाठी घेतल्यात. बहुतेक English proverbs मराठीतल्या म्हणींशी मिळत्याजुळत्या आहेत.
१) आयुर्वेदानं आरोग्य-रक्षणासाठी आहार आणि जीवनशैलीवर जोर दिलाय. दिनचर्या-ऋतुचर्या याविषयी मार्गदर्शन केलंय. या दिनचय्रेची सुंदर झलक एका म्हणीत पाहायला मिळते. ‘लवकर निजे, लवकर उठे, तया ज्ञान, आरोग्य, संपत्ती भेटे।’ ही म्हण अगदी जशीच्या तशी इंग्रजीत आहे.
Early to bed and early to rise, makes a man healthy, wealthy and wise.
२) एखाद्याकडं वारंवार जाण्यानं आपली किंमत रहात नाही, अशा अर्थाची संस्कृतातून आलेली म्हण आहे- अतिपरिचयात् अवज्ञा. आंग्लभाषेतही याच अर्थाची म्हण आहे.
Familiarity breeds contempt- when one becomes used to someone or something, one’s respect degenerates into disregard.
३) मनाचा स्वभावच असा की जे आहे त्याचा कंटाळा येतो आणि जे नाही, त्याचं आकर्षण वाटतं, म्हणूनच प्रत्येक नवऱ्याला ‘शेजाऱ्याची बायको सुंदर’ दिसते. याच अर्थाची इंग्रजी म्हण आहे.
– said of people who believe that others benefit from greater advantages than they do.
४) ज्या गोष्टी स्वत: आचरणात आणू शकत नाही, त्यांचा उपदेश आपण इतरांना नेहमी करत असतो. मराठीत याला म्हणतात, ‘आपण सांगे लोकाला, शेंबुड आपल्या नाकाला!’ याच अर्थाची इंग्रजी म्हण आहे.
Physician, heal thyself
– before correcting or healing others, first make sure you are not suffering from the same problem yourself.
५) आपलं वैगुण्य लपवणं, प्रसंगी त्यासाठी दुसऱ्याला दोष देणं, हा मानवी स्वभावच आहे. मराठीत आपण म्हणतो, ‘नाचता येईना, अंगण वाकडं.’ अशीच म्हण इंग्रजीत आहे.
A bad workman blames his tools- वाईट कामगार आपल्या हत्यारांना दोष देतो.
६) जिथं धूर, तिथं आग असणारच या अर्थाची संस्कृतातून आलेली म्हण आहे यत्र धूम:, तत्र वन्ही:। हीच म्हण इंग्रजीत आहे.
There’s no smoke without fire
– rumours are not groundless, they have some truth in them.
खेडय़ातल्या शाळेचं स्नेहसंमेलन. गावातलेच एक कवी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत. पाहुण्यांची ओळख करून देण्यासाठी शिक्षक उभे राहिले. ‘‘विद्यार्थी मित्रहो, स्नेहसंमेलनासाठी शहरातल्या प्रख्यात लेखक महोदयांना आम्ही निमंत्रण दिलं. त्यांनी यायचं कबूलही केलं. पण आयत्यावेळी त्यांचं येणं रद्द झालं. आमच्यापुढं मोठ्ठं संकट उभं राहिलं. आता काय करायचं? शेवटी आम्ही आपल्या गावचे सुपुत्र असलेल्या कविरायांना गाठलं आणि म्हटलं, तुम्हीच अध्यक्ष व्हा. म्हटलेलंच आहे, ‘अडला हरी अन् गाढवाचे पाय धरी।’