नाश्ता आणि जेवण दोन्ही एकत्रच करणं याला इंग्रजीत ब्रंच म्हणतात. म्हणजे ब्रेकफास्ट आणि लंच. अशा दोन गोष्टी एकत्र करून वेगळा शब्द बनणं या प्रकाराला पॉटमॅन्टे असं म्हटलं जातं.
अलीकडे टीव्हीवर बॅगची जाहिरात पाहिली. व्यवसायानिमित्त दौऱ्यावर असणारा एक तरुण विमानातून उतरतो- फुलाफुलांचा शर्ट अणि अर्धी चड्डी घालून समुद्रकिनारी मौजमजेसाठी उधळतो- तिथं त्याला एक मना भेटते. तिच्याशी थोडी मौजमजा करतो- थोडय़ाच वेळात, सुटाबुटात मिटिंगसाठी हजर. पाहतो तर सागरतीरीची मनाही सुटाबुटात मीटिंगला आलेली. थोडक्यात काय तर मौजमजा आणि धंदापाणी या दोन्ही गोष्टी हा स्मार्ट पोऱ्या कसा काय सांभाळू शकतो? तर दोन स्वतंत्र कप्पे असलेल्या बॅगमुळे. (एक कप्पा ऑफिसचा आणि दुसरा खाजगी) ही जी two in one बॅग आहे तिला इंग्रजीत portmanteau म्हणतात.
portmanteau (पॉटमॅन्टे) – a large heavy suitcase that opens into two parts.
portmanteau word – a word that is invented by combining a beginning of one word and the end of another and keeping the meaning of each.
आज आपण इंग्रजीतल्या काही portmanteau words अर्थात एकात बसवलेल्या दोन शब्दांची ओळख करून घेऊ.
१) सामान्यत: लोक सकाळी नाष्ता करतात आणि दुपारी जेवतात. पण बँकवाले, शिक्षक वगरे मंडळी सकाळी दहा-साडेदहाला भाजी-पोळी खाऊन बाहेर पडतात. नाष्ता आणि जेवण यांच्या संयोगासाठी brunch हा शब्द वापरला जातो.
brunch (ब्रंच) = breakfast + lunch.
उदा. He takes heavy brunch at home and a sandwich at office in the afternoon.
२) आधुनिक जगात माहितीचा महापूर आलाय. आणि रंजक पद्धतीने माहिती पुरवणे, हे आवश्यक कौशल्य बनलंय. माहिती आणि रंजन यांच्या मेळासाठी infotainment हा शब्द वापरतात.
infotainment (इन्फोटेन्मेन्ट) = information + entertainment.
उदा. Organisers called it infotainment but it was useless information and cheap jokes.
३) पाìकगच्या समस्येमुळे गाडीवाले शहरातली हॉटेलं टाळतात आणि शहराबाहेरचा एखादा धाबा पसंत करतात. हॉटेल निवडताना पाìकगची सोय हा मुद्दा शहरात फार कळीचा बनला आहे. यातूनच motel शब्द आलाय.
motel (मोटेल) = motor + hotel.
उदा. You can choose any one from a dozen motels on the highway.
४) आपला शेजारी चीन जवळपास महासत्ता बनलाय आणि भारतही त्या दिशेने प्रगती करतोय. आशिया खंडातल्या या दोन ताकदींचा उल्लेख एकत्रितपणे Chindia असा केला जातो.
Chindia (चिंडिया) = China + India.
उदा. By 2030, Chindia will rule the economic world.
५) आमचे शिक्षक मित्र- त्यांचा विषय इंग्रजी. टेबलावर कायम २-४ डिक्शनऱ्या. शब्द अडला किंवा काही शंका आली की म्हणतात, ‘‘थांबा. मिस्टर Oxambridge यांचा सल्ला घेऊ.’’
Oxambridge (ऑक्सेंब्रिज्) = Oxford + Cambridge.
उदा. Don’t go on guessing meaning of a word. Consult Mr. Oxambridge.
६) कार्यशाळा, चर्चासत्रं, परिसंवाद, अभ्यासवर्ग वगरे गोष्टींचं सध्या पेव फुटलंय. स्त्री-प्रश्नांसंबंधीच्या अभ्यासवर्गासाठी feminar हा शब्द रूढ झालाय.
feminar (फेमिनार) = femina + seminar.
उदा. She is flying across the nation attending feminars.
एका मित्रानं या बुलेटीन्सना ‘व्होस्टर्कल’ असं नाव दिलंय. Vocabulary Study Circle चं पोटमॅन्टो रूप. Portmanteau मध्ये एकात दोन शब्द बसवलेले असतात. मित्रानं एक पाऊल पुढं टाकत vosturcle मध्ये एकात तीन शब्द बसवलेत.