आपलं नाव जगाच्या अंतापर्यंत टिकून रहावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. अनेकांचं तसं कर्तुत्वही असतं. अशाच काहीजणांचं नाव इंग्रजी भाषेत कोरलं गेलं आहे.
आम्ही आठवीत असताना, एक नवे शिक्षक आले. आपल्या विद्यार्थ्यांनी खूप मोठं व्हावं, असं त्यांना फार वाटायचं. त्यामुळे बहुतेकदा त्यांच्या भाषणाचा शेवट ‘कर्तृत्व गाजवा आणि इतिहासात नाव कोरून ठेवा’ किंवा ‘मागं नाव सोडून जा’ असा असायचा. गुरूजींच्या वक्तव्यातून स्फूर्ती घेऊन, काही मुलांनी कंपासपेटीतील हत्यारांनी बाकांवर आपली नावं कोरली. त्याहूनही तयारीचे काही होते. त्यांनी आपली नावं एखाद्या मुलीच्या नावात गुंफून, बदाम बाणांकित चिन्हासह, शाळेमागच्या िभतीवर कोरली.
आज आपण अशा काही व्यक्ती आणि वल्लींचा परिचय करून घेणार आहोत, ज्यांनी (अजाणताच) आपली नावं इंग्रजी भाषेत कोरून ठेवली आहेत. कोणतीही डिक्शनरी याची साक्ष देईल.
१) स्कॉटिश डॉक्टर बाउड्लर महाशयांनी १८१८ मध्ये ‘समग्र शेक्सपिअर’ची नवी आवृत्ती तयार केली. ‘कुटुंबासोबत एकत्र बसून वाचता येणार नाहीत’ असे शब्द आणि उद्गार त्यांनी पुस्तकातून काढून टाकले आणि चांगल्या उद्देशानं हे काम करणारे बाउड्लर, चेष्टेच्या सुरात वापरल्या जाणाऱ्या शब्दाच्या रूपाने डिक्शनरीत जाऊन बसले.
bowdlerize (बाउड्लराइझ्) – to remove the parts of a book, play, etc. that you think are likely to shock or offend people.
उदा. 1) When the film was shown on television, all the nude scenes were bowdlerized.
2) I got that book but it was a bowdlerized version.
२) ११६० साली फ्रेंच सनिकांची कवायत सुधारण्यासाठी मार्टिनेट यांची नेमणूक करण्यात आली. त्यांनी कडक शिस्त आणि कठोर नेमकेपणानं असं काही ड्रिल करवून घेतलं की पुढील काळात कठोर शिस्तीच्या सर्वच अधिकाऱ्यासाठी ‘मार्टिनेट’ हे विशेषण बनलं आणि यथावकाश शब्दार्थकोशात येऊन बसलं.
martinet (मार्टिनेट्) – a very strict person who demands that other people obey orders or rules completely.
उदा.
1) He was a strict teacher of English and a martinet where grammar and spelling were concerned.
2) Students called him, not head master but head martinet.
३) मिस्टर मॅव्हरिक हे वेगळंच रसायन होतं. ‘प्रत्येकानं आपापल्या गुराढोरांवर ओळखीच्या खुणा केलेल्या असतात, तेव्हा बिनखुणांची असतील ती गुरं माझी’ असा अपारंपारिक विचार करून मॅव्हरिकने आपल्या गुरांना ब्रॅण्डिग केलं नाही. त्यांच्या या हटके विचार-आचारामुळेच त्यांचं नाव डिक्शनरीत नोंदलं गेलंय.
maverick (मॅव्हरिक्) – ंperson who does not behave or think like everyone else, but who has independent, unusual opinions.
उदा. 1) He is regarded as a maverick film director.
2) In the advertising field being maverick is not much a maverick.
४) सिलुएत् हे फ्रान्सच्या राजाचे वित्तमंत्री. आíथक संकटाच्या पाश्र्वभूमीवर त्यांनी खर्च कपातीचं धोरण अवलंबलं. पण त्यामुळे स्वस्तात बनवलेल्या वस्तूंशी त्यांचं नाव जोडलं गेलं. पेंटिंगऐवजी केवळ बारेषांनी काढलेलं आणि काळ्या रंगानं भरलेलं चित्र नक्कीच स्वस्त पडतं. या प्रकारची चित्रं सिलुएत् या नावानंच ओळखली जाऊ लागली.
silhouette (सिलुएत्) – a dark shape seen against a light background
उदा. 1) The bare branches of the tree formed silhouettes against the winter sky.
2) In the old Hindi movies, kissing scenes were typically in silhouettes.
एकदा पु. लं. पर्वतीवर फिरायला गेले. जागा मिळेल तिथे, भेट देणाऱ्यांनी आपली नावं खडू, कोळसा, दगड यांनी कोरली होती. पुलंनी एक खडूचा तुकडा मिळवला आणि कामाला लागले. प्रत्येक नावाखाली ‘कालच वारले’, ‘देवाज्ञा झाली’, ‘दुखद देहावसन’ असं लिहून टाकलं. (तेव्हापासून नाव सोडून जाण्याचं प्रमाण थोडं कमी आहे म्हणे.)