इंग्रजी ही आता केवळ ब्रिटिशांची भाषा राहिलेली नाही, भारतात तर तिला भारतीय भाषांच्या बरोबरीचे स्थान मिळाले आहे. एवढंच नाही तर भारतीय संदर्भ घेऊन इंग्रजीत काही शब्द नव्यानेही तयार झाले आहेत.

भारताने जगाला काय दिले? असा प्रश्न उपस्थित केल्यास भारतीय संस्कृतीचे अभिमानी शून्यापासून-बुद्धिबळापर्यंत, उपनिषदांपासून-विमानविद्य्ोपर्यंत आणि अजंठा-वेरूळपासून-आयुर्वेदापर्यंत लांबलचक यादी सादर करतील. जगातल्या प्रत्येक गोष्टीचं मूळ भारतीय संस्कृतीतच आहे, असं मानणाराही एक मोठा वर्ग आहे.
परवा एक मित्र म्हणाला, ‘‘शेक्सपिअर हासुद्धा भारतीयच. मूळचा केरळी ब्राह्मण. इंग्लंडला जाऊन इंग्रजी शिकला अन् नाटकं लिहून प्रसिद्ध झाला. त्याचं खरं नाव-शेष-कपि-अय्यर.’’ आता बोला !
गमतीचा भाग सोडून आज आपण भारताने इंग्रजी भाषेला दिलेल्या काही शब्दांची ओळख करून घेऊया.
grass widow (ग्रास विडो) – woman who does not live with her husband or whose husband is away from home for long period of time. (भारतावर इंग्रजांची सत्ता होती तेव्हा अनेक इंग्रजी प्रशासक, सन्याधिकाऱ्यांनी आपल्या बायका-मुलांनाही सोबत आणलं. भारतातल्या उष्ण हवामानाचा त्यांना त्रास व्हायचा. त्यावर उपाय म्हणून उन्हाळ्याच्या दिवसात कुटुंबीयांना ते थंड हवेच्या ठिकाणी पाठवायचे आणि त्याचा उल्लेख विनोदानं, ह्लक “I have sent my wife to grasses” असा करायचे. त्यातूनच grass widow म्हणजे नवऱ्यापासून दूर राहणारी स्त्री असा शब्द आला. grass widow म्हणजे सधविधवा [सधवा असून विधवा])
Bangalored (बेंगलोर्ड) – It refers to people who have been laid off from multinational companies because their jobs have been moved to India.
(कॉम्प्युटरच्या जमान्यात अमेरिकन कंपन्यांना भारतात काम पाठवून ते करून घेणं, खूप स्वस्त पडतं. अशी outsourcing ची कामं करणाऱ्यातलं बेंगलोर हे प्रमुख शहर. त्यामुळे बेंगलोरला काम जाणे याचा अर्थ अमेरिकन लोकांना डच्चू. (They are Bangalored.) आता या outsourcing विरुद्ध अमेरिकेत असंतोष प्रकट व्हायला लागलाय. ‘Don’t get Bangalored’ असा संदेश छापलेले टी-शर्ट्स एका इंटरनेट साइटवर विक्रीसाठी उपलब्ध आहेत.)
juggernaut (जगरनॉट) – a large or powerful force that can’t be controlled.
(हा आहे जगन्नाथ. पुरीच्या जगन्नाथाचा रथ हजारो लोक ओढतात. एका ब्रिटिश माणसानं पहिल्यांदा जेव्हा ही यात्रा पाहिली तेव्हा त्यातला अदम्य जोर त्याला जाणवला. आणि जगन्नाथाचा अपभ्रंश होऊन juggernaut बनला. वृत्तपत्रात हा शब्द सर्रास वापरलेला असतो.
उदा. The opposition tried hard to stop it, but the Modi juggernaut crushed them all 
pariah (पराईअ) – a person who is not acceptable to society and is avoided by everyone ; outcast. (तामीळ भाषेतल्या परैयन (ढोलवादक) या मागास जातीच्या नावावरून हा शब्द आलाय.)
उदा. The local community treated the African guest as a pariah. 
dekko (डेको) – have a dekko – to look.
उदा. Come and have a dekko at this beautiful sunset. (dekko म्हणजे देखो !)
* * *
आमचे प्राध्यापक मित्र पत्नी- मुलांसह वर्तमान कोल्हापूर मुक्कामी सुखाने निवास करत होते, पण नोकरीवर खूश नव्हते. मनाजोगी संधी लाभताच बेंगलोरला रवाना झाले. मित्रपत्नी grass widow बनून कोल्हापुरीच राहिली. साता-आठ महिन्यांत प्राध्यापक बेंगलोरी रुळले. कन्नड बोलू लागले आणि एक दिवस मित्रपत्नीचा फोन आला, ‘‘मुलांना घेऊन मीही बेंगलोरला निघाले’’. या घटनेचं मी वर्णन केलं. ‘Grass widow Bangalored !’ सधविधवा बेंगलोर शहरी गेली, हा एक अर्थ. आणि नवऱ्याकडेच गेली म्हणजे ‘विरह कंठणं’ हे सधविधवेचं मुख्य कामच तिच्याकडून काढून घेतलं गेलं, या दुसऱ्या अर्थानेही Grass widow Bangalored !

Story img Loader