सर करायचा होता एव्हरेस्ट बेस कॅम्प आणि नजरेला पडले ते भूकंपामुळे कोसळत येणारे समोरच्या बर्फाच्छादित पर्वतांचे कडे. मृत्यूशी थेट सामना करून नेपाळहून परतलेल्या ट्रेकर्सचा आँखो देखा हाल-
तो दिवस ३० एप्रिल २०१५! रात्री आठच्या सुमारास भारतीय वायू सेनेच्या कार्गो विमानाने काठमांडू विमानतळावरून उड्डाण केले आणि आम्हा उभयतांप्रमाणेच भारतात परतणाऱ्या अन्य भारतीय नागरिकांचा जीव भांडय़ात (खरं तर विमानातच) पडला. काठमांडू ते दिल्ली या साधारणत: दोन ते अडीच तासांच्या प्रवासात, गेल्या दहा-बारा दिवसांतील सर्व घटनांची एक मालिकाच जणू एखाद्या चित्रपटाप्रमाणे डोळ्यासमोर तरळून गेली. यात उत्साह होता, साहस होते, संकटांची मालिका होती, अन मृत्यूच्या चाहुलीचा थरारही होता. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे दहा-बारा दिवसांच्या आमच्या नाटय़मय अन् थरारक मोहिमेचाही शेवट सुखद होत होता, तो केवळ भारतीय वायू सेनेच्या अतुलनीय कामगिरीमुळेच.
‘ईबीसी-एव्हरेस्ट बेस कॅम्प’ (१७५७५ फूट) आणि ‘काला पत्थर (१८१९२ फूट) सह ‘माऊंट लोबुचे (२०२०० फूट) एक्स्पिडीशन’ ही आम्हा उभयतांची (मी आणि माझे पती शरद कुलकर्णी) मोहीम म्हणजे, मार्च २०१६ साठी प्लॅन केलेल्या ‘माऊंट एव्हरेस्ट एक्स्पिडीशन’ (२८८४८ फूट) तसेच त्याचबरोबर करत असलेल्या ‘मिशन सेवन समिट्स’च्या मोहिमेच्या पूर्वतयारीचा एक टप्पा होता.
१७ एप्रिल २०१५ रोजी लुक्ला येथून निघून, लुक्ला-फाकडिंग-नामचे बझार-डेबोचे-डिंगबोचे-लोबुचे असा प्रवास करत २४ तारखेला सकाळी लोबुचेहून गोरक्षेपकडे प्रयाण केले. खरं तर आमच्या पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार गोरक्षेपला पोहोचल्यावर त्या दिवशी आराम करून दुसऱ्या दिवशी ईबीसीला जायचे होते. परंतु लोबुचेहून निघतानाच आम्ही तो प्लॅन बदलून गोरक्षेपला पोहोचताच फ्रेश होऊन इबीसीला जायचे ठरवले होते. त्यानुसार ईबीसीकडे निघालो. वातावरण तसे कुंदच होते. गोरक्षेप ते ईबीसीच्या रस्त्यावर फार क्वचितच एखादा ट्रेकर अथवा पोर्टर दिसत होता. त्यामुळे वाट फारच सुनसान वाटत होती. ईबीसीला मात्र देश-विदेशीच्या अनेक क्लाइंबर्सच्या तंबूचे जणू काही एखादे गावच वसले होते. आमच्या मित्र परिवारातील एव्हरेस्ट मोहिमेवर असलेल्या चार-पाच मित्रांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. परंतु ते कॅम्प टू ला गेलेले असल्यामुळे त्यांची भेट होऊ शकली नाही. गोरक्षेपच्या परतीच्या मार्गाला लागलो. तोपर्यंत स्नोफॉल सुरू झाला होता. रात्री उशिरापर्यंत चालू असलेल्या या प्रचंड स्नोफॉलमुळे तर काला पत्थरचे रूपांतर शुभ्रधवल पत्थरमध्ये झाले होते.
दुसऱ्या दिवशी पहाटे सूर्योदयाच्या वेळी काला पत्थरवरून एव्हरेस्टचे विलोभनीय दर्शन घ्यायचे, या हेतूने आम्ही उभयता पहाटे तीन वाजताच उठून गाईडसह काला पत्थरच्या दिशेने मार्गस्थ झालो. सूर्योदयाच्या आत पोहोचूनही अतिशय खराब वातावरणामुळे काला पत्थरवरून ना सूर्याचे दर्शन झाले ना एव्हरेस्टचे. गोरक्षेपला पोहोचल्यावर फ्रेश होऊन लगेच लोबुचे बेसकॅम्पकडे निघायचे ठरले होते. परंतु नियतीच्या मनात काही निराळेच होते. आणि म्हणूनच कदाचित, कितीही लांब पल्ल्याचा ट्रेक असला तरी कधीही न थकणारी मी त्या दिवशी मात्र गोरक्षेपहून काला पत्थरला पोहोचेपर्यंत प्रचंड थकले होते. लोबुचेपर्यंत जायची ताकद नव्हती. डोळे आपोआप झाकत होते. पायातही गोळे येत होते. प्रचंड अशक्तपणा जाणवत होता. म्हणून मी शरदला म्हटले, आज आपण गोरक्षेपलाच राहू या आणि उद्या पहाटे लवकर उठून लोबुचे बेस कॅम्पला जाऊ. हो-नाही करता करता शेवटी असा एक प्रश्न समोर आला की लोबुचे बेस कॅम्पला आमचे टेंट्स लावून इतर सर्व व्यवस्था करायला पुढे गेलेल्या गाइडला निरोप कसा द्यायचा? कारण फोनला अजिबात रेंज नव्हती. आजच लोबुचे बेसकॅम्पला पोहोचलो तर उद्याचा संपूर्ण दिवस आराम मिळेल या आशेने गोरक्षेपला बाय बाय करून आम्ही निघालो.
गोरक्षेपहून निघाल्यावर पहिलाच मोठ्ठा चढ चढून गेल्यावर अचानक मला चक्कर आल्यासारखे वाटायला लागले. माझे पाय हेलपाटायला लागले. मला चक्कर येत आहे असे शरदला सांगायला मी मागे वळले तर शरददेखील हेलपाटत होता. त्यालादेखील चक्कर येत होती. अन् एवढय़ात जाणवले की आम्हा दोघांना चक्कर येत नव्हती तर ज्या डोंगरावरून आम्ही चालत होतो तो डोंगरच गदागदा हलत होता. आता मात्र आमचे धाबेच दणाणले होते. एकमेकांचा आधार घेत आम्ही आहे त्याच परिस्थितीत बर्फातच बसकण मारली अन् क्षणार्धात कानठळ्या बसतील असा अतिप्रचंड स्फोटाचा आवाज आला. नकळतपणे आवाजाच्या दिशेला म्हणजेच ईबीसीच्या समोरील बाजूस बघितले तर समोर बर्फाचे महाकाय कडेच्या कडे कोसळत होते. ते दृश्य बघून आम्ही देखील बर्फागत पुतळेच झालो होतो. एकमेकांच्या धरलेल्या हातातून केवळ स्पर्शाने दोघांच्या मनाची अवस्था एकमेकांना कळत होती. कितीतरी वेळ आम्ही त्याच अवस्थेत बसलो होतो. जेव्हा भानावर आलो तेव्हा लक्षात आले की काही वेळापूर्वी आपण याची देही याची डोळा जे महाप्रचंड हिमप्रपात बघितले त्याच्याच धक्क्याने आपण चालत असलेला डोंगरही गदागदा हलत होता.
या धक्क्यातून सावरताच, अंगावरील बर्फ झटकत आम्ही एकमेकांना आधार देत धडपडत उठलो. शक्य तेवढय़ा लवकर लोबुचे गाठायचे ठरवून चालण्याचा वेग वाढवायचा प्रयत्न केला. आता शरीराला स्वत:कडे बघण्याची फुरसदच नव्हती. लोबुचेला पोहोचल्यावर मानसिक दिलासा मिळेल या आशेवर, शीघ्र वेगाने तेथे पोहोचताच जे दृश्य बघितले आणि ज्या बातम्या ऐकल्या त्यामुळे तर आम्ही पुरते हादरूनच गेलो. या दृश्यांचा आणि बातम्यांचा धक्का तर सकाळच्या अॅवलॉचपेक्षाही कैक पटीने मोठा होता. लोबुचे गावामध्ये सर्व घरांची आणि हॉटेलांची पडझड झाली होती. तिथे आल्यावरच आम्हाला समजले की काही तासांपूर्वी आपण जे अवेलांच बघितले ते अॅव्हलॉच नव्हता तर अवघ्या नेपाळला हादरवून टाकणाऱ्या महाप्रलयंकारी भूकंपाच्या धक्क्याने झालेले ते लॅण्डस्लाइड होते.
रेडिओ चालू असल्यामुळे स्थानिक लोकांकडून विविध ठिकाणांच्या विनाशाच्या बातम्या कळत होत्या. एव्हरेस्टसह ईबीसी अन् गोरक्षेपलाही झालेल्या वाताहतीची बातमी ऐकल्यावर तर अंगाचा थरकापच झाला होता. केवळ नशिबानेच आपण कोणत्या दिव्यातून सहीसलामत सुखरूपपणे बाहेर पडलो होतो याची कल्पना आली. सकाळी काला पत्थरहून परत आल्यावर गोरक्षेपला न राहता तेथून बाहेर पडण्याची तीव्र सूचना दिल्याबद्दल शरीराने अंतर्मनाचे मन:पूर्वक आभार मानले.
नशिबाची साथ जोरदार होती. ज्या हॉटेलमध्ये आम्ही आधी मुक्काम केला होता त्या हॉटेलची फारशी पडझड झाली नव्हती. परंतु आफ्टरशॉक्सच्या भीतीने सर्व लोक कोणत्याही क्षणी बाहेर पळायच्या पवित्र्यात डायनिंग रूममध्येच बसले होते. मोबाइलला रेंज नसल्यामुळे आम्ही सुखरूप असल्याची बातमी घरी कशी कळवावी, या विचारात असतानाच संध्याकाळी सहाच्या सुमारास अचानकपणे वायफायला रेंज आली. ताबडतोब शंतनुला (आमच्या मुलाला) वायबरवरून फोन केला. आम्ही सुखरूप असल्याची बातमी आमच्याच तोंडून ऐकल्यावर झालेला त्याच्या डोळ्यांत आलेले अत्यानंदाचे अश्रू मला फोनमधूनही दिसत होते.
या महाप्रलयंकारी भूकंपामुळे सर्वत्र हाहाकार माजला होता. आम्हालाही आमची पुढची लोबुचे एक्स्पिडीशन अर्धवट सोडून परतीचा मार्ग धरावा लागला होता. गाइडबरोबर चर्चा करून दुसऱ्या दिवशी पहाटे लवकर निघून पूर्वनियोजित प्लॅनप्रमाणे फेरीचेला न थांबता डेबुचेपर्यंतचा पल्ला गाठायचा ठरवले.
दुसऱ्या दिवशी २६ तारखेला पहाटे लवकर आवरून लोबुचेहून निघालो. डेबोचेच्या रस्त्यावरील फेरीचे येथे पोहोचताच समोर दिसला तो ‘टेंपररी रेस्क्यु कॅम्प.’ एव्हरेस्ट आणि इबीसी येथील जखमींना हेलिकॉप्टरने येथे आणले जात होते आणि अत्यावश्यक प्राथमिक उपचार देऊन दुसऱ्या हेलिकॉप्टरने लुक्ला येथे पाठवले जात होते. जखमी लोकांच्या त्या अवस्था बघून आम्ही उभयतांनी आम्हाला शक्य होईल तेवढी मदत करायचे ठरवले. तेथील इन्चार्ज डॉक्टरांना भेटून आम्ही दोघांनी मदतीला सुरुवात केली. ईबीसी येथून हेलिकॉप्टरने आणलेल्या जखमींना उचलून कॅम्पमध्ये आणायचे आणि प्रथमोपचार केलेल्या जखमींना उचलून हेलिकॉप्टरमध्ये नेण्यास मदत करण्याचे काम आम्हाला दिले गेले.
१४ हजार फुटांपेक्षा जास्त अल्टीटय़ुड असलेल्या ठिकाणी नुसते पळायलादेखील आपल्याला कठीण जाते. आणि इथे तर हेलिकॉप्टरमधून आणलेल्या जखमी व्यक्तीला पाच-सहा जणांनी उचलून अंदाजे ३००-४०० मीटर धावत धावत कॅम्पमध्ये न्यायचे व लगेच दुसऱ्या प्रथमोपचार केलेल्या जखमी व्यक्तीला हेलिकॉप्टरमध्ये नेऊन ठेवण्यासाठी आम्ही पळत होतो. त्यामुळे दम लागत होता. पाच-सहा राऊंडस्मध्येच पाय भरून आले होते. तेथील डॉक्टरांच्या ते लक्षात आल्यामुळे त्यांनी आम्हाला कॅम्पमध्ये येऊन मदत करायला सांगितली. तेथे ३०-४० जखमी व्यक्ती जमिनीवर व्हिवळत पडल्या होत्या. त्यांच्यावर प्रथमोपचार चालू होते. सर्व जखमींची शारीरिक आणि मानसिकही अवस्था फारच कठीण होती. अशा जखमींना मानसिक आधार देण्यास आम्हाला सांगण्यात आले.
मला ज्या जखमी व्यक्तीकडे पाठवले ती व्यक्ती आजही माझ्या डोळ्यांसमोरून जात नाही. त्याला एका खुर्चीवर बसवण्यात आले होते. त्याच्या उजव्या कानाच्या वरच्या बाजूपासून कपाळाच्या मध्यापर्यंत डोके फाटले होते आणि विना अॅनेस्थेशिया, टाके घालण्याचे काम चालू होते. ते दृश्य बघूनच माझ्या अंगाचा थरकाप झाला होता. तरी देखील त्याला हिम्मत देण्यासाठी मी झटकन पुढे सरसावले. त्याला हिम्मत देण्यासाठी त्याचे रक्ताळलेले दोन्ही हात हातात घेतले. तो कोणत्या देशाचा होता, ते माहीत नाही, त्याची भाषा कोणती ते माहीत नाही. पण केवळ स्पर्शातून दिलेला दिलासा त्यालाही समजला होता. टाके घालण्याचे काम पूर्ण होईपर्यंत तो माझे हात घट्ट धरून अस्पष्टपणे केवळ ‘सिस्टर सिस्टर’ असे म्हणत होता. त्याला होणाऱ्या प्रचंड वेदना बघून माझ्या डोळ्यांत येणाऱ्या अश्रूंना मी मोठय़ा कष्टाने रोखले होते अन् उसन्या हसतमुखाने त्याला दिलासा देत होते. त्याचे प्रथमोपचार झाल्यावर त्याला लुक्लाला पाठवण्यासाठी हेलिकॉप्टरमध्ये नेताना पुन्हा एकदा माझा हात हातात घेऊन ‘बाय सिस्टर, गॉड ब्लेस यू’ एवढे शब्द फार मोठय़ा कष्टाने बोलला होता. आजही त्याचा तो अस्पष्टपणे पण कृतज्ञ नजरेने ‘बाय सिस्टर, गॉड ब्लेस यू’ म्हणणारा चेहरा डोळ्यांसमोर दिसतो. मी त्याला कधीही विसरू शकणार नाही.
फेरीचे गावातील सर्वच घरांची आणि हॉटेलांची मोठय़ा प्रमाणावर पडझड झालेली होती. त्यामुळे तेथे मुक्काम करणे शक्य नव्हते. जवळपास तीन-साडेतीन तास मदतकार्य करून आम्ही डेबोचेकडे निघालो. निघताना आमच्याजवळ असलेले मेडिकल किट तेथील डॉक्टरांच्या हवाली केले. डेबोचेच्या रस्त्याला लागल्यावर जाणवले की आता काही का होईना पण पोटात अन्न जाण्याची गरज आहे. अशा वेळी रस्त्यातील एका छोटय़ाशा गावामध्ये एका ठिकाणी मिळालेल्या दाल राईसने तृप्त झालेल्या आमच्या अंतरात्म्याने त्या अन्नदात्याला मन:पूर्वक खूप खूप धन्यवाद अन् शुभेच्छा दिल्या. डेबोचेला पोहोचेपर्यंत तीन वाजून गेले होते. भूकंपाच्या धक्कय़ाने तेथील एकही हॉटेल वाचले नव्हते. त्यामुळे तेथून टेंगबोचेकडे कूच करण्याशिवाय पर्याय नव्हता. टेंगबोचेला आल्यावर तेथील परिस्थिती काही निराळी दिसली नाही. तेथील मोनेस्ट्रीचीदेखील पडझड झाली होती. त्यामुळे मोनेस्ट्रीच्या व्हरांडय़ात राहण्याचा विचारही सोडून द्यावा लागला. प्रचंड थंडीमुळे रस्त्यावर राहणेही शक्य नव्हते. गाइडला आशा वाटत होती की टेंगबोचेहून खाली उतरून पुंगीटन्गा गावात आल्यावर कुठे न कुठे नक्कीच आसरा मिळेल. कमीत कमी वनविभागाच्या आवारात तरी नक्कीच मिळेल. पण पुंगीटन्गापर्यंत प्रचंड उतार उतरून आल्यावर चेकपोस्टही रिकामेच आढळले. पुंगीटन्गातील जी पाच-दहा घरे होती त्यांना देखील कुलुपं लावलेली होती. आता नामचे बझारला जाण्याशिवाय पर्याय उरला नव्हता. पण त्याआधी पोटात थोडेतरी इंधन घालणे जरुरी होते. एका झऱ्याजवळ बसकण मारली आणि जवळ असलेल्या चिवडा, शेंगदाणे, बाकरवडय़ा, चीज सर्व खाऊ काढला. गाइड, पोर्टर आणि उभयता असे सर्वानी मिळून खाऊ खाल्ला. पोटभर पाणी प्यालो. पुंगीटन्गा ते नामचे बझार या पूर्णपणे चढाच्या रस्त्यावर गरज भासणाऱ्या हेडटॉर्च काढून ठेवल्या. अंधाराबरोबरच थंडीचा कडाकाही वाढत होता. नामाचेबझारला राहण्याची सोय करण्यासाठी गाइड पुढे गेला. पोर्टर मात्र आमच्याबरोबर चालत होता.
लोबुचेहून सकाळी चालायला सुरुवात केल्यापासून बारा तास उलटून गेले होते. आता मात्र शरीर आणि त्याहीपेक्षा मन थकायला लागले होते. अशा अवस्थेतच कसे तरी खुम्जुम या गावापर्यंत पोहोचलो, तोपर्यंत पाऊसही सुरू झाला होता. या छोटय़ाशा गावात रस्त्याला लागूनच उजव्या बाजूला पाच-सहा घरे आणि डाव्या बाजूला डोंगरावरच्या उतारावर पठार होते. घरातील लोकांनी या पठारावर चार मोठे बांबू बांधून वर प्लास्टिकची ताडपत्री बांधली होती. या ताडपत्रीच्या आसऱ्याला घरातील लोकांव्यातिरिक्त आमच्यासारखे ३०-४० विदेशी गिर्यारोहक पण थांबले होते. तेथेच एका कोपऱ्यावर शेगडीवर नुडल्स बनवून सगळ्यांना दिल्या जात होत्या. आमच्या पोर्टरने नेपाळी भाषेत हॉटेल मालकीणीकडे चौकशी केली असता समजले की, नामचे बझार ७० टक्के पेक्षा नामशेष झाले आहे. तेथे राहणे अधिक धोकादायक आहे. अशा अवस्थेत आम्ही नामचे बझारला जाण्याची रिस्क न घेता तेथेच ताडपत्रीखाली राहण्याची परवानगी मागितली. तिनेही मोठय़ा उदार मनाने जागा नसतानाही केवळ माणुसकीच्या नात्याने, झोपायला केवळ अंथरूण मिळेल, पांघरूण नाही या बोलीवर परवानगी दिली. पडत्या फळाची आज्ञा घेऊन आम्ही तात्काळ ताडपत्रीखाली शिरलो.
तापमानाचा पारा कधीच मायनसकडे झुकला होता. स्लीपिंग बॅग पुरेशी होईना. मग डफल बॅगमधील समिट जॅकेट, ग्लोव्ह््ज इ. सगळे बाहेर आले तेव्हा कुठे थंडीमुळे होणारी थरथर कमी झाली. तोच १५ ते २० मिनिटांत पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का बसला. पुन्हा सगळ्यांची पळापळ आरडाओरडा, मग देवाचा धावा, जप करत पुन्हा एकदा आडवे होणे, असे चक्रच सुरू झाले. खरे तर आम्ही सगळेजण मोकळ्या पठारावरच होतो. डोक्यावर फक्त ताडपत्रीचा आसरा होता. पळून जाणार तरी कुठे? जास्तीत जास्त काय होईल? आपण जमिनीत गाडले जाऊ, मग पळायचे तरी कशासाठी? असा विचार करून आम्ही उभयतांनी ठरवले की आता भूकंप झाला तरी उठायचे नाही की पळायचे नाही. कारण शरीराला कमीत कमी तीन-चार तासांच्या तरी विश्रांतीची गरज होती. कारण दुसऱ्या दिवशी खुम्जुम ते लुक्ला असा जवळ जवळ दहा-बारा तासांचा टप्पा पार पाडायचा होता. पहाटेपर्यंत भूकंपाचे धक्के घेत आम्ही स्लीपिंग बॅगमध्ये पडून राहिलो. पहाटे लवकर उठून नामचे बझारच्या रस्त्याला लागलो.
रस्त्यांमध्ये ठिकठिकाणी लॅण्डस्लाईड्स झाले होते. त्यातून कसाबसा मार्ग काढत नामचे बझारला पोहोचलो. कायम चहलपहल असलेल्या या गावाची पार रयाच गेली होती. ठिकठिकाणी प्रचंड पडझड झालेली होती. रस्त्यांवर घरांच्या कोसळलेल्या भिंतींच्या दगडांचे ढिगारे पडले होते. त्यामधूनच मार्ग काढावा लागत होता. नामचे बझारचे ते स्वरूप बघून डोळ्यांत पाणी आले. तेवढयात समोरून आमचा गाइड आला. आम्हाला सुखरूप बघून त्याला अत्यानंद झाला होता. तो रात्रभर इतर शेर्पाबरोबर रस्त्यावरच झोपला होता. रात्री त्याला जेवणपण मिळाले नव्हते. आमच्या जवळ जे होते ते आधी त्याला खायला लावले. आणि मग लुक्लाकडे कूच केले.
नामचे बझार ते फाकडिंगपर्यंत प्रचंड उतार. त्यामुळे गुडघे दुखायला लागले होते. त्यामुळे फाकडिंगला जेवण करून थोडा वेळ आराम करायचे ठरवले. पण जेवण झाल्यावर चैन पडेना. डोळ्यांसमोर फाकडिंग ते लुक्लाचा चढ दिसत होता. इथे आराम करण्यापेक्षा लवकरात लवकर लुक्लाला पोहोचणे महत्त्वाचे होते. मग काय, निघालो लगेच! आज लुक्लाला पोहोचल्यावर उद्या सकाळी उठून चालायला लागणार नाही या आशेवर मजल दर मजल करीत शेवटी लुक्लाला पोहोचलो. गाइडने पुढे जाऊन टेंट तयारच ठेवला होता. नंतर जेवण झाल्यावर टेंटमध्ये अक्षरश: कसेबसे ढकलले आणि कधी आडवे झालो ते कळले पण नाही. दुसऱ्या दिवशी पहाटेच जाग आली. रात्रभर बाहेर पाऊस पडलेलादेखील कळले नाही. लुक्लाला पोहोचेपर्यंत रस्त्यात ज्या ज्या ठिकाणी वाय-फाय मिळेल तेथून शंतनूला आम्ही सुखरूप असल्याचा निरोप देत होतो.
आम्ही लुक्लापर्यंत आलो खरे. पण इथून कधी बाहेर पडू हे सांगणं कठीण होतं. लुक्लामध्ये परतणाऱ्या गिर्यारोहकांची गर्दी दिवसागणिक वाढत होती. अन् लुक्लापासून काठमांडूला जाण्यासाठी एकमेव पर्याय असलेली १८ ते २० सीटर विमाने भूकंपानंतर दोन दिवस बंदच होती. नंतर खराब हवामानामुळे काठमांडूपासून ही विमाने येण्याची शाश्वती नव्हती. आणि आलेल्या विमानात आपला नंबर लागेल याची खात्री नव्हती. कारण तिकिटांचा काळाबझार सुरू झाला होता. डॉलरच्या तुलनेत रुपया फिका पडत होता. भूकंपामुळे झालेल्या प्रतिकूल परिस्थितीमुळे नव्हे तर भारतीयांना (रुपयाला) दिल्या जाणाऱ्या दुज्याभावामुळे मन विषण्ण होत होते.
येणारा प्रत्येक दिवस निराशा वाढवत होता. रोज सकाळी आपल्याला तिकीट मिळेल या आशेवर एअरपोर्टवर येऊन बसायचे, याच्या त्याच्यासमोर दीनवाणे होऊन, हात जोडून तिकिटाची अपेक्षा करायची. पण पुन्हा पुन्हा नकारघंटा वाजली जायची.
३० तारखेच्या सकाळी लुक्लाच्या विमानतळावर रोजच्यासारखा पुन्हा एकदा दुजाभावाचा अनुभव घेतल्यावर आम्ही उभयता हा सर्व प्रकार सोशल मीडियाद्वारे आपल्या सरकारला कळवायच्या विचारात असतानाच, अचानक नेहमीच्या हेलिकॉप्टरच्या तुलनेने काहीसा मोठ्ठा आवाज कानी आला. आवाजाच्या दिशेने धाव घेताच समोर दिसले ते भारतीय वायुसेनेचे हेलिकॉप्टर! ते बघताच डोळ्यांत आनंदाश्रूच आले. सुटकेच्या आशा पल्लवित झाल्या.
भारतीय वायू सेनेच्या लोकांनी एकामागोमाग एक अशा अनेक फेऱ्या करत अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने अन् त्वरेने सर्वप्रथम महिला, त्यानंतर जेष्ठ नागरिक आणि सर्वात शेवटी युवा वर्ग अशी सर्वाची सुटका केली. सर्वाना काठमांडूला आणण्यात आले. काठमांडूला विमानतळावरच एका प्रशस्त हिरवळीवर सर्वाना मोठय़ा जेवण देण्यात आले. त्यानंतर साधारणपणे दोन-तीन तासांतच भारतीय वायू सेनेच्या कागरे विमानाने दिल्लीला आणण्यात आले. या विमानात नेपाळच्या इतर ठिकाणांहूनदेखील रेस्क्यू केलेले कित्येक भारतीय नागरिक होते. तसेच जखमी झालेले काही नेपाळी वा विदेशी नागरिकही होते. या सर्वाकडेच विमानात सारख्याच आपुलकीने लक्ष दिले जात होते. दिल्ली एअरपोर्टवर उतरताना बसलेल्या जोरदार धक्क्य़ाबरोबर घटनांची ही मालिका वर्तमानात आली.
दिल्ली विमानतळावर आमच्या स्वागतासाठी महाराष्ट्र सदनचे कर्मचारी हजरच होते. विमानतळावरून महाराष्ट्र सदनमध्ये जाण्याआधीच सर्वाची मुंबई, पुणे ठिकाणची तिकिटे प्रिपोन (विनाशुल्क) करून देण्यास त्यांनी सर्वाना मदत केली. महाराष्ट्र सदनमध्ये पोहोचेपर्यंत रात्रीचे जवळ जवळ बारा वाजले होते. फ्रेश व्हायच्या आत गरमागरम जेवणाची ताटे तयारच होती. अगदी प्रत्येकालाच व्यक्तिगत आग्रहाने वाढले जात होते. या अगत्याने अगदी स्वत:च्या घरी येण्याआधीच स्वगृही पोहोचल्यासारखे वाटत होते.
भारतीय वायू सेनेच्या आणि महाराष्ट्र सदनच्या संबंधित अधिकाऱ्याकडे, आम्हाला मिळालेल्या या उत्तम सेवेच्या पोचपावतीचे मेल्स आधीच पाठवले आहेत. शक्य त्यांचे व्यक्तिगतरीत्या फोन करूनही आभार मानले आहेत. तरी देखील नेपाळमधून रेस्क्यू केलेल्या माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने मी या लेखांद्वारे पुन्हा एकदा ‘भारतीय वायू सेना’ आणि ‘महाराष्ट्र सदन-दिल्ली’ यांचे मन:पूर्वक आभार मानते. ‘लुक्ला ते काठमांडू अन् काठमांडू ते दिल्ली’ अशी आमची सुटका करणाऱ्या भारतीय वायू सेनेमुळेच आम्ही सर्वजण आपापल्या घरी सुखरूपपणे पोहोचलो. अन्यथा किती दिवस लुक्ला येथे आणि नंतर काठमांडू येथे मदतीच्या अपेक्षेत खितपत पडलो असतो ते देवच जाणे..
भारतीय वायू सेनेला त्रिवार सलाम!