कोल्हापूरहून मिठारवाडी गावाकडे मी आणि माझी पत्नी सीमा दोघेही टू-व्हीलरवरून येत होतो. सीमाला आइस्क्रीम खायचं होतं. पुढं पुढं येत केर्ले या गावापाशी आलो, बच्चनसाहब आइस्क्रीम पार्लर येथे येऊन थबकलो. जेथे हे आइस्क्रीम पार्लर आहे, तेथे चार-पाच वर्षांपूर्वी मलिक कृपा हा दगडापासून मूर्ती बनवणारा कारखाना होता. त्या कारखान्याच्या बोर्डवर कोणत्याही देवाचा नाही तर अमिताभ बच्चन यांचा भलामोठा फोटो होता. हे मी अगदी अकरावीपासून कॉलेज शिक्षण पूर्ण होईपर्यंत पाहत होतो. तो पाहून मी रोजच आश्चर्याने मनात विचार करायचो की, एका दगडाच्या कारखान्यावर अमिताभ बच्चनचा फोटो आणि तोही इतका मोठा, फक्त बोर्डवरच नव्हे, तर कारखान्यातील भिंतीवरही वेगवेगळ्या भावमुद्रा असणारे फोटो मी एस.टी.च्या खिडकीतून रोजच पाहत होतो आणि विचार करत होतो; कसला हा फॅन म्हणायचा? कशासाठी एवढे फोटो लावलेत याने ?
आज आमची गाडी बच्चनसाहब आइस्क्रीम पार्लर येथे येऊन थांबली. अवघ्या दहा बाय दहाच्या खोलीत किमान पाचेक फोटो पाहिले आणि तेही सुंदर अशा महागडय़ा फ्रेममध्ये; आइस्क्रीम हातात घेऊन टेबलच्या दिशेने आमचा मोर्चा वळला. दोघांनी आइस्क्रीम खायला सुरुवात केली. तेवढय़ात माझ्या मनात विचार आला. या चाहत्याची मुलाखत घेऊ. आइस्क्रीम तेथेच ठेवून मी त्याच्याकडे गेलो. मनाला थंडावा देत देत मी त्यांना विचारलं,
‘‘बच्चनसाहेबांचे इतके फोटो तुम्ही येथे लावलेले आहेत, ते का? अगदी दहा वर्षे पाठीमागे गेलो तरी येथे मलिक कृपा कारखाना होता. त्याच्या बोर्डवरही बच्चनचा फोटो होता. कशासाठी?’’
तो म्हणाला.. ‘‘बच्चनसाहेब आमचे आदर्श आहेत. एक आयडॉल म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतोय आणि काम करतोय. त्यांची सुरुवातीची कारकीर्द आठवली तर ते एक नवीन अभिनेते म्हणून फिल्म इंडस्ट्रीमध्ये आले. सुरुवातीचे अनेक चित्रपट पडले, पण फारसे यश न मिळाल्याने त्यांची कारकीर्द धोक्यात आली होती. पण न डगमगता त्यांनी ‘जंजीर’ चित्रपटात तन-मन-धन अर्पण करून काम केलं आणि तेथूनच त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली व आज ते सुपरस्टार आहेत. त्यांच्या कारकिर्दीतील ४४ वर्षे उलटून गेली, पण कोणताही डाग न लावता प्रामाणिक आयुष्य जगले. एवढे मोठे झाले, पण किंचितसाही गर्व नाही. ही व्यक्ती पूर्वी जशी होती तशीच आजही आहे. म्हणूनच ते आमचे आयडॉल आहेत.
आम्ही कारखाना उभा केला तेव्हा आमचं काहीच अस्तित्व नव्हतं. रात्रंदिवस भरपूर कष्ट केले आणि पैसा मिळवला. आम्ही आमच्या कारखान्यात बच्चनसाहेबांचं पहिलं पोस्टर ‘जंजीर’ चित्रपटातलंच लावलं होतं. कारण तेथूनच त्यांच्या अभिनयाच्या नव्या कारकिर्दीला सुरुवात झाली होती आणि तिथून पुढं जसा काळ तशीच या भिंतीवरील चित्रंही बदलत गेली.
एक देव म्हणून एक आदर्श म्हणून आम्ही त्यांच्याकडं पाहिलं व त्याच पद्धतीने काम करत गेलो. आज जे काही आमच्याकडं आहे, ते सर्व त्यांच्या गुरुत्वामुळे व आदर्शामुळे. आज एक कारखाना हे आइस्क्रीम पार्लर आहे ते फक्त प्रामाणिकपणे केलेल्या कष्टामुळे; आम्हाला कोणतंही व्यसन नाही. वाईट मार्ग नाहीत ते फक्त आमच्या आयडॉलमुळे, त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत आम्ही इथवर आलो आहोत. आता आमची लाईफ वेल सेटल झाली आहे. प्रत्येक माणसाचा किंबहुना मोठय़ा माणसाचा कोणी ना कोणी गुरू किंवा आदर्श असतो. आमचा आदर्श बच्चनसाहेब आहेत.’’ असे तो म्हणाला.
ही वाक्ये कानावर पडताच माझं मन आइस्क्रीममधून चक्क महाभारतात निघून गेलं. एकलव्याची आठवण झाली आणि डोळ्यासमोर एकलव्य दिसू लागला. आजच्या पिढीतील हा बच्चनसाहेब आइस्क्रीम पार्लरवाला तसाच. दोघांकडूनही एकच बोध मिळतो. गुरू फक्त जीवित व्यक्तीतच सामावलेला नसतो तर तो मूर्त वस्तुत:ही वास करत असतो.
मी लगेच त्यांना पुढचा प्रश्न विचारला, ‘‘तुम्ही बच्चनसाहेबांना भेटलाय का?’’
ते म्हणाले, ‘‘बरेच वेळा भेटलो आहे. मला ते नावानिशी ओळखतात. अभिषेकलाही मी भेटलो आहे. तोही मला ओळखतो; मी त्यांचे सर्वच्या सर्व चित्रपट पाहिले आहेत. त्यांच्याकडून बरेच चांगले मार्गदर्शनही मिळाले आहे. त्यांना भेटण्यासाठी मला कोणतीही अडचण येत नाही. मी बरेच वेळा मुंबईमध्ये त्यांना भेटायला जातो.’’
आणखी एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे याची वेशभूषा-केशभूषाही बच्चनसारखीच आहे; किंबहुना त्याच्या तनामनात अमिताभ आहे हे मात्र नक्की.
ब्लॉगर्स कट्टा : असाही फॅन…
कोल्हापूरहून मिठारवाडी गावाकडे मी आणि माझी पत्नी सीमा दोघेही टू-व्हीलरवरून येत होतो. सीमाला आइस्क्रीम खायचं होतं.
First published on: 18-07-2014 at 01:14 IST
मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fan