उन्हाळ्यात कॉटन पँट्स बाजारात पाहायला मिळतात. पण कित्येकदा त्या पातळ असतात. प्रवासादरम्यान कित्येकदा फाटण्याची भीती असते. यासाठी कोणती काळजी घ्यावी?
-वृषाली जाधव, २५
उन्हाळ्यामध्ये डेनिम्सपेक्षा कॉटन पँट्स कधीही उत्तमच. सुटसुटीत असल्यामुळे घालायला सोयीच्या असतातच आणि त्यांचा लुकही सुंदर असतो. बर गंजी, टी-शर्ट, क्रॉप टॉप यांच्यासोबत सहजच जुळून येतात. त्यामुळे या उन्हाळ्यामध्ये जीन्सना रजा देण्याचे एक मजबूत कारण तुमच्याकडे आहे. अर्थात, कॉटन पँट्समध्ये तू म्हणतेस तसं पातळ असल्याने काही समस्या येतात. त्यातली एक म्हणजे त्या खूप पारदर्शक वाटू शकतात. तसेच त्यांची शिलाई कधीतरी उसवण्याचीही भीती असते. त्यामुळे त्याबाबतीत काही काळजी घेणं महत्त्वाचं आहे. सर्वप्रथम पँट्स घेताना त्याच्या लायनिंग असलेल्या पँट्स शक्यतो निवड. बहुतेकदा ब्रण्डेड पँट्सना अर्धे लायनिंग असते. लायनिंग नसल्यास हाफ स्ल्यॅक्स घालणं कधीही उत्तमच. न्यूड शेडच्या स्ल्यॅक्स सर्व रंगांच्या पँट्ससोबत जुळून येतात. त्यामुळे या वॉडरोबमध्ये असणं महत्त्वाचं आहे. या सर्वासोबत कॉटन पँट्सच्या बाबतीत सर्वात महत्त्वाची घ्यायची काळजी म्हणजे त्या घालण्यापूर्वी शिंप्याकडून त्यावर एकदा शिलाई करून घ्या. जेणेकरून मूळ शिलाई कच्ची असली तरी तुम्हाला पँट उसवण्याची भीती नसेल.
अंगठय़ांचं मला खूप आकर्षण आहे. पण माझी बोटं छोटी असल्यानं मोठय़ा अंगठय़ा माझ्या हातात शोभून दिसत नाहीत. वेगवेगळ्या पद्धतीने आणि नजरेत भरतील अशा पद्धतीने अंगठय़ा कशा घालता येतील?
– छाया दराडे, २२
अंगठी ही खरतर मिनिमल ज्वेलरीच उत्तम उदाहरण आहे. छोटीशी अंगठी तुमच्या संपूर्ण लुकमध्ये मोठा बदल आणते. मुळात आकाराने छोटी असली तरी ती तुमच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल खूप काही बोलून जाते. त्यामुळे तिच्याकडे दुर्लक्ष करणं चुकीचं ठरेल. फक्त तुम्हाला तिला मिरवता आलं पाहिजे. छाया तुझ्या म्हणण्यानुसार तुझी बोटं छोटी आहेत, पण म्हणून अंगठय़ा तुला घालताच येऊ शकत नाहीत असं अजिबात नाही. तू नेहमीची फुलांची डिझाइन असलेली अंगठी घालण्यापेक्षा एखाद बोल्ड डिझाइन निवडून पहा. अर्थात डिझाइनमधील अतिरिक्त डिटेलिंग टाळ, कारण त्यामुळे नेमकं डिझाइन लक्षात येणार नाही. थमरिंग्स घालायला तुला काहीच हरकत नाही. उलट त्यामुळे तुझ्या अंगठय़ाला भरीवपणा येऊन तो नजरेत भरेल. कलरफुल स्टोन्सच्या अंगठय़ा वापर. पण खडय़ांचा आकार मोठा असू देत. याशिवाय कधीतरी हातफुल वापरायलाही हरकत नाही. हातफुलामध्ये ब्रेसलेट आणि अंगठी जोडलेले असतात.
आवाहन
फॅशनच्या संदर्भात तुमचे काही प्रश्न, शंका असल्यास जरूर पाठवा किंवा ‘लोकप्रभा’ला ई-मेल पाठवा. पाकिटावर किंवा ई-मेलच्या विषय रकान्यात ‘फॅशन पॅशन’ असा उल्लेख करावा.
मृणाल भगत