मी उंचीला थोडी बुटकी आहे. कित्येकदा ड्रेस घातल्यावर मी अजूनच बुटकी दिसते. अशा वेळी मी कोणत्या स्टाइलचे कपडे घातल्यास थोडी उंच वाटू शकेन?
– प्रिया नकाशे, २१.
प्रिया, तू सांगतेस तो प्रश्न बहुतेक सर्वच मुलींना भेडसावत असतो. त्यासाठी सर्वात सोप्पी आणि साधी ट्रिक म्हणजे तुमच्या पायांकडे लक्ष द्यायला हवे. एकदा पाय फोकसमध्ये आले की, उंची जास्त असल्याचा आभास लगेच साधता येतो. त्यासाठी स्लिम फिटच्या हाय वेस्टेड डेनिम मस्ट आहेत. त्यासोबत टँक टॉप किंवा क्रॉप टॉप घातलास तर उत्तम. शक्यतो डेनिम डार्क शेडची आणि टॉप्स पेस्टल कलर किंवा फ्लोलर प्रिंटचे असू देत. डेनिमसोबतच सॉलिड कलरच्या स्ट्रेट फिट ट्राऊझर तू वापरू शकतेस. प्रिंट्समध्ये शक्यतो उभ्या पट्टय़ांचे डिझाइन निवड. त्यामुळे पायांची उंची जास्त दिसते. स्कर्ट्सचा पर्यायसुद्धा आहे तुझ्याकडे, पण फ्लेअर स्कर्टपेक्षा स्ट्रेट फिट, पेन्सिल स्कर्ट निवड. अनियमित हेमचे स्कर्टसुद्धा वापरता येतील. सध्या मॅक्सी ड्रेसेसचा ट्रेंड आहे. हाय वेस्ट किंवा एम्पायर लाइनचे ड्रेस तुला उंच दिसण्यास नक्कीच मदत करतील.
माझा चेहरा अंडाकृती आहे. मला वेगवेगळ्या प्रकारचे सनग्लासेस घालायला खूप आवडतं. पण माझ्या चेहऱ्याला सूट होणारे सनग्लासेस निवडण्यात माझा गोंधळ होतो. मी कोणत्या स्टाइलचे सनग्लासेस वापरू? – काव्या मुळ्ये, २०.
काव्या, सर्वप्रथम तुझा चेहरा ओव्हल म्हणजेच अंडाकृती असेल आणि तुला सनग्लासेस घालायला आवडत असतील, तर ते उत्तमच आहे. कारण अंडाकृती चेहऱ्याच्या मुलींवर साधारणपणे सर्व प्रकारचे सनग्लासेस शोभून दिसतात. त्यासाठी तुम्हाला जास्त खटपट करावी लागत नाही. त्यामुळे त्याबाबतीत तू बिनधास्त राहा. उलट नेहमीचे आकार निवडण्यापेक्षा सध्या ट्रेंडमध्ये असलेले कॅट आय सनग्लासेस तू ट्राय करच. हा आकार खरं तर तुमच्यासाठीच बनला आहे, असं म्हटलं तर त्यात गैर नाही. शिवाय त्यात रिफ्लेक्टिव्ह, स्टडेड असे कितीतरी प्रकार पाहायला मिळतात. नेहमीच्या सनग्लासेसच्या आकारांमध्ये गोल रेट्रो स्टाइलचे सनग्लासेस पण ट्रेंडमध्ये आहेत. अर्थात सनग्लासेसचा आकार तुझ्या चेहऱ्याला साजेसा असेल याची काळजी घे. आकाराने जास्त मोठे किंवा छोटे सनग्लासेस निवडणे टाळ. वेगवेगळ्या रंगाच्या फ्रेम्स तू नक्कीच वापरू शकतेस.
आवाहन
फॅशनच्या संदर्भात तुमचे काही प्रश्न, शंका असल्यास जरूर पाठवा किंवा ‘लोकप्रभा’ला ई-मेल पाठवा. पाकिटावर किंवा ई-मेलच्या विषय रकान्यात ‘फॅशन पॅशन’ असा उल्लेख करावा.
मृणाल भगत