वर्षांतून दोनदा होणारा लॅक्मे फॅशन शो हा देशातल्या फॅशन शोजमधला सगळ्यात नामांकित फॅशन शो आहे. आपल्याला काही सेकंदांसाठी रॅम्पवर चालत येणाऱ्या मॉडेल्स दिसतात, पण त्यासाठी केवढा तरी मोठा आटापिटा केलेला असतो..

झगमगत्या दुनियेचं आकर्षण प्रत्येकालाच असतं आणि त्यातही आपल्या आवडत्या सेलिब्रेटीजना जवळून पाहण्याची संधी रॅम्पवर होणाऱ्या फॅशन शोजमधून मिळते. भारतातल्या फॅशन शोजमधला सर्वात नामांकित फॅशन शो म्हणजे लॅक्मे फॅशन वीक. या लॅक्मे फॅशन वीकचे वर्षांतून दोन सीझन होतात. एक म्हणजे समर रिसॉर्ट आणि दुसरा िवटर फेस्टिव्हल. लॅक्मे फॅशन वीक आला म्हणजे सेलिब्रेटीजच्या चाहत्यांना आठवडाभराची मेजवानीच असते. मोठमोठय़ा डिझायनर्सच्या कपडय़ांचं शोकेसिंग आठवडाभर मोठय़ा दिमाखात सादर होत असतं. याखेरीज शो  स्टेजच्या बाहेरील आवारात शो पाहायला येणाऱ्या प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी लॅक्मे प्रेझेंट काही गेम्स, गिफ्ट्स व खाण्याच्या पदार्थाची सोय केलेली असते. रॅम्पवॉकसोबतच त्यांनी विविध गेम्सचा आनंद लुटावा व बाजारात येणाऱ्या काही नवीन प्रॉडक्ट्सची त्यांना माहिती उपलब्ध व्हावी किंवा लॅक्मे प्रॉडक्ट्स व त्याचे ऑफिशिअल पार्टनर असणाऱ्या दुसऱ्या काही कंपन्यांच्या प्रॉडक्ट्सचे लाँचिंग लॅक्मे फॅशन वीकच्या माध्यमातून व्हावे हे उद्दिष्ट असते. शो सुरू व्हायच्या आधी प्रेक्षकांची अमाप गर्दी स्टेज परिसराच्या बाहेर होते. त्या प्रेक्षकांना बाहेर ताटकळत उभं राहावं लागू नये यासाठी आधी झालेले फॅशन शोज मोठय़ा स्क्रीनवर बघण्याची सोय असते. शिवाय लॅक्मेतर्फे प्रेक्षकांचा मोफत मेकअपदेखील केला जातो. परंतु हे सर्व व्यवस्थित पार पाडण्यासाठी नियोजन केलेले असते. प्रेक्षकांची कुठल्याही प्रकारची गरसोय होणार नाही याची काळजी घेतली जाते.

हजारो लोकांना घेऊन एक कार्यक्रम पार पाडायचा म्हटलं म्हणजे लग्नकार्यच उरकल्यासारखं आहे. मग इथे तर संपूर्ण आठवडाभर त्याच उत्साहात काम करायचे म्हटल्यावर पूर्वनियोजन अत्यंत आवश्यक आहे. झगमगत्या दुनियेतील तारेतारकांचे चेहरे तर आपल्याला पटकन दिसतात पण त्या चेहऱ्याची काळजी घेणाऱ्या, त्यांना हवं नको ते बघणाऱ्या, वेळप्रसंगी त्यांचे नखरे झेलणाऱ्या पडद्यामागील टीमचे कष्ट लोकांना दिसत नाहीत. पण या उत्कृष्ट टीमवर्कमुळेच आठवडाभराचा हा कार्यक्रम व्यवस्थित पार पडतो. हा ग्रँड कार्यक्रम सादर करण्यासाठी बॅकस्टेज मेंबर्सची एक मोठी टीम बनवण्यात येते. या टीममध्ये कोणाकडे कोणते काम असणार यासाठी मीटिंग आयोजित केली जाते. डिझायनर्सपासून ते स्टायलिस्ट, मेकअप आर्टस्टि, हेअर स्टायलिस्ट, को-ऑíडनेटर, त्यांचे असिस्टंट्स, वॉर्डरोब असिस्टंट्स, कॅटर्स पर्सन ते क्लीनअप पर्सनपर्यंत मोठ्ठीच्या मोठ्ठी टीम या लॅक्मे फॅशन वीकच्या जय्यत तयारीसाठी काही दिवस आधीपासूनच सज्ज असते. लॅक्मे शो ज्या आठवडय़ात असणार त्याच्या आधीच्या आठवडय़ापासून स्टेज शोबाहेरचा परिसर सजवणे, फिटिंग्ज घेणे, डिस्प्ले एरिया बनवणे वगरे तयारी सुरू होते. डिझायनर्सने बनवलेले गार्मेट्स मॉडल्सला फिट होतायत की नाही, कोणता शो कोणत्या दिवशी असणार, शोचं शेडय़ूल कसं असणार या साऱ्याची रंगीत तालीम आधल्या आठवडय़ात होते.

रॅम्प वॉक करणे म्हणजे फक्त रॅम्पवर जाऊन गार्मेट प्रेझेन्ट करणे नव्हे तर त्या गार्मेटच्या आधारे डिझायनरला लोकांना काय संदेश द्यायचा आहे, त्याची थीम काय आहे, त्या गार्मेट अनुसार मॉडेलचा अ‍ॅटिटय़ूड, शो सिक्वेन्स या सगळ्यांचं भान मॉडल्सला असणं अत्यावश्यक आहे. प्रत्येक डिझायनरच्या गार्मेट थीमनुसार त्यांनी रॅम्पवर चालण्यासाठी एका म्यूझिकची निवड केलेली असते. त्या म्यूझिकवर गार्मेटचं प्रेझेन्टेशन कसं करायचं यासाठी एका कोरिओग्राफरची नेमणूक केलेली असते. त्यांच्या कोरिओग्राफीप्रमाणे, त्याच सिक्वेन्सनुसार मॉडेल्सला जावे लागते. कोणा मागे कोणती मॉडेल असणार हे आधीच ठरलेले असते, त्यात आयत्या वेळी बदल करू शकत नाही, प्रत्येक शोसाठी मॉडेल्सच्या पायाच्या नखापासून ते केसापर्यंतचा अखंड मेकओव्हर बदलत असतो. लॅक्मेसारख्या शोमध्ये दिवसातून चार-पाच वेळा मॉडेल्सना शोनुसार नवा मेकअप करावा लागतो. अगदी नेलपेंटदेखील बदलले जाते. या सगळ्यासाठी खास मेकअप आर्टस्टि, हेअरस्टायलिस्ट असतात. स्वत मॉडेल्ससुद्धा त्यांच्या मेकअप किंवा हेअरस्टाइलमध्ये फेरफार करू शकत नाही. सर्व मॉडेल्सना शोनुसार एकसारखाच मेकअप असतो, बहुतेकदा शो स्टॉपरचा मेकअप व हेअरस्टाइल वेगळी असते. मॉडेल्सला मदत करण्यासाठी, कोणता गार्मेट पहिला-कोणता दुसरा हे सांगण्यासाठी, डिझायनरने प्रत्येक ड्रेसवर दिलेली ज्वेलरी न विसरता त्याच ड्रेसवर त्या मॉडेलला घालण्यासाठी, मॉडेल्सना काही हवं नको ते पाहण्यासाठी प्रत्येक मॉडेल मागे एक असे वॉर्डरोब असिस्टंट नेमलेले असतात. मॉडेल व्यवस्थित तयार झाली आहे की नाही, चुकूनही (झीप लावणं, पदर पिनअप करणं ) काही राहिलं तर नाही ना, किंवा पेहराव परिपूर्ण झाला आहे की नाही याची जबाबदारी वॉर्डरोब असिस्टंटकडे असते. मेकअप, हेअर, ड्रेस झाल्यावर मॉडेल्स शोसाठी लाइनअप करतात. त्यांना वेळेत बाहेर काढणे, व्यवस्थित अरेंजमेंट करणे, बॅकस्टेज आणि फ्रंटस्टेजमधल्या घडामोडी जाणून घेऊन तसे फेरफार करणे याची जबाबदारी को-ऑर्डिनेटरकडे असते. त्याचप्रमाणे बॅकस्टेजला मॉडेल्स तयार होऊन आल्यावर फोटोग्राफर्स आपला कॅमेरा घेऊन सज्ज असतात. शिवाय रॅम्पच्या सगळ्यात पुढच्या बाजूलादेखील फोटोग्राफर आणि मीडियावाल्यांना जागा दिलेली असते. लॅक्मे फॅशन शो हा कमीतकमी अध्र्या तासाचा शो असतो, पण या अध्र्या तासाच्या शोसाठी लागलेली मेहनत अक्षरश: प्रचंड असते.

लॅक्मे फॅशन शोचे एकच स्टेज सर्वाना माहीत असते, ज्याला ‘मेन स्टेज’ म्हणतात. पण इथे मेन स्टेज खालोखालच जबाँग प्रस्तुत लॅक्मे फॅशन शो असतो, त्याला जबाँग स्टेज म्हणतात. मेनस्टेज शोमध्ये नामवंत फॅशन डिझायनर्स, टॉप मॉडेल्स असतात, तर जबाँग स्टेजमध्ये नामवंत डिझायनर्ससोबतच होऊ घातलेल्या काही डिझायनर्स मॉडेल्सनाही वाव असतो. याचबरोबर आय.एन.आय.एफ.डी. प्रेझेन्ट जेन नेक्स्ट हा शो खास त्या कॉलेजच्या सर्व शाखांमधून निवडून आलेल्या विद्यार्थ्यांसाठी असतो. आपल्या डिझाइन्स लोकांपुढे आणण्यासाठी एक चांगली संधी लॅक्मे स्टेज त्यांना देते. शिवाय डिझायनर म्हणून या क्षेत्रात आपलं स्थान वाढवण्यात लॅक्मे या विद्यार्थ्यांना चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकांना पडलेला मोठा प्रश्न- फॅशन शोमधले कपडे जातात कुठे? हे कपडे आपण विकत घेऊ शकतो का? त्या कपडय़ांचं पुढे काय? तर या प्रश्नांचं उत्तर म्हणजे हे कपडे विकत घेण्यासाठी खास एक सोर्स एरिया असतो. लॅक्मे फॅशन वीक चालू आहे तोपर्यंत सोर्स एरिया किंवा डिस्प्ले एरियादेखील चालू असतो. शो सादर करणाऱ्या सर्व डिझायनर्सना एक एक गाळा देऊन त्यात त्यांच्या डिझायनर वेअरचे प्रदर्शन लोकांसाठी खुले असते. रॅम्पवर असलेले कपडे किंवा त्या डिझायनरचं इतर कलेक्शन आपल्याला तेथे बघायला मिळतं व तिथूनच आपण ते विकतही घेऊ शकतो. एकूणच धमाल, मस्ती, मनोरंजन आणि फॅशनविश्वात होणाऱ्या प्रगतीकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन याने भरलेला लॅक्मे फॅशन वीक हा धंदा लोअर परेलच्या पॅलेडिअम मॉलमधल्या सेंट रेगीस हॉटेलमध्ये २४ ऑगस्ट ते २८ ऑगस्ट दरम्यान पार पडणार आहे.
अमृता अरुण – response.lokprabha@expressindia.com

Story img Loader