गळ्यात, कानात, हातात, पायात, बोटात घालायचे दागिने जसे लोकप्रिय आहेत, तसेच दंडात घालायचे दागिनेही लोकप्रिय आहेत. पण जुना काळ दाखवणाऱ्या टीव्ही मालिका आल्या की या दंडात घालायच्या दागिन्यांचे पुनरुज्जीवन होते.
राजघराण्यातील प्रसिद्ध असलेला बाजूबंद हा दागिना सध्याच्या काळात फारसा पाहायला मिळत नाही. अंगठी आणि बांगडय़ा यांचा वापर आपण अजूनही मोठय़ा प्रमाणात करतो. परंतु पेशवाईच्या अखेरच्या काळात दंडावरच्या दागिन्यांचा मोठय़ा प्रमाणात समावेश होता हे आढळून येते. बहुभूषणांमध्येही अनेक प्रकार त्या काळात उपलब्ध होते हे इतिहासाची पारखणी करताना समजते. आत्ताच्या काळात काही मोजके दागिन्याचे दंडावरचे प्रकार आहेत, त्यातलेच काही प्रकार आपण पाहू.
वाकी :
वाकी हा दंडावरचा दागिना अजूनही स्त्रियांमध्ये लोकप्रिय आहे. हा दागिना सोन्याचा, चांदीचा, पितळेचा असतो. सध्या अँटिक सिल्व्हर, अँटिक गोल्ड यामध्येही हा दागिना पाहायला मिळतोय. पूर्वी वाकी ही बहुधा ग्रामीण भागातील स्त्रियांच्या दंडावर पाहायला मिळायची, आता दंडावरील दागिन्यांचा प्रकार कमी झाला असल्यामुळे वाकी फारशी घातली जात नाही. तरीदेखील चटईच्या व रुद्रगाठीच्या नक्षीची वाकी स्त्रियांच्या जास्त पसंतीस पडते हे आढळून येते. नागर समाजातील उच्चवर्णीय स्त्रिया पूर्वी वाकीचा मोठय़ा प्रमाणात वापर करत. त्यांच्या वाक्यांवरील नक्षी ही अगदी कोरीव असे. नाजूक घडणावळीच्या सोन्याच्या वाक्या या स्त्रिया वापरत, तर याउलट ग्रामीण समाजातील स्त्रिया ठोसर व चांदीच्या वाक्या वापरत. वाकी हा दंडावरील दागिन्यांचा प्रकार दंडावर घट्ट बसेल अशा रीतीने प्रेस करून घातला जातो. वाकीला एक विशिष्ट माप नसल्यामुळे स्त्रिया एकमेकींच्या वाक्यांची देवाणघेवाणदेखील करू शकतात. गोलाकार, उभट, वळणदार असे वेगवेगळे वाकीचे प्रकार आहेत.
नागोत्र :
नागोत्र या दंडावरील दागिन्याला ग्रामीण भागात नागोत्तर या नावाने ओळखले जाते. वेटोळे घालून बसलेल्या नागाप्रमाणे नागोत्र हा दागिना असतो. पूर्वीच्या काळी ग्रामीण व नागर भागात हा दागिना मोठय़ा संख्येने वापरात होता. कालांतराने शहरी भागातील लोकांनीही नागोत्र वापरण्यास सुरुवात केली, परंतु शहरातील नागोत्र अगदी आखीव-रेखीव, सुबक नक्षीकाम असलेलं सुवर्णजडित असे तर गावाकडील नागोत्र चांदीचं आणि ठसठशीत असे. धनगर समाजातील लोक या दागिन्यांचा जास्त वापर करत असल्यामुळे चांदीचे नागोत्र जास्त प्रचलित आहे व आता ऑक्सिडाइज, अँटिक सिल्व्हरमध्ये हे नागोत्र बाजारात उपलब्ध आहे व तरुण मुली हौसेने असे नागोत्र फॅशन म्हणून घालताना दिसतात. जय मल्हार मालिकेतील बानू या पात्रालादेखील अशाच प्रकारचे नागोत्र देण्यात आले आहे व तिच्यासोबत असणाऱ्या सख्या, मंजी वगैरे पात्रांच्या दंडावरही नागोत्र हा दागिना पाहायला मिळतो.
नागबंद :
नागबंद या दागिन्याला फक्त नाग असेही संबोधतात. नागबंद हे वाकीप्रमाणेच असते. एखाद्या नागाने दंडाला घट्ट वेटोळे घालून बसावे व त्याचा फणा उभारावा अशाप्रकारे नागबंदांची रचना असते. चित्रात किंवा मूर्तीमध्ये शंकराच्या पिंढीसमोर बसलेल्या नागाची रचना जशी असते तशीच नागबंद दागिन्याची असते. हा दागिनादेखील पूर्वी धनगर व ग्रामीण समाजात फार प्रचलित होता. सोने, चांदी, पितळ, तांबे, पंचधातू अशा विविध धातूंमध्ये हा दागिना पाहायला मिळतो. पूर्वी शिवभक्तांच्या दंडावर अशा प्रकारचा दागिना आढळून येई आता स्टाइल म्हणून त्याचा वापर होतोय.
बाजूबंद :
शहरी भागात प्रसिद्ध असलेला व आजही तितक्याच संख्येने वापरला जाणारा बाजूबंद हा दंडावरील दागिना आहे. वाकीप्रमाणे बाजूबंद प्रेस करून न घालता त्याला दंडाच्या आकारानुसार अडकवायचा फास असतो. त्यामुळे हा दागिना दंडाच्या आकारानुसार खास बनवून घ्यावा लागतो. सुरेख घडणावळीचा, सुवर्णाचा, रत्नजडित असा हा दागिना लग्नकार्यात मोठया प्रमाणात पाहायला मिळतो. या दागिन्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची कोरीव नक्षी पाहायला मिळते. शिवाय याला लटकन म्हणून खाली घुंगरू जोडलेले असतात, त्याने याची शोभा आणखीन खुलून दिसते. विविध फुलांची, पानांची, कुयरीची, बदामाची अशा एक ना अनेक नक्षी बाजूबंदमध्ये आढळून येतात. जय मल्हार मालिकेतील म्हाळसा आणि लक्ष्मी तर गणपती बाप्पा मोरया या मालिकेतील पार्वती या पात्रांचा भरगच्च बाजूबंद लोकांचे लक्ष लगेच वेधून घेतो. यावरून राजघराण्यातील स्त्रिया या दागिन्यांचा वापर मोठया प्रमाणात करत असतील हे समजते व अशा मालिकांचे अनुकरण करून पुन्हा स्त्रिया सणावाराला असे पारंपरिक दागिने घालू लागल्या आहेत.
ताळेबंद :
ताळेबंद हा दागिना जास्त करून चांदी या धातूपासून बनवतात. खेडेगावात हा दागिना पूर्वी फार प्रचलित होता. किंबहुना अजूनही त्याचा वापर गावामध्ये होतो. चटईची नक्षी असलेल्या वाकीप्रमाणे या दागिन्याचीदेखील रचना असते; परंतु वाकीपेक्षा हा दागिना भरगच्च, भक्कम अशा स्वरूपातील असतो. ग्रामीण भागात या दागिन्याला खूप मागणी आहे.
वेळा :
आदिवासी समाजात वापरात असलेला वेळा हा दागिना त्याच्या पेहरावाचा एक भाग आहे. ताळेबंदासारखाच हा दागिनादेखील अगदी जाडजूड स्वरूपाचा असतो. आदिवासी, ठाकर लोक आजही हा दागिना वापरतात. यावरील कोरीव नक्षीकाम अगदी पाहण्यासारखे असते. या दागिन्यांचा प्रसार आदिवासी समाजात जास्त दिसत असला तरी शहरी भागात वेळा हा दंडावरील दागिन्यांचा प्रकार अँटिक सिल्व्हरमध्ये पाहायला मिळतो. या दागिन्याला वेळा असे म्हणतात हे जरी शहरी भागातील लोकांना माहीत नसले तरी दंडावरील दागिन्यांचा एक प्रकार म्हणून तो विकत घेण्याकडे लोकांचा कल दिसून येतो. हा दागिनादेखील मुख्यत: चांदीचाच असतो; परंतु चांदी आणि सोने महाग झाल्यामुळे आता रोजच्या वापरासाठी किंवा एखाद्या खास कार्यक्रमासाठी लोक ऑक्सिडाइज, अँटिक सिल्व्हरमध्ये हा दागिना घेतात.
असेच काही दंडावरच्या दागिन्यांचे पारंपरिक प्रकार जे लोकांना नावाने माहीत नाहीत, परंतु त्यांच्या कलात्मक रूपाने, त्यावरील नक्षीकामाने लोकांना आवडू लागलेत आणि पुन्हा ते प्रकार नव्याने, नव्या ढंगाने नवीन पिढीपर्यंत येऊन पोहोचलेत. पारंपरिक दागिन्यांचे असेच अनेक प्रकार आपण जपले पाहिजेत आणि पुढच्या पिढीपर्यंत ते घेऊन गेले पाहिजे हे यावरून लक्षात येतं. नव्या दागिन्यांसोबतच ऐतिहासिक दागिन्यांची जपणूक करणे हे आपले कर्तव्य आहे आणि आपण ते नक्कीच पार पाडूया.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा