दिवाळी-दसऱ्याच्या खरेदीप्रमाणेच आता पावसाळ्याची खरेदीही तरुणांसाठी महत्त्वाची झाली आहे. पावसाला सुरुवात झाली असली तरी दोस्तहो, अजूनही वेळ गेलेली नाही. हे वाचा आणि खरेदीचे नियोजन करा. खास पावसाळ्यातल्या खरेदीसाठी दिलेल्या काही टीप्स..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जून महिना आला की मार्केटमध्ये झुंबड उडते ती रंगीबेरंगी छत्र्यांची, पावसाळी चपलांची, रेनकोट्सची. सगळ्यांनाच वेध लागतात ते मान्सून शॉपिंगचे. मग मुंबईत पाऊस असो वा नसो, पण ‘रेनी शॉपिंग तो बनती है बॉस!’ यंदाच्या पावसाळ्यात काय नवीन आलंय, कोणती फॅशन चलतीत असेल यावर जरा नजर टाकू या-

लेटेस्ट छत्र्या, रेनकोट्स

या वेळी छत्र्यांमध्ये खूप वैविध्य पाहायला मिळणार आहे. मागच्या वर्षीप्रमाणे टू-फोल्ड किंवा थ्री-फोल्ड छत्र्यांची फॅशन या वेळीही असेल, कारण त्या कॅरी करायला सोप्या असतात; पण त्याचबरोबर मोठय़ा दांडय़ाच्या हटके छत्र्याही पाहायला मिळतील. बदक, हंस, मेंढी, तलवार, कुत्रा असे नानाविध प्रकार छत्रीच्या दांडय़ांमध्ये निघाले आहेत. छत्री हातात पकडूनही आपण मोबाइलवर सहज चॅट करू शकू यासाठी छत्रीच्या दांडय़ात आपली चार बोटं मावू शकतील अशी छत्रीदेखील बाजारात उपलब्ध असेल. शिवाय लहान मुलांसाठी छत्रीच्या दांडय़ाला कोणता तरी कार्टूनचा मुखवटा व छत्रीच्या टोकाला त्या कार्टूनचे पाय अशी हटके छत्रीदेखील पाहायला मिळेल. तसेच काही छत्र्यांच्या दांडय़ामध्ये आपण वॉटर बॉटल किंवा कॉफी कॅन ठेवू शकू अशी जागादेखील आहे. काही काही छत्र्या तर छत्र्याच वाटणार नाहीत अशा आहेत. म्हणजे कोल्ड ड्रिंक्स बॉटलच्या आकाराची छत्री, परफ्यूम, फ्लॉवर पॉटच्या आकाराची छत्री असे नानाविध प्रकार छत्र्यांमध्ये आढळून येतील. याशिवाय छत्र्याचे प्रिंट्सही खूप हटके असतील म्हणजे न्यूज पेपरप्रिंट्सच्या किंवा जॉमेट्रिकल शेप्स, फिल्स अशा एक ना अनेक छत्र्या बाजारात उपलब्ध असतील. अशा हटके छत्र्या तुम्हाला बांद्रय़ाच्या हिल रोड, लिंकिंग रोड किंवा कुलाबा कॉझवे अशा स्ट्रीट शॉपिंगमध्ये कमी दरात मिळतील.

ट्रेंडी रेनकोट्स –

बाइकर्सना किंवा शाळेत जाणाऱ्या मुलांना पावसाळ्यात सगळ्यात सोयीस्कर ठरणाऱ्या रेनकोट्समध्येही सध्या नवनवीन डिझाइन्स आल्या आहेत. पोल्का डॉट, बिझी प्रिंट्सची फॅशन सध्या चलतीत आहे. ऑफिसला जाणाऱ्या तरुणींसाठी ट्रेंच कोटचा पर्यायसुद्धा बाजारात उपलब्ध आहे. यात लाइट, पेस्टल शेड्स जास्त खुलून दिसतात. शॉट ए लाइन केप स्टाइल रेनकोट घालून बघायलाही काहीच हरकत नाही. पारदर्शक रेनकोटलाही एक वेगळाच लुक असतो. असे रेनकोट्स तुम्हाला दादर वेस्ट मार्केट किंवा कोणत्याही मॉलमध्ये सहज मिळू शकतील.

शूज, सॅण्डल्स –

फूटवेअरसाठी पावसाळ्यात बेस्ट ऑप्शन म्हणजे रबरी फ्लिप-फ्लॉप. लेदर किंवा वेलवेटचे शूज पावसाळ्यात वापरणे शक्यतो टाळा. त्याच्याबदली तुम्ही ऑल सीझनचे शूज वापरू शकता. सॅण्डल्समध्येही पावसासाठी खास म्हणून रबराचा वापर केला असतो. नवीन प्रकारचे ‘बीच शूज’ ज्यावर वेगवेगळे डिजाइन असतील असे घालून बघायलाही काहीच हरकत नाही किंवा ‘गमबूट’मध्येही खूप नवनवीन प्रकारचे प्रिन्ट्स पाहायला मिळतील. आपल्या लुकला फॅशनेबल टच द्यायला गमबूट हा उत्तम पर्याय आहे. लेटेस्ट फॅशन म्हणून ‘रबरी स्नीकर्स’सुद्धा ट्राय करून बघायला काहीच हरकत नाही किंवा पावसाळ्यात हाय हिल्स घालायचे असतील तर वेगवेगळ्या प्रकारचे ‘किमोनो’ घालू शकतात. परंतु पावसाळ्यात जेव्हा कोणतेही फूटवेअर घ्याल तेव्हा काळजी घ्या की ते चांगल्या क्वॉलिटीचे असतील.

रेनी बॅग्ज् –

यंदाच्या पावसाळ्यात ओवर साइज बॅग्जची फॅशन असेल. आपल्या नॉर्मल डेली यूजच्या बॅग्जच्या प्रोटेक्शनसाठी आणखी एक बॅग कव्हर म्हणून वापरली जाईल. यामध्ये पारदर्शक किंवा प्रिंटेड दोन्ही ऑप्शन असतील. काही प्लास्टिक बॅग्जमध्ये वेगवेगळ्या खास पावसासाठी तयार केलेल्या प्रिंट्स बघायला मिळतील म्हणजे पॅच् वर्क केलेली छत्रीची प्रिंट, पावसाची प्रिंट इ. प्रकार मार्केटमध्ये उपलब्ध असतील. मागच्या वर्षांत फॅशनमध्ये असलेल्या मोठय़ा कापडी बॅग्ज निदान पावसाळ्यात तरी बाहेर काढू नयेत. पावसात भिजल्यावर त्या बॅग्ज पाणी शोषून घेतात आणि बॅगमधल्या सगळ्या वस्तू खराब होतात. यासाठी पावसाळ्यात नेहमीच प्लास्टिक बॅग्ज किंवा ऑल सिझन बॅग्ज वापराव्यात. या बॅग्ज तुम्हाला कुठल्याही मार्केटमध्ये मिळू शकतात किंवा तुम्ही पावसाची कोणतीही शॉपिंग ऑनलाइनदेखील करू शकता.

रेनी गारमेंट्स –

पावसाळयासाठी नेहमीच गडद रंग उत्तम. शक्यतो पावसाळ्यात सफेद, क्रीम अशा लाइट शेड्स वापरणे टाळावे, कारण या भिजल्यावर पारदर्शक दिसतात. चिखल उडाल्यास लगेच खराबदेखील होतात. तसेच पावसाळ्यात नेहमी हलके कपडे वापरावे. शिफॉन, जॉर्जेट, मलमल या कापडांना प्राधान्य द्यावं, कारण हे भिजल्यावर लगेच सुकतात. पावसाळा सुरू झाला म्हणजे लगोलग कॉलेज सुरू होतातच, परंतु काही कॉलेजमध्ये शॉर्ट कपडे घालण्यास परवानगी नसते. म्हणून त्या बदल्यात तुम्ही अँकल लेंथ जेगिन्स, केप्रिज, अँकल लेंथ स्कर्टस् घालू शकता. त्याचबरोबर तुम्ही क्रॉप टॉप आणि केप्रीज घालून बघू शकता. ‘जर आपण क्रॉप टॉप घातला आणि आपलं पोट दिसलं तर यासाठी तुम्ही संकोचत असाल तर लाँग टाइट फिटेड टँक टॉपवर देखील क्रॉप टॉप घालू शकता. शिवाय तुम्ही लूज टी शर्ट्स, शॉर्ट ए लाइन वन पीस या आउटफिट्सचाही पावसाळ्यात वापर करू  शकता.’

त्वचेची आणि केसांची काळजी –

पावसाळ्यात आपल्या त्वचेची आवर्जून काळजी घ्या. साधा-सोपा घरगुती उपाय म्हणजे मध आणि काकडी यांचं एकत्र मिश्रण करून त्वचेला लावा. यामुळे त्वचा तुकतुकीत दिसते व त्वचेचा कोरडेपणा निघून जातो. पावसाळ्यात मेकअप करतानादेखील वॉटर प्रूफ प्रॉडक्ट वापरावेत. काजळ, लाइनर वापरताना ते चांगल्या कंपनीचे असेल याची काळजी घ्यावी. लिपस्टिकसुद्धा पावसाच्या पाण्याने स्प्रेड होणार नाही अशीच घ्यावी.

पावसाळ्यात केसांकडे मात्र दुर्लक्ष करू नये. पावसाच्या पाण्याने आपले केस रूक्ष व कोरडे होतात यासाठी केसांच्या मुळांना थोडे ऑलिव्ह ऑइल लावून केसांचा पोनिटेल बांधा किंवा फिशटेल वेणी बांधून तुमचा लुक फॅशनेबल बनवा.
अमृता अरुण – response.lokprabha@expressindia.com