दर शुक्रवारी नव्याने येणाऱ्या सिनेमांप्रमाणे बॉलिवूडमधली फॅशनदेखील सतत बदलत असते आणि तरुणाईच्या लाईफस्टाइलवर परिणाम करत असते.

छोटय़ा पडद्याने फॅशनवर साधलेली किमया तर आपण मागच्या भागात पहिली. मग या गर्दीत मोठा पडदा तरी कसा मागे राहिलं.. अगदी बरोबर. या वेळी आपण सिनेमा आणि फॅशन याबद्दल बोलणार आहोत. आता तुम्ही विचार कराल, दर शुक्रवारी बदलणारा तो सिनेमा. त्याचं स्वत:चं आयुष्य एका आठवडय़ाचं असतं, तो काय आमच्या कपडय़ांवर, लाइफस्टाइलवर प्रभाव टाकणार आहे? अर्थात इतके आठवडे आपण फॅशन एकूणच तुमच्या जीवनशैलीचा कसा अविभाज्य भाग बनत गेली आहे याचा जो काही आढावा घेतला त्यावरून यहाँ कुछ भी हो सकता है.. याचा अंदाज तुम्हाला आलाच असेल म्हणा.
तर आता आपण आपल्या मूळ मुद्दय़ावर जाऊ या. फॅशन आणि सिनेमा यांच्यातल्या संबंधाबाबत बोलायचं असेल तर आपल्याला थोडंसं फ्लॅशबॅकमध्ये जावं लागेल. कारण याची सुरुवात साधारण साठच्या दशकापासून झाली होती. अर्थात जगात सिनेमाची सुरुवात याआधीच झाली होती, पण फॅशन आणि सिनेमा यांचा संबंध येण्यास साठचं दशक उजाडावं लागलं. या सिनेमाने कित्येक फॅशन डिझायनर्स घडवले, भारतात एकीकडे मनीष मल्होत्रा, नीता लुल्ला, भानू अथैया, सब्यासाची ही नावं सिनेमामुळे परिचयाची झाली तिथेच हॉलीवूडमध्ये जिवाची, वर्साचे, डोल्चे गबाना अशा अनेक डिझायनर्सची करियर्स सिनेमामुळे फळाला आली.
याची सुरुवात झाली ऑड्री हॅप्बर्न आणि डिझायनर जिवाची यांच्या जोडीने. आपल्याकडे ज्याप्रमाणे मधुबालाने फक्त अभिनयामुळे नाही तर तिच्या लोभस चेहऱ्याने कित्येक पिढय़ा घायाळ केल्या आहेत, तेच श्रेय हॉलीवूडमध्ये ऑड्री हॅप्बर्नला जातं. पुलंच्या ‘ती फुलराणी’च्या निमित्ताने भक्ती बर्वेची छबी आपल्या मनात तयार होण्याच्या आधी या ‘माय फेअर लेडी’ने आपल्या अदाकारीने सर्वाचा कलिजा खल्लास केला होता. १९६०च्या सुमारास ऑड्री हॅप्बर्नला सौंदर्याचा मूर्तिमंत खजिना मानलं जायचं. तिच्या केवळ अभिनयाचं आणि सौंदर्याचं कौतुक होत नसे तर तिच्या चित्रपटांमधील लूकची पण बरीच चर्चा झाली. एक सालस, मनमौजी तरुणीचं उदाहरण म्हणून तिच्याकडे पाहिलं जात असे. त्यातूनच ‘डिझाईनर जिवाची’ हे नाव घराघरांत पोहोचलं. ऑड्री हॅप्बर्नचं सौंदर्य आणि जिवाचीचे गाऊन्स हे समीकरण कित्येक काळापर्यंत लोकांच्या मनावर राज्य करीत होते. आजही ब्लॅक गाऊन, त्यावर मोत्यांची माळ आणि केसांची गच्च बांधलेली फ्रेंच नॉट हा पार्टीज्साठी तरुणींचा सर्वात आवडता लुक आहे.
यानंतरही अनेक हॉलीवूड सिनेमे फक्त त्यांच्या स्र्लुकसाठी ओळखले जाऊ लागले होते. ‘द ग्रेट गॅस्पी’ हेही त्यातलंच एक उदाहरण. मागे विसाव्या शतकातील फॅशनचा आढावा घेताना आपण याबद्दल बोललो होतोच, पण या चित्रपटाच्या पहिल्या आवृत्तीमधील लुक्सची भरपूर चर्चा झाली होती. आपल्याकडेही साठच्या दशकात आशा पारेखच्या घट्ट चुडीदार-कुर्त्यांची खूप क्रेझ होती. त्या वेळी शिफॉनच्या साडय़ांनीसुद्धा तरुणींना भुरळ घातली होती.
पण ऐंशीच्या दशकात सिनेमातील नायिकांच्या प्रतिमाही बदलू लागल्या होत्या. धाडसी बेधडक नायिका सिनेमामध्ये दिसू लागली होती. ती आता फक्त नायकामागे फिरणारी नायिका नव्हती तर ती एक स्वत:चं करिअर सांभाळणारी, अडचणीवर मात करणारी, वेळप्रसंगी हातात बंदूक घ्यायला मागे-पुढे न पाहणारी तरुणी होती. त्यामुळे ती आता ट्राऊझर्स, सूट्समध्ये दिसू लागली होती. ‘फ्लॅशडान्स’, ‘द हॅण्डफुल डस्ट’सारख्या सिनेमांमधून तुम्हाला या तरुणीचं रूप पाहता येईल. पण त्याच सुमारास भारतात ऋषी कपूर आणि अमिताभ बच्चन असे दोन भिन्न प्रवाह वाहू लागले होते. लोकांनी राजेश खन्नाच्या सफारी सूटमधून बाहेर पडून शॉर्ट शर्ट्स आणि लाँग स्ट्रेट पँट वापरायला सुरुवात केली होती. अँग्री यंग मॅनची प्रतिमा जोर धरू लागली होती. पण त्याच वेळी तरुणींना मात्र गोडगोजिऱ्या, प्रेमळ नायकाची छबी अधिक आवडू लागली. कारण हा नायक तिला तिच्या जिवाभावाच्या मित्राप्रमाणे भासू लागला होता. तो तिच्याबरोबर मस्ती करे, हसत-खेळत असे आणि मुख्य म्हणजे त्याच्यात अधिकारवाणी नव्हती. त्यामुळे या नायकाच्या कपडय़ांमध्येसुद्धा फ्लोरल प्रिंट्स, कलर्स दिसू लागले होते. कपडे ढगाळ आणि फ्लोरी झाले होते. तुमच्या आईवडिलांचे फोटोज पाहिलेत तर फ्लेअर पँट्सच्या फॅशनचा अंदाज तुम्हाला येईल. या काळात मुलीसुद्धा मोकळ्या झाल्या होत्या. सिनेमात साडी ते बिकिनी प्रत्येक अवतारातील नायिका आल्याने प्रत्यक्षातसुद्धा मुलींनी हे कपडे वापरायला सुरुवात केली होती.
नव्वदीत भारतात सिनेमातील फॅशनला अवकळा आली होती असं म्हटलं तरी हरकत नाही. लेदर पँट्स, घट्ट बसणारे ड्रेस, रंगीत डेनिम्स, गंजीस, अॅनिमल प्रिंट्स यांनी मोठा पडदा व्यापून टाकला होता. एकीकडे बोल्डनेसच्या नावाखाली सूट न होणारे कपडे घातले जात होते, तर दुसरीकडे सलवार-कमीज पायघोळ झाले होते. फिटिंगचा प्रकार या काळात बहुतेक लोक विसरून गेले होते असं म्हणायला हरकत नाही. त्या वेळी कॉलेजला असणाऱ्यांपैकी कित्येक जण आजही आपले त्या वेशातले फोटोज लपवून ठेवण्यात धन्यता मानतात.
अर्थात हिंदी सिनेमाचं बॉलीवूड झालं त्या वेळी अजून एक बदल झाला तो म्हणजे कॉश्च्युम डिझायनर्सचा सिनेमांमधील प्रवेश. याआधीसुद्धा सिनेमामध्ये कॉश्च्युम डिझायनर्स होते, पण आता मुख्य प्रवाहातील डिझायनर्सनी कॉश्च्युम डिझायनिंगची जबाबदारी स्वीकारली. त्यामुळे सिनेमातले कपडे तुम्हाला लगेचच बाजारात मिळू लागले होते. टेलरकडे नेऊन ‘मला माधुरीसारखा ड्रेस शिवून दे’ असं सांगायची गरज राहिली नव्हती. दुकांनामध्ये ते कपडे दिसायला लागले होते.
मनीष मल्होत्रा, नीता लुल्ला, रितू कुमार, विक्रम फडणीस अशी नावं लोकांच्या नजरेत येऊ लागली होती. आता फक्त सिनेमात नायक-नायिका काय घालतात हे महत्त्वाचं नव्हतं, तर रोजच्या आयुष्यात त्यांचा वॉर्डरोब कसा असतो हे जाणून घ्यायची आणि तसा लूक कॅरी करायची गरज तरुणांना भासू लागली आहे. आज सिनेमातसुद्धा नायक-नायिका एकाच लूकमध्ये अडकून राहत नाहीत. त्यांना प्रत्येक सिनेमामध्ये नवीन लुक लागतो. पूर्वी राजेश खन्ना आणि सफारी सूट, देव आनंद आणि केसांचा तुरा, शम्मी कपूर आणि जॅकेट्स, अगदी आत्ताआत्तापर्यंत सलमान खान म्हणजे टाइट शर्ट्स हे समीकरण रूढ होतं. पण रणबीर कपूर, अर्जुन कपूर, शाहीद कपूर यांसारख्या आजच्या पिढीतील नायकांना एकाच लुकसाठी ओळखणं कठीण आहे. नायिकांची तीच तऱ्हा आहे. श्रीदेवी आणि साडय़ा, हेमामालिनी आणि वेस्टर्न लुक असा संबंध आताच्या पिढीतील दीपिका, करीना, कतरिना याबाबत लावता येत नाही. दर शुक्रवारी बदलणाऱ्या सिनेमानुसार त्यांची स्टाइलसुद्धा बदलत जाते. आणि त्यानुसार तरुणाईमधील ट्रेंड्ससुद्धा बदलत जातात. अगदी कुर्ता-लेगिंग्सपासून ते साडीवर बिकिनी ब्लाऊज घालण्यापर्यंत सर्व ट्रेंड्सचं स्वागत केलं जातं. त्यामुळे पूर्वीइतकाच सिनेमांचा प्रभाव आजही आहे. फक्त त्याचा चेहरामोहरा थोडा बदलला आहे.

Story img Loader