फॅशन विशेष

सतत बदलत्या आणि म्हणूनच रंगीन असलेल्या फॅशनच्या दुनियेचा फेरफटका-
दहा पावलांवर भाषा बदलते असे म्हणतात. तशी पावलापावलावर फॅशनही बदलते. पेहराव, वेषभूषा म्हणजे फक्त फॅशन नाही. फॅशन कपडय़ापुरतीच मर्यादित असते असे तर मुळीच नाही. कुठे जाताना कसे कपडे घालावेत, कुठल्या कपडय़ावर कुठला दागिना घालावा, अमुक कपडय़ावर केस कसे असले पाहिजेत, हातात काय असावे, पायात काय घालावे.. म्हणजे डोक्यावरच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत सगळेच घटक फॅशनमध्ये मोडतात. अमेरिकन डिझायनर मिशेल बोहबोत नुकतीच एका कार्यक्रमानिमित्ताने भारतात येऊन गेली. तिच्या मते- फॅशन म्हणजे एक्स्प्रेशन. फॅशनमधून तुम्ही व्यक्त होता. स्वत:ची प्रतिमा निर्माण करता. स्वत:चा आब राखून घेण्याची पहिली पायरी तुमचे कपडे ही आहे. एखादं कापड अंगावर कसं वाटतं, ते नेसल्यावर किंवा घातल्यावर तुम्हाला काय वाटतं हेही महत्त्वाचं.
कपडे आणि त्याच्या ओघाने येणाऱ्या या अ‍ॅक्सेसरीज म्हणजे फॅशन. अमुक प्रकारच्या कपडय़ांवर अमुक घालायचे नाही, असा कायमचा नियम कधीच फॅशनमध्ये नसतो. कारण हे सगळे नियम ठरतात ते ट्रेंडनुसार. म्हणून फॅशन ट्रेंड कळणे महत्त्वाचे. काळाच्या बरोबर राहणारी फॅशन काय हे ट्रेंड ठरवतो. काळानुसार फॅशन बदलते, पण जुने जाऊ दे मरणालागून अशी गत फॅशनच्या जगात कधीच नसते. जुन्या काळातील फॅशन कायमची बाद होते, असे कधीच होत नाही. कारण पुन्हा पुन्हा जुने फॅशन ट्रेंड प्रचलित होण्याची पद्धतच आहे. म्हणूनच सत्तरच्या दशकातील बेल बॉटम नव्या सहस्रकात पुन्हा येते आणि थेट व्हिक्टोरियन काळातील बेलट्रेंडनुसार फॅशन कशी बदलते याचे एक छोटेसे उदाहरण.. दहा वर्षांपूर्वीपर्यंत जीन्सवर चप्पल घालणारी मुलगी आढळली तर ती गावंढळ, फॅशन सेन्स नसलेली म्हणून हिणवली गेली असती. रूढार्थाने आधुनिक म्हणवल्या जाणाऱ्या मुली त्या काळात जीन्सवर चप्पल आणि जीन्सच्या पँटवर टिकली हे खपवूनच घेऊ शकल्या नसत्या. गेल्या काही वर्षांत मात्र जीन्स घातल्यानंतर फ्लॅट चप्पलच काय पूर्वीच्या स्लीपरसारखी दिसणारी आधुनिक स्लीप-ऑन सर्रास वापरली जाते; किंबहुना ती फॅशनेबल समजली जाते. तीच कथा कपाळावरच्या कुंकवाची. टिकली हे त्याचं त्या मानाने आधुनिक रूपसुद्धा कालबाह्य़ वाटतेय ना वाटतेय तोच आता ही टिकली ‘फॅशन शो’च्या रँपवर उठून दिसत आहे. यंदाच्या वर्षीच्या काही फॅशन शोजमध्ये कपाळावरची टिकली अनेक ठिकाणी दिसली आहे. अनेक मॉडेल्सनी टिकली वेगळी फॅशन म्हणून मिरवली. यामध्ये परदेशातील काही फॅशन शोज आणि परदेशी मॉडेल्सचाही समावेश आहे. म्हणजे आता टिकली लावण्याचीही ‘फॅशन’ येणार असेच चिन्ह आहे. जागतिक फॅशनविश्वात तर जुनी फॅशन पुन्हा येण्याची तर पद्धतच आहे. त्याला कुणी रेट्रो लूक नाव देतो तर कुणी गोल्डन डेज म्हणून आठवण काढतो. हल्ली ग्रामीण भागातील पारंपरिक केशभूषा, वेशभूषा ट्रायबल लूक म्हणून किंवा अँटिक लूक म्हणून मिरवण्याचा ट्रेंडही प्रकर्षांने दिसतोय. भारतातील आघाडीचे डिझायनर्स आवर्जून ग्रामीण भागात पोहोचून तिथली परंपरा आपल्या आधुनिक डिझाइन्समध्ये उतरवण्याचा प्रयत्न करीत आहेत.
नियॉन कलर्स
दरवर्षी फॅशनविश्वात एखादा रंग धुमाकूळ घालतो. तो रंग ही त्या हंगामाची फॅशन असते. गेल्या काही दिवसांपासून नियॉन कलर्स चलतीत आहेत. गडद रंगछटांमधील लाल, गुलाबी, भगवा, निळा, पिवळा, हिरवा हे रंग नियॉन कलर्स म्हणून ओळखले जातात. चमकते रंग म्हणजे नियॉन कलर्स. हे रंग याही हंगामात लोकप्रिय ठरण्याची शक्यता आहे. नियॉन कलर्सच्या काही मर्यादादेखील आहेत. ठरावीक वयातच या रंगाचे कपडे चांगले दिसतात. मध्यमवयीन व्यक्तींना हे रंग शोभून दिसत नाहीत. सरसकट सगळ्यांना हे रंग चांगले दिसत नाहीत. कारण हे भडक असतात. पूर्ण आऊटफिट या रंगात केल्यास ते सगळ्यांना शोभून दिसणार नाही. मग नियॉनचा वापर एखाद्या पॅचपुरता करता येतो. या नियॉन कलरच्या ट्रेंडचा वापर अ‍ॅक्सेसरीजमध्ये वापर करता येईल.
गुलाबी थंडीची गुलाबी फॅशन
गुलाबी रंग तारुण्याचे, प्रेमाचे प्रतीक असला तरी तो रंग कुठल्याही वयाला शोभून दिसतो. गुलाबी रंग हा पहिल्यापासूनच स्त्रीला वाहिलेला रंग आहे. मुलींना भावणारा रंग आहे. या हंगामात गुलाबी रंगाला महत्त्व दिल्याचे दिसते. निळ्याच्या छटासुद्धा तशा फेमिनाइनच. त्यामुळे यंदाच्या सीझनला स्त्रीत्व मिरवण्यासाठी या छटांचा प्रभावी वापर आघाडीच्या डिझायनर्सनी केलेला दिसतो. ‘पिंक’ आणि ‘इंक’ हे ‘सीझन कलर’ यंदा चलतीत येणारे आहेत. या दोन्ही रंगांचा वापर पारंपरिक भारतीय तसेच पाश्चिमात्य शैलीच्या कपडय़ांमध्ये केलेला दिसतो.
कपडय़ांमध्येदेखील फ्युजन
संगीत क्षेत्रात पारंपरिक आणि आधुनिक, भारतीय आणि पाश्चिमात्य असा संगम केला की, त्याला फ्युजन म्हणायची पद्धत आहे. गेली काही वर्षे नव्या-जुन्याचा संगम कपडय़ांमध्येही केल्याचे दिसते आहे. या वर्षी सणासुदीच्या काळात हीच फॅशन रूढ होण्याची चिन्हे आहेत. या वेळी बाजारात उपलब्ध असलेली नवीन फॅशन पाहता हे फ्युजन प्रकर्षांने जाणवते. कारण बहुतेक सगळ्या डिझायनर्सनी फ्युजन साधण्याचा प्रयत्न केला आहे. आघाडीचा डिझायनर मनीष मल्होत्रा याने यंदा घागरा-पँट हा नवीन प्रकार यंदा लॅक्मे फॅशन वीकमध्ये सादर केला. म्हणजे दुरून दिसायला घेरदार घागरा वाटत असला तरीही तो प्रत्यक्षात मात्र पँटसारखा घालता येतो आणि तितकाच सुटसुटीत असतो. त्याच धर्तीवर सध्या धोती-पँट प्रचलित आहे. शॉर्ट कुडत्यावर अशी धोती पँट अगदी उठून दिसते. साडी-घागरा हा असाच एक आणखी फ्युजनचा प्रकार थ्री-पीस घागरा म्हणून वापरता येतो. प्रसंगी साडी म्हणूनही नेसता येतो.
जुन्या जरीला नवीन झळाळी
पदरावर असलेल्या जरतारीच्या मोरावरून पैठणीची नजाकत, तिचे मूल्य ठरवले जायचे. लुगडय़ाला जरीचा काठ असणे हीच तेव्हाची फॅशन होती. आता ही जरीची फॅशन पुन्हा नव्याने रूढ होत आहे, पण वेगळ्या प्रकाराने. कुर्ता किंवा टॉपला जरीचा काठ लावून सजवण्याची फॅशन पुन्हा रूढ होत आहे. भारतीय समाजाला पहिल्यापासून सोन्याचे जसे आकर्षण तसे सोनेरी रंगाचेही. म्हणूनच भारताच्या कुठल्याही प्रांतात, कुठल्याही समाजात पारंपरिक पेहरावांमध्ये सोनेरी रंगाला विशेष महत्त्व असते. मग ती गढवाली साडीवरची सोनेरी नक्षी असेल, बनारसी शालूचा सोनेरी पल्लू असेल, पंजाबी चुनरीचे सोनेरी गोंडे असतील, नाहीतर लेहंग्याचे जरीचे काठ असतील, सोनेरी रंगाने कपडय़ाची शोभा वाढते. म्हणूनच भरजरी वस्त्र म्हटले की सोनेरी छटा येणार हे ठरलेले. हा सोनेरी रंग तसा पाश्चिमात्य कपडय़ांना विशेष चालत नाही, पण भारतीय डिझायनर्स सध्या या सोनेरी झळाळीचा खुबीने वापर करताना दिसत आहेत. विक्रम फडणीस या आघाडीच्या डिझायनरने लॅक्मे फॅशन वीकमध्ये सादर केलेले सगळे कपडे फक्त सोनेरी रंगाचे होते.
पैठणीचे वाढते ग्लॅमर
याशिवायही अनेक बडय़ा डिझायनर्सनी आपल्या डिझाइन्समध्ये हा पारंपरिक आणि आधुनिक डिझाइन्सचा मिलाफ साधण्याचा प्रयत्न केलेला दिसला. त्यामध्ये प्रामुख्याने स्थान देण्यात आले ते जरीच्या डिझाइन्सना. हर्षिता चॅटर्जी-देशपांडे आणि श्रुती संचेती यांनी तर अस्सल मराठमोळा पेहराव आधुनिक रूप देत रँपवर उतरवला. पैठणीला थोडय़ा वेगळ्या ढंगात पेश करत त्यांनी ग्लॅमर मिळवून दिले. पैठणीच्या जरतारी पदराचा, काठाचा वापर आधुनिक ढंगाच्या पेहरावात त्यांनी केला. पैठणीचे डिझाइन अनारकली आणि लाँग असिमेट्रिक गाऊनमध्ये झाल्याने त्या पारंपरिक कारागिरीला एक वेगळा आयाम मिळवून दिला.
बोल्ड प्रिंट्स, क्रॉप टॉप्स आणि जॅकेट्स
गेल्या काही दिवसांपासून कपडय़ांवर आणि अ‍ॅक्सेसरीजवर गडद रंगाबरोबर उठावदार नक्षीसुद्धा हमखास दिसत होती. तोच ट्रेंड सध्या बाजारात असणाऱ्या बोल्ड प्रिंट्वरून दिसत आहे. प्राण्यांपासून प्रेरणा मिळालेल्या अ‍ॅनिमल प्रिंटच्या ट्रेंडनंतर आता तशाच पण अधिक वैविध्य असणाऱ्या बोल्ड प्रिंटचा वापर प्रामुख्याने पाश्चिमात्य पेहरावांवर केलेला दिसतो. वेस्टर्न आऊटफिट्समध्ये क्रॉप टॉप ही सध्याची लेटेस्ट फॅशन म्हणावी लागेल. अशा क्रॉप टॉप्सखेरीज डिझायनर जॅकेट हा सध्याचा ट्रेंड दिसत आहे. उंचीला छोटय़ा आणि पुढून बंद नसणाऱ्या श्रगची फॅशन अजूनही चलतीत आहेच. त्याच्या जोडीला आता या जॅकेटचा ट्रेंड येऊ पाहतोय. कुठल्याही टॉपवर किंवा कुडत्यावर एम्ब्रॉयडरी केलेले जॅकेट घालून त्याला वेगळेपणा आणता येतो.
जुने ते सोने
केसांचा घट्ट अंबाडा, नाकात नथ अशा वर्णनाची स्त्री कशी असेल असे वाटते? या वर्णनावरून रँपवर चालणारी आधुनिक स्त्री तर नक्कीच डोळ्यापुढे येणार नाही. पण आता ट्रेंड बदलतोय. नथ हा पारंपरिक दागिना ‘इन फॅशन’ ठरतोय. अनेक मॉडेल्सनी या वर्षी नथ घालून रँपवर प्रवेश केला. मॉडेल्सबरोबर आघाडीच्या चित्रपट तारकांनीही नथ मिरवली तेव्हा ही पारंपरिक फॅशन पुन्हा रुळणार हे नक्की झाले. सोनम कपूर, जुही चावला यांनी फॅशन शोमधून नथ घालून रँपवर चालणे पसंत केले. तर विद्या बालन नथ घालून थेट आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या व्यासपीठावर मिरवली. आंतरराष्ट्रीय रँपवर काही परदेशी मॉडेल्सनीही नथनी घालून नवी फॅशन रूढ करण्याच्या आविर्भावात आपली नथनी मिरवली. त्यामुळे उद्या अनारकलीवर किंवा डिझायनर कुर्त्यांवर नथ घालून जाणाऱ्या मुली दिसणार हे नक्की.
अगदी आत्तापर्यंत केस मोकळे सोडण्याची फॅशन होती. पण आता घट्ट बांधलेले केस हीच फॅशन असणार असे संकेत मिळत आहेत. अनेक मॉडेल्स असे घट्ट बांधलेले केस एखाद्या ‘हेड गिअर’सारखे मिरवताना दिसताहेत. म्हणूनच घट्ट आंबाडा, नथ आणि जरीचा ड्रेस ही अल्ट्रामॉडर्न फॅशन असल्याचे कुणी सांगितले तर चकित होऊ नका. तीच गोष्ट कपाळावरच्या कुंकवाची. पारंपरिक पेहरावावर टिकली लावूनच मॉडेल्स रँपवर उतरल्या होत्या. त्यामुळे नथ, बिंदी, कुंकू, टिकली या नटण्यामुरडण्याच्या जुन्या गोष्टी ‘ब्युटी अ‍ॅक्सेसरीज’ म्हणून नव्याने येणार हे नक्की.
दागिन्यांच्या अ‍ॅक्सेसरीज
दागिन्यांच्या अ‍ॅक्सेसरीज होतात तेव्हा आपण नव्या काळाला धरून फॅशन केली असे म्हणता येईल. कारण दागिन्यांना अ‍ॅक्सेसरीज म्हटल्याशिवाय फॅशन कळते असे समोरच्याला वाटत नाही. पण याच दागिन्यांमध्ये ‘अँटिक’ आणि ‘एथनिक’ म्हणत जुनेच भरगच्च दागिने पुन्हा फॅशनमध्ये येत आहेत. एक बदलता ट्रेंड म्हणजे सोनेरी रंगाची क्रेझ वाढली असली तरी पिवळ्याधम्मक धातूची क्रेझ मात्र कमी होत आहे. तरुण पिढीतील मुलींना सोन्याच्या दागिन्यांपेक्षा प्लॅटिनम किंवा व्हाइट मेटलचे दागिने घालणे आवडायला लागलेय. सोन्याच्या झळझळीत पिवळ्या रूपापेक्षा थोडा जुनाट वाटणारा ‘अँटिक लूक’ त्यांना हवाहवासा वाटत आहे. म्हणूनच अँटिक गोल्ड हा नवा प्रकार दागिन्यांमध्ये दिसू लागला आहे. सणासुदीला आणि लग्नसराईत वापरायला भरगच्च दागिने लागतात. त्यासाठी अँटिक गोल्डला तरुणीची पसंती मिळत असल्याचे दिसते. त्यातून वेगळेपणा मिळतो यासाठी या अँटिक गोल्डकडे तरुणाई वळत आहे, असे वाटते.
मुलांच्या अ‍ॅक्सेसरीज
मुलींच्या बरोबरीने किंबहुना ‘काकणभर’ अधिकच रस मुलांनाही फॅशनमध्ये असतो, असा हा जमाना. त्यामुळे मुलांच्या फॅशन अ‍ॅक्सेसरीजही हल्ली मोठय़ा प्रमाणावर दिसताहेत. त्यामध्ये प्रामुख्याने लॉकेट्स, कडी आणि अंगठय़ांचा समावेश असतो. मुलांची फॅशन ब्रँडेड असते असे म्हणतात. मुलांच्या फॅशनमध्येही ‘फ्युजन’ आल्याचे या वर्षांत जाणवले. त्यामुळे धोती-कुर्ता, शेरवानी, जोधपुरी या पारंपरिक पेहरावांना सुटसुटीतपणा देत आधुनिक रूप काही डिझायनर्सनी दिल्याचे दिसते. जॅकेटचा ट्रेंड मुलांमध्येही लोकप्रिय होतोय. पारंपरिक भारतीय कपडय़ांवर उठून दिसणारे जॅकेट हे या वेळचे विशेष म्हणावे लागेल.

Story img Loader