भारतात ‘नेक परवीन’, ‘विश्वास’, ‘जुगनू’ यासारखे हिट चित्रपट देणाऱ्या फ़ीरोज़्ा निज़ामी यांनी पाकिस्तानात ‘चन वे’, ‘दुपट्टा’, ‘किस्मत’, ‘सोला आने’ आणि ‘राज़्ा’सारख्या हाताच्या बोटांवर मोजण्याइतपत निवडक चित्रपटांना नादमधुर संगीत दिले. किराणा घराण्याचे गायक व प्रतिभावान संगीतकार असलेल्या फ़ीरोज़्ा निज़ामी यांचे नाव त्यांची चित्रपट संगीतातली चमकदार कामगिरी विचारात घेता आजही सिनेसंगीतशौकिनांच्या स्मरणात राहिले आहे.
संगीतकार जी. ए. चिश्ती, रशीद अत्रे, ख़्वाजा ख़ुर्शीद अन्वर, ए. हमीद, एम. अशरफ़, मास्टर इनायत हुसन, नाशाद, निसार बज़्मी, सुहैल राणा यांच्यासारखी धुंवाधार कारकीर्द फ़ीरोज़्ा निज़ामी यांच्या वाटय़ाला आली नाही. परंतु जे चित्रपट मिळाले त्यात त्यांनी आपल्या अभिजात संगीताचा रंग मिसळला आणि चित्रपटसंगीत सुश्राव्य बनविले. फ़ीरोज़्ा निज़ामी यांच्या कारकिर्दीतील काही योगायोग मोठे विलक्षण वाटतात. भारतात जसे त्यांनी तीन-चार हिट चित्रपट दिले तद्वत पाकिस्तानात संगीतबद्ध केलेल्या त्यांच्या यशस्वी चित्रपटांची संख्यासुद्धा तेवढीच भरते. सुपरहिट सिनेमा म्हणून भारतात ‘जुगनू’ तर पाकिस्तानात ‘दुपट्टा’ असा प्रत्येकी एकेकच सिनेमा त्यांच्या नावावर जमा आहे.. भारतात स्वरसम्राट मोहंमद रफी तर पाकिस्तानात संगीतकार सोहेल राणा यांसारखा प्रत्येकी एकच प्रतिभावान शिष्य त्यांना लाभला.. एवढेच नव्हे तर भारत आणि पाकिस्तानात त्यांनी संगीत दिलेल्या चित्रपटांची संख्यासुद्धा थोडय़ाफार फरकाने समान आहे. भारतात त्यांनी अकरा चित्रपटांना आणि पाकिस्तानात जेमतेम चौदा चित्रपटांना संगीत दिले. दोन्ही देशात फ़ीरोज़्ा निज़ामी यांना ग्रेट संगीतकार मानणाऱ्यांची संख्या मोठी आहे. भारतात त्यांनी चाळीसच्या तर पाकिस्तानात पन्नासच्या दशकात दिलेले संगीत आजही चिरतरुण आहे.
फ़ीरोज़्ा निज़ामी यांचा जन्म लाहोरचा. त्यांच्या जन्मसालाविषयी एकवाक्यता आढळून येत नाही. काही अभ्यासकांच्या मते त्याचा जन्म १५ नोव्हेंबर १९१० रोजी तर काहींच्या मते १९१६ साली एका सुखवस्तू मुस्लीम परिवारात झाला. १९२९ साली फ़ीरोज़्ा निज़ामी इस्लामिया कॉलेज, लाहोरमधून बी.ए.ची पदवी घेऊन उत्तीर्ण झाले. यावरून त्यांचे जन्मसाल १९१० असावे या तर्काला बळकटी मिळते. सुशिक्षित व पुरोगामी विचारसरणीचा माहोल असल्याने घरात संगीत आणि संगीतवाद्यांविषयी आस्था होती. आपसूकच फ़ीरोज़्ा निज़ामी संगीताकडे आकृष्ट झाले. त्यांचे धाकटे बंधू नज़्ार मोहंमद हे पाकिस्तानी क्रिकेटचे धडाकेबाज व सलामीचे फलंदाज होते. नज़्ार मोहंमद यांचा मुलगा व फ़ीरोज निज़ामी यांचा पुतण्या मुदस्सर नज़्ार हाही अष्टपलू खेळाडू म्हणून नावाजला गेला.
लाहोर विद्यापीठातून पदवी परीक्षा उत्तीर्ण होताच त्यांनी िहदुस्तानी शास्त्रोक्त संगीताचे दिग्गज उस्ताद अब्दुल वाहिद ख़ां यांची शागिर्दी पत्करली व संगीताचे रीतसर शिक्षण घेतले. त्यानंतर ते लाहोरच्या आकाशवाणी केंद्रात कार्यक्रम निर्माते म्हणून रुजू झाले. भारतातील प्रख्यात पाश्र्वगायक मोहंमद रफीबरोबर त्यांची ओळख लाहोर रेडिओ केंद्रावरच झाली. रफीनेदेखील उस्ताद अब्दुल वाहिद ख़ां यांच्याकडे शास्त्रोक्त संगीताचे धडे गिरवले असल्याने फ़ीरोज निज़ामी त्यांचे गुरुबंधू लागत होते. नंतर निज़ामी हे दिल्लीच्या आकाशवाणी केंद्रावर संगीत विभागाचे प्रमुख म्हणून रुजू झाले. आपल्या कुटुंबीयांसमवेत ते दिल्लीच्या पुल बंगाश या भागात राहत होते. सुगम संगीताची ओढ असणाऱ्या रफीने काही काळ त्यांच्या घरी राहून विद्याग्रहण केले.
फ़ीरोज़्ा निज़ामी यांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी होते. किराणा घराण्याचे शात्रीय गायक व संगीतकार तर होतेच शिवाय संगीताचे अभ्यासक या नात्याने इंग्रजी भाषेतून त्यांचे साक्षेपी लिखाण ‘पाकिस्तान टाइम्स्’मधून नियमितपणे प्रकाशित होत असे. पंजाब विश्वविद्यालयाच्या पदवी परीक्षेच्या अभ्यासक्रमात त्यांनी उर्दूतून लिहिलेला ‘असरार-ए-मौसीक़ी’ (संगीताची गूढात्मकता) हा मौलिक ग्रंथ अंतर्भूत होता.फ़ीरोज़्ा निज़ामींचा सूफी संगीत आणि सूफी साहित्याचाही प्रगाढ अभ्यास होता. या विषयावर त्यांनी लिहिलेला ‘सरचश्मा-ए-हयात’ (जीवनस्रोत) हा ग्रंथ विचारवंत व समीक्षकांच्या गौरवास पात्र ठरला होता.
दिल्ली आकाशवाणी केंद्रात काम करीत असताना एका सहयोगी कर्मचाऱ्याच्या बढतीविषयी वाद निर्माण झाला. यासंदर्भात तेथील व्यवस्थापनाने घेतलेल्या ताठर भूमिकेमुळे फ़ीरोज़्ा निज़ामी संतप्त झाले व अवघ्या पंधराच महिन्यांत सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन मुंबईला रवाना झाले. मुंबईच्या चित्रपटसृष्टीत त्यांना वाडिया मूव्हीटोन बॅनर्सचा ‘विश्वास’ (१९४३) हा चित्रपट मिळाला. चित्रपटात एकूण आठ गाणी होती. पकी सात गाण्यांना फ़ीरोज़्ा निज़ामी यांनी तर उर्वरित एकमात्र गाण्याला मास्टर छैला लाल यांनी स्वरबद्ध केलं होतं. यात ‘भूल जा भूल जा भूल जा जो देखता है जो है देखा भूल जा’, ‘मुसाफिर हंसी खुशी हो पार’ (स्वर : सुरेंद्र), ‘औरत एक कहानी मय्या’, ‘भोजन के नज़ारें हैं’ (‘सावन के नज़ारे हैं’च्या धर्तीवर पॅरोडी साँग. स्वर : बेबी माधुरी), ‘दुनिया नई बसाई सजनी’ व ‘सावन की ऋत आए सजनवा’ (स्वर : सुरेंद्र व मेहताब) यांसारखी फम्ीरोज़्ा निज़ामी यांनी चालीत बांधलेली गाणी त्या काळात लोकप्रिय झाली होती.
मज़्ाहर ख़ान दिग्दíशत ‘बडम्ी बात’ (१९४४) या चित्रपटात फ़ीरोज़्ा निज़ामी यांनी राजकुमारी, अमीरबाई कर्नाटकी, ख़ान मस्ताना, जी.एम. दुर्रानी यांच्या आवाजात काही सुश्राव्य गाणी संगीतबद्ध केली. ‘इक़रार के पर्दे में मुझ को न सज़ा देते’, ‘सोती हूं अब.. तुम चंदा मुझे जगा देना’ (स्वर : अमीरबाई), ‘बगिया करें सिंगार’ (स्वर : अमीबाई व ख़ान मस्ताना), ‘क्यूं देख रही हो मुझे शोख़ नज़्ारसे’ (स्वर : अमीरबाई व जी. एम. दुर्रानी), ‘जाऊं कैसे न बीच बाज़ार, सिपहिया आँख़ मारे’, ‘मेरा बालम बडम हरजाई रे, मैं तो प्रीत लगा पछताई’ (स्वर : राजकुमारी), ‘मेरे भोले से बालम का भोला है दिल’ (स्वर : हमिदा बानो व कुसुम मंत्री) या गाण्यांवर लोकांनी पसंतीची मोहोर उमटवली.
प्रजा पिक्चर्सचा ‘उमंग’ (१९४४) हा चित्रपट पडद्यावर आला आणि पुन्हा एकदा श्रेयनामावलीत संगीतकार म्हणून फ़ीरोज़्ा निज़ामी, बी.ए. ही अक्षरे झळकली. मोतीलाल आणि चंद्रप्रभा मुख्य भूमिकेत होते. ‘खिल उठा सारा चमन क्यूं’, ‘मधुर सुरों में सुनो कहानी.. एक था राजा एक थी रानी’, ‘राधे छुपाई कहाँ बंसिया बताओ न’, ‘गाते गाते जीवन बीता’, ‘कैसे खिलेगा वो चमन, उजडा जो वो बहार में’ या गाण्यांना फ़ीरोज़्ा निज़ामी यांनी आपल्या स्वरांनी समृद्ध केले. याच वर्षांतला ‘उस पार’ हा सन आर्ट पिक्चर्सचा चित्रपट केवळ मधुर गाण्यांमुळेच तरून गेला. चित्रपटात मुकेश आणि कुसुमच्या आवाजात ‘ज़्ारा बोलो री हाँ, क्या लोगी इस दिल का किराया’, ‘मैं आपकी हूं बीना, तुम गीत हो कन्हैया’, ‘ये किस्मत की क्या क्या सितमगारियाँ है’ (स्वर : अमीरबाई), ‘आज नशेंमें हैं फुलवारी’ व ‘खेवय्या आओ चलें उस पार’ (स्वर : अमीरबाई व जी. एम. दुर्रानी) ही गाणी लोकांना भावली.
१९४५ साली पुन्हा एकदा वाडिया मूव्हीटोनच्या ‘पिया मिलन’साठी दिग्दर्शक एस.एम. यूसुफ यांनी फ़ीरोज निज़ामी यांना पाचारण केले. यात ‘किसने दिया है हमको सहारा’, ‘आई बसंत रानी लचकीली शरमीली’, ‘रो रहा है आज कोई मुस्कुराने के लिए’, ‘गा गा रे मनवा गा’ (स्वर : निर्मला देवी), ‘राखी का दिन आया भय्या’, ‘आये, दिन पिया मिलन के आये’, ‘जाग उठो नारियों, देश की दुलारियों’ (स्वर : ज़्ाोहराबाई), ‘लो डूब गया ख़ुर्शीद, अब देखो अंधेरा छाने लगा’ (स्वर : राजकुमारी) यांसारख्या गाण्यांची रेलचेल होती. या वर्षांत प्रथमच फ़ीरोज़्ा निज़ामी यांनी मोहंमद रफीला ‘शरबती आँख़े’ या आपल्या चित्रपटातून पाश्र्वगायनाची प्रथम संधी दिली. ‘अब न बीन बजा स्नेही’, ‘बहोत मुख़्तसर है अपनी कहानी’, ‘प्यार करना ही पडेगा एक दिन’ (स्वर : मोहंमद रफी), ‘दुनिया शराबख़ाना’, (स्वर : ज़्ाीनत बेग़म), ‘दिल तू ही बता दे, यह प्यार है क्या’, ‘दुनिया शराबख़ाना’ (स्वर : हमिदा बानो), ‘बिखरे कितने रूप जगत में, बिखरे कितने रूप’ (स्वर : फ़ीरोज़्ा निज़ामी) ही गाणी कमालीची लोकप्रिय बनली होती.
वाडिया मूव्हीटोनने १९४६ साली होमी वाडिया यांच्या दिग्दर्शनाखाली ‘अमर राज़्ा’ चित्रपटाची घोषणा केली तेव्हा पुन्हा एकदा फ़ीरोज़्ा निज़ामी यांना संगीतकार म्हणून नियुक्त करण्यात आले. ‘प्राण त्याग कर तूने दीवानी, जग में बना दी अमर कहानी’, ‘तोडो, तोडो, तोडो दिल के तार, टूटे तो संगीत लुटाये’ (स्वर : मो. रफी), ‘मैं जब छेडूं, प्रेम तराना, नाचे मेरे साथ ज़्ामाना’ (स्वर : मो. रफी व मोहनतारा तळपदे), ‘इक चाँद वहाँ इक चाँद यहाँ’, ‘दिल पुकारे रे.. यही बोले क्या’ (स्वर : हमिदा बानो व कृष्णा गांगुली) यांसारख्या गाण्यांमुळे चित्रपट हिट ठरला.
डी.आर.डी. प्रॉडक्शनचा ‘नेक परवीन’ हा १९४६ सालात फ़ीरोज़्ा निज़ामींच्या संगीतामुळे हिट ठरलेला चित्रपट! दिग्दर्शक एस. एम. यूसुफ यांनी तो दिग्दíशत केला होता. हा मुस्लीम पाश्र्वभूमीवरचा चित्रपट होता. हा चित्रपट फारसा चालला नसला तरी यातली गाणी तुफान हिट ठरली. यातली ‘तेरी ज़ात पाक है ऐ ख़ुदा तेरी शान जल्ला जलाल हूं’ (स्वर : हमिदा बानो-कोरस), ‘सुन ले तू मेरी इल्तेजा सुन ख़ुदा मेरी दुआ’, ‘दुनिया में भी नज़्ार कर ओ आसमानवाले’ (स्वर : ज़्ाीनत बेग़म), ‘दुनिया क्यूं गरीबों को जीने नही देती’ (स्वर : ज़्ाीनत-हमिदा) ही गाणी कमालीची गाजली. याशिवाय १९४७ साली फ़ीरोज़्ा निज़ामी यांचे ‘पती सेवा’ व ‘रंगीन कहानी’ हे दोन चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले असले तरी यातली गाणी रसिकांनी उचलून धरली.
१९४७ साली शौकत आर्ट प्रॉडक्शन्सचा ‘जुगनू’ हा चित्रपट फ़ीरोज़्ा निज़ामी यांच्यासाठी ‘लॉटरी’ लागावी तसा आपण होऊन चालून आला. निज़ामीसाहेब मनोमन सुखावले. हुरूपाने चाली बांधायला बसले. नूरजहाँ आणि दिलीपकुमार या चित्रपटात मुख्य भूमिकेत होते. ‘हमें तो शामे-ग़म में काटनी हैं िज़्ादग़ी अपनी’, ‘तुम भी भुला दो मैं भी भुला दूं’, ‘आज की रात, साज़्ो-दिले-पुरदर्द न छेडम्’, ‘उमंगे दिल की मचली, मुस्कुराई िज़्ादगी अपनी’ (स्वर : नूरजहाँ) यासारख्या बेहतरीन चाली बांधून फ़ीरोज़्ा निज़ामी साहेबांनी आपल्यावर नूरजहाँ व शौकत रिज़्ावी या दाम्पत्याने टाकलेला विश्वास सार्थ ठरविला. रफीला ‘वो अपनी याद दिलाने को इक इश्क़ की दुनिया छोडम् गये’ या विनोदी गीतात संधी देऊन धमाल उडवून दिली. रिज़्ावी साहेबांनी रफीला गाणे म्हणताना चक्क कॉलेजकुमारच्या रूपात पडद्यावर पेश केले. रफीने यापूर्वी ‘लला मजनू’ (१९४५) चित्रपटात फकिराच्या भूमिकेत अभिनय केला होता. नंतर ‘समाज को बदल डालो’ या चित्रपटातही तो दिसला होता. परंतु या चित्रपटातले त्याचे तरुण वयातले भाबडे दर्शन सुखावून गेले.
‘जुगनू’त नूरजहाँ व दिलीपकुमार यांच्यावर एक युगुलगीत कंपोझ करायचे ठरले आणि फ़ीरोज़्ा निज़ामींपुढे धर्मसंकट उभे ठाकलें.. नूरजहाँ त्या काळातली सर्वाधिक प्रतिष्ठित व मान्यताप्राप्त गायिका-अभिनेत्री होती.. तिची ग्रहणशक्ती अफाट होती. गाण्याची चाल एकदा दोनदा समजावून घेतली केली की ‘टेक्’ फायनल झालाच म्हणून समजा! रफी, गाण्याच्या रिहर्सलसाठी भरपूर वेळ खर्च करायचा. गाणे पूर्णतया आत्मसात केल्याशिवाय तो माईकसमोर उभा राहत नसे. शिवाय रफीसारखा नवोदित पोरसवदा गायक नूरजहाँसारख्या प्रस्थापित गायिकेबरोबर युगुलगीतासाठी उतरविणे फ़ीरोज़्ा निज़ामींना प्रशस्त वाटत नव्हते. त्यामुळे ते रफीला नूरजहाँबरोबर संधी देण्यासाठी कांकूं करू लागले. रफीला आपण या गाण्याला न्याय देऊन शकू याविषयी जबरदस्त आत्मविश्वास वाटत होता; परंतु फ़ीरोज़्ा निज़ामींना तशी खात्री वाटत नव्हती. कोंडी फुटायचे नाव घेत नव्हती.
नूरजहाँच्या कानावर ही गोष्ट जाताच तिने याबाबत थेट निज़ामीसाहेबांकडेच विचारणा केली.. त्यांनी तिच्यासमोर अडचणींचा पाढाच वाचला. रफी अजून या क्षेत्रात नवा आहे, त्याचा आवाज कच्चा आहे, त्याच्याबरोबर तुम्हाला अनेक रिहर्सल कराव्या लागतील. वगरे वगरे. नूरजहाँने रफीच्या स्वरातली मिठास, गायकीचा पल्ला आणि आवाजाची रेंज ओळखली होती. ती म्हणाली, ‘‘मेहनतीला मी घाबरत नाही. कितीही रिहर्सल करायची माझी तयारी आहे; परंतु हे गाणे माझ्याबरोबर मोहंमद रफीच गाईल.’’ प्रत्यक्ष चित्रपट संस्थेच्या मालकिणीनेच असा आग्रह धरल्यावर फ़ीरोज़्ा निज़ामींचा नाइलाज झाला आणि यमन कल्याणवर आधारित एक अजरामर युगुलगीत रफी व नूरजहाँच्या आवाजात ध्वनिमुद्रित झाले. दिलीपकुमारसाठी हा रफीचा पहिलाच ‘प्लेबॅक’ होता. या गाण्याने मिळवलेली लोकप्रियता अभूतपूर्व होती. गल्लीबोळातून आणि घराघरांतून हे गाणे गाजले. आजही हे चिरंतन गाणे रसिकांच्या स्मृतिमंजूषेत सदासतेज आहे. आपल्या करिअरला दिशा देण्यासाठी नूरजहाँने लावलेला हातभार आणि तिने दाखविलेला मनाचा मोठेपणा रफीने कायम स्मरणात ठेवला. चाळीसच्या दशकातले रफीचे हे पहिलेवहिले सुपरडुपर हिट युगलगीत ठरले. गाण्याचे बोल होते.
यहाँ बदला वफा का बेवफाई के सिवा क्या है,
मुहब्बत करके भी देखा मुहब्बत में भी धोख़ा है
कभी सुख है कभी दुख है, अभी क्या था अभी क्या है
यूं ही दुनिया बदलती है, इसी का नाम दुनिया है
कभी सुख है कभी दुख है,अभी क्या था अभी क्या है
तडम्पने भी नहीं देती हमें मजबुरियाँ अपनी
मुहब्बत करनेवालोंका तडम्पता किसने देखा है
मुहब्बत करके भी देखा मुहब्बत में भी धोख़ा है
बडम्े अरमानसे वादोंने दिल में घर बसाया था
वो दिन जब याद आतें हैं कलेजा मुंह को आता है
यहाँ बदला वफा का बेवफाई के सिवा क्या है..
फाळणीनंतर खरे तर नूरजहाँला भारतातून पाकिस्तानात जायचे नव्हते. परंतु भारतात तिच्या जिवाला धोका असून तिला काही समाजकंटक मारून टाकण्याच्या तयारीत आहे असे समजले आणि धास्तावलेल्या नूरजहाँने पाकिस्तानात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. पाठोपाठ फ़ीरोज़्ा निज़ामी यांनीसुद्धा पाकिस्तानाकडे प्रयाण केले.
१९५० साली फ़ीरोज़्ा निज़ामी यांनी शकूर क़ादरी दिग्दíशत ‘हमारी बस्ती’ या चित्रपटाला संगीत दिले होते; परंतु चित्रपट ‘सुपर फ्लॉप’ ठरला. त्यानंतर शौकत हुसन रिज़्ावीने ‘चन वे’ (१९५१) या इम्तियाज़्ा अली ताजच्या कथेवर बेतलेल्या पंजाबी चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी फ़ीरोज़्ा निज़ामी यांच्यावरच टाकली.
‘चन वे’त निज़ामींनी नूरजहाँच्या आवाजात स्वरबद्ध केलेली ‘चन दिया टोटिया दिल्लाँ दियां खोटिया’, ‘मेरे अंगणे विच चरिया चन जवानी दा’, ‘तेरे मुखडे दा काला काला तिल वे, वे मुंडिया सियालकोटिया’, ‘जादू कोई पा गया दिल साडा आ गया’, ‘चंगा बनायाऽइ साणूं खिलौना’ यासारखी नादमधुर गाणी रसिकांनी अक्षरश: डोक्यावर घेतली व पाकिस्तानात फ़ीरोज़्ा निज़ामी यांच्या नावावर पहिल्यावहिल्या हिट चित्रपटाची नोंद झाली.
‘चन वे’च्या सांगीतिक यशाने प्रभावित झालेल्या असलम लोधीने आपल्या ‘दुपट्टा’ (१९५२) या उर्दू सिनेमाचे संगीत दिग्दर्शन फ़ीरोज़्ा निज़ामी यांच्यावर सोपवले. चित्रपटात नूरजहाँची मध्यवर्ती भूमिका असल्यामुळे उत्साहित झालेल्या निज़ामींनी नूरजहाँच्या स्वरात एकापेक्षा एक सरस गाण्यांची सौगात चित्रपटाला दिली. ‘तुम िज़्ादगी को ग़म का फ़ंसाना बना गये’, ‘मोरे मन के राजा आजा सुरतिया दिखा जा’, ‘जिगर की आग से इस दिल को जलता देखते जाओ’, ‘साँवरिया तोहे कोई पुकारे, तोहे कोई पुकारे आ जाऽ रे सोये चाँद सितारे’, ‘नाचे जिया होऽ नाचे जिया छाई घटा होऽ छम छमा छम’, ‘बात ही बात में, जी चाँदनी रात में, जिया मेरा खो गया’ ‘मैं बन पतंग उडम् जाऊंगी’ या गाण्यांनी भारत-पाकिस्तानातील संगीतशौकिनांना वेड लावले. ‘दुपट्टा’ हा चित्रपट फ़ीरोज़्ा निज़ामी यांच्या सांगीतिक कारकिर्दीतला परमोच्च िबदू म्हणावा लागेल. या चित्रपटातले सर्वाधिक हिट व लोकप्रिय गाणे नूरजहाँने गायले होते..
एक टीस जिगर में उठती है
एक दर्दसा दिल में होता है
हम रातों को उठकर रोतें हैं
जब सारा आलम सोता हैं
होऽ चाँदनी रातें, चाँदनी रातें
सब जग सोये, हम जागे,
तारोंसे करें बातें..
चाँदनी रातें, चाँदनी रातेंऽ
‘दुपट्टा’च्या यशानंतर फ़ीरोज़्ा निज़ामी यांनी ‘शरारे’, ‘सोहनी’, ‘इंतख़ाब’ (१९५५), ‘किस्मत’ (१९५६), ‘सोलह आने’, ‘राज़्ा’ (१९५९), ‘ज़्ांजीर’, ‘मंज़िल’ (१९६०), ‘मंगोल’ (१९६१), ‘सौकन’ (१९६५), ‘ज़्ान, ज़्ार ते ज़्ामीन’(१९७४) यांसारख्या मोजक्याच चित्रपटांतून संगीत दिले. तथापि ‘जुगनू’ आणि ‘दुपट्टा’च्या संगीतातली जादू त्यांना पुन्हा निर्माण करता आली नाही.
संगीतकार म्हणून काम करीत असताना फ़ीरोज़्ा निज़ामी वेळ मिळेल तेंव्हा पाकिस्तान रेडिओवर शास्त्रीय गायनासाठी आवर्जून हजेरी लावायला जात. पाकिस्तान आर्टस् कौन्सिलच्या संगीत विभागाचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. दिनांक १५ नोव्हेंबर १९७५ रोजी आपल्या मृत्यूपर्यंत ते या पदावर कार्यरत होते.