उत्सव मानवाला आनंद देतात, प्रसन्नता मिळवून देतात. उत्सवामुळे संघशक्ती वाढून लोकहिताचे विधायक कार्य व्हावे बहुधा हाच उद्देश उत्सवांमागचा असावा. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला गणेश उत्सव याचाच भाग असावा. उत्सव साजरा का करायचा, यामागची कारणमीमांसा समजली की उत्सव साजरे करण्याला महत्त्व प्राप्त होईल. शासनाने दिलेली सार्वजनिक सुट्टी कोणत्या प्रासंगिकतेमुळे दिली याचे भानही काही महाभागांना नसते. हल्ली उत्सव साजरे करण्याच्या पद्धतीही अत्यंत चुकीच्या झाल्या आहेत. वाहने अडवून, अरेरावी करून निधी संकलनाचे काम नेटाने सुरू असते. विरोध करून विघ्न ओढवून घेण्यापेक्षा वर्गणी दिलेली बरी या कारणांचा कार्यकर्ते वेगळाच अर्थ काढतात. भव्य रोषणाई, महागडे देखावे, डी.जे. लावण्यापेक्षा उद्बोधनाचे, होतकरूंना मदत करण्याचे कल्याणकारी उपक्रम हाती घेतले तर ज्या उद्देशासाठी निधी उभारला त्या निधीचा सदुपयोग होईल. ज्या देव-देवतांच्या नावे वर्गणी गोळी केली त्या दैवी शक्तीला धन्य-धन्य झाल्याचे वाटेल. आज उत्सवामध्ये, अश्लील, कानठळय़ा बसविणारी गाणी वाजविली जातात. डीजेच्या आवाजाने कान तर फाटणार नाहीत ना, अशी शंका निर्माण होते. गुलालाच्या अतिवापरामुळे डोळय़ांना हानी पोहोचते. उत्सव जरूर साजरे करावेत, संस्कृतीने उत्सव दिले आहेत, पण आपल्या कृतीमुळे इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. उत्सव जरूर साजरे करा, पण कुठलीही हानी होणार नाही, कल्याणकारी कामे करण्यासाठी दिशा मिळेल, याची जाणीव ठेवून उत्सवांना हात घातला तर सर्वाना आनंदच होईल.
‘वाचक लेखक’ या सदरासाठी लेख पाठवताना मेल अथवा पाकिटावर ‘वाचक लेखक सदरासाठी’ असे स्पष्टपणे नमूद करावे. आमचा पत्ता: लोकप्रभा, प्लॉट नं. ईएल-१३८, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, महापे, नवी मुंबई-४००७१० फॅक्स : २७६३३००८ Email – response.lokprabha@expressindia.com