पावसाळ्याबरोबर सर्वानाच वेध लागतात ते पुढच्या तीन-चार महिन्यांमध्ये साजऱ्या होणाऱ्या विविध सणांचे. शेकडो वर्षे परंपरागत सुरू असणाऱ्या या सणांचा, रूढीपरंपरांचा अर्थ समजून घेऊन मगच ते साजरे करायला हवेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘या सृष्टीचे कौतुक जाण बाळा, नेमेचि येतो मग पावसाळा’ या उक्तीला खोटं ठरवत पाऊस आता नेमाने अनियमितपणे येतो आहे. म्हणजे ७ जूनला ठरल्याप्रमाणे मृग नक्षत्र लागते, पण मृगाचा पहिला पाऊस त्या दिवशी येईलच असं नाही. त्याआधी मान्सून येऊ घातलाय, तो अमुक ठिकाणापर्यंत आलाय, तो पुढं सरकतोय अशा त्याच्याविषयीच्या आशादायक बातम्या हवामान खात्याचा हवाला देत वृत्तपत्रांत आणि विविध वाहिन्यांवर झळकू लागतात. आपल्यालाही खात्री वाटते, या वर्षी वेळेवर येणारच बरं पाऊस, मागच्यासारखा दडी मारून नाही बसणार तो. अन् खरोखरच काळय़ा मेघांनी आभाळ भरून जाते, आपण सर्व पूर्वतयारी करून ठेवतो अन् तो मात्र वाऱ्याच्या साथीने आपल्याला वाकुल्या दाखवत, हूल देऊन निघून जातो. पण पावसाळय़ात पाऊस जरी नियमित येत नसला तरी चातुर्मास मात्र सालाबादप्रमाणे येतच असतो. उन्हाळा संपला की चातुर्मासाचे वेध लागतात आणि चातुर्मास म्हणजे सणांची लयलूट आणि व्रतवैकल्यांची विपुलता.
आषाढी एकादशीला ‘पांडुरंग-विठ्ठल’ असा टाळमृदंगाच्या साथीने नामघोष करीत वारकऱ्यांची पाऊले पंढरीची वाट चालू लागतात. पूर्वी नियमित पडणाऱ्या पावसामुळे वेळेवर पेरण्या आणि शेतीची इतर कामे करून निश्चिंत मनाने शेतकरी विठ्ठलाच्या दर्शनाला जात असत. आता कधी पाऊस नसतो, पेरण्या खोळंबतात. तरी मनात आशा बाळगून, श्रद्धेच्या पाठबळावर त्यांच्या पायांना पंढरीची ओढ लागते. पण मुखात हरिनाम असलं तरी मनात चिंतेचं काहूर असतं. पाऊस असा बेभरवशाचा का झाला बरं?
नंतर येणाऱ्या गुरुपौर्णिमेला गुरुचरणी आदरांजली वाहिली जाते अन् दिव्याच्या अमावास्येला आपलं घरदार उजळणाऱ्या दिव्यांची पूजा करून कृतज्ञता व्यक्त केली जाते.
आता येतो मनभावन श्रावण. बाहेर रिमझिमणाऱ्या श्रावणसरी अन् मनात उठणाऱ्या आनंदलहरी तनमनाला सारख्याच भिजवीत असतात. नागपंचमी येते, झाडाझाडांवर झोके बांधले जातात. आणि गाण्यांच्या सुरांबरोबर मन त्या हिंदोळय़ांवर उत्साहानं झुलत असतं. नागपंचमीची प्रमुख परंपरा म्हणजे नागाची पूजा.
आपला देश हा कृषिप्रधान देश म्हटला जातो. शेतं म्हणजे फक्त पिके, झाडे, पाणी इ. च फक्त नसतात, तर कीटक, अळय़ा, उंदीर, नाग, पक्षी इ. प्राणीही शेतातच असतात. यातील काही शेतीला उपकारक तर काही अपायकारक असतात. उंदरासारखे प्राणी शेतातील पिकांचे खूप नुकसान करतात. शेतात नाग असल्याने उंदरांवर नियंत्रण राहते, धान्याचं संरक्षण होते. ही अन्नसाखळी परस्परपूरक तर आहेच, पण पर्यावरण पोषकही आहे. त्यामुळे आपल्या पूर्वजांनी नागांविषयी कृतज्ञता म्हणून त्यांची पूजा करणे सुरू केले असावे. त्यांना अपाय न करता त्यांची पूजा करत असतील.
आता केवळ आपल्यासारख्या शहरातील लोकांची सोय व्हावी म्हणून नागांना गारुडी बंद पेटाऱ्यात घालून आपल्यापर्यंत आणत असतात. पण केवळ या एका दिवसासाठी गारुडी नागांना कित्येक दिवस आधी पकडून उपाशी ठेवतात, त्यांच्या विषग्रंथींना अपाय करतात. खूप दिवसांच्या उपवासामुळेच नागपंचमीच्या दिवसापर्यंत त्यांना डी हायड्रेशन झालेले असते. दूध हे मुळात नागाचं अन्न नाहीच. त्यामुळे आपण दूध पाजून त्यांच्या हालात भरच घालत असतो. त्यामुळेच नागपंचमीनंतर कित्येक नाग अर्धमेले होतात आणि कित्येक मृत्युमुखी पडतात. निसर्गाची साखळी खंडित होते.
सांगली जिल्हय़ातील बत्तीस शिराळे या गावी मोठय़ा प्रमाणात नागांची मिरवणूक काढली जायची त्यावर आता बंदी आली आहे.
अशा रीतीने आपण केवळ आपल्या अंधश्रद्धेपोटी नागांना मृत्युपंथाला लावत नाही ना याचा प्रत्येक सुशिक्षित, सुसंस्कृत नागरिकाने जरूर विचार करायला हवा. पूजा केली नाही म्हणून अपराधी भाव वाटत असेल तर मात्र खुशाल सरसकट सर्वानीच नागाच्या फक्त चित्राची पूजा करायला हरकत नसावी.
फक्त नागपंचमीच्या दिवशीच नागांची पूजा करून कृतार्थ झाल्याचे समाधान मिळवण्यात काय हशील, एरव्ही वर्षांच्या कुठल्याही दिवशी घरात, परिसरात नाग, साप आढळल्यास त्यांना न मारता सर्पमित्रांना बोलावून त्यांना दूर नेऊन सोडल्यास निसर्गाचे चक्र त्यांच्यापुरते व्यवस्थित चालू राहील.
नागपंचमीनंतर येणारा रक्षाबंधनाचा सण. भावा-बहिणीच्या पवित्र नात्याला राखीच्या रेशीम-रज्जूने दृढ करणारा भाऊ नसला तर चंद्राला भाऊ मानून ओवाळणे ही आपली परंपरा आहे. किंवा एखाद्याशी भावाचे नाते जोडून ते जन्मभर निभावणे हीसुद्धा आपलीच संस्कृती आहे. मेवाडची राणी कर्मावती हिने मुघलसम्राट हुमायुनला राखी पाठवून बहिणीचे नाते जोडले होते आणि आपल्या व आपल्या राज्याच्या संरक्षणाची मागणी केली होती असं इतिहास सांगतो.
एकंदरीत आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीत पुरुषाने स्त्रीचे पर्यायाने भावाने बहिणीचे संरक्षण करावे अशी परंपरा चालत आली आहे. स्त्री ही अबला असल्याने ती परावलंबीच असणार असे समाजाने गृहीतच धरले होते. स्त्रियांनाही त्यात काही वावगे आहे असे वाटत नसे. दुय्यम भूमिका पूर्वापार संस्कारांमुळे तिने निमूटपणे सहजच स्वीकारली होती. त्यामुळे आधी पित्यावर, मग पतीवर, नंतर पुत्रावर ती सतत अवलंबून राहिली.

पण आता काळ बदलला. स्त्री बऱ्याच अंशी सक्षम बनली. स्वत:चं रक्षण करण्याइतकी सबला बनण्याचा ती यशस्वी प्रयत्न करतेय. अर्थात हे चित्र सार्वत्रिक आहे असं नाही, पण प्रातिनिधिक नक्कीच आहे. शिवाय कुटुंबाचा आकारही मर्यादित झालाय. त्यामुळे एखाद्या कुटुंबात फक्त दोघी बहिणीच असतात. मग त्यांनी भाऊ नसण्याची खंत करण्याऐवजी एकमेकींनाच राखी बांधली तर.. शिवाय संरक्षण फक्त शारीरिक संकटासाठीच हवे असते असे नाही, खूपदा मानसिक आधारही लाखमोलाचा असतो.
एखादे आई, वडील, बहीण, भाऊ असे चौकोनी कुटुंब असते. पण दुर्दैवाने काही अनवस्था प्रसंग ओढवला अन् बहीण मोठी असली तर ती स्वत:ची सर्व सुखे बाजूला सारून आई-बापांचा अन् भावाचाही भार स्वत:च्या खांद्यावर पेलते. अशी कित्येक कुटुंबे आपल्याला आजूबाजूला दिसतात. अशा वेळी कुणी कुणाला राखी बांधणे उचित ठरेल..
किंवा एकुलत्या एक मुलीने आपल्या आई-वडिलांचा एखाद्या मुलापेक्षा कांकणभर सरसपणे सांभाळ करावा अन् तरीही तिने ‘राखीसाठी’ कुणाला तरी भाऊ मानावे..
रक्षण करणारी ती ‘राखी’ असा जर तिचा अर्थ आहे, मग आजच्या जमान्यात ते मनगट पुरुषाचे असो किंवा स्त्रीचे, काय फरक पडतो..
आणि भाऊ-बहीणच कशाला हवेत! दोन शेजाऱ्यांनी, ते विभिन्न धर्माचे असले तरी किंवा तेव्हाच खरं तर एकमेकांना राखी बांधली आणि संकटकाळी परस्परांना साहाय्य करू असा संकल्प केला तर..
जरी कलाबुत, मोती, कुंदन, आरसे, वेगवेगळी छोटीशी खेळणी, छोटय़ांच्या वाहिन्यांमधील लोकप्रिय व्यक्तिरेखा, स्पंजच्या मोठय़ा राख्या, नाजूकशा देखण्या राख्या, सोन्या-चांदीच्या आणखी कशा कशाच्या श्रावणाच्या आगमनापासूनच दुकाने विविधरंगी, विविधढंगी राख्यांनी सजू लागतात अन् राखीपौर्णिमेपर्यंत समस्त एकंदरीत उद्देशापेक्षा देखाव्याची परंपरा इथेही दिसून येतेच.
पण आपल्या सगळय़ांनीच एक वेगळा विचार करण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे. आपले रक्षण व्हावे या हेतूनेच जर आपण राखी बांधत असू तर इतर कोणाहीपेक्षा वृक्षांनाच ती बांधणे जास्त योग्य ठरेल. होय, ‘वृक्षांनाच.’ कारण स्वत:च्या ऐहिक सुखासाठी आपली निसर्गाला ओरबाडून जी चढाओढ चालू आहे अन् त्यासाठी जी भयानक वृक्षतोड सुरू आहे ती बघता आपले रक्षण करण्यासाठी कुठल्याच राखीचा धागा उपयोगी पडणार नाही.
राखी पौर्णिमेप्रमाणेच हरितालिका, महालक्ष्म्या, विजयादशमी, होळी इ. जे सण कुठल्या ना कुठल्या झाडांशी संबंधित आहेत, त्या प्रत्येक सणाच्या रूढीमागचा अर्थ जाणून घ्यायला हवा. नव्या परिस्थितीशी, नव्या काळाशी त्या रूढीची सांगड घालायला हवी. अन्याथा डोळे झाकून पूर्वापार परंपरा म्हणून प्रत्यक्ष रानावनांत न जाता बाजारातून पैसे फेकून पाने, फुले, फांद्या असे झाडांचे अवशेष घरी आणायचे अन् धर्म सांभाळण्याच्या अभिनिवेशात ती झाडे मात्र ओकीबोकी करायची, यात आपण झाडांबरोबर आपल्याही पायांवर कुऱ्हाड मारून घेत आहोत.
नुकताच अनुभवलेला हा किस्सा पुरेसा बोलका आहे. पुण्यातील नव्याने वसलेली उच्चभ्रू वस्ती. वटपौर्णिमेची संध्याकाळ. मोठमोठी झाडे तोडून, उपजाऊ शेती उजाड करून, त्या जमिनीवर बांधलेल्या उंचच उंच इमारतींच्या आवारातील छोटय़ाशा कृत्रिम बागेत नेहमीप्रमाणे काही भगिनी बसलेल्या, आणि ‘आज पूजेला वडाचं झाड कुठेच मिळालं नाही/ खूप दूर जावं लागलं बाई/ मी तर बाई फांदीच आणली घरी पूजेसाठी, काय करणार?’ न राहवून ‘या फांद्या उद्या तुम्ही सोसायटीत किंवा जवळपास रुजवा म्हणजे पुढच्या वर्षी सोय होईल’ असं मी त्यांना म्हणताच ‘हे काय भलतंच’ अशा आविर्भावात त्या माझ्याकडं पाहू लागल्या. आता पुढच्या वर्षी यांना फांद्या तरी मिळतील की नाही कुणास ठाऊक.
खरं म्हणजे दैनंदिन कामकाजाच्या रगाडय़ातून थोडा विरंगुळा मिळावा, आयुष्यातील तोच तोपणा जाऊन पुढील कामांसाठी नव्याने उभारी लाभावी या मर्यादित हेतूने, पुराणातील कथांचा आधार घेऊन, ऋ तुकालाशी जुळवून, अरोग्यास लाभप्रद होतील म्हणून आणि निसर्गाशी घट्ट नाते जोडण्यासाठी आपल्या पूर्वजांनी हे सण उत्सव निर्माण केले. आपण त्यातील फक्त धार्मिकता सांभाळून त्यांना दिलेले हे दिखाऊ, बेगडी रूप म्हणजे निव्वळ उपचार राहिला आहे. तेव्हा आता फक्त विचार नाही, कृती करू या, निसर्ग वाचवू या.
‘सावध ऐका, पुढच्या हाका
करू निसर्गाचे रक्षण
अस्तित्व आपले टिकण्यासाठी
राखू पर्यावरण’

‘वाचक लेखक’ या सदरासाठी लेख पाठवताना मेल अथवा पाकिटावर ‘वाचक लेखक सदरासाठी’ असे स्पष्टपणे नमूद करावे. आमचा पत्ता: लोकप्रभा, प्लॉट नं. ईएल-१३८, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, महापे, नवी मुंबई-४००७१० फॅक्स : २७६३३००८  Email – response.lokprabha@expressindia.com

मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Festivals and traditions