फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्री ही खरे तर व्यापार-उद्योगाच्या संदर्भातील अनेक कंपन्या आणि संघटनांची शिखर संस्था. या संस्थेतर्फे गेली काही वर्षे फिक्की फ्रेम्स हा मनोरंजन उद्योगाच्या संदर्भातील एक उपक्रम राबविला जात आहे. मनोरंजनाचे क्षेत्र प्रतिवर्षी अनेक पटींनी वाढते आहे, त्यांच्या अर्थशास्त्राचा परिघ वाढतो आहे, हे लक्षात आल्यानंतर फिक्कीने या क्षेत्राकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. फिक्की ही थेट अर्थशास्त्राशी संबंध असलेली व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांची संघटना आहे. मनोरंजनाच्या क्षेत्राला ‘मूल्य’ आल्यानंतर त्यांनी ‘फिक्की फ्रेम्स’ हा मनोरंजन क्षेत्राला वाहिलेला उपक्रम सुरू केला. खरे तर हा उपक्रम म्हणजे तीन दिवसांची व्यावसायिकांची परिषदच असते. या ‘फिक्की फ्रेम्स’तर्फे प्रतिवर्षी पाहणी केली जाते आणि अहवाल मांडले जातात. त्यात गेल्या काही वर्षांत असे लक्षात आले आहे की, भारतातील सर्वाधिक व्यवहार होणारे क्षेत्र हे मनोरंजन असणार आहे. निव्वळ मनोरंजन हा मोठाच उद्योग आहे. त्यामुळेच तर सायंकाळी प्राइम टाइमला डोके गहाण टाकून भारतीय मंडळी बहुसंख्येने टीव्हीसमोर बसलेली असतात. मग रोज नव्या साडय़ा आणि दागदागिन्यांनी सजलेल्या अवस्थेत भारतातील किती घरांमध्ये स्वयंपाक होतो असा प्रश्न त्या वेळेस मनालाही शिवत नाही. कारण तिथे डोक्याचा काहीच संबंध नसतो.
आता वार्ता अशी आहे की, या फिक्कीला आता एक नवे क्षेत्र खुणावत असून पुढच्या निवडणुकांपासून फिक्कीने ‘फिक्की- इलेक्शन्स’ नावाचा नवा उपक्रम दर पाच वर्षांनी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.. अर्थात कळते- समजते. कारण दर पाच वर्षांनी होणाऱ्या निवडणुकांच्या निमित्ताने अर्थशास्त्राला मोठीच चालना मिळते, असा आजवरचा अनुभव आहे. या कालखंडात होणारी लक्ष्मीची आवक-जावक ही कोणत्याही उद्योग समूहास लाजवणारी अशीच असू शकते. किंबहुना फिक्कीने याचाही व्यवस्थित पाहणी अहवाल तयार केला तर त्यांना, अर्थशास्त्राच्या वर्तनाचे काही नवे फंडेही यात सापडू शकतील. शिवाय ज्या उद्योगाला भविष्यामध्ये खूप मोठय़ा विस्ताराचे भवितव्य आहे, असे फिक्कीला वाटते ते मनोरंजन हा तर आता नव्या राजकारणाचा पायाच होऊ पाहतो आहे!
वानगीदाखल आपण गेल्या दीड आठवडय़ांमध्ये निवडणुकांच्या रणधुमाळीत घडत गेलेल्या घटना पाहू. मग आपल्याला असे लक्षात येईल की, बॉक्स ऑफिसवर तुफान चालणाऱ्या एखाद्या दे-मार गल्लाभरू चित्रपटामध्ये ज्याप्रमाणे रसिक प्रेक्षकांना आवडेल ते सारे देण्यात येते, त्याचप्रमाणे अलीकडे निवडणुकांचेही झाले आहे. पूर्वीच्या पिढीला चित्रपटांमधील संवाद तोंडपाठ असायचे. आता संवादांबरोबरच ग्राफिक्सही नेत्रसुखद असल्याने लक्षात राहतात. पण म्हणून काही संवादांचे (डायलॉग) महत्त्व कमी झालेले नाही. निवडणुकीतील काही संवादांवर एक नजर टाकली तर इथेही संवादांना तेवढेच महत्त्व असल्याचे लक्षात येईल.. कुणी म्हणेलही, ‘क्या, डायलॉग मारा है..!’
‘मुझे विश्वास है, आप ‘जहेर की, खेती’ बोने नही देंगे’-काँग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी
‘आप को लगता है की, छत्तीसगढ पर ‘खुनी पंजे’ का साया न पडे तो कमल पर बटन दबाये’-भाजपचे पंतप्रधानपदाचे दावेदार नरेंद्र मोदी
‘मोदी तो ‘मौत का सौदागर’ है’-सोनिया गांधी
‘अब की बार इलेक्शन में एकही बात याद रखना. इलेक्शन में तय होगा कयादत (नेतृत्व), वजूद (आयडेंटिटी) और वकार (स्वाभिमान). हम लडेंगे जो ठोक के जवाब देना जाने. मोदीने जो गुजरात में किया वो यूपी में करेंगे तो बोटी काट देंगे छोटी छोटी’ -काँग्रेसचे सहारनपूरचे उमेदवार इम्रान मसूद
सध्या टीआरपी याच संवादांना अधिक आहे. अगदीच तुम्ही तरुण असाल आणि सोशल नेटवर्किंगवर अधिक सक्रिय असाल तर तिथेही जाऊन पाहा, याच संवादांना सर्वाधिक लाइक- डिस्लाइक्स मिळताहेत. चॅनलवाल्यांनी तर २४ तास त्याचा रतीबच घालण्यास सुरुवात केली आहे.
भारतीय माणसाला चटकदार, मसालेदार संवादांची सवय आहे, असे म्हणतात; किंबहुना म्हणून तर पूर्वी तोंडपाठ असलेल्या चित्रपटातील संवादांची जागा आता टीव्ही मालिकांमधील संवादांनी आणि लकबींनी घेतली आहे. त्यामुळे भारतीय माणसाला सदासर्वकाळ प्रिय असलेले हे मनोरंजनाचे वारे जराही कमी पडू द्यायचे नाही, याची खातरजमा सर्वच राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांनी करण्यास सुरुवात केली आहे.
यात थोडी विनोदाची कमी होती, ती तर आता थेट राष्ट्रवादी जाणत्या नेत्यानेच भरून काढली. माथाडी कामगारांचे नेते अण्णासाहेब पाटील यांचा स्मृतिदिन सोहळा अलीकडेच नवी मुंबईत पार पडला. त्यात विनोदाची पखरण करताना शरद पवार म्हणाले, ‘गेल्या निवडणुकीत घोटाळा झाला होता. कारण मुंबईत आणि साताऱ्यात एकाच वेळेस मतदान झाले होते. यंदा मात्र साताऱ्यात १७, तर मुंबईत २४ तारखेला मतदान आहे. त्यामुळे तिथेही घडय़ाळावर शिक्का हाणायचा आणि इथेही शिक्का हाणायला यायचे. पण येताना पहिली शाई पुसून टाकायची, नाही तर घोटाळा होईल.’
पण पवारसाहेबांचा हा विनोद काही कुणाला कळला नाही. मग ‘आप’पासून ते भाजपपर्यंत सर्वानीच निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आणि अखेरीस साहेबांना सांगावे लागले की, निवडणुकीच्या गांभीर्याने राजकारण तापलेले, त्यात वातावरणातला उष्माही वाढलेला म्हणून शिडकाव्यासारखी त्यांनी थोडी विनोदाची कारंजी फवारली.. आणि म्हणाले, करा दोनदा मतदान. ‘पण शाई पुसून’ असे भानही दाखवले तर ते राहिले बाजूला, त्याला दाद द्यायची सोडून विरोधी पक्ष गेले निवडणूक आयोगाकडे. पण आयोगाला मात्र बहुधा पवारांचा विनोद कळला असावा म्हणून त्यांनी त्यांचा खुलासा मान्य केल्याचे कळते- समजते.
मनोरंजनाचे क्षेत्र, निवडणूक, अर्थशास्त्र आणि त्यातील भविष्य व भवितव्य हे पवार यांना कळत नाही, असे कोण म्हणेल? पण राजकारणातील इतरांना तेवढी समजही नाही आणि काळाच्या पुढे जाणारी व्हिजनही नाही. पवारांनी केवळ हेलिकॉप्टरमधून पाहिले तरी त्यांना कळते कुठे लवासा होऊ शकते आणि कुठे आयपीएल रुजू शकते. त्यांची नजर ही एकाच वेळेस घारीसारखी आणि दुसरीकडे ‘माये’चीही आहे. म्हणून तर जे एस्सेल ग्रुपला आयसीएलच्या माध्यमातून जमले नाही ते साहेबांनी आयपीएलच्या माध्यमातून करून दाखवले. पण त्यांची व्हिजन आणि विनोद समजून घेण्याची कुवतच विरोधकांमध्ये नाहीसे दिसते. मनोरंजनाच्या क्षेत्राला नाटय़ही लागते. केवळ विनोदावर मालिकाही फारशा चालत नाहीत आणि सिनेमाही. नाटय़ हे या साऱ्याचा आत्मा असतो. तो केवळ पवारांना जेवढा कळला तेवढा इतर कुणालाच कळला नाही. निवडणुकांमध्ये हे नाटय़रंग भरण्याचे कामही अखेरीस याच जाणत्या नेतृत्वास करावे लागले. अलीकडेच एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत साहेब म्हणाले.. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारपेक्षा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे वाजपेयी सरकार चांगले होते! तोपर्यंत सारे काही आलबेल असलेल्या काँग्रेसच्या गोटात चक्रावल्यासारखी स्थिती निर्माण झाली. पण त्यांनाही पवार कळलेच नाहीत. निवडणुकांच्या गंभीर वातावरणात ज्या नाटय़ाची कमी होती, त्याचीच फोडणी देत त्यांनी निवडणुकांच्या माध्यमातून रंजन करीत वातावरणात नाटय़ आणले होते. खरे तर त्यामुळे निवडणुकांचे वातावरण जिवंत केले होते. याला खरे तर दुसरी बाजूही होती. हे नाटय़ सेना-भाजपच्या गोटातही निर्माण झाले. त्यामुळे म्हणे काही काळ पुन्हा उद्धवजींच्या पोटात गोळा आला होता.. पण विदर्भवीर देवेंद्र फडणवीस लगेचच सरसावले आणि त्यांनी स्पष्टोक्ती केली की, निवडणुकांआधीपासून जे बरोबर आहेत तेच केवळ नंतरही सोबत राहतील.. पण फडणवीस आणि उद्धव ठाकरे दोघाही बिचाऱ्यांना पवार यांचे नाटय़ कळलेच नाही. ते आपले उगीचच घाबरल्यासारखे दिसले!
पवार कधीही एक दगड मारतात तेव्हा ते किमान तीन-चार पक्ष्यांची तरी शिकार करतातच करतात. गेली ४७ वर्षे राजकारणात राहायचे आणि तेही केंद्रस्थानी किंवा चर्चेत, हे काही खायचे काम नाही. या एकाच नाटय़ात त्यांनी पुतण्या अजितदादांनाही पेचात पकडले. क्षणभर त्यांनाही प्रश्न पडला की, जिभेला लगाम घाला, वाचन करा, संयम ठेवा असे सांगणारे हेच का ते काका? पण त्यांनी मनातला प्रश्न मनातच ठेवला. कारण बरेच महिने झाले ते संयम राखून आहेत. जरा वेळ मिळाला की म्हणे कृष्णाकाठी यशवंतरावांच्या समाधीस भेट देऊन ते आत्मक्लेशाच्या माध्यमातून आत्मशांतीच्या मार्गाचा शोध घेतात.. कळते, समजते!
तर आता वार्ता अशी आहे की, एकूणच या इंडियन पोलिटिकल लीग (आयपीएल- निवडणूक स्पेशल)मुळे फिक्कीचे लक्ष वेधले गेले आहे. या क्षेत्रात येत असलेला मनोरंजनाचा महापूर आणि कॉर्पोरेट कंपन्यांनाही लाजवणारे राजकीय अर्थशास्त्र यामुळे आता प्रत्येक निवडणुकीदरम्यान ‘फिक्की- इलेक्शन्स’ हा नवा उपक्रम राबविला जाणार आहे. त्यांना त्याचे तहहयात अध्यक्ष तर आताच आयते सापडले आहेत.. अर्थात जाणते पवारसाहेब! कारण असे म्हणतात की, त्यांना भविष्याची पावले आधीच कळतात!
 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा