मथितार्थ
सचिन रमेश तेंडुलकर या नावामध्ये शिकण्यासारखे बरेच काही दडले आहे. एखाद्याला आपल्या आयुष्यात त्याच्या आवडत्या क्षेत्रात दीर्घकाळ राहायचे असेल, खेळी खेळायची असेल तर आवश्यक गुण कोणते असतात याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सचिन तेंडुलकर! १५ नोव्हेंबर १९८९ साली पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रवेश केला. पण कारकीर्द किती जबरदस्त आहे पाहा, आपल्या आगमनाची वर्दी त्याने जगाला त्यापूर्वी एक वर्ष आधी म्हणजे १९८८ साली हॅरिस शिल्डमध्येच दिली होती. शालेय क्रिकेट स्पर्धेमध्येच त्याने सहकारी असलेल्या विनोद कांबळीसोबत थेट ६६४ धावांच्या भागीदारीचा आंतरराष्ट्रीय विक्रम नोंदवला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये येण्यापूर्वीच एक आंतरराष्ट्रीय विक्रम आपल्या नावावर असणे हेच अनोखे होते. अर्थात असे काही तुमच्या नावावर असते त्यावेळेस सुरुवातीपासून चाहत्यांच्या अपेक्षेचे जू तुमच्या मानेवर राहते. सचिनच्या बाबतीत मायदेशातील तमाम क्रिकेटप्रेमींच्या अपेक्षा तर त्याच्यावर होत्याच पण इतर देशांतील क्रिकेटवेडय़ांसाठीही तो देव होता. एवढेच काय तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असलेल्या ओबामांनाही सचिन तेंडुलकरला जाणून घेण्याचा मोह आवरला नाही! अशा या सचिनने गेल्याच आठवडय़ात कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली तेव्हा त्याच्यावर जगभरच्या सर्वच वर्तमानपत्रांत रकानेच्या रकाने मजकूर प्रसिद्ध झाला. काहींनी त्याच्या सातत्याविषयी लिहिले, काहींनी विक्रमादित्य म्हणून कौतुक केले. फार कमी जणांनी त्याच्या शारीरिक फिटनेसविषयी लिहिले, पण त्याच्या मानसिक – भावनिक फिटनेसविषयी मात्र कुणीच लिहिले नाही. सचिन तेंडुलकरच्या घडण्यामध्ये त्याच्या मानसिक – भावनिक फिटनेसचा वाटा सर्वात मोठा आहे. त्याच्याकडून ते सर्वाधिक शिकण्यासारखे आहे. शारीरिक फिटनेस ही पहिली पायरी असते, प्राथमिक शाळेसारखी. तिथे तुमचा पाया पक्का होता. त्यानंतर इंटलेक्च्युअल फिटनेस म्हणजे माध्यमिक शाळा. त्यानंतर येतो तो मानसिक किंवा भावनिक फिटनेस; हा महाविद्यालयाच्या टप्प्याप्रमाणे असतो. आणि अखेरच्या टप्प्यावर असतो तो आध्यात्मिक फिटनेस (म्हणजे बुवाबाजी किंवा गंडोदोरे नव्हे. तो तुमच्या कामाच्या श्रद्धेय अशा नेमस्तपणामध्ये दिसतो.) हा अखेरचा फिटनेस म्हणजे पदव्युत्तर विशेषज्ज्ञाचा टप्पा असाच प्रकार असतो. या सर्वच स्तरांवर सचिन श्रेष्ठ ठरला, असे त्याच्या कारकिर्दीकडे एक दृष्टिक्षेप टाकल्यानंतर सहज लक्षात येते.
क्रिकेट आणि इतर खेळ यांची तुलना केली तर असे लक्षात येते की, फुटबॉलपटू किंवा टेनिसपटूला जेवढा जबरदस्त फिटनेस गरजेचा असतो तसे क्रिकेटचे नाही. पूर्वी केवळ कसोटी क्रिकेट होते. त्यात शरीराची चपळाई कायम राखली तरी पुरत असे. सुरुवातीचे कसोटीपटू आठवून पाहा प्रसन्ना, बेदी, चंद्रशेखर, सुनील गावस्कर, गुंडाप्पा विश्वनाथ. नंतर एकदिवसीय क्रिकेट आले त्यात लागणारी चपळाई वाढली, फिटनेसला पूर्वीपेक्षा अधिक महत्त्व आले. पोट बाहेर न दिसणारे क्रिकेटपटू दिसू लागले. त्यात कपिलदेव, अजय जाडेजा, अझरुद्दीन आदींचा समावेश होता. आणि आता टी २० आल्यानंतर त्या फिटनेसला ताकदीचे वेगळे परिमाणही लाभले. त्यात महिंद्रसिंग धोनी आदर्श मानला जातो.. तरीही फुटबॉलपटू आणि टेनिसपटूंएवढा पराकोटीचा फिटनेस आजही क्रिकेटपटूंसाठी गरजेचा नसतो. असे असले तरी तो फिटनेस सलग २४ वर्षे कायम राखणे, त्यासाठीच्या प्रयत्नांमध्ये सातत्य असणे ही केवळ कौतुकास्पद बाब मानायला हवी. आज प्रचंड यश पदरी आल्यानंतरही सूर्याच्या पहिल्या किरणापूर्वीच एमआयजी ग्राऊंडवर सरावासाठी येणारा सचिन त्याच्या सातत्याचा आणि सातत्यामध्येही असलेल्या एका वेगळ्या एकाग्रतेचा अध्याय आपल्याला सहज शिकवून जातो. यशाच्या मांडवाखालून गेल्यानंतर अनेकांचे सरावाकडे किंवा पूर्वतयारी, गृहपाठाकडे दुर्लक्ष होते. सचिनने ते कटाक्षाने टाळले.
असे म्हणतात की, काही गोष्टी या प्रत्येकाकडे नैसर्गिकरीत्या येतात. देवावर विश्वास असेल तर दैवी देणगी म्हणून येतात, असे मानले जाते. सचिनकडे असलेले मनोबल हा त्याच्या त्या नैसर्गिक देणगीचा आणि कौटुंबिक वारशाचाही भाग आहे. कारण यश तुमच्याकडे आले की, त्या पाठोपाठ येणारे मोह आणि माया या दोन्ही बाबी टाळण्यासाठी तुमच्याकडे मनोबलच असावे लागते. तिथे शारीरिक बलाचा काहीही संबंध नसतो. त्याच्या क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात झाली त्यावेळेस त्याच्यासोबत असणारे किंवा त्याच सुमारास क्रिकेटविश्वात प्रवेश केलेले क्रिकेटपटू आज कॉमेंट्रीबॉक्समध्ये बसलेले दिसतात. या उदाहरणातूनच सचिनच्या मनोबलाचे महत्त्व सहज लक्षात येईल.
आजवर तो कोणत्याही वादामध्ये अडकलेला नाही. खासगीतही नाही आणि सार्वजनिक आयुष्यात तर नाहीच नाही. माणसाला मिळणाऱ्या यशाबरोबर वाददेखील यशाचेच एक सहउत्पादन असावे त्याप्रमाणे येतात. मग कुणाचे अभिनेत्री रवीना टंडनसोबत तर कुणाचे अभिनेत्री नगमासोबत नाते जुळल्याची चर्चा रंगते. सचिनने मात्र अशा गोष्टी कटाक्षाने टाळलेल्या दिसतात. भारतीय क्रिकेट संघात समावेश झाल्याचे कळल्यानंतर अनेक अभिनेत्री आणि मुलींचा गराडा त्या नवख्या क्रिकेटपटूला पडतो, मग सचिनच्या मागे कुणी लागले नसेल का? कदाचित त्याच्यामागे लागलेल्यांची तर एक वेगळी रांगच असावी. पण त्याबद्दल कधी काही ऐकल्याचे आठवतेय का? म्हणून सचिन हा सचिन आहे.
अगदी अलीकडे संपूर्ण क्रिकेटविश्व फिक्सिंगच्या वादात झाकोळले. त्याही वेळेस हा सूर्य तळपत होता. सचिनमार्फत फिक्सिंग करावे किंवा त्यालाच फिक्सिंगचा मोहरा करावे, असे कुणाच्या मनात आले नसेल का? किंवा तसे प्रयत्नही झाले नसतील का? या दोन्ही प्रश्नांची उत्तरे सकारात्मक असली तरी सचिन मात्र कटाक्षाने त्याहीपासून दूर राहिला आहे. त्या वादात तो कुठेही नव्हता. ना त्याने कधी त्याबाबत कुठे टिकाटिप्पणी केली. त्याला बोलते करून त्याच्या खांद्यावर बंदूक ठेवत निशाणा साधण्याचा प्रयत्नही अनेकांनी करून पाहिला, पण त्यातही त्याने कुणालाही आपल्यावर हावी होऊ दिले नाही. हे सारे केवळ मनोबलाच्या माध्यमातूनच शक्य असते. त्याच्या आयुष्यातला झालेला एकमेव वाद हा होता त्याच्या फेरारीच्या करमाफीचा. पण तोही त्याने फार चिघळू दिला नाही!
केवळ पराकोटीच्या मनोबलाच्या माध्यमातूनच मोह- माया आदी षङ्रिपुंवर मात करता येते.. हे त्याचे मनोबल मैदानावर तर अनेकदा दिसले आहे. अगदी तो वयाने लहान असतानाही. कपिलदेव कर्णधार असताना एका एकदिवसीय सामन्यात अवघ्या काही धावा प्रतिस्पध्र्यालाजिंकायला हव्या असताना गोलंदाजी करायला कुणी पटकन तयार होईना तेव्हा सचिन पुढे आला. कपिलने त्याच्या हाती चेंडू देण्याचा घेतलेला निर्णय त्याने सार्थ ठरवत सामनाजिंकून दिला. ही निडरता मनोबलातून येते. जगातील सवरेत्कृष्ट गोलंदाजाच्या प्रत्येक चेंडूवर राई राई एवढय़ा चिंधडय़ा उडवतानाही चेहऱ्यावर साधे- सामान्य भाव राखण्यामागेही हेच मनोबल असते. असेच मनोबल सध्या पाहायला मिळते आहे ते महेंद्रसिंग धोनीच्या चेहऱ्यावर. विश्वचषक जिंकल्यानंतरही त्याच्या चेहऱ्यावरच्या भावरेषांमध्ये कोणताही बदल झालेला नव्हता! हे मनोबल एकाग्रतेतून येते आणि एकाग्रतेच्या सरावातून ते उत्तरोत्तर वाढत जाते!
सचिन मैदानावर उतरतो त्याच्या आधीपासून त्याच्या चाहत्यांच्या अपेक्षांचा ताण त्याच्यावर असतो. पण त्याचे रूपांतर तो तणावामध्ये होऊ देत नाही. तिथे त्याचे मनोबल कामी येते. केवळ चाहते नव्हे तर देशाच्याही अपेक्षा त्याच्यावर असतात, नजरा खिळलेल्या असतात आणि त्यावेळेस अर्जुनच्या एकाग्रतेने तो खेळत असतो.
क्रिकेटव्यक्तिरिक्त इतर कोणतेही व्यसन सचिनला नाही त्यामुळे तो त्याचा शारीरिक फिटनेस चांगला राखू शकतो. शारीरिक फिटनेस राखला तरच पुढचा सोपान चढता येतो. तुम्ही अधिक वर उंचीवर जाता त्यावेळेस पाय ठेवण्याचे क्षेत्र कमी होत जाते, सोबत असलेले अनेक जण मागे पडतात आणि त्याचवेळेस वातावरणातील ऑक्सिजनचे प्रमाणही कमी होत जाते.. त्याही अवस्थेत आणखी एक एव्हरेस्ट गाठायचे असेल तर त्यासाठीही मनोबलाचीच गरज असते. क्रिकेटच्या क्षेत्रातील अशी अनेक शिखरे सचिनने सहज पादाक्रांत केली आहेत. प्रत्येक शिखरावर त्याचे नाव आहे. आजवर अस्पर्श राहिलेली अशी शिखरेही त्याने सर केली आहेत. पण त्याने ती ज्या बळावर सर केली त्या मनोबलाबद्दल मात्र फारसे कधी कुठे बोललेही गेले नाही आणि तेवढे लिहिलेही गेले नाही.
एखादी व्यक्ती बाहेर श्रेष्ठ ठरते तेव्हा त्याच्या सर्व गुणांबद्दल चर्चा होते पण त्याच्या आयुष्यात सर्वात मोठी भूमिका बजावणाऱ्या कुटुंबीयांबद्दल कधीच चर्चा होत नाही. सचिनच्या मनोबलामागे त्याच्या घरच्यांचे संस्कार आहेत याकडे अनेकांचे दुर्लक्ष झाले आहे. एरवी एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीचे कुटुंबीय समाजात कसे वावरतात ते पाहा आणि मग सचिनच्या कुटुंबीयांना आठवून पाहा. त्याचे कुटुंबीयही तेवढेच संयत आहेत. आणि म्हणूनच आपल्या कारकिर्दीतील अतिमहत्त्वाचा म्हणजेच निवृत्तीचा निर्णय जाहीर करताना सचिन अतिशय कृतज्ञतेने म्हणाला, ‘‘माझ्या कुटुंबीयांचा संयम आणि समजूतदारपणा याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे.’’ कारण वय वाढल्यानंतर तुमचे शरीर पूर्वीएवढे साथ देत नाही आणि शरीराच्या प्रतिक्षिप्त क्रियाही नैसर्गिकरीत्या काहीशा कमी वेगाने काम करतात त्यावेळेस होणाऱ्या टीकेला फक्त सचिनलाच सामोरे जावे लागत नाही तर त्यात त्याच्या कुटुंबीयांचाही समावेश असतो. पण त्यांच्याबद्दल कुणीच बोलत नाही. खरे तर सचिनचे हे मनोबल हा त्याच्या कुटुंबीयांच्याही डीएनएचाच एक महत्त्वाचा भाग आहे! सचिनने त्यावरही अधिक चांगले संस्कार करत भर घातली आणि तेही एव्हरेस्टच्या माथ्यावर नेऊन ठेवले, म्हणूनच तो ‘फिटनेसैव अद्वितीय’ ठरतो!
फिटनेसैव अद्वितीय !
<span style="color: #ff0000;">मथितार्थ</span><br />सचिन रमेश तेंडुलकर या नावामध्ये शिकण्यासारखे बरेच काही दडले आहे. एखाद्याला आपल्या आयुष्यात त्याच्या आवडत्या क्षेत्रात दीर्घकाळ राहायचे असेल, खेळी खेळायची असेल तर आवश्यक गुण कोणते...
First published on: 18-10-2013 at 01:04 IST
मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fitness of sachin tendulkar