विनायक परब – @vinayakparab / vinayak.parab@expressindia.com
डॉ. रेमंड दुराईस्वामी
प्रसिद्ध भूगर्भशास्त्रज्ञ
गेले आठवडाभर कोकण आणि दक्षिण महाराष्ट्र खासकरून सातारा, सांगली, कोल्हापूर या परिसरात अनेक गावे पुराखाली गेली. सह्यद्रीच्या पूर्वेकडील भागामध्ये महापूर तर पश्चिमेकडे म्हणजे कोकणात महापूर आणि सोबत मोठय़ा प्रमाणावर दरडी कोसळण्याच्या घटना असे विदारक चित्र आहे.  गेल्या काही दिवसांत पावसांतील या दुर्घटनांच्या बळींची संख्या आता शंभरच्या घरात तर वित्तहानी काही हजार कोटींच्या घरात अशी स्थिती आहे. दरखेपेस आपत्ती व्यवस्थापन असे आपण म्हणतो खरे पण आपत्ती व्यवस्थापनाची सुरुवात आपत्ती आल्यानंतरच सुरू होते. खरे तर आपत्ती रोखण्यापासून याची सुरुवात व्हायला हवी मात्र प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या बाबतीत आपली स्थिती आपण त्या गावचेच नाही, अशी आहे. पुरानंतर किंवा दरडी कोसळल्यानंतर त्या भागांना राजकारण्यांनी भेटी देणे आणि सारे आरोप निसर्गावर अर्थात पावसावर करून मोकळे होणे ही खूपच सोपी बाब आहे. कारण निसर्ग काही त्यांच्याविरोधात युक्तिवाद करण्यासाठी येत नाही. खरे तर त्याने दिलेल्या इशाऱ्यांतून आपण काहीच शिकत नाही, त्या वेळेस तो आपल्याला धडे देतो. असे धडे त्याने २००५, २०१९ या दोन्ही वर्षी देऊन झाले. मात्र आपले घोडे पुढे सरकतच नसल्याने यंदा महाधडाच मिळाला आहे. अर्थात असे झाल्यानंतरही आपण त्यातून काही शिकून मार्गक्रमण करू असे कोणतेही चित्र दिसत नाही. दरखेपेस चौकशा आणि नवीन अहवाल तयार करणे हेच नव्याने होते. मुळात गेल्या काही वर्षांत महाराष्ट्राला सातत्याने या नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागते आहे, याची इशाराघंटा २००७ मध्येच आयपीसीसी इंटरगव्हर्नमेंटल पॅनल फॉर क्लायमेट चेंजच्या अहवालात वाजलेली होती. मात्र आपण गेली १४ वर्षे सातत्याने दुर्लक्ष करत आहोत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील भूगर्भशास्त्रज्ञ डॉ. रेमंड दुराईस्वामी गेली काही वर्षे सातत्याने याकडे लक्ष वेधत आहेत.

आयपीसीसीच्या अहवालात पावसाच्या असमान वितरणाकडे नेमके लक्ष २००७ सालीच वेधण्यात आले होते. हा अहवाल खरेतर २०५० साली नेमकी काय अवस्था असेल याकडे लक्ष वेधण्यासाठी तयार करण्यात आला आहे. मात्र त्यामध्ये देण्यात आलेले इशारे गेल्या १० वर्षांमध्येच प्रत्यक्षात येण्यास सुरुवात झालेली दिसते, असे सांगून डॉ. दुराईस्वामी सांगतात,  त्यासाठी तापमानातील विविध बदल- अनियमितता आणि इतर निकषांचा शास्त्रीय अभ्यास करण्यात आला आहे. त्यानुसार भविष्यातील तापमान वाढ तसेच पावसाचे असमान वितरण, त्याच्या वाढणाऱ्या तीव्रता आणि न पडण्याचे वाढते प्रमाण याचे नकाशेच तयार करण्यात आले असून ते जगभर सादर झाले आहेत. यात नवे काहीही नाही. उत्तर ध्रुवावरील तापमानवाढीमुळे बर्फाचे वितळणे ही सर्वात मोठी घटना असणार आहे.

mhada Lottery
छत्रपती संभाजीनगरातील ९४१ सदनिका, ३६१ भूखंडांची सोडत जाहीर, अर्ज विक्री-स्वीकृतीला सुरुवात
imd predicted hailstorm in north central Maharashtra
उत्तर-मध्य महाराष्ट्र,मराठवाड्यात शुक्रवारी गारपीट… जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज
rain in Vidarbha
सावधान! येत्या ४८ तासांत ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता
mahayuti ahmednagar
नगरमध्ये महायुतीत एकोप्याचा अभाव, महाविकास आघाडी संघटित

प्रचंड बर्फ वर्षांव होणाऱ्या सायबेरियासारख्या ठिकाणी पाऊस सुरू होईल, असे या अहवालात म्हटले आहे, त्याचा अनुभव गेली काही वर्षे येतोच आहे. त्यात कॅलिफोर्निया व कॅनडातील तापमानवाढीचेही संकेत आहेत. यंदा कॅलिफोर्नियामध्ये ५३ अंश तापमानाची नोंद झाली. ही तापमानातील मोठीच वाढ आहे. याचा परिणाम होऊन अनेक ठिकाणी वणवे लागण्याचे प्रमाणही वाढले आहे. जंगले खाक होत आहेत. परिणामी त्यातूनही पुन्हा तापमानवाढ होणार असून परिणामांचे हे दुष्टचक्र असेच सुरू राहील. त्यात मानवच काही ठोस पावले उचलून हे दुष्टचक्र थांबवू शकतो. हा जागतिक वातावरणातील बदल आहे. उष्णता वाढल्याने परिणामी एका बाजूस पावसाचे प्रमाणही वाढणार आहे. मात्र ते सर्वत्र वाढणार नाही तर काही ठिकाणी ते अतितीव्र वाढेल तर काही ठिकाणी पाऊस गायबच होऊन दुष्काळसदृश परिस्थितीत वाढ होणार आहे. याला पावसाचे असमान वितरण कारणीभूत असेल. आकडेवारीमध्ये दिसायला त्याने सरासरी गाठलेली असेल किंवा सरासरीपेक्षा अधिक बरसणे असेल मात्र त्याच्या असमान वितरणामुळे कुठे पूर तर कुठे दुष्काळ असा सामना करावा लागेल.

जागतिक वातावरण बदलाचा आपल्याकडील परिणाम म्हणजे दक्षिण आशिया आणि आग्नेय आशियामध्ये काही ठिकाणी तुफान पावसाला सामोरे जावे लागेल. मात्र असमान वितरणामुळे हा तुफान पाऊस सर्वत्र होणार नाही. तर काही ठिकाणी तो अतितीव्र कोसळेल. भारत, थायलंड आणि चीनचा काही परिसर या अतितीव्र तडाख्यात असणार आहे. त्याबद्दल डॉ. दुराईस्वामी सांगतात, आपल्याकडे घाटमाथ्यावरच्या पावसामध्ये मोठय़ा प्रमाणावर वाढ होणार आहे, असे आयपीसीसीच्या अहवालामध्ये २००७ सालीच स्पष्ट करण्यात आले आहे. त्यात पावसानंतरच्या पूरसदृश्य स्थितीचाही उल्लेख करण्यात आला आहे.

भविष्यातील घडामोडींचा अंदाज आपल्याला निकटच्या अभ्यासावरून  येऊ शकतो, असे सांगून डॉ. रेमंड दुराईस्वामी म्हणाले, अरबी समुद्रातील सारे बाष्पीभवन एकवटून ते घाटमाथ्याच्या दिशेने येईल आणि म्हणूनच कदाचित भविष्यात चेरापुंजी नव्हे तर महाबळेश्वर हे जगातील सर्वाधिक पाऊस होणारे ठिकाण असेल. २०१९ साली केलेल्या नोंदीनुसार, कोकणात आंबोली येथे ६४७२ मिमी पाऊस झाला. संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यमध्ये सरासरी ४००० मिमी पाऊस त्या वर्षी झाला. तर महाबळेश्वरजवळ असलेल्या लामज या गावी तब्बल ७२०० मिमी पावसाची नोंद झाली. महाबळेश्वरची पावसाची नोंद सरासरी ५८२० मिमी अशी आहे. यंदा आतापर्यंत तर केवळ ३० टक्केच पाऊस झाला आहे.

भूगर्भशास्त्र असे सांगते की, अतितीव्र पावसात डोंगरावरची माती, राडारोडा सारे काही वेगात खाली येते. केवळ मातीच असेल तर ती पाणी शोषते. तिचे वजन वाढते आणि अशा वेळेस मातीचा हा ढिगारा डोंगरउतारावर असेल तर त्याचा गुरुत्वमध्य वजनामुळे खालच्या दिशेला सरकतो आणि डोंगराच्या टोकाच्या भागासह सारे काही खाली कोसळते. अनेक ठिकाणी अलीकडे एकाच दिवसात तब्बल २०० मिमी पावसाची नोंद झाली आहे. अशा अधिकच्या पावसात अशा घटना होणे अगदीच साहजिक आहे. कोकणात बहुतांश ठिकाणी असेच झाले आहे.  आपल्याकडे खासकरून सह्यद्रीमध्ये डोंगरमाथ्याला बसॉल्ट आहे. त्यामधील भेगादेखील अशा प्रकारच्या दरडी कोसळण्यास कारणीभूत ठरतात. शिवाय दक्षिण कोकणात डोंगरमाथ्यावर पठारावर जांभा दगड आहे. त्यात पावसाच्या वेळेस त्यामधील खनिजे निघून जातात व तो सच्छिद्र होत जातो. अशा वेळेस अशा प्रकारच्या घटना खूपच साहजिक असतात. त्यामुळेच डोंगराची भूगर्भशास्त्रीय पाहणी करून नोंदी करणे आणि दरडी कोसळण्याची भीती असलेल्या परिसरात काही होण्यापूर्वीच काळजी घेणे म्हणजे शक्य असेल या घटना रोखण्यासाठीच्या उपाययोजना किंवा त्याखाली असलेल्या वस्ती इतरत्र हलविणे असे उपाय करता येतील.

महाबळेश्वरला तर ५९२ मिमी पावसाची नोंद एकाच दिवसात झाली आहे. २४ तासांत एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर पाऊस होतो, त्या वेळेस आपल्याला धोरणात्मक बदल करावा लागणार आहे, हे निश्चित.  एक काळ असा होता की, टंचाईसदृश परिस्थितीवर मात करण्यासाठी डॉ. मोहन धारिया यांनी पाणी अडवा पाणी जिरवा ही योजना अतिशय यशस्वीरीत्या राबविली. त्याचे चांगले फायदेही महाराष्ट्राने अनुभवले. मात्र आता जागतिक वातावरण बदलाला सामोरे जाताना जिथे मोठय़ा प्रमाणावर पावसात वाढ झाली आहे, तिथे तरी वेगळी उपाययोजना करावी लागेल. तिथे पाणी अडवा, पाणी जिरवा चालणार नाही.  त्यासाठी वेगळ्या उपाययोजनेसाठी आपण वेळीच प्रयत्न करायला हवेत, असे डॉ. दुराईस्वामी सांगतात.

काही ठिकाणी नद्यांचे पाट खुले ठेवायला हवे. जेजुरीला सर्व पाणी अडवत होतो. कऱ्हा नदीमध्ये ११८ टक्के पाणलोट क्षेत्रात कामे झाली. त्याचा परिणाम असा की,  त्यामुळे मोरगाव आदी क्षेत्रांत क्षारयुक्त पाण्यात वाढ झाली. याला रेसिडेन्स ऑफ टाइम असे म्हणतात. म्हणजेच आपण वापरलेले एक चमचा मीठ ते पुढची तब्बल १७६ वर्षे पाणलोट क्षेत्रात राहते. सगळेच पाणी अडवले तर त्यामुळे पलीकडे क्षारतेत वाढ होते. तापीमध्ये किंवा सांगली साताऱ्यात वाढलेली क्षारता हा त्याचाच परिणाम आहे. आता वाढलेल्या पावसामुळे आपल्याला परिस्थिती बदलण्याची संधी आहे. जिथे मोठय़ा प्रमाणावर पाऊस होतो आहे तिथे सुरुवातीचे पावसाचे पाणी आपण वाहून द्यायला हवे. खासकरून कोल्हापूरसारख्या परिसरात ऑगस्टनंतरचा आणि परतीचा असे दोन्ही पाऊस अनुभवता येतात. अशा ठिकाणी अखेरचा २० टक्के पाऊस कोल्हापूर बंधारा पद्धतीने अडवला जाऊ शकतो. त्याने क्षारता मोठय़ा प्रमाणावर कमी करण्याची संधी या अधिकच्या पावसामुळे मिळणार आहे.

पुणे विद्यापीठातील विद्यार्थी डॉ. बाबाजी मस्कारे यांनी दरडी कोसळ्याची शक्यता असलेल्या पठारावरील प्रदेशांचा अभ्यास त्यांच्या पीएचडीच्या शोधप्रबंधामध्ये केला असून त्यात नकाशासह सारे काही उपलब्ध आहे. त्याचा वापर राज्य शासनास करता येऊ शकतो. रायरेश्वरचे पठार वगळता पाचगणी- महाबळेश्वर, ठोसेघर, कास आणि पाटण यांचा अभ्यास झाला पूर्णपणे करण्यात आला असून दरडी कोसळण्याची शक्यता असलेली ठिकाणेही शास्त्रीय अभ्यासाने शोधण्यात आली आहेत. कोकणामध्येही अशाच प्रकारचा भूगर्भशास्त्रीय अभ्यास होणे गरजेचे आहे.

बोर्गेवाडी हे पाटणच्या पठाराजवळचे गाव असून तिथे सातत्याने दरडी कोसळत होत्या. मात्र अशा प्रकारच्या शास्त्रीय अभ्यासानंतर तिथे शासनाने पुनर्वसन केले आहे. अशाच प्रकारे पुनर्वसन भिलारमध्येही पार पडले. त्यामुळे मनुष्य व वित्तहानी टाळता येते हे सिद्ध झाले आहे, असे सागून डॉ. दुराईस्वामी म्हणाले की, एक महत्त्वाचा बदल आपल्याला आपल्या मानसिकतेमध्ये आणि धोरणनिर्णयामध्ये करावाच लागेल. आपण आजवर ब्रिटिशांची नियोजन पद्धती आदर्श मानली. त्यानुसार गेल्या ५०-१०० वर्षांतील घटनांचा, नोंदीचा अभ्यास करून त्यानुसार प्रकल्पांची बांधकामे केली जातात. यापुढे भविष्यात वातावरणबदलाची शास्त्रीय अभ्यासपूर्ण सर्वेक्षणे लक्षात घेऊन पुढच्या ५० वर्षांच्या शास्त्रीय अभ्यासाच्या मॉडेल्सचा अभ्यास करत नियोजन करावे लागेल म्हणजे मग आपला द्रुतगती महामार्गच पाण्याखाली गेला अशा प्रसंगांना सामोरे तर जावे लागणार नाहीच, शिवाय मोठय़ा प्रमाणावर होणारी मनुष्य व वित्तहानीही टाळता येईल.