अन्न कसे जेवावे याचे ही एक शास्त्र आहे. पारंपरिक पद्धतीमध्ये असे म्हणतात की भूकेपेक्षा दोन घास कमी खावेत. जेवताना मांडी घालून पाटावर बसून जेवणे आवश्यक आहे. पाटावर बसल्यामुळे आपण पुढे वाकून जेवण जेवतो. हे करताना पोटावर थोडासा ताण पडतो व त्यामुळे कदाचित आपण भुकेपेक्षा दोन घास कमी खातो- जे शरीराला आरोग्यदायी आहे. या विरुद्ध डायिनग टेबलवर मागे झुकल्यामुळे नेहमीच दोन घास जास्त जातात.
जेवणाच्या लगेच आधी व नंतर भरपूर पाणी पिऊ नये, कारण त्यामुळे उदराग्नी मंद होतो. दोन घासामध्ये थोडं थोडं घोट घोट पाणी प्यावे. जेवणामधील थोडय़ा पाण्याने अग्नी व्यवस्थित प्रज्वलित राहतो. लागले तर जेवणानंतर थोडय़ा वेळाने पाणी प्यावे.
अन्नावरील संस्कार
आजच्या फास्टफूडच्या जमान्यात अन्नावरील अग्निसंस्कार हा शब्ददेखील विसरला गेला आहे. आपल्याकडे दोन पिढय़ा पूर्वीपर्यंत स्वच्छ आंघोळ करून सोवळ्याने स्वयंपाक केला जाई; तोही घरच्या बाईकडून किंवा स्वयंपाकाचे काम करणाऱ्या ठरावीक व्यक्तीकडून. स्वच्छता पाळल्याने अन्नाला जंतुसंसर्ग होणार नाही हा विचार त्यात आहे. शिवाय स्वयंपाक बनवताना बनविणाऱ्याच्या भावना, विचार यामुळे हे जेवण संस्कारित होत असते ही कल्पनाही आहे. हे खरंच विचार करण्यासारखे आहे. आज आपण स्वयंपाकासाठी बाई ठेवतो किंवा बाहेरून जेवण मागवतो. यात घरच्या स्त्रीकडून अन्नावर होणारे संस्कार मिळत नाहीत.
एक संस्कृत श्लोक आहे- ‘संस्कारात गुणांतराधानम्’ याचा अर्थ संस्कारामुळे गुणधर्म बदलतात. अन्न शिजवताना बनवणाऱ्याच्या भावना त्यात गुंफल्या जातात व अन्न संस्कारित होते. आणि त्या अन्नाचे गुणधर्म त्याप्रमाणे बदलतात. आहाराने आपले मन, आपले विचार बनत असतात. पहा आपण म्हणतोच माझ्या आईच्या जेवणाची सर कशालाच नाही. का बरं? कारण त्या जेवणात आईच प्रेम ओतप्रोत भरलेलं असतं- तर हा आहे अन्नसंस्कार!
आपण शाळेमध्ये एक प्रार्थना म्हणत असू- ‘सहनौ वक्तू सहनौ भुनक्तौ..’. यातून सांघिक भावनेची घडण आपल्या मनामध्ये रुजवली जायची. तसेच एकत्र खावे हे ही सांगितले जायचे. एक घास वाटून खावा. यातूनच मनाची घडण होते. अनेक धर्मामध्ये व प्रांतामध्ये जेवण्याच्या विविध पद्धती आहेत. काही धर्मामध्ये एका ताटात १२ जण एकत्र जेवतात. आपल्याकडेही नवऱ्याचे उष्टे नवरी खाते. त्यातून त्यांनी तनाने व मनाने एकत्र व्हावे हीच भावना असते. विदर्भात अनेकजण जेवताना काला करतात. सर्व अन्नपदार्थाचा एकत्र काला करून तो हाताने खाताना एकसंघ भावनेचा होणारा संस्कार हा काटा चमच्याने आपल्याला विभाजित करतो.
लहानपणी आई किंवा आजी जेवणाआधी आपल्याला बऱ्याच सूचना द्यायची (अर्थात त्या वेळी त्यांना तेवढा वेळही असायचा). बाहेरून आल्यावर जेवणाआधी कपडे बदला, हात-पाय धुवा, पाट लावा इत्यादी. कधी कधी त्या सूचना जाचकही वाटत असत. परंतु त्यामध्ये त्या आपल्या आरोग्याची काळजी तर घेत असतच, पण अन्नाचा सन्मान करण्यास शिकवत होत्या. या संस्कारामुळे आजही तुम्ही अन्न वाया जाऊ देत नाही.
जेवणापूर्वीच्या प्रार्थनेलाही महत्त्व आहे.
‘वदनी कवळ घेता
नाम घ्या श्रीहरीचे।
सहज हवन होते
नाम घेता फुकाचे॥
जीवन करी जीवित्वा
अन्न हे पूर्णब्रह्म।
उदरभरण नोहे
जाणिजे यज्ञकर्म॥’
हा श्लोक पूर्वी आपण जेवणाआधी म्हणत असू. या श्लोकाद्वारे आपण पोटातल्या अग्नीची पूजा/ त्याला वंदन करतो. अन्नग्रहण हे एक पवित्र यज्ञकर्म आहे म्हणून ते विनम्र व समाधानाने करणे आवश्यक आहे. आपल्या जगण्यासाठी पूर्णब्रह्म असलेले अन्न प्राप्त करून दिल्याबद्दल या श्लोकात आपण देवाचे आणि निसर्गाचे आभार मानतो. शेवटी ‘उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म’ म्हणजे- पोट भरण्यासाठी अन्न गिळणे हे जितके असंस्कारित आहे तेवढेच एक यज्ञकर्म म्हणून योग्य अन्न, योग्य प्रमाणात, योग्य मान ठेवून ग्रहण करणे हे संस्कारमय आहे. हेच खरे अन्नसंस्कार!
अन्नदाता सुखी भव:
डॉ. अविनाश सुपे
संग्रहित लेख, दिनांक 16th Jan 2015 रोजी प्रकाशित
कशासाठी? पोटासाठी! : अन्नसंस्काराचं महत्त्व
गेल्या काही दशकांत आपल्या सर्वाच्या आयुष्यात खूपच बदल झाले आहेत. माझ्या पिढीने तर शाळेतील पाटी/फळापासून नवीन आलेल्या स्मार्ट बोर्डपर्यंत बदल पाहिले आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 16-01-2015 at 01:25 IST
मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Food and lifestyle