01vbपातीकांदा बटाटा करंजी

साहित्य :
६ ते ८ पातीकांद्याच्या काडय़ा
१ मध्यम बटाटा
१ चमचा तेल फोडणीसाठी, १/४ चमचा जिरे, १/४ चमचा हिंग
१/२ चमचा चाट मसाला
lp34१/२ चमचा धनेपूड
१/४ चमचा जिरेपूड
१/२ चमचा लाल तिखट
२ चिमटी गरम मसाला
२ हिरव्या मिरच्या बारीक चिरून
चवीपुरते मीठ
किसलेले चीज
तळण्यासाठी तेल

पारीसाठी
१ वाटी मैदा
१ चमचा कणीक
१ चमचा तेल मोहनासाठी
२ चिमटी मीठ

कृती :
१) बटाटा उकडून सोलून घ्यावा. सुरीने अगदी बारीक तुकडे करावे.
२) कांद्याची पात आणि त्याचा कांदा दोन्ही बारीक चिरून घ्यावे.
३) पारीसाठी मैदा, कणीक आणि मीठ एकत्र करावे. त्यात १ चमचा गरम तेलाचे मोहन घालावे. पाणी घालून घट्ट भिजवून झाकून ठेवावे.
४) कढईत तेल गरम करून त्यात जिरे आणि हिंग फोडणीस घालावे. त्यात मिरची घालून परतावे. नंतर पातीकांदा आणि मीठ घालावे. परतून मंद आचेवर २-४ मिनिटे वाफ काढावी. नंतर बटाटा घालून मिक्स करावे.
५) आच बंद करून त्यात चाट मसाला, धने-जिरेपूड, लाल तिखट, गरम मसाला घालून मिक्स करावे.
६) पारीच्या दीड इंचाच्या गोळ्या बनवाव्यात. लाटून त्यात अर्धा ते एक चमचा सारण घालावे. १ चमचा चीज घालावे. पारी बंद करून करंजीचा आकार द्यावा. तेल गरम करून त्यात करंज्या मध्यम आचेवर तळून घ्याव्यात.
टॉमॅटो केचपबरोबर सव्‍‌र्ह कराव्यात.

टीप :
जर चीज वापरणार असाल तर सारणात मीठ थोडे कमी घालावे, कारण चीजमध्ये मीठ असतं. नाहीतर करंज्या खारट होतात.

lp32पातीकांद्याची भजी

साहित्य:
अर्धी जुडी पातीकांदा (१२ ते १५ काडय़ा)
१/४ चमचा ओवा
२-३ हिरव्या मिरच्या, बारीक चिरून
१/२ लहान चमचा हळद
१/४ चमचा हिंग
१/४ चमचा लाल तिखट
१ वाटी बेसन
१ चमचा तांदळाचे पीठ
चवीपुरते मीठ
भजी तळण्यासाठी तेल

कृती :
१) कांद्याची पात आणि कांदा दोन्ही बारीक चिरून घ्यावे. त्यात ओवा, चिरलेली मिरची, हळद, हिंग, लाल तिखट आणि मीठ घालून मिक्स करावे. १५ मिनिटे तसेच झाकून ठेवावे.
२) नंतर त्यात अंदाजाने बेसन आणि तांदळाचे पीठ घालून मिक्स करावे. पातीकांद्याला सुटलेल्या पाण्यातच पीठ भिजवावे. अजून जास्तीचे पाणी घालू नये. पीठ चमच्या चमच्याने घालावे, एकदम सर्व घालू नये. थोडे सैल आणि चिकट भिजले पाहिजे.
३) भिजलेल्या पिठाची चव पाहून गरजेनुसार मीठ-तिखट घालावे.
४) तेल गरम करून त्यात पिठाची लहान बोंडं तळून घ्यावी. गरमच वाढावी.

lp33पातीकांद्याचे पोहे

साहित्य :
६ ते ८ काडय़ा पातीकांदा, बारीक चिरून
३ वाटय़ा जाडे पोहे

फोडणीसाठी :
३ चमचे तेल, पाव चमचा मोहरी, पाव चमचा हिंग, अर्धा लहान चमचा हळद
५-६ पाने कढीपत्ता
३-४ हिरव्या मिरच्या, चिरून
१/४ वाटी शेंगदाणे
१/२ वाटी खोवलेलं ओलं खोबरं
चवीपुरते मीठ आणि साखर

कृती :
१) पोहे चाळणीत घेऊन भिजवावेत. अधिकचे पाणी निथळू द्यावे.
२) कढईत तेल गरम करावे. त्यात शेंगदाणे आधी तळून बाजूला काढून ठेवावे.
३) त्याच तेलात मोहरी, हिंग, हळद, कढीपत्ता आणि मिरच्या घालून फोडणी करावी. चिरलेला पातीकांदा (पात आणि कांदा दोन्ही) फोडणीला टाकावा. मीठ घालावे. मंद आचेवर वाफ काढावी.
४) पात शिजली की भिजलेले पोहे घालून व्यवस्थित मिक्स करावे. तळलेले शेंगदाणे घालावे. चवीपुरती साखर आणि लागल्यास अजून थोडे मीठ चव पाहून घालावे. ओलं खोबरं घालून मंद आचेवर पोहे शिजू द्यावेत. अधूनमधून ढवळावे.

टीप :
यात पातीकांद्याचे प्रमाण कमीजास्त करू शकतो. वरील प्रमाणापेक्षा अजून थोडी जास्त पाती वापरली तर छान हिरवा रंग येतो पोह्यंना.
वैदेही भावे

Story img Loader