01vbपावसाळी काढा

साहित्य :
६ कप पाणी
१ इंच ज्येष्ठीमध
१ इंच सुंठ
१ इंच वेखंड
१०-१५ तुळशीची पाने
४ लांब पाती, चहा पाती (गवती चहा) (लेमनग्रास)
४ लवंग
२ इंच दालचिनी
५ पारिजातकाची पाने (टीप)
१/४ कप धने (साधारण मूठभर)
४-५ पत्री खडीसाखर

lp43कृती :
१) धने भरडसर कुटून घ्यावेत. पावडर होऊ देऊ नये. चहा पाती लहान आकारात कापून घ्याव्यात. सुंठ आणि वेखंडावर बत्त्याने एकदाच हलकेच ठोकावे.
२) खडीसाखर सोडून सर्व साहित्य पाण्यात घालावे आणि उकळत ठेवावे. ६ कपचा ४ कप काढा होईस्तोवर उकळवा. नंतर गॅस बंद करून पातेल्यावर झाकण ठेवावे.
३) ५ मिनिटांनी गाळून घ्यावा. त्यात खडीसाखर घालावी. तेवढय़ा उष्णतेवर खडीसाखर विरघळेल.
काढा गरमच प्यावा. काढा एका वेळी १/२ कप असे दिवसातून २-३ वेळा प्यावा. उरलेला काढा फ्रिजमध्ये झाकून ठेवावा. लागेल तसा गरम करून प्यावा.

टीप :
१) ज्यांची उष्ण प्रकृती असेल किंवा उष्णतेचा खोकला असेल तर हा काढा कमी प्रमाणात प्यावा. तसेच थोडी हिरवी वेलची कुटून इतर साहित्याबरोबर उकळवावी.
२) प्राजक्ताची पाने मिळाली नाहीत तरी चालेल. पारिजातकाच्या पानांमुळे सर्दीमुळे तापाची जी कणकण वाटते ती कमी व्हायला मदत होते.
३) सुंठ न मिळाल्यास आले वापरले तरी चालेल.
४) अडुळसा पाने मिळाल्यास ४ पाने किंवा पावडर मिळाल्यास १/२ चमचा पावडर घालावी.

lp41जिंजर लेमन टी

साहित्य :
अडीच कप पाणी
२ टी बॅग्स
२ ते ३ चमचे मध
लिंबाच्या २ चकत्या
१/२ इंच आलं

कृती :
१) आल्याच्या पातळ चकत्या कराव्यात.
२) पातेल्यात पाणी घेऊन त्यात आल्याच्या चकत्या घालाव्यात. उकळून घ्यावे.
३) कपमध्ये ओतून त्यात मध मिक्स करावा. कपात प्रत्येकी एक लिंबाची चकती आणि टी बॅग घालावी. चहा स्टीप झाला की टी बॅग काढून टाकावी.
४) चमच्याने ढवळून कोमटसर चहा प्यावा.

टीप :
यामध्ये पुदिन्याची किंवा तुळशीची पाने पाण्यात उकळताना घालू शकतो.

lp42चहाचा मसाला

साहित्य :
४० वेलची (हिरवी)
२५ काळी मिरी
१५ ते १८ लवंग
५ काडय़ा दालचिनी (२ इंच प्रत्येकी)
१ टेस्पून सुंठ पावडर
३/४ जायफळ, किसलेले

कृती :
१) वेलची सोलून घ्यावी. दालचिनी हाताने तुकडे करून घ्यावी.
२) सर्व साहित्य मिक्सरमध्ये बारीक करावे.
वापर :
४ कप चहासाठी १ मध्यम चमचा मसाला वापरावा. चहा पावडरबरोबरच हा मसाला घालावा. चहा उकळल्यावर आच बंद करून मिनिटभर झाकण ठेवावे. यामुळे मसाल्याचा स्वाद चहामध्ये चांगला मुरेल.
टीप :
१) काळीमिरी, वेलची, दालचिनी आणि सुंठ यांची फ्रेश पावडर वापरूनही मसाला बनवू शकतो. जर दालचिनीचा स्वाद आवडत असेल तर ती थोडी जास्त घालावी.
२) चहाच्या मसाल्यात वाळवलेली चहाची पाती, बडीशेप आणि थोडय़ाशाच प्रमाणात चक्रीफूल घालू शकतो.
३) वेलची न सोलता वापरली तरी चालेल.
वैदेही भावे response.lokprabha@expressindia.com

Story img Loader