lp48तिरंगी कोफ्ता करी

साहित्य :
लाल रंगाची देशी गाजरे- २
लहानसा बटाटा उकडून- १/२
पालक १२-१३ पाने
पनीर – खिसून वाटीभर घेणे
कॉर्न फ्लोअर, बेसन, तांदळाची पिटी
कांदे २ + आले,
लसूण पेस्ट
हिरवी मिरची पेस्ट.

कृती :
प्रथम गाजरे धुऊन खिसून घ्यावीत. त्यात बेसन २/३ चमचे, कॉर्न फ्लोअर, कोथिंबीर, मीठ घालून मळून गोळे करून घ्यावेत.
पालक धुऊन पाच मिनिटे उकळत्या पाण्यात घालून नंतर बाहेर काढून चाळणीत निथळून घ्यावा व त्याची पण पेस्ट करून त्यात मीठ, हिरव्या मिरचीची पेस्ट, कॉर्नफ्लोअर घालून मळून गोळे करून घ्यावेत.
पनीर घेऊन ते खिसून त्यात उकडलेला छोटासा बटाटा पण खिसून घालावा व मळून गोळे करून घ्यावेत. वरील तिन्ही रंगांचे गोळे तळून घेऊन ठेवावेत. नंतर ग्रेव्ही- ग्रेव्हीसाठी २/३ मध्यम आकाराच्या कांद्याची पेस्ट करावी.
कढईत तेल घालून, कांद्याची पेस्ट, आले-लसूण पेस्ट घालून गरम मसाला, हळद, धने, जिरे पूड, टोमॅटो प्युरी घालून थोडे नारळाचे दूध घालून २/३ मिनिटे शिजवावे.
जेवायला देताना तीन रंगाचे कोफ्ते बशीत घालून वरून गरम ग्रेव्ही घालावी. गरमागरम पुऱ्यांबरोबर छान वाटते.

lp49भाताची भजी

साहित्य :

रात्रीचा अथवा सकाळचा भात
दही, आले, मिरची, लसूण पेस्ट
कोथिंबीर, भाजके तीळ.

कृती :

भातात- दही घालून छान हलवून ३/४ तास तसाच ठेवावा.
नंतर त्यात बेसन पीठ, भाजके तीळ (चहाच्या चमचाभर) व वरील सर्व मसाला घालून कालवावे व छोटी छोटी भजी तळावीत.
खूप खमंग व कुरकुरीत होतात. गरमागरम चहा-कॉफीबरोबर शेजारी बशीत गरम, कुरकुरीत भजी असल्यावर काय हवे?

lp50कढी-पकोडे

साहित्य :

किंचित आंबट ताक
बेसन दोन टेबलस्पून
मीठ, साखर
आले लसूण पेस्ट
कढीपत्ता.

कृती :

ताक घसळून वरील सामान घालून नेहमीप्रमाणे कढी करून घ्यावी. नंतर कांदे दोन व बटाटे दोन मध्यम. बेसन, भाजलेले तीळ, आले, लसूण पेस्टवरील कांदे-बटाटे बारीक चिरून घ्या व पकोडे करून तळावेत. हे पकोडे गरम कढीत घालून वरून खमंग फोडणी घालावी. गरमागरम खिचडीबरोबर थंडीच्या दिवसांत खाण्यास चविष्ट व पोटभर.
शंकुतला नानिवडेकर