साहित्य :
२ वाटी ज्वारी, २ चमचे मेथी दाणे, ८-१० पाकळी लसूण, १/२ इंच आले, ३-४ हिरवी मिरची, चवीपुरते मीठ.
कृती :
१. ज्वारी आंबवण्याकरिता २-३ दिवस पाण्यात भिजत ठेवणे. उन्हात ठेवल्यास लवकर आंबते. पाणी रोज बदलणे.
२. नंतर ज्वारी आणि मेथी दाणे मिक्सरमध्ये फिरवणे. साधारण इडलीच्या पिठासारखे ठेवणे. जास्त पातळ करू नये.
३. हे पीठ रात्रभर आंबवणे.
४. धिरडे करतेवेळी आले, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबिरीची पेस्ट आणि चवीपुरते मीठ पिठात घालून एकत्र करणे.
५. नंतर तवा चांगला गरम करावा, तव्यावर थोडे तेल पसरवून धिरडय़ाचे पीठ पसरवावे. बाजूने थोडे तेल सोडावे आणि मध्यम आचेवर दोन्ही बाजूने चांगले होऊ द्यावे.
६. गोड आवडत असल्यास एका बाजूने थोडा बारीक केलेला गूळ आणि तूप पसरवावे.
७. वांग्याची सुकी भाजी आणि दूध-गुळाबरोबर सव्र्ह करावे.
टीप :
१. धिरडय़ाचे पीठ जास्त पातळ करू नये.
२. सुरुवातीला थोडेच पीठ घालून छोटेच धिरडे लावावे, तेवढय़ा वेळात तवा चांगला गरम होऊन नंतरचे धिरडे चांगले उलटतात.
तिळगुळाचे तळलेले मोदक
साहित्य :
तिळगुळाकरिता : १ वाटी तीळ, १/२ वाटी किसलेले सुके खोबरे, ३/४ वाटी गूळ, १ छोटा चमचा सुंठ पावडर, १ चमचा वेलची पावडर.
पारीकरिता : २ वाटी मैदा, १ वाटी बारीक मैदा, ३-४ चमचे तेल, १ वाटी दूध पीठ भिजवण्याकरिता, तळणाकरिता तूप.
कृती :
तिळगुळाचे सारण करण्याकरिता तीळ आणि सुके खोबरे थोडे कढईत भाजून घ्यावे. गूळ थोडा सुरीने बारीक करावा. नंतर तीळ, सुके खोबरे आणि गूळ मिक्सरमध्ये एकत्र फिरवावा. नंतर त्यात सुंठ पावडर, वेलची पावडर आणि थोडी चारोळी घालून सारण चांगले एकत्र करावे.
पारीकरिता : रवा, मैदा एकत्र करून त्यामध्ये थोडे गरम तेलाचे मोहन घालावे. नंतर दूध घालून घट्ट भिजवून थोडा वेळ ओल्या कपडय़ाने झाकून ठेवावे. नंतर पीठ चांगले मळून त्याचे छोटे छोटे गोळे करावे. त्याची पातळ पापडी लाटून त्यात मोदकाचे सारण भरून मोदक वळावे. नंतर तुपात गुलाबीसर रंगावर तळून घ्यावे.
माघ महिन्यातल्या तिलकुंद चतुर्थीला तिळगुळाच्या मोदकाचा नैवेद्य दाखवतात.
राजश्री नवलाखे