lp19चायनीज, मेक्सिकन, थाई पद्धतीच्या अन्नपदार्थावर आपल्याकडची मंडळी तुटून पडत असतात. तसाच भारतीय खाद्यपदार्थावर आधी तुटून पडणारा, मग ते बनवणारा, त्यांच्यावर पुस्तकं लिहिणारा एक अवलिया ब्रिटनमध्ये आहे. या लेखातून भेटाच त्याला..

‘वसुधैव कुटुंबकम्’ या संकल्पनेने आजच्या जागतिकीकरणाच्या युगात जग अगदी जवळ येत चाललंय. जेवणाच्या सवयीच्या बाबतीत चायनीज, थाई, मेक्सिकन, इटालियन जेवणाने आपल्यावर गारूड केलंय. तसंच भारतीय जेवणानेदेखील जगावर गारूड केलं आहे; असाच एक अवलिया आहे जो भारतीय जेवणावर मनापासून प्रेम करतो. ५० वर्षांचा डॅन टुम्ब.. जन्माने कॅलिफोर्नियन असलेला डॅन ३० वर्षांपूर्वी ब्रिटनमध्ये आला आणि स्थिरावला. ब्रिटनमधील त्याच्या वास्तव्यात कधीतरी एकदा त्याने भारतीय ‘करी’ चाखली आणि तो भारतीय जेवणाच्या प्रेमात पडला. महिन्यातून अनेकदा ‘टेक अवे’मधून भारतीय जेवणांची पार्सल्स नेताना त्याच्या महिन्याचा खर्च वाढू लागला. त्याचं बजेट कोलमडू लागलं. शेवटी भारतीय जेवणाच्या प्रेमापोटी त्याने भारतीय जेवण शिकण्याचा निश्चय केला आणि आता तो भारतीय पाककृतींमध्ये पारंगत बनला आहे. डॅनला आणि त्याच्या कुटुंबीयांना भारतीय जेवण एवढं आवडतं की वर्षांचे lp91३६५ दिवस ते भारतीय पाककृतींचाच आस्वाद घेतात. त्यांच्या ख्रिसमस आणि न्यू इयर पार्टीत भारतीय पदार्थाची रेलचेल असते. डॅन स्वत: भारतीय मसाले आणि जेवण यांचा भोक्ता आहेच, पण तो भारतीय पद्धतीचं जेवण बनवू इच्छिणाऱ्या प्रत्येकाला हे शिकण्यास प्रोत्साहन देतो, मदत करतो. आज ट्विटरवर त्याचे ३० हजारपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.
भारतीय पद्धतीचं जेवण बनवू इच्छिणारे जगाच्या विविध भागांतील अनेक जण त्याच्याकडे मार्गदर्शन मागतात. आतापर्यंत डॅन पाचशेपेक्षा जास्त भारतीय पाककृती शिकला आहे. आजही त्याला एखाद्या ब्रिटिश-भारतीय रेस्तराँमधली पाककृती आवडली तर तो आवर्जून तेथील शेफची भेट घेतो आणि त्याच्याकडून रेसिपी शिकून घेतो. घरी आल्यानंतर ती पाककृती त्याप्रमाणे बनावी याकरिता अथक प्रयत्न करतो.
डॅनची ही भारतीय पद्धतीच्या स्वयंपाकाची आवड त्याच्या केटी, जो आणि जेनिफर या तिन्ही मुलांनाही आता लागली आहे.
भारतीय स्वयंपाकघरातील आई ‘माझ्या मुलाला किनई मॅगी खूप आवडतं’ असं कौतुकाने सांगते, तितक्याच कौतुकाने डॅन माझ्या घरात माझ्या मुलीला इंडियन करीबरोबर नान खूप आवडतात असं सांगतो.
डॅनची परफेक्ट इव्हिनिंगची व्याख्या आहे.. ‘अत्यंत चविष्ट भारतीय जेवण, लोणी लावलेल्या व खरपूस भाजलेल्या नानसह..’ या परफेक्ट ‘नान’च्या शोधात त्याची ‘सचिन इन न्यूकॅसल’ या रेस्तराँच्या बॉब अरोराशी भेट झाली आणि परंपरागत पद्धतीने तंदूर लावून दह्य़ात पीठ सहा सात तास मुरवून अस्सल पंजाबी नान तयार करण्याची कला डॅन त्याच्याकडून शिकला. मग पेशावरी नान, खिमा भरलेले चविष्ट नान, रोझमेरी व लसणाचा वापर करून तयार केलेले नान अशा वेगवेगळ्या प्रकारचे नान करायला तो शिकत गेला.
ह्य़ुस्टन टेक्सास येथील शेफ किरणची आणि डॅनची भेट झाली, तेव्हा त्या पहिल्या भेटीत किरणने त्याला आपल्या हातच्या गरमागरम टम्म फुगलेल्या पुऱ्या खिलवल्या. मग काय एकीकडे पुऱ्या खाता खाता दुसरीकडे पुऱ्यांची साग्रसंगीत पाककृती, व्हिडीयोसह रेकॉर्ड झाली. डॅनच्या पाककुशल नजरेतून पाककृतीचे कोणतेच बारकावे सुटत नाहीत. पुऱ्यांना सोनेरी रंगाचा पदर सुटण्याकरिता त्यावर तीन ते पाच सेकंद तेल झाऱ्याने उडवावं, हे त्याचं म्हणणं त्याच्यातल्या निरीक्षणशक्तीची कमाल दर्शवतं. नान तंदूर ओव्हनवर आणि स्टोव्हवर बनवायच्या या दोन्ही पद्धती तो शिकला आहे.
मूग डाळीचा चिला असो किंवा चण्याच्या डाळीचा पोळा (पॅनकेक) या गोष्टी सकाळच्या नास्त्याला कोणत्या चटणीबरोबर सव्‍‌र्ह करायच्या, साग रोटी कशी बनवायची, पंजाबी पराठय़ांचे वेगवेगळे प्रकार या आणि अशा मुरब्बी गृहिणीलाही कठीण वाटणाऱ्या गोष्टी डॅनला चुटकीसरशी येतात.
भारतीय पाककृतींमध्ये लसूण वेगवेगळ्या सहा प्रकारे कसा वापरला जातो, याचा चित्रमय संग्रह त्याने तयार केला आहे. विशेष म्हणजे कोणत्या प्रकारे तयार केलेला लसूण कोणत्या रेसिपीला किती वापरायचा हे त्याला चांगलंच माहीत आहे. ‘आतापर्यंत मला लसूण वापरण्याच्या एक-दोन पद्धती माहिती होत्या, पण अतिशय बारीक चिरलेला, खलबत्त्यात कुटलेला लसूण, मंद तेलात परतून परत तेलात मुरवलेला लसूण, सुकवलेला लसूण आणि टूथ पिकच्या साहाय्याने मंद गॅसवर गुलाबीसर भाजलेला लसूण..’ एखाद्या आजीबाईच्या निगुतीने लसणीचे हे सर्व धडे डॅन तपशीलवार देतो. इतकंच नव्हे तर हे सर्व प्रकार कोणत्या भारतीय रेसिपीत कसे वापरायचे याचे इत्थंभूत माहिती त्याला असते.
भारतीय पापड, लोणची यांच्याविषयी त्याला जास्त कुतूहल होतं. लिंबाचं लोणचं भारतीय पद्धतीने कसं बनवायचं याकरिता त्याने स्थानिक भारतीय रेस्टारंटच्या शेफला गाठलं, त्याच्याकडून ती रेसिपी शिकून घेतली. आज त्याला आंब्याच्या करकरीत लोणच्यापासून ते लसणीच्या लोणच्यापर्यंत आवडीचे लोणच्याचे lp92प्रकार येतात. त्याच्या हातचं लिंबाचे लोणचं ब्रिटनमधील सुपरमार्केटमध्ये मिळणाऱ्या कोणत्याही ब्रॅण्डेड लोणच्यापेक्षा अधिक टेस्टी आहे. हे प्रशस्तिपत्रक खुद्द त्याच्या रेस्टॉरंटच्या शेफने दिलंय.
बटाटय़ाच्या काचऱ्यांची सुकी भाजी डॅन खूप छान बनवितो. या भाजीला त्याने ‘बॉम्बे आलू’ असं नाव दिलंय. या काचऱ्या थोडय़ा कमी तेलात अजून क्रिस्पी बनविल्या तर मार्केटमध्ये जास्त पैशात मिळणाऱ्या पोटॅटो चिप्सपेक्षा मुलांसाठी अधिक चांगल्या असतील असं त्याचं मत आहे. जगातला सर्वात चांगला ‘लेमन राइस’ फक्त डॅन बनवू शकतो असा सार्थ अभिमान त्याच्या कुटुंबीयांना आहे. बासमती तांदळाचा दाणा त्याचे कण न मोडता कसा शिजवावा, लिंबाचा रस कसा घालावा आणि शेवटी खमंग फोडणी कढीपत्ता कुरकुरीत परतून तो न करपवता कशी तयार करावी आणि हलक्या हाताने ती भातावर कशी परतावी याची प्रत्येक स्टेप तो खरोखरच एखाद्या सुगरणीप्रमाणे सांगतो.
‘लस्सी’ तर डॅनच्या समर ब्रेकफास्टचा अविभाज्य भाग आहे. मुलांच्या आवडीप्रमाणे चेरी, स्ट्रॉबेरी, मँगो यासारखी फळं तो लस्सीत घालतो.

डॅनच्या घरातील भारतीय जेवणाचा मेनू
सोमवार – विंदालू, भात आणि लिंबू
मंगळवार – गोवन फिश विथ ग्रीन चिली चटणी ग्रीन सॅलड
बुधवार – व्हेज करी व परतलेली कोबीची भाजी
गुरुवार – कोणतीही भारतीय पद्धतीची करी विथ नान, भात व चिंचेची चटणी
शुक्रवार – कोथिंबीर पेरलेला राजमा, भात व मिक्स भजी.
शनिवार – चिकन जालफ्रेझी व नान कोथिंबीर पेरलेली मसूर डाळ व नान.

भारतीय माणूस परदेशी प्रवासाला गेल्यावर सगळ्यात जास्त काय मिस करतो तर भारतीय पद्धतीचं जेवण, भारतीय पदार्थ.. तसंच डॅनचंही होतं. तो बाहेर गेल्यावर त्याचं आवडतं भारतीय जेवण मिस करतो. त्याच्याच भाषेत सांगायचं तर दोन-तीन दिवसांपेक्षा जास्त तो भारतीय जेवणापासून दूर राहू शकत नाही, नाहीतर त्याला व्रिडॉव्हल सिण्ड्रोमसारखी बेचैनी होते. त्यामुळे आता बाहेरगावी जाताना त्याच्या बॅग्ज भारतीय मसाल्याच्या पदार्थानी भरलेल्या असतात. वेगवेगळ्या देशांतील विमानतळांवर चेकअपमध्ये त्याला या मसाल्याच्या बॅग्जबद्दलच्या निरनिराळ्या प्रश्नांना सामोरं जाताना त्याची कशी भंबेरी उडते हे सांगायला तो विसरत नाही.
डॅनचं भारतीय जेवणावरचं प्रेम पाहून त्याच्या वाढदिवसाला त्याच्या बायकोने- कॅरोलीनने त्याला चक्क ‘तंदूर ओव्हन’ भेट दिला.
त्याच्या या भारतीय जेवणावरील प्रेमामुळे त्याचा सर्व मित्रपरिवार त्याला ‘करी गाय’ या नावाने ओळखायला लागलाय. जेवण बनविण्याच्या आवडीमुळे त्याने ‘करी गाय लिमिटेड’ या कंपनीची स्थापना केली आहे. या कंपनीमार्फत तो भारतीय मसाले ऑनलाइन विकतो. त्याची भारतीय जेवणाच्या पाककृतीची 
Great Indian sea food
How to make British Indian
Restarunt style meal
Low fat Indian take away
तीन तीन इ बुक्ससुद्धा प्रकाशित झालेली आहेत.
‘भारतीय जेवण आरोग्याला अपायकारक असतं ही चुकीची कल्पना आहे. बाहेर रेस्टॉरंटमधील जेवणात तेला-तुपाचा भरपूर प्रमाणात वापर असतो, पण तेच जेवण तुम्ही घरी बनवलं तर खूप चांगलं व पौष्टिक बनू शकतं. आता माझ्या पूर्ण परिवाराला भारतीय पद्धतीने जेवणाची जणू सवय लागली आहे. माझ्या मुलीच्या जेनिफरच्या बर्थ डे पार्टीची सरप्राइझ डिश होती तिच्या आवडीची ‘तांदळाची खीर.’ आता तिन्ही मुले आवडीने स्वयंपाक करतात. आम्ही भारतीय पाककृतीचे तीन-चार ग्रेव्ही मिक्स तयार करून फ्रीजमध्ये ठेवतो. मग मला जेवण बनवणं खूप सोपं जातं.’ डॅन सांगतो.
डॅनला स्वत:ला भारतीय जेवणामध्ये ‘रोगन जोश’ व जाल फ्रेझी खूप आवडते.
या भारतीय जेवणावर मनापासून प्रेम करणाऱ्या आणि या प्रेमापोटी भारतीय पाककला शिकून त्यात पारंगत होणाऱ्या डॅनला हॅटस् ऑफ!!
डॅनला भारतीय पद्धतीचं जेवण खूप आवडत असलं तरी त्याला अजून भारतात यायची संधी मिळालेली नाही. तशी संधी त्याला जरूर मिळो आणि अतिथी देवो भव या आपल्या संस्कृतीप्रमाणे भारतीय खाद्यपदार्थाच्या माध्यमातून त्याचा पाहुणचार करायची संधी आपल्याला मिळो.

Story img Loader