सध्या सगळीकडेच धूम आहे ती फुटबॉल विश्वचषकाची. हा विश्वचषक कोण जिंकेल, याची चर्चा सुरू झाली आहे आणि त्यामध्ये अवघे क्रीडा विश्व न्हाऊन निघताना दिसत आहे. फुटबॉल हा सांघिक खेळ, त्यामुळे सर्वात महत्त्वाचा संघ आणि त्यानंतर खेळाडू. पण काही खेळाडू आपल्या देदीप्यमान कामगिरीच्या जोरावर अपवाद ठरतात आणि संघापेक्षा त्यांच्यावरच अधिक लक्ष दिले जाते. कारण त्यांच्या खेळावर जय-पराजयाची समीकरणे अवलंबून असतात. त्यामुळेच असे काही खेळाडू प्रतिस्पध्र्याच्या रडारवरही असतील. यंदाच्या विश्वचषकातल्या अव्वल दहा खेळाडूंची ही यादी..
१) ख्रिस्तियानो रोनाल्डो
देश : पोर्तुगाल
यंदाच्या विश्वचषकात ज्याच्यावर अवघ्या क्रीडा विश्वाची नजर असेल आणि अव्वल दहा खेळाडूंच्या यादीमध्ये जो अग्रस्थानी असलेला खेळाडू म्हणजे ख्रिस्तियानो रोनाल्डो. काही वर्षांपूर्वी ब्राझिलच्या रोनाल्डोने धुमाकूळ घातला होता. जेव्हा ख्रिस्तियानोचा उदय होत होता, तेव्हा काही जण त्याला ब्राझीलचाच समजत होते. पण कालांतराने त्याने आपल्या देदीप्यमान कामगिरीच्या जोरावर स्वत:ची अवीट अशी ओळख निर्माण केली. रोनाल्डो हा सध्याच्या घडीचा फुटबॉल विश्वातील अव्वल खेळाडू समजला जातो. फुटबॉल लीगमध्ये त्याच्याकडून दमदार कामगिरी होत असली तरी पोर्तुगालचा संघ मात्र काही वर्षांपूर्वी अडचणीत होता. यामधून रोनाल्डोनेच पोर्तुगालला बाहेर काढले आणि एका अनोख्या उंचीवर नेऊन ठेवले. खरे सागायचे तर पोर्तुगालचा संघ हा ‘वन मॅन आर्मी’ असाच आहे. कारण त्यांचा संघ मुख्यत्वेकरून रोनाल्डोवर अवलंबून आहे. यंदाच्या विश्वचषकात रोनाल्डो किमान चार गोल करेल आणि संघाला मोठी उंची गाठून देईल, असे क्रिकेटपंडितांचे म्हणणे आहे. त्याचा खेळ जेवढा चपळ तेवढीच परिपक्वताही त्याच्यामध्ये आहे. आतापर्यंत बऱ्याचदा अनपेक्षित पण चोख फटके मारत त्याने संघाला विजय मिळवून दिले आहेत. यापूर्वीही त्याने आपले सामथ्र्य दाखवून दिले असले तरी ही त्याच्यासाठी अग्निपरीक्षा आहे. या विश्वचषकात जर सर्वाधिक अपेक्षा कोणाकडून असतील तर त्या रोनाल्डोकडून. त्यामुळे पोर्तुगालला जर विश्वचषक जिंकायचा असेल तर रोनाल्डोला जबरदस्त कामगिरी करावी लागेल.
२) नेयमार
संघ : ब्राझील
पेले आणि रोनाल्डोसारख्या महान फुटबॉलपटूंच्या ब्राझीलकडून सध्याच्या विश्वचषकात दिसणारा चमचमता तारा म्हणजे नेयमार. ब्राझीलच्या संघाने यावेळी विश्वचषकासाठी युवा खेळाडूंची मोट बांधली आहे. त्यामुळे काका, रोनाल्डिनोसारख्या अनुभवी खेळाडूंना संघातून बाहेरचा रस्ता दाखवल्यामुळे आता सर्वाचेच डोळे नेयमारवर लागलेले असतील. त्याने गेल्या काही वर्षांत केलेल्या कामगिरीमुळे त्याच्याकडून सर्वाच्याच अपेक्षा वाढलेल्या आहेत. आपल्या घरातच सामने होणार असल्याचा नक्कीच फायदा ब्राझीलला होईल आणि त्यांना जर विश्वविजेतेपदाला गवसणी घालायची असेल तर त्यासाठी नेयमारकडून मोठय़ा कामगिरीची अपेक्षा असेल. कारण ब्राझीलच्या संघातील सर्वात आघाडीचे नाव नेयमारचे आहे. बार्सिलोनाकडून खेळताना त्याच्याकडून चांगली कामगिरी झाली होती. त्याचबरोबर ब्राझीलकडून खेळतानाही त्याने दमदार कामगिरी केली आहे. युवा नेयमारमध्ये जबरदस्त जोश आहे, पण त्यामध्ये अजूनही हवी तशी परिपक्वता दिसत नाही. त्यामुळे नेयमार जोशमध्ये होश गमावून बसला तर ब्राझीलची वाट बिकट होऊ शकते. जगातील सर्वोत्तम तीन खेळाडूंमध्ये गणना होणाऱ्या नेयमार मैदानातील परिस्थिती कशी हाताळतो आणि संघ त्याला कसा पाठिंबा देतो, यावर ब्राझीलच्या विजयाचे गणित अवलंबून असेल.
३) लिओनेल मेस्सी
संघ : अर्जेटिना
लिओनेल मेस्सी, या नावाची ओळख देण्याची गरज नाही. कारण जो फुटबॉल पाहतो, त्याला मेस्सी काय चीज आहे हे चांगलेच माहीत असेल. दिएगो मॅरेडोनानंतर अर्जेटिनाला मिळालेला महान खेळाडू म्हणजे मेस्सी. मेस्सीचा चपळ, चाणाक्ष खेळ साऱ्यांनाच भावतो आणि प्रतिस्पध्र्याना धडकी भरायला लावतो. बार्सिलोकडून खेळताना मेस्सीची कामगिरी अफलातून होती. पण त्याचा खेळ जेवढा बार्सिलोनाकडून खेळताला बहरला तेवढाच अर्जेटिनाकडून खेळताना नक्कीच चांगला झाला नाही आणि याची प्रचीती गेल्या विश्वचषकातही आली. अन्य खेळाडूंची अपेक्षित साथ न लाभल्याने अर्जेटिनाला उपांत्य फेरीतही पोहोचता आले नव्हते. पण हीच त्याच्यासाठी संधी असेल ती मॅरेडोना यांच्या पंक्तीत जाऊन बसण्याची. त्यामुळे मेस्सीसाठी ही एक मोठी परीक्षा असेल आणि याची जाणीवही त्याला असेल. त्यामुळे यंदाच्या विश्वचषकात बार्सिलोनाला विजय मिळवून देणार मेस्सी संघाला विश्वचषक मिळवून देण्यासाठी काय करतो, याची उत्सुकता साऱ्यांनाच असेल.
४) लुईस सुआरेझ
देश : उरुग्वे
कोणत्याही क्षणी काहीही करण्याची कुवत असलेला खेळाडू म्हणजे लुईस सुआरेझ. चित्त शांत असले तरी लुईसचा खेळ मात्र आक्रमक. लिव्हरपूलसारख्या संघाकडून खेळताना त्याने त्याचे सामथ्र्य दाखवून दिले आहे. त्याचबरोबर उरुग्वेकडून खेळतानाही त्याने दमदार कामगिरी केली आहे. यंदाच्या विश्वचषकात जर लुईसने लौकिकाला साजेशी कामगिरी केली, तर उरुग्वेचा संघ उपांत्य फेरीत पोहोचू शकतो, असे फुटबॉल पंडितांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता सर्व देशांच्या अपेक्षांचे ओझे त्याच्यावर आहे. आतापर्यंत त्याने लीगमध्ये दमदार कामगिरी केल्यामुळे इंग्लंडमध्ये तर सर्वात लोकप्रिय असलेला फुटबॉलपटू लुईस आहे. गेल्या काही वर्षांपासून लुईसच्या कामगिरीचा आलेख चढता राहिलेला आहे. पण यंदाच्या विश्वचषकात त्याला कामगिरीत सातत्य राखता येईल का, याची उत्सुकता साऱ्यांना असेल.
५) मेसुत ओझिल
देश : जर्मनी
आतापर्यंत जवळपास प्रत्येक विश्वचषकामध्ये जर्मनीने दामदार कामगिरी केलेली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये त्यांच्या या कामगिरीमध्ये मोलाचा वाटा उचलताना दिसतो तो मेसुत ओझिल. कमालीचे सातत्य, कठोर मेहनत आणि कुठल्याही स्थानावर संघासाठी काहीही करण्यासाठी ओझिल नेहमीच सज्ज असलेला पाहायला मिळतो. यंदाच्या विश्वचषकात जर जर्मनीला जेतेपदापर्यंत मजल मारायली असेल तर त्यांच्यासाठी ओझिल हा हुकमी एक्का ठरू शकतो. कारण आतापर्यंत त्याने जर्मनीच्या संघासाठी बरेच काही केले आहे. आर्सेनलकडून खेळताना तर त्याने जबरदस्त कामगिरी करत संघाला विजेतेपदापर्यंत पोहोचवले आहे. पण जर्मनीकडून खेळताना बऱ्याचदा त्याची संघातील जागा बदलण्यात आली आणि त्याचाच फटका संघाला बसला. त्यामुळे यावेळी जर ओझिलला एकाच जागेवर खेळवले गेले तर त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. त्यामुळे ओझिलने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ केला आणि संघाकडून त्याचा चांगला पाठिंबा मिळाला तर जर्मनीचा संघ ब्राझिलमध्ये कमाल करू शकतो.
६) आंद्रेस इनिएस्टा
देश : स्पेन
वाइन जशी मुरत जाते तशी ती अधिक चांगली लागते, असे म्हटले जाते, असेच काहीसे स्पेनच्या आंद्रेस इनिएस्टाच्या बाबतीत बोलले जाते. गतविजेत्या स्पेनच्या संघातील एक अनमोल हिरा इनिएस्टा असल्याचे म्हटले जाते. फुटबॉलमध्ये वयाला फार महत्त्व असते. जास्त वयाच्या खेळाडूंना संघातून बाहेरचा रस्ता दाखवला जात असला तर एनिएस्टाच्या बाबतीमध्ये मात्र काहीसे वेगळे चित्र पाहायला मिळते. कारण त्याच्याकडे असलेली गुणवत्ता आणि अनुभव याची जाण संघाला नक्कीच आहे. त्यामुळे स्पेनच्या संघातील अव्वल खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते आणि त्यामुळेच स्पेनवासीयांच्या मोठय़ा अपेक्षा त्याच्याकडून आहेत. गतविजेत्या स्पेनला जर पुन्हा एकदा विश्वचषकाला गवसणी घालायची असेल तर नक्कीच एनिएस्टा हा संघासाठी मोलाचा खेळाडू असेल.
७) थिआगो सिल्व्हा
देश – ब्राझील
कोणताही संघ कधीही फक्त एकाच खेळाडूवर अवलंबून नसतो. ब्राझीलच्या संघाचेही असेच काहीसे आहे. नेयमारसारखा एक तारा ब्राझीलकडे आहेच, पण जर तो चालला नाही तर त्यांच्याकडे दुसरा पर्याय आहे तो म्हणजे थिआगो सिल्व्हाचा. आतापर्यंत स्थानिक आणि क्लब्जच्या सामन्यांमध्ये सिल्व्हाने आपली चमक दाखवून दिली आहे. ब्राझीलविरुद्ध खेळताना प्रतिस्पर्धी जर नेयमारच्या मागे लागले आणि त्याला जर चांगला खेळ करता आला नाही तर सिल्व्हा हा त्यांच्याकडे सर्वात चांगला पर्याय असेल. आपल्याच देशात विश्वचषक असल्याने सहाव्यांदा जेतेपद पटकावण्याचे स्वप्न ब्राझील बघत असेल, तर त्यांना नेयमारसह सिल्व्हावर अधिक मेहनत घ्यावी लागेल. आपल्या दमदार खेळाने त्याने ब्राझीलवासीयांची मने तर जिंकली आहेतच, त्यामुळेच विश्वचषकामध्ये देशवासीयांना त्याच्याकडून फार मोठय़ा अपेक्षा असतील. या विश्वचषकात जर सिल्व्हाकडून दमदार कामगिरी झाली तर नक्की क्रीडा विश्वाला एक नवा हिरा गवसेल, असे म्हटले जात आहे.
८) थॉमस म्युलर
देश – जर्मनी
गेल्या काही वर्षांमध्ये जर्मनीच्या संघात आपली जागा निर्माण करण्यात यशस्वी ठरलेला खेळाडू म्हणजे थॉमस म्युलर. बार्यन म्युनिककडून खेळताना म्युलरने दमदार कामगिरी करत संघाला एकहाती विजय मिळवून दिले आहेत. गेल्या दोन मोसमांमध्ये तर त्याच्या देखण्या खेळाचा आनंद साऱ्यांनीच लुटला आहे. म्युअर हा खऱ्या अर्थाने दोन गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे, एक म्हणजे त्याच्या खेळातला अफलातून वेग आणि जोश. वेगवान खेळाच्या जोरावर प्रतिस्पध्र्यावर तो कधी चाल करून जातो, हे कळत नाही. म्युलर हा मोठा सामन्यांचा खेळाडू आहे, असे क्रीडा पंडितांचे म्हणणे आहे. कारण बऱ्याच मोठय़ा सामन्यांमध्ये तो खेळला आहे, त्यामध्ये चॅम्पियन्स लीगची अंतिम फेरी असो किंवा विश्वचषकातील पात्रता फेरीच्या टप्प्यामध्ये त्याची कामगिरी चांगली पाहायला मिळालेली आहे. त्यामुळे विश्वचषकाच्या बाद फेरीत जर संघ पोहोचला तर त्यांच्यासाठी म्युलर हा महत्त्वाचा खेळाडू असेल.
९) मारिओ बालोटोली
संघ – फ्रान्स
आपल्या केशरचनेबरोबरच धडाकेबाज खेळासाठी मारिओ बालोटोली प्रसिद्ध आहे. ए सी मिलानसारख्या नावाजलेल्या संघाकडून खेळताना त्याने आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. त्याचबरोबर फ्रान्सकडून खेळतानाही त्याने चांगली कामगिरी केली आहे. बालोटोली हा खरं तर घाना देशाचा, पण तिथून घरच्यांनी काही कारणास्तव इटली गाठले आणि तो इथला स्थायिक झाला. १५-वर्षांखालील संघापासून त्याने राष्ट्रीय संघ कधीही सोडलेला नाही. गेल्या विश्वचषकात त्याला पहिली संधी देण्यात आली आणि त्याने पोलंडविरुद्ध गोल करत आपली निवड सार्थ ठरवली. आता या विश्वचषकात उतरताना त्याच्या गाठीशी चांगला अनुभव नक्कीच आहे. पण त्याने आपल्या आक्रमकपणावर नियंत्रण ठेवायला हवे. जर त्याने आक्रमकपणावर नियंत्रण ठेवले तर नक्कीच तो फ्रान्सला मोठय़ा स्तरावर घेऊन जाऊ शकतो.
१०) फर्नाडो टोरेस
देश – स्पेन
स्पेनच्या नावाजलेल्या आघाडीपटूंमधील एक अव्वल नाव म्हणजे फर्नाडो टोरेस. वेग आणि तांत्रिक सक्षता हे त्याच्या खेळातील वाखाणण्याजोगे असे गुण. स्पेनला जेव्हा जेव्हा गरज पडली तेव्हा टोरेसने संघासाठी दमदार कामगिरी करून दाखवली आहे. एक आघाडीपटू म्हणून लीग सामन्यांमध्येही त्याने चांगले नाव कमावले आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये संघासाठी काहीही करून दाखवण्याची धमक टोरेसमध्ये आहे आणि त्याने ते सिद्धही करून दाखवले आहे. पण गेल्या काही वर्षांमध्ये गुडघ्याच्या आणि जांघेतील स्नायू दुखावल्यामुळे टोरेस जायबंदी होता. पण यामधून तो सावरल्याचे वृत्त असून पुन्हा एकदा तो जुना टोरेस पाहायला मिळणार का, याची उत्सुकता साऱ्यांनाच असेल.