रुपेरी पडदा हे व्यक्तीचा, कथेचा, परिसराचा कॅनव्हास मांडणारं व्यासपीठ. फ्रेम-अँगल-पटकथा-संवाद आणि असंख्य घटकांतून उभं राहतं एक विश्व- आभासी पण मनाला विश्वासार्हतेची डूब देणारं. रुपेरी दुनियेत वावरणाऱ्यांना फुटबॉलसारख्या हॅपनिंग गोष्टीची भुरळ न पडती तरच नवल. त्यामुळे ९० मिनिटांमध्ये मैदानावर रंगणारा थरार आणि त्यानिमित्ताने घडणाऱ्या सभोवतालचा वेध घेण्याचा पुरेपूर प्रयत्न हॉलीवूड, बॉलीवूडकरांनी केला आहे. चित्रपटाला मसाला लागतो- फुटबॉलमध्ये तो पुरेपूर आहे. चित्रपटाला कथानक लागते, पात्र लागतात, त्यांची आपापली विश्व असतात. हे सगळं फुटबॉल पर्याप्त प्रमाणात पुरवतं. प्रत्यक्ष मैदानात किंवा टीव्हीवर या गोलमैफलीची अनुभूती घेणाऱ्या प्रेक्षकांना ७० एमएम पटलावर तोच अनुभव देण्याचा प्रयत्न जगातल्या दिग्दर्शकांनी केला आहे. फुटबॉल विश्वाचा महासोहळा अर्थात विश्वचषक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. जगभरातले सर्वोत्तम खेळाडू आपल्या देशाला विश्वचषकाचा झळाळता चषक मिळवून देण्यासाठी सज्ज झाले आहेत. नृत्य आणि उत्सवी संस्कृतीचे मूर्तिमंत प्रतीक असलेल्या ब्राझीलमध्ये फुटबॉलचा कुंभमेळा अवतरणार आहे. भारतात इंडियन प्रीमिअर लीगचा (आयपीएल)जलसा आटोपतोय तोच फुटबॉल फिव्हर चढणार आहे. खेळ आणि चित्रपटात समाजाचे प्रतिबिंब उमटते, तत्कालीन परिस्थितीचे चित्रण असते. विश्वचषकाच्या पाश्र्वभूमीवर फुटबॉल केंद्रित चित्रपटांचा अभ्यास खेळ आणि त्यामागचे कंगोरे समजायला उपयोगी पडू शकतो. विश्वचषकाच्या निमित्ताने रुपेरी दुनियेतील गोलविश्वाचा घेतलेला हा धांडोळा.
बेंड इट लाइक बेकहॅम- नावातच डेव्हिड बेकहॅम या जगप्रसिद्ध इंग्लंडच्या फुटबॉलपटूचा संदर्भ असलेला हा चित्रपट. खेळाडू यशस्वी ठरला की त्याला पैसा-प्रसिद्धी, ग्लॅमर यांचं वलय मिळते. पण तिथपर्यंत पोहोचण्याचा रस्ता किती खडतर असू शकतो या वास्तवाची जाणीव करून देणारा हा चित्रपट आहे. लंडनमध्ये स्थायिक झालेल्या गुरमिंदर भामरा या मुलीला फुटबॉलची गोडी लागते. मात्र मुलगी म्हणजे लग्न-मुलं-संसार असे कर्मठ विचार गुरमिंदरच्या घरच्यांचे असतात. या विचारांना भेदत आणि आप्तस्वकीयांना आपली आवड खरी असल्याचे गुरमिंदर सिद्ध करते. परिस्थितीचे अडथळे ओलांडत
एस्केप टू व्हिक्टरी- मायकेल केन, सिल्व्हेस्टर स्टेलॉन आणि आपल्या अद्भुत खेळाने जिवंतपणी दंतकथा झालेले पेले यांच्या भूमिकांनी सजलेला हा चित्रपट. रॉकी आणि रॅम्बो फेम सिल्व्हेस्टर यात गोलकीपरच्या भूमिकेत आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जर्मनीच्या ताब्यात असलेली युद्धकैदी आणि जर्मन फुटबॉल टीम यांच्यातील खेळवल्या गेलेल्या सामन्याचे कथानक या चित्रपटात मांडले आहे. हिंसा-रक्तपात, निराशा या युद्घाशी संबंधित नकारात्मक गोष्टींना बाजूला सारत खेळाद्वारे ९० मिनिटे किती आनंददायी असू शकतात हा विचार दिग्दर्शक जॉन हस्टनने मांडला आहे. असंख्य खऱ्याखुऱ्या फुटबॉलपटूंनी चित्रपटात भूमिका केल्या होत्या.
किकिंग अॅण्ड स्क्रीमिंग- नावात काहीशी आक्रस्ताळी विशेषणं असलेला हा विनोदी चित्रपट आहे. परंतु यातला विनोद अंतर्मुख करणारा आहे. आयुष्यात अपयशी असा शिक्का बसलेला चित्रपटाचा नायक हायस्कूलमधल्या फुटबॉल संघाचे प्रशिक्षकपद स्वीकारतो. आपल्यातले लपलेले कौशल्य बाहेर काढून संघाला विजयपथावर नेण्याचे काम हा प्रशिक्षक करतो. यादरम्यान त्याचे आणि मुलाचे तरल नातेसंबंध हे सगळंच फुटबॉल संलग्न जगण्याची ओळख करून देणारी. विल फॅरालच्या सर्वसमावेशक अभिनयाची चुणूक या चित्रपटात पाहायला मिळते.
शाओलिन सॉकर- फुटबॉलला कुंगफूची फोडणी देऊन एकत्रीकरणावर बेतलेला हा हाँगकाँगमध्ये निर्मिलेला धमाल चित्रपट आहे. या दोन्ही खेळांमधल्या थराराची ग्राफिक्सच्या माध्यमातून अनुभूती हा चित्रपट देतो. जिंकण्यासाठी अमानवी वाटू शकणारी शक्ती निर्माण करून तिचा उपयोग करण्याची सुरस कथा या चित्रपटाचा आत्मा आहे. हॉलीवूडच्या अॅक्शनपॅक्ड चित्रपटांचा आशियाई चित्रपटांवरला प्रभाव हा चित्रपट स्पष्ट करतो.
गोल- खेळ खेळण्यामागचा संघर्ष किती खडतर असू शकतो याचा प्रत्यय घडवणारा हा सर्वागसुंदर चित्रपट. खेळ खेळाडू खेळतो, खेळाडू समाजाचा भाग असतो. सामाजिक अभिसरणावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. या चित्रपटात कहाणी आहे मेक्सिकोतून अवैधरीत्या अमेरिकेत स्थलांतरित झालेल्या गरीब कुटुंबातील फुटबॉलपटूची. माळीकाम करणारे वडील आणि तुटपुंजं उत्पन्न अशी परिस्थिती असतानाही सँटियागो व्यावसायिक फुटबॉलपटू बनतो. खाचखळग्यांनी भरलेल्या त्याच्या प्रवासाची ही कहाणी. फुटबॉलविषयी आणि खेळाडूंविषयी भरपूर जिव्हाळा निर्माण करणारा असा हा चित्रपट. फिफाच्या सहकार्यामुळे खरेखुरे संघ आणि खेळाडू चित्रपटात दिसतात. या चित्रपटाचे पुढचे दोन भागही प्रेक्षणीय आहेत. गोल-द ड्रीम बिगिन्स (२००५), गोल- लिव्हिंग द ड्रीम्स (२००७) आणि गोल-टेकिंग ऑन द वर्ल्ड (२००९) अशी ही त्रिसूत्री.
ग्रेसी- विजिगीषु वृत्ती असेल तर ईप्सित साध्य करता येतंच हे दाखवून देणारा हा प्रेरणादायी चित्रपट. डेव्हिस गुगेनहेइम दिग्दर्शित हा चित्रपट ग्रेसी बोवेनची संघर्षमय कहाणी आहे. फुटबॉलपटू भावाच्या अपघाती मृत्यूमुळे घरावर दु:खाचे सावट असते. हे सावट दूर करण्यासाठी आणि घराचा गाडा पूर्वपदावर आणण्यासाठी ग्रेसी फुटबॉलपटू होण्याचा निर्णय घेते. सत्यघटनेवर आधारित या चित्रपटात ग्रेसी अथक परिश्रमांच्या जोरावर व्यावसायिक संघात प्रवेश मिळवते. फुटबॉलच्या जोडीने सकारात्मक ऊर्जेची पुंजी देणारा हा चित्रपट आवर्जून पाहावा असा. कार्ली श्रेहोडरने ग्रेसीची भूमिका समरसून केली आहे.
मीन मशीन- मीन-मोड हे सर्व शालेय गणितात होतं. पण याच नावाच्या एका पुस्तकात फुटबॉल काय किमया घडवू शकतं याचा प्रत्यय येतो. दोन पोलिसांना मारहाण केल्याप्रकरणी डॅनी या प्रसिद्ध फुटबॉलपटूला तुरुंगवासाची शिक्षा होते. त्याच्या नावाभोवती असलेल्या वलयामुळे तुरुंगात सर्वजण त्याच्याशी फटकून वागतात. मात्र धमन्याधमन्यात फुटबॉल भिनलेला डॅनी कैद्यांना फुटबॉल शिकवतो.
द कप- फुटबॉलचे वेड धर्माच्याही पलीकडे कसे जाते याची अफलातून रंजक कथा सांगणारा हा चित्रपट. भूतानच्या खेंतन्से नोरबू दिग्दर्शित या वेगळ्या वाटेवरच्या चित्रपटाने अनेक फेस्टिव्हल्समध्ये पुरस्कारांवर नाव कोरले. फ्रान्समध्ये सुरू असलेले फुटबॉल विश्वचषकाचे सामने पाहण्याचं वेड बुद्ध भिक्षूंना लागतं. मात्र धर्मनियमांनुसार त्यांना याची परवानगी नसते. मठाच्या नियमांच्या विरोधात जाऊन, विविध अडथळ्यांना ओलांडत भिक्षू मुलं मठातच फुटबॉलची मॅच पाहण्यासाठी टीव्ही आणतात. अशक्य वाटावं असं हे भिक्षू मुलं प्रत्यक्षात घडवून आणतात. फुटबॉलप्रेमाची आस, बौद्ध तत्त्वज्ञान, आयुष्याची विचारसरणी या तीन विभिन्न प्रतलांचा वेध चित्रपटात घेतला आहे. भारतात, हिमाचल प्रदेशांतल्या छोटय़ा गावात या चित्रपटाचं चित्रीकरण झालं आहे.
लाँगेस्ट पेनल्टी शॉट इन द वर्ल्ड- लांबलचक नावाचा हा चित्रपट फुटबॉलला आवश्यक झुंजार वृत्तीचे दर्शन घडवतो. स्थानिक फुटबॉलच्या सामन्यात गोलकीपरला दुखापत होते. विमनस्क अवस्थेत दारूसोबत जगणाऱ्या गोलकीपरला त्याच्याऐवजी संधी देण्यात येते. शेवटच्या पेनल्टी किकला वाचवण्यासाठी या गोलकीपरला आणल्याने चाहते विरोध करतात. मात्र आठवडय़ाभराच्या काळात नवा गोलकीपर स्वत:ला सिद्ध करतो.
शी इज द मॅन- नावातच विचित्रपणा सांगणारा हा धमाल चित्रपट आहे. व्हिओला हेस्टिंग्ज मुलांच्या फुटबॉल संघातून खेळण्यासाठी चक्क तिच्या भावाच्या शाळेत जाते मुलगा बनून. पुढे जे काही घडतं ते वाचण्यापेक्षा अनुभवलेलं चांगलं. दिग्गज साहित्यकर्मी विल्यम शेक्सपीअरच्या ट्वेल्फ्थ नाइटवरून प्रेरित हा चित्रपट अँडी फिकमनने दिग्दर्शित केला आहे.
गेम ऑफ देअर लाइव्स- डेव्हिड अन्सपॉग यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट जॉफ्री डग्लस यांच्या याच नावाच्या पुस्तकावर आधारित आहे. परिस्थितीशी झगडून यशस्वी होणाऱ्या अमेरिकेच्या संघाची ही कहाणी आहे.
व्हॅन- नोकरीवरून अचानक काढून टाकल्याने उपजीविकेची समस्या भेडसावणाऱ्या दोन मित्रांनी वर्ल्डकप सामन्यांवेळी बर्गर विक्रीची व्हॅन लावण्याचा निर्णय घेणारा आणि फुटबॉलमुळे कमकुवत मनाचं आत्मविश्वासात झालेलं रूपांतर अशी मानवी आयुष्याची जबरदस्त कथा सांगणारा हा चित्रपट.
द अर्सेनल स्टेडियम मिस्ट्री-लोनार्ड ग्रिबल यांच्या कथेवर आधारित थोरोल्ड डिकन्सन दिग्दर्शित या चित्रपटात अर्सेनल चषक प्रसंगी फुटबॉलपटूच्या खुन्याचा शोध घेतला जातो. साहस, रोमांचक आणि गूढ असे विविध पैलू उलगडवणारा हा रहस्यपट.
स्टबी- बालपण ते व्यावसायिक फुटबॉलपटू बनलेल्या स्टबीची यात कहाणी आहे. विश्वविजेत्या संघाचा अविभाज्य घटक असलेल्या स्टबीची एक लहान मुलगा स्वाक्षरी मागतो आणि फ्लॅशबॅकमधून त्याचा प्रवास आपल्या समोर उभा राहतो.
दी गोलकीपर्स फीअर ऑफ दी पेनल्टी- पीटर हडकेच्या कादंबरीवर आधारित या चित्रपटात जर्मनीच्या सीमावर्ती भागात फुटबॉलच्या सामन्यात पेनल्टी हुकल्यामुळे गोलकीपरची हत्या करण्यात येते. ऑर्थर ब्रॉसची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट खिळवून ठेवतो.
यस्टरडेज हीरो- ३५ वर्षीय फुटबॉलपटूच्या आयुष्यावर बेतलेला हा चित्रपट. फुटबॉल, त्याच्या आयुष्यातील वळणं, संगीत असा पूर्ण मसाला या चित्रपटात आहे.
ले बलून डोर- तरुण आफ्रिकन फुटबॉलपटूची यात कहाणी आहे. वर्षांतील सर्वोत्तम फुटबॉलपटूचा मान मिळवणाऱ्या या युवा फुटबॉलपटूचा प्रवास यात चितारला आहे.
ऑल थिंग्ज फॉल अपार्ट- असाध्य आजाराने ग्रासलेल्या फुटबॉलपटूची जगण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती मांडणारा हा चित्रपट. मारिओ व्हॅन पीबल्स दिग्दर्शित या चित्रपटात कुर्टिस जॅक्सनने प्रमुख भूमिका साकारली होती. थिंग्ज फॉल अपार्ट नावाची चिनुआ अचुबी यांची प्रसिद्ध कादंबरी होती. नामसाधम्र्यामुळे चित्रपटासंदर्भात वादही निर्माण झाला होता. मात्र नंतर सामंजस्याने तो सोडवण्यात आला.
्र ्र ्र
साहेब- बॉलीवूडमधला कथानकात फुटबॉल असणारा अनिल गांगुलींचा चित्रपट. साहेबची भूमिका अनिल कपूरने साकारली आहे. साहेबला फुटबॉलची प्रचंड आवड असते. एकत्र कुटुंबातील सर्वजण त्याला या आवडीसाठी नावं ठेवत असतात. यामध्ये करिअर नाही असे सुचवत असतात. मात्र परिस्थितीशरण बहिणीच्या लग्नासाठी तो आपली किडनी दान करतो. यामुळे त्याला आपल्या फुटबॉलवर पाणी सोडावं लागतं.
हिप हिप हुर्रे- बिहारमधल्या अनागोंदीचं आपल्या चित्रपटातून दर्शन घडवणाऱ्या प्रकाश झा यांचा हा पहिलाच चित्रपट. चित्रपटाचा नायक संदीप चौधरी अभियंता असतो. मात्र मनासारखी नोकरी मिळत नसल्याने एका छोटय़ा गावातल्या शाळेत क्रीडाशिक्षकाचे काम स्वीकारतो. आपल्या नेतृत्वगुणांच्या बळावर तो फुटबॉल संघाला विजय मिळवून देतो. राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार विजेते गुलजार यांनी चित्रपटाचा स्क्रीनप्ले लिहिला आहे.
धना धना धन गोल-अलीकडच्या काळात फुटबॉलवर बेतलेला विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित हा चित्रपट. लंडनमधल्या दक्षिण आशियाई समाजातील लोकांची ही कहाणी आहे. बेंड इटच्या प्रमाणे भारतातून इंग्लंडमध्ये स्थायिक झालेल्या कुटुंबातील फुटबॉलप्रेमी मंडळींच्या संघर्षांची कथा आहे. जॉन अब्राहम, अर्शद वारसी, बोमन इराणी आणि बिपाशा बसू अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात होती. याचा सिक्वेल बनवण्याचे दिग्दर्शकाने ठरवले होते. मात्र अद्याप तो आलेला नाही.
सिकंदर- प्रेम, इश्क, मोहब्बत या बॉलीवूडी साच्याला छेद देणारा हा पीयूष झा यांचा चित्रपट. संवेदनशील जम्मू-काश्मीरच्या पाश्र्वभूमीवर बेतलेल्या या चित्रपटात परझान दस्तूरसह आर. माधवन, संजय सुरी, आयेशा कपूर प्रमुख भूमिकांमध्ये आहेत. दहशतवादाच्या वाढत्या प्रसारात फुटबॉल कसे तग धरते याची ज्वलंत कहाणी यात पाहायला मिळते. विनोदी नावाखाली सवंग-थिल्लरपटांच्या भाऊगर्दीत हा चित्रपट हरवला पण दर्दीनी जरूर पाहावा असा.
फुटबॉल या खेळावर आधारित शेकडो माहितीपट विविध देशांत तयार झाले आहेत. विशिष्ट खेळाडूची किंवा संघाची सखोल माहिती देणाऱ्या या माहितीपटांनी फुटबॉलविश्वाची महती कळण्यास मदतच होते. सर्वाधिक देशात खेळला जाणारा खेळ असं फुटबॉलविषयी म्हटले जाते. त्यामुळे प्रत्येक देशात या खेळाने रुपेरी क्षेत्रातील मंडळींना भुरळ घालणे साहजिक आहे. पाहू तेवढं कमी अशी आपली अवस्था होऊ शकते. फुटबॉल मॅनिया सुरू झालाच आहे, वेळ आणि संधी असेल तर मोठय़ा पडद्यावरच्या या गोलप्रयत्नांचा आवर्जून आस्वाद घ्या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा