लढा
गौरी-गणपतीचे ते दिवस होते. अमर दोन महिन्यांची सुट्टी संपवून विशाखापट्टणम येथे सेवेत दाखल झाला होता. त्यानंतर नऊ दिवसांनी म्हणजे २३ सप्टेंबर १९९३ रोजी नौदलाचे दोन अधिकारी आमच्या डोंबिवलीतील उदयांचल सोसायटीतील जुन्या घरी धडकले. अमरला अपघात झाला आहे असे त्यांनी आम्हाला सांगितले. त्यांनी विमानाची दोन तिकिटे आणली होती. अचानक आलेल्या या बातमीने आभाळ कोसळले. काही सुचेना. अमरला अपघात झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. बघता बघता घर परिसर माणसांनी भरून गेला. या सगळ्या धावपळीत, भेदरलेल्या अवस्थेत अमरला खूप काही लागले आहे का, त्याच्यावर कोठे उपचार सुरू आहेत अशा अनेक प्रश्नांनी मी नौदल अधिकाऱ्यांना भंडावून सोडले. अखेर माझा भाऊ सुभाष पटवर्धन याला अधिकाऱ्यांनी अमरचा मृत्यू झाल्याचे सांगितले. माझ्या भावाने ही बाब तात्काळ मला सांगितली नाही. माझी बैचेनी जसी वाढत गेली तसे भाऊ सुभाषने मला अमर आपल्यात नाही असे सांगितले. माझ्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. माझं पोर गेलं आणि मग मी का जिवंत आहे असं मला वाटत होतं. आम्ही तिकडे हैदराबादला जायला निघालो. हैदराबाद विमानतळावर आमच्याबरोबर असलेल्या मिलिंद शिंदे यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ खरेदी केला. त्यामध्ये ‘नौदलातील पाणबुडय़ाचा मृतदेह सापडला’ अशी बातमी आली होती.
२१ सप्टेंबर रोजी अमरचा मृत्यू झाला होता. नौदल अधिकाऱ्यांना आम्ही मृत्यूची कारणे विचारू लागलो. काकिनाडा येथे बंगालच्या उपसागराला गोदावरी नदी मिळते तेथे भूदल, हवाईदल, नौदलाची संयुक्त युद्धाची तयारी सुरू होती. त्यावेळी हेलिकॉप्टरमधून समुद्रात उडी मारताना अमरचा मृत्यू झाला. असे उपस्थित लेफ्टनंट रावत, कसरतींचे प्रमुख सुब्रम्हण्यम सांगू लागले. अमरच्या अगोदर तीन जणांनी उडय़ा मारल्या. त्यामधील एक जण अगोदर जखमी झाला. तो सुखरूप होता. अमरने सकाळी पावणेसात वाजता उडी मारल्यानंतर तो पाण्यातून वर आलाच नाही. शोध घेऊनही सापडला नाही. समुद्राला उधाण आले होते. उडी मारताना त्याला हदयविकाराचा झटका आला असावा, अशी शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तविली. अशा वेळी तुमची आपत्कालीन यंत्रणा काय करीत होती यासारख्या आमच्या प्रश्नांची नीट आणि स्पष्ट उत्तरे नौदल अधिकारी देत नव्हते.
अमरचा मृतदेह नंतर सापडला. तो ज्या ठिकाणी ठेवण्यात आला होता, तेथे योग्य तापमान राखण्याची काळजी घेण्यात न आल्याने दरुगधी सुटली होती. योग्य तापमान का ठेवले नाही या आमच्या प्रश्नाचे उत्तरही त्यावेळी एका अधिकाऱ्याने ‘असेच घडते येथे’ असे गोलमाल उत्तर दिले. माझा भाऊ म्हणजेच अमरचा मामा सुभाष पटवर्धन जलतरणपटू आहे. त्याचा समुद्राच्या पाण्याचा अभ्यास आहे. त्याला नौदल अधिकारी आपल्याला चुकीची माहिती देत आहेत याचा अंदाज येत होता. अमरचा मृत्यू झाला त्यावेळी ‘समा’ होती. म्हणजे समुद्र खवळलेला नसतो आणि खाडीचे पाणी शांत असते. अशा परिस्थितीत अमरचा मृत्यू होणे शक्य नव्हते, असे सुभाषने संतप्त होऊन अधिकाऱ्यांना सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा