सुतोंडा किल्ल्यावर एवढय़ा संख्येने असलेली पाण्याची टाकी, त्यांच्यावरचे ते लेणीसदृश्य खोदकाम बघून अचंबित व्हायला होते. हा किल्ला होता म्हणून एवढी टाकी आहेत की हा जलव्यवस्थापनाचा उत्कृष्ट नमुना आहे, असा प्रश्न पडतो.
औरंगाबाद जिल्ह्य़ाच्या अजिंठा डोंगर परिसरात (सह्य़ाद्रीची विध्यांदी ही डोगर रांग) पर्यटनयोग्य असा खूप मोठा खजिना आहे. मोठमोठे धबधबे, विपुल अशी लेणी, चार-पाच किल्ले, विपुल अशी हेमाडपंथी मंदिरे, डोंगर, दऱ्या, निसर्गसंपदा. या परिसरात पर्यटन क्षेत्र चांगल्या पद्धतीने विकसित होण्यासाठी सगळं काही आहे. मात्र गरज आहे राजकीय इच्छाशक्तीची, लोकप्रतिनिधींना ती दृष्टी येण्याची. ही सगळी स्थानके कन्नड आणि सोयगांव या तालुक्यांच्या ठिकाणाहून खूपच जवळ आहेत. मात्र स्वातंत्र्य मिळाल्यापासून ही पर्यटनस्थळे असणारा हा संपूर्ण डोंगरपट्टा कोणत्याही एका तालुक्यात आणि कोणत्याही एका आमदाराच्या किंवा खासदाराच्या कार्यक्षेत्रात येत नाही.
तालुका सोयगांव पण मतदारसंघ कन्नड किंवा सिल्लोड. त्यामुळे या डोंगरपट्टय़ाच्या पर्यटन विकासासाठी चाळीसगांव, कन्नड, नांदगांव, सिल्लोड आणि सोयगांव या प्रशासनिक व्यवस्थेचे एकत्रित असे नियोजन व्हावे लागेल. आपल्या परिसरातील शाळा-महाविद्यालयांचे स्वस्तात असे पर्यटन व्हावे, या उद्देशाने कन्नड तालुक्याचे माजी आमदार कै. अप्पासाहेब नागदकर यांचे प्रयत्न मोलाचे आहेत. चाळीसगांव ते सोयगांव आणि पुरणवाडी ते सिल्लोड या डोंगराच्या दोनही बाजूने जाणाऱ्या समांतर रस्त्यांना मधले रस्ते जोडण्याची त्यांची इच्छा होती. त्यामुळे पाटणादेवी, पितळखोरा लेणी, मदासीबाबा, केदाऱ्या धबधबा, धवलतीर्थ धबधबा, गौताळा अभयारण्य, गौतमऋषी, सितान्हाणी, गोल टाकं व लेणी, धारकुन्ड लेणी, घटोत्कच लेणी, अजिंठा लेणी, जोगेश्वरी, मुडेश्वरी, कालीमठ, अन्वाचे मंदिर, पिशोरचे मंदिर, वाकी, पेडक्या किल्ला, चिंध्या देव, किले अंतूर, नायगांवचा वाडीसुतोंडा किल्ला, वेताळवाडी किल्ला, हळद्या किल्ला, खालच्या व वरच्या पट्टय़ातली शेकडो जुनी हेमाडपंथी मंदिरे, शेकडोवर असलेली पिण्याच्या पाण्याची कोरीव टाकी या पर्यटनासाठी जोडली जाणार होती. पंण ते होऊ शकले नाही. आजही ही सगळी तीर्थक्षेत्रांचा दर्जा प्राप्त झालेली स्थळे रस्त्यांच्या जोडणीअभावी व पर्यटकांच्या सोयीअभावी ओस पडलेली आहेत.
औरंगाबाद जिल्ह्य़ातील पितळखोरा ते अजिंठा या सातमाळाच्या रांगेत अनेक किल्ले, टेहळणी नाके आहेत. त्यांचा शास्त्रीय असा अभ्यास झालेला नाही. दौलताबाद या सुप्रसिद्ध किल्ल्याशिवाय सुतोडा, वैसागड, लोजा, पेडक्या, हळद्या, वेताळवाडी यासारखे किल्ले आहेत.
सुतोंडा, सायीतोडा, वाडी किल्ला, वाडीसुतोडा किल्ला हा वाडीसुतोंडा किल्ला, नायगांव किल्ला, वाडी किल्ला या नावांनी परिसरात ओळखला जातो. हा किल्ला चाळीसगांव ते सोयगांव या रस्त्यावरील बनोटी या मोठय़ा गावापासून तीन ते पाच किमी अंतरावर आहे. नायगांव या गावाला लागून हा किल्ला आहे. नायगांव हे नाव या गावाचे असले तरी त्याचे शेजारी ओसाड उजाड गाव होते व त्या गावाचे नाव सुतोंडा व बाजूच्या गावाचे नाव वाडी यावरून तो परिसर वाडीसुतोंडा म्हणून ओळखतात. तेथे जे मोठे धरण बांधले गेले आहे त्या धरणाच्या पूर्वेला नायगांव हे परिसरात परिचित असणारे गाव. तर या धरणाच्या पश्चिमेला धारकुंड धबधबा, महादेव व लेणी असलेले ठिकाण. या दोनही ठिकाणी जाण्यासाठी बनोटी या गावाहून रस्ता आहे. परिसरात मात्र वाडीसुतोंडा किल्ला हे नाव जनमानसात प्रसिद्ध नाही. त्यासाठी नायगांव हेच नाव विचारावे लागते. औरंगाबादच्या गॅझेटमध्ये या किल्ल्याला साईतेंडा म्हटले असून, तो कन्नडपासून उत्तरपूर्व दिशेला २६ किमी अंतरावर असल्याची नोंद आहे. दख्खन प्रांतावर मुस्लमांचे राज्य येण्यापूर्वी हा सातोंडा किल्ला कुणी मराठाराजाने बांधला असावा. काही देशमुखांकडे औरंगजेबने या किल्ल्याबाबत दिलेली सनदही असल्याचा उल्लेख गॅझेटमध्ये दिलेला आहे. मात्र नायगांव (जुने सुतोंडा, सायीतोंडा) हे गाव ६५ ते ७० घरांचे असून ३५० ते ३८० लोकवस्तीचे गाव आहे. सगळे लोक शेती व दुग्धव्यवसाय करतात. चौथीपर्यंत जिल्हा परिषदेची शाळाही आहे. गावांत प्रमुख गवळी, मराठे असून व इतर जातीही आहेत. डोंगरावरील कन्नड सिल्लोड तालुक्याच्या हद्दीवरील घाटनांदाचा अवघड व उंच डोगर उतरून हा किल्ला सहा ते आठ कि.मी. अंतरावर आहे.
मुख्य प्रवेशद्वार व तटबंदी : वाडीसुतोंडा किंवा सायीतेंडा हा किल्ला उंच अशा मुख्य डोगरात नसून पुढे आलेल्या डोंगररांगेच्या एका उंच टेकडीवर आहे. मुख्य दरवाजा हा मूळ उंच असलेल्या डोंगररांगांच्या दिशेने म्हणजे दक्षिणेकडून आहे. (किल्ले अंतूरचाही मुख्य दरवाजा हा दक्षिणमुखीच आहे.) नायगांवकडून, दक्षिणेकडून आल्यावर संपूर्ण गोल टेकडीचा भाग ओलांडून मागच्या अध्र्या डोंगरातून मुख्य दरवाजा दिसतो. मूळ डोंगररांगेचा उंच असा भाग कापून टाकून मोठा खंदक तयार केलेला आहे. या खंदकाच्या उत्तरेकडील उंच खडकात मुख्य दरवाजा हा कोरलेला आहे. त्या समोरचा दक्षिणेकडील उंच कडा हाही सलग अशा डोंगराच्या उंचीचा खडकाचा आहे. या उंच डोंगरातूनही कुणी शत्रू या किल्ल्याकडे येऊ शकणार नाही अशी कडय़ाची उंची आहे. इतर किल्ले हे कुठेतरी बांधकाम केलेल्या तटबंदीला लागून असलेल्या मजबूत बांधकामात भलीमोठी चौकट बसवून फळ्या लावलेल्या दिसतात. मात्र या सुतोंडा किल्ल्यावर कोणत्याही बांधकामात हा मुख्य दरवाजा नाही. तर तो खडकात, उंच कडय़ाच्या तळाशी कोरलेला आहे. आत जाणारा त्या खडकाच्या दरवाजात उत्तरेकडे तोंड करून जातो तोच त्याला त्या खडकातील मंडपाच्या उजव्या बाजूला पूर्वेकडे तोंड करून व पुन्हा उत्तरेकडे वळून खडकांतील भुयारी मार्गातून वर किल्ल्यावर निघावे लागते. या मार्गात शिरलेल्या शत्रूवर हल्ला करण्यासाठी सन्याला लपून बसण्यासाठीच्या जागाही आहेत. या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंच या कडय़ावरील खडकांवर बांधकामांसाठी चुना वगरे न वापरता दगडावर दगड रचून उंच अशा िभती उभारलेल्या आहेत. उत्तरेकडील सुतोंडा गावाच्या दिशेने बऱ्याच अंतरापर्यंतची नसíगक कडय़ांची तटबंदी तर आहेच, त्याशिवायही दगडांवर दगड रचून केलेली दगडांची तटबंदी अजूनही सुरक्षित आहे. या किल्ल्याला तीनही बाजूने नसíगक उंच कडा आहेत, तर दक्षिणेकडून मुख्य डोंगररांगेची सलगता ही खोल खंदकाने तोडलेली आहे. उत्तरेकडील (गावाच्या दिशेकडील) लहान दरवाजा हा दगडाचे चिरे एकावर एक रचून तयार केलेला आहे. हा दरवाजा लहान असून त्यातून माणसांनाच प्रवेश करता येईल असा सामान्य दरवाजाप्रमाणे पाच फूट एवढाच तो उंच आहे.
उत्तरेकडील पाण्याची टाकी लहान दगड रचून तयार केलेल्या या दरवाजाच्या बाहेर त्या अवघड अशा डोंगरकडांवर तीन-चार मोठे पाण्याची टाकी आहेत. काही टाकी मातीखाली दबून झाकली गेलेली आहेत. त्या टाक्यांमध्ये लेण्या कोरण्याचाही प्रयत्न झालेला आहे. या टाक्यांच्या भिंतीत मूर्ती कोरलेल्या आहेत. मूर्तीच्या डोक्यावर काही चित्रेही कोरलेली आहेत. या टाक्यांना दगडाचे कोरीव प्रवेशव्दार असून त्या दगडांच्या चौकटीवरही नक्षीकाम कोरलेले आहे. या हिंदू देवतांच्या मूर्ती आहेत. या लेण्यांच्या वा लेणीवजा असणाऱ्या पाण्याच्या टाक्यांतील सगळे खांब हेसुद्धा नक्षीकाम केलेले आहेत. बहुतांश मोठमोठय़ा पाण्याच्या टाक्यांची रचना ही कोरलेल्या लेण्याप्रमाणेच आहेत. मुख्य प्रवेशद्वार व मागचे लहान दार याशिवाय तटबंदीला लागून इतर दरवाजे नाहीत. मात्र या लहान मागच्या दरवाजातून प्रवेश केला व वर थोडे अंतर चढून गेले तर एक उंच पडकी अशी रेखीव पण दोन कालखंडात बांधकाम केलेली कमान व दर्गा दिसतो. त्या शेजारी आपल्याला आधी दर्शन होते ते पाचपन्नास अशा पाण्याच्या कोरीव टाक्यांचे त्यांचा वरचा सगळा भाग हा उघडा असून मोठमोठय़ा हौदांप्रमाणे ते दिसतात. या सलग असलेल्या उघडय़ा हौदाप्रमाणे असलेल्या पाण्याच्या टाक्यांची विशिष्ट अशी रचना आहे. मोठमोठी हौदासारखी ही टाकी सलग एका रांगेत आहेत. त्या शेजारी दुसरी थोडय़ा आकाराने लहान असलेल्या हौदांची रांग आहे. तिला लागून तिसरी हौदांची रांग ही मोठय़ा तोंडाच्या रांजणाच्या आकाराच्या हौदांची आहे. म्हणजे या तिसऱ्या रांगेतून हत्ती, घोडे यांनाही पाणी पिता येईल अशी दिसते किंवा तिसऱ्या टप्प्यातील ही रांग तिसऱ्यांदा पाणी गाळून पुढे सरकलेले असल्याने ते अधिक स्वच्छ आढळते. मात्र हा सलग पाच शेते हजार फूट लांबीच्या या पाण्याच्या दगडी हौदांच्या तिहेरी रांगेच्याही खाली या डोंगराच्या उर्वरित तीनही बाजूने पाण्याची मोठमोठी लेणीवजा बंद टाकी आहेत.
दक्षिण दिशेची पाण्याची टाकी त्यापकी किल्ल्याच्या दक्षिण भागात असलेल्या दगडी टाक्यांचे तीन मजले आढळतात. यांची संख्या ही १० ते १५ असेल. प्रत्येक पाण्याच्या या लेणीचे (टाक्याच्या) छतावरून पुढे गेले तर आपण दुसऱ्या पाण्याच्या टाक्याच्या लेणीत घुसतो, तसेच वर चढून पुन्हा तिसऱ्या पाण्याच्या टाक्याच्या लेणीत शिरतो. अशी ही पिण्याच्या पाण्यांच्या टाक्यांची (की कोरीव लेण्यांची?) तीनस्तरीय रचना किल्ल्याच्या दक्षिण भागात दिसते. या पाण्याच्या लेणीवजा टाक्यांत मोठमोठय़ा कोरीव खांबांच्या १५ ते २० फुटांवरील अशा तीन तीन रांगाही आढळतात. या एका रांगेतील खांबांची संख्या ही एक, दोनपासून ते ती आठ, दहापर्यंत लेणीनिहाय आहे. दोन दगडी खांबांमधील अंतर हे लेणींच्या आकारानुसार पाच फुटापासून ते २० फुटांपर्यंत आढळते. मोठय़ा पाण्याच्या टाक्यांना बाहेरच्या कडांना लागून पायऱ्याही आहेत. त्या पायऱ्यांनी पाण्यापर्यंत जाऊन पाणी घेता येते. खूप मोठा परिसर व्यापणाऱ्या काही टाक्यांना दगडांच्या कडांवर खिडक्याही कोरलेल्या आहेत. ही मोठी टाकी खोलीला कमी (पाच पासून २० फूट) असली तरी ती लांबीला व रुंदीला (२०० ते ४०० फूट) ती भरपूर मोठी आहेत. दक्षिणेकडील या पाण्याच्या टाक्यांचे पाणी अतिशय थंड व चांगल्या गोड चवीचे आहे. या टाक्यांचे पाणी साधारणत: चार ते पाच ठिकाणी गाळून आलेले असते. या सगळ्य़ा पाण्याच्या टाक्यांमध्ये पाणी पाझरून आत आणणाऱ्या काही हिरवट रंगांच्या ढिसूळ अशा नहरवजा खडकांच्या रेषा उपयुक्त ठरतात असे काही ठिकाणी आढळते. खडकांत असलेल्या या हिरव्या खडकांच्या रंगीत रेषा पावसाच्या पाण्यामुळे अधिक ढिसूळ बनून तेवढा हिरव्या दगडाचा भाग बाजूला गळून जाऊन तो नहराचे वा पाण्याच्या चारीचे काम करतो असेही आढळते.
पूर्वेकडील पाण्याची टाकी
या सुतोंडा किल्ल्याच्या पूर्वे दिशेला काही मोठी लेणीवजा टाकी आहेत. काही ठिकाणी दोन तीन टाकी- लेणी- या सलग असल्या तरी एकातून दुसऱ्या टाक्यात ठरावीक उंचीवरून पाणी जावे असे दगडाला मोठे नक्षीदार छिद्र कोरलेले आढळते. दोन टाक्यांमध्ये अखंड दगडाची (टाकी कोरतानाच) भिंत तयार केलेली दिसते. अशा भिंतीची सहा ते १२ इंचाची जाडी ठेवलेली दिसते. दक्षिण-पूर्व दिशेला असलेल्या एका मोठ्य़ा टाक्यात पाच ते सात खांबांची आडवी रांग (पसरट) व चार खांबांची उभी (आत खोल होत जाणारी ) रांग आहे. तिसऱ्या खांबापर्यंत दोन ते तीन फूट पाण्यातून चालत गेले तर तेथे दक्षिणेकडील दगडाच्या भिंतीत अंधारात पाण्यातून किंचित वर असलेली गुप्त खोली आहे. ती कोरडी राहते, पाण्याचा अंशही तेथे नसतो. शत्रूपासून लपून बसणे किंवा धनदौलत लपवून ठेवणे या कामांसाठी ती वापरली जात असावी. असल्याच प्रकारची काही टाकी याच डोंगररांगेत असणाऱ्या पेडक्या या किल्ल्यात (कळंकी, ता. कन्नड जि. औरंगाबाद) आढळते. तेथेही या पाण्याच्या टाक्यात असले चोरकप्पे आढळतात.
टाक्यातील दगडांचा वापर
ही टाकी कोरताना दगडांचे जे उभे चिरे काढले आहेत, ते सगळे चिरे एकावर एक रचून तटबंदीच्या भिंती तयार केलेल्या आहेत. मागील लहान दरवाजाही तसल्याच चिऱ्यांचा आहे. समोरच्या कडय़ात कोरलेल्या मुख्य प्रवेशव्दारावरही वरच्या उंच िभतीच्या उभारणीसाठीही असलेच दगडाचे मोठमोठे चिरे वापरलेले आहेत. (असली टाकी कोरून बनविलेल्या तलावाच्या चौफेरच्या भिंती व पायऱ्यांसाठी असा चिऱ्यांचा वापर याच डोंगरातील गौताळा तलावावर केलेला आढळतो.) तसेच कन्नडपासून दहा किलोमीटर अंतरावरील किल्ले अंतूरच्या तलावाजवळील दर्गाच्या वरचा समोरील किंवा किल्ल्याच्या दुसऱ्या प्रवेशव्दाराजवळची खोली समोरील दर्शनी भाग यावर फसविलेल्या तिरकस अशा चापट दगडांच्या तिरकस ठेवलेल्या तळ्य़ा (पावसाचे पाणी आत येऊ नये म्हणून ठेवलेल्या दारावरील तिरप्या पत्रांप्रमाणे) यांची रचना पाहता त्या रचनेशी जुळणारी रचना या सुतोंडा किल्ल्याच्या भव्य पडक्या कमानीच्या वर लावलेल्या दगडांच्या रचनेशी जुळताना दिसते. ते काम व तटबंदीच्या काही भागांचे काम हे जर सोळाव्या शतकातले असेल तर उत्तरेकडील मूर्ती असलेल्या लेणीवजा कोरलेल्या पाण्याच्या टाक्यांचा काळ हा चौथ्या पाचव्या शतकात घेऊन जाईल असे दिसते. (अर्थात हा इतिहासाच्या संशोधनाचा विषय आहे.)
वैशिष्ट्य़े : किल्यात किल्ला म्हणून असे कोठार घरे, तोफा, भुयारे असे काहीही आढळत नाही. मात्र कोणत्याही किल्ल्यात नसतील एवढी पाण्याची टाकी येथे खोदलेली आहेत. तीही अनेक मजली. ही लेणीवजा पाण्याचीच टाकी म्हणून कोरली की लेणी खोदलेल्या होत्या व त्यात पाणी पाझरल्याने कालांतराने पुढे किल्ला बनून ती पाण्याची टाकी म्हणून वापरली गेलीत हा प्रश्नच आहे.
किल्ल्याची पाण्याची टाकी म्हणूनच ती कोरली गेली असतील तर जलनियोजनाचा, जलव्यवस्थापनाचा महाराष्ट्रातील तो एक उत्कृष्ट नमुनाच आहे. शे-पन्नास पाण्याची टाकी, तीनचार वेळा फिल्टर होऊन येणारे पाणी. दुष्काळातही टिकणारे पाणी. प्रश्न पडतो की हा किल्ला भव्यही नाही. मात्र एवढी पाण्याची टाकी का कोरलीत? कोणत्याही मोठय़ा किल्ल्यावर एवढी पाण्याची टाकी नाहीत. पाण्याची इतकी गरज कुठेही आढळलेली नाही. मग येथे एवढे पाणी का साठविले? अशी आख्यायिका आहे की, या किल्ल्याच्या एका हौदात टाकलेला िलबू पाण्यावर तरंगत वाहात जाऊन तो आठ ते दहा किमी असलेल्या बनोटीच्या नदीकाठावरील महादेव मंदिराजवळील गो मुखातून बाहेर पडतो. असे जर असेल तर आपल्या राज्यात तत्कालीन राजाने वा किल्लेदाराने असला पाणीपुरवठा कुठे कुठे केलेला होता, हाही संशोधनाचा विषय ठरेल.
या किल्ल्याचे दुसरे वैशिष्ट्य़ असे की याचे मुख्य प्रवेशव्दार हे खडकाच्या उंच कडय़ातून कोरलेले आहे. सगळीकडे दगडाचे चिरे हे चुण्याचा वापर न करता एकावर एक बसविलेले आहेत. या किल्ल्यात ज्या काही दगडात कोरलेल्या लहान खोल्या आहेत, त्या वाघाच्या खोल्या म्हणून ओळखल्या जातात. पाळीव वाघ या खोल्यात कोंडून ठेवत असत, अशी आख्यायिका आहे. या किल्ल्यात हत्ती वावरू शकेल अशी मुख्य प्रवेशव्दाराची व पायऱ्यांची वा रस्त्याची रचना वाटत नाही. फार तर घोडेस्वार सहज फिरू शकेल अशी ती रचना आढळते. विशेष म्हणजे किल्ल्यावर वापरता येईल अशी सपाट जागा वा मदानही नाही. कुठे भुयारे वा भुयारी घरेही असू शकत नाही
कारण चारही बाजूने पाण्याच्या टाक्यांचे की लेणींचे थर आहेत व या लेणींचे थरांचाच हा डोंगर आहे. प्रत्येक टाक्याच्या वरची छताची बाजू हीच काय सपाट व मोकळी जागा आढळते. वर उंच डोंगराचा सुळका होत गेलेला आहे. वर टोकांवर दगड रचून केलेल्या भिंतीच आहेत. असलाच तर मोठा कोठार घरावजा भाग असेल, पण तोही काही खूप भव्य वाटत नाही. त्यामुळे त्या ठिकाणची टाकी, उत्तरेकडील लहान दगड रचून केलेले द्वार, दक्षिणेकडील कडा कोरून कोरलेले मोठे प्रवेशव्दार आणि मध्यभागी बांधलेले भव्य, उंच अशी कमान ह्यंचा बांधकामाचा काळ एक वाटत नाही. या सर्व कोरलेल्या टाक्यांचा काळ व या इतर बांधकांमाचा काळही एक वाटत नाही. मात्र तो परिसर वैभवसंपन्न असावा. याच डोंगराला लागून बाजारपट्टय़ाच्या ओटय़ांच्या खुणा आहेत, पय्ये आहेत. या परिसरात हत्ती व घोडे खरेदीसाठी मोठा बाजार भरत असे अशी आख्यायिका आहे.
मग हा किल्ला आहे की, कोरलेल्या लेणींचे रूपांतर पुढे किल्ला बनवून या वस्तीसाठी झालं? जंगल कुरणांनी वैभवसंपन्न अशा भागात या मोठय़ा बाजारपेठेसाठी हत्ती, घोडे पुरविणाऱ्या श्रीमंत व्यापाराची ही जनावरे सांभाळण्याची व राहण्याची तर जागा नसावी ना? आपली जनवारे, वैभवसंपन्नतेवर हल्ला होऊ नये म्हणून किल्लेवजा तटबंदी त्यानेच तर केली नसावी ना? आपल्या जनावरांसाठी वर्षभराचे पाणी साठविण्यासाठीच ही एवढी टाकी कोरली नसतील ना? की एखादा श्रीमंत सरदाराचे येथे वास्तव्य होते? की जुन्या दक्षिणपथाच्या व्यापारी मार्गावरील हे एक थांब्याचे ठिकाण होते अशीही शंका येते.
या परिसरातील या सुतोंडा किल्ल्यावर व त्याच्या आजूबाजूच्या परिसरातील इतर बाबीवर इतिहास संशोधकांनी अधिकचे संशोधन करून प्रकाश टाकणे अगत्याचे आहे.
डॉ. रमेश सूर्यवंशी – response.lokprabha@expressindia.com